हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कुंचल्यातून रेषा सहज फटकार्यांनी किती प्रत्ययकारी आणि जिवंत होत आणि एरवी अवघड वाटणारी कल्पनाही किती सोपी भासत असे, याचं उत्तम उदाहरण असलेलं हे व्यंगचित्र… इंदिरा गांधींच्या लाटेने मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष आणि विरोधी गट या दोहोंची होडकी कशी उधळून लावली, ते दाखवून देणार्या या व्यंगचित्रात इंदिराजींच्या करारी मुद्रेचे भेदक डोळे हृदयाचा ठाव घेतात, त्यांच्या त्या सुप्रसिद्ध केशरचनेचं रूपांतर लाटांमध्ये होतं आणि त्यात पूर्ण भेलकांडलेली होडकी दिसतात… इंदिरा लाटेने विरोधकांचे कसे कस्पट करून टाकले होते, याचं अप्रतिम दर्शन घडवणारं हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नुकताच लागलेला ‘निकाल’ आठवतो… इथे १४४ जागांपैकी १३४ जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत… पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याचा भारतीय जनता पक्षाच्या बलदंड सरकारचा अक्राळविक्राळ प्रयत्न वंगबंधूंनी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने हाणून पाडला. त्यातून काहीही न शिकलेल्या भाजपची अवस्था कोलकात्यात- होडके सोडा, ते फार मोठे असते- पार पाचोळ्यासारखी होऊन गेली ममता लाटेत.