रणवीर सिंह, दीपिका आणि प्रियंका चोप्रा यांनी गाजवलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये प्रियंकाने रंगवलेली काशीबाई आपण पाहिली. पण त्यात कथानकच बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमप्रकरणावर बेतलेले असल्यामुळे काशीबाई तशी दुर्लक्षितच राहिली. मात्र मुळात ती कोण होती? कोणत्या घराण्यातून आली? बाजीरावाचे लग्न तिच्याशी कसे झाले? हे प्रश्न तेव्हा अनुत्तरितच राहिले. काशीबाईचा भूतकाळही उज्वल होता. ती लाडात वाढलेली एक श्रीमंताघरची कन्या होती. या भाबड्या पण मनाने भक्कम असलेल्या मुलीचे मराठा साम्राज्यातील एका मुत्सद्दी प्रशासकात कसे रूपांतर झाले त्याची कथा ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या झी टीव्हीवरील मालिकेत पाहायला मिळते.
—-
चित्रपट असो की मालिका… प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवणं महत्त्वाचं असतं. ते कथानक प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन गेलं तर ते ते गुंतून राहू शकतात. तसं न होणं हे ऐतिहासिक काळावर बेतलेल्या मालिका फसण्याचं कारण असू शकतं. मात्र झी टीव्हीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या मालिकेचा पहिला भाग पाहूनच प्रेक्षक चक्क त्या काळात जाऊन पोहोचतात. कर्जतच्या एन.डी. स्टुडिओत या मालिकेचा खास सेट लावण्यात आला आहे. तेथे इतिहास अक्षरश: जागा झाल्यासारखा जाणवतो.
बुलंद भलामोठा दरवाजा असो, पुरातन काळातल्या पेशव्यांचा महाल असो, भरभक्कम तलवारी आणि ढाली असोत की अगदी कलाकारांचे जुन्या स्टाईलचे संवाद असोत… कुठेही तडजोड करण्यात आलेली दिसत नाही. म्हणूनच पेशवे बाजीरावांची पत्नी काशीबाई हिच्या बालपणीच्या काळात डोकावताना प्रेक्षक गुंग होतात आणि आपणही त्याच काळाचे साक्षीदार असल्यासारखे वाटते. या मालिकेचा पहिला भाग सुरू झाला, त्याच दिवशी कर्जतच्या एन.डी. स्टुडिओत काही मोजक्या पत्रकारांसमोर पेशवाईचा हा काळ उलगडण्यात आला. तेव्हा आपण पेशवाईच्या काळात आल्याचे वाटत होते. काशीबाई, तिचे आईवडील यांचे डोलीतून येणं, छोट्या बाजीरावाचं घोड्यावरून दिमाखात प्रवेश करणं या सगळ्याचा याचि देही याचि डोळा अनुभव घेता आला.
नितीन देसाई यांच्या या स्टुडिओत याआधीही ‘जोधा अकबर’, ‘अजिंठा’ आणि इतरही काही ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील मालिका, सिनेमांचे चित्रण झालेच आहे. आता ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ मालिका सुरू आहे. रणवीर सिंह, दीपिका आणि प्रियंका चोप्रा यांनी गाजवलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये प्रियंकाने रंगवलेली काशीबाई आपण पाहिली. पण त्यात कथानकच बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमप्रकरणावर बेतलेले असल्यामुळे काशीबाई तशी दुर्लक्षितच राहिली. मात्र मुळात ती कोण होती? कोणत्या घराण्यातून आली? बाजीरावाचे लग्न तिच्याशी कसे झाले? हे प्रश्न तेव्हा अनुत्तरितच राहिले. काशीबाईचा भूतकाळही उज्वल होता. ती लाडात वाढलेली एक श्रीमंताघरची कन्या होती. या भाबड्या पण मनाने भक्कम असलेल्या मुलीचे मराठा साम्राज्यातील एका मुत्सद्दी प्रशासकात कसे रूपांतर झाले त्याची कथा आपल्याला या मालिकेत पाहायला मिळते.
आता ऐतिहासिक कालखंडावर आधारलेली कल्पनारम्य मालिका करायची म्हणजे कलाकारांची निवड योग्य होणं हे ओघाने आलंच… काशीबाईचा मृदूपणा, लाघवीपणा, तिचे बालपणापासूनच असलेले पक्के विचार, तिची मतं हे सगळं व्यक्त होणारा चेहरा मिळणं या भूमिकेसाठी अतिशय गरजेचं होतं… मात्र नऊ वर्षांच्या छोट्याशा आरोही पटेलमध्ये हे सगळं होतं म्हणूनच छोट्या काशीबाईच्या भूमिकेसाठी तिची निवड अतिशय योग्य असल्याचं पदोपदी जाणवतं. ही भूमिका मिळाल्यावर कसं वाटलं, असं थेट छोट्या आरोहीला विचारलं, तेव्हा हसत ती म्हणाली, ही प्रमुख भूमिका मिळाली, तेव्हा मला खूप आनंद झाला. पण मनातून थोडी धाकधूकही वाटली. कारण एकतर ही माझी पहिलीच मालिका… त्यात देशाच्या गौरवशाली इतिहासातल्या एका महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तीची भूमिका असल्याने मी थरारून गेले. पण आमच्या टीमने भूमिकेसाठी खूप मदत केली. यातील एका प्रसंगासाठी मला घोडेस्वारीही शिकावी लागली.
मालिकेत आरोही लहानपणीच्या काशीबाईची भूमिका साकारतेय. महादजी जोशी या श्रीमंत सावकारांची ती लाडकी कन्या असते. तिला आई-वडिलांबरोबर सरळ-साधं जीवन जगायचं असतं. जग जिंकण्याची किंवा त्यावर अधिराज्य गाजविण्याची वगैरे अजिबात इच्छा नसते. ती भोवतीच्या सर्वांना नेहमी मदत करत असे. थोडी लाडावलेली असली, तरी ती तीव्र बुद्धिमान असते. कोणत्याही परिस्थितीतला कसं तोंड द्यायचं, याचे धडे तिला आईवडिलांकडून मिळाले आहेत. ते ती आपल्या पालकांकडून शिकते. ही व्यक्तिरेखा दमदार आहे, हे खरेच.
ती म्हणाली, या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. काही दिवसांनी मला कॉल आला आणि त्यानंतर आम्ही तीन-चार लुक टेस्ट केल्या आणि मग माझी निवड झाली. भूमिकेच्या पूर्वतयारीबद्दल सांगायचे तर आमची क्रिएटिव्ह टीम माझ्याबरोबर बराच वेळ असते. मराठा साम्राज्य आणि काशीबाईंच्या जीवनाची ते मला माहिती देतात. त्यामुळे मला लहानपणीच्या काशीबाईची व्यक्तिरेखा समजली आहे. रोज चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मी दिग्दर्शकांबरोबर चर्चा करते. त्या दिवशीच्या प्रसंगात माझी देहबोली कशी असावी, माझं वागणं-बोलणं, हातवारे कसे असावेत, याची ते मला माहिती देतात. त्यामुळे माझी भूमिका नैसर्गिकपणे साकारली जाते. काशीबाईंप्रमाणेच मी या भूमिकेसाठी मराठी आणि संस्कृत भाषा शिकले आहे. मला मराठी संस्कृतीबद्दल बरीच माहिती मिळाली आहे.
आरोहीला आपला अभ्यास सांभाळूनच या मालिकेचे चित्रिकरण करावे लागते. कोरोना संकटामुळे तिचा अभ्यास घरूनच ऑनलाइन असला तरी अभ्यास आणि चित्रीकरण याचा मेळ तिला घालावाच लागतो. याबाबत बोलताना ती म्हणते, हो, अभ्यास ऑनलाइनच सुरू आहे, पण यात माझ्या शाळेतील शिक्षक मला खूपच सहकार्य करत आहेत. कोरोना साथीमुळे आमचे वर्ग ऑनलाइनच भरत असतात. त्यामुळे मला माझ्या कोणत्याच विषयांचे वर्ग बुडवावे लागले नाहीत. सकाळी मी शाळेत ऑनलाइन सहभागी होते आणि दिवसभर चित्रीकरण करते, असेही ती स्पष्ट करते.
मालिका काशीबाईवर असली तरी यात बाजीराव पेशव्यांचीही व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे. बाजीरावांच्या बालपणीची भूमिका वेंकटेश पांडे करतोय. तोही भूमिकेला साजेसाच आहे. तो म्हणाला, मराठा साम्राज्याचे महान योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारायला मिळतेय या कल्पनेनेच मी खरं तर शहारलो. इतकी महत्त्वाची भूमिका, तीही कारकीर्दीत पहिल्यांदाच साकारण्याची संधी मिळत असल्याचा निश्चितच अभिमान वाटतो. बाजीरावांचा कणखरपणा, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि वयाच्या तुलनेत असलेली त्यांची परिपक्वता यामुळे ते त्यांच्या वयाच्या अन्य नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. ही भूमिका योग्य रीतीने साकारण्याचे माझ्यापुढे मोठं आव्हानच आहे, असेही तो म्हणाला.