कौतिकराव ठाले पाटील
चालते-फिरते आमचे दुकान
बोलते तेव्हा कौतुक होते
ठाले पाटील म्हणतात मला
साहित्याशी घट्टच नाते
– – –
माझ्यासारखा चिरतरुण
संमेलनात वावरतो
तरुणांनाही लाज वाटेल
थंडी-वाराही घाबरतो
– – –
इतरांनीही माझ्यासारखा
साहित्याचा काढा प्यावा
भांगेसारखा चढत जातो
तेव्हा ‘मंकी’ होऊ द्यावा
छगन भुजबळ
भाषणांपेक्षा भोजनानेच
रसिकांची पोटे भरतात
नाशकात आम्ही सिद्ध केले
तृप्त मनाने ढेकर देतात
– – –
कधी वाटते आपणसुद्धा
भोजन-संमेलन भरवावे
पंचपक्वानांची रेलचेल
जे हवे ते खाऊ द्यावे
– – –
खाऊन खाऊन किती खातील
ते काही पैसे नाहीत
तेच खरे खाद्यप्रेमी
हौसे, गवसे, नवसे नाहीत
रामदास आठवले
मी होतो दिल्लीत तेव्हा
नाशकात कवींची होती झुंबड
प्राण ओतत होते कवितेत
उगाच म्हणतात फुक्कट बडबड
– – –
कविकट्ट्यावरचे अनुभव
समोर नाचत होते तेव्हा
मोदी म्हणाले, ध्यान किधर है
कळले शुद्धीत आलो जेव्हा
– – –
मी जेव्हा कवितेत बोलतो
तुम्हाला वाटते करतो टाइमपास
त्यालासुद्धा लागते डोके
नाहीतर व्हावे लागते नापास
देवेंद्र फडणवीस
हुकले माझे संमेलन ते
माझ्या अनुपस्थितीतही गाजले
त्रिवार निषेध करून ‘त्यांचा’
आम्ही गुंडाळले बिर्हाड-बाजले
– – –
कान टवकारून बसले लोक
आवाज येईल ‘पुन्हा येईन’
नाही शक्य झाले मला
आता टेपच करून घेईन
– – –
साहित्य वाचून वाचून थकलो
घरात गाणे ऐकून पकलो
वेळ रिकामा जातच नाही
आता माईकपुढे झुकलो
निमंत्रण पत्रिका
नावे छोटी करूनसुद्धा
माणूस छोटा होत नाही
सूर्यापुढे काजव्याचा
उजेडसुद्धा दिसत नाही
– – –
शब्दाने जो प्रकाश पडतो
वैज्ञानिक लालित्याचा
शरीर दुबळे थकते बघून
दुरून उत्सव साहित्याचा
– – –
रसिक येतात प्रेमापोटी
जशी वारी साहित्याची
बडव्यांचा तो तोरा बघून
चिंता करती विठ्ठलाची