केंद्र सरकारला नेमकी कशाची माहिती असते?
शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या कथित ७०० शेतकर्यांपैकी एकाच्याही मृत्यूची माहिती सरकारकडे नाही, असे आताच केंद्रीय कृषिमंत्र्यानी लोकसभेत सांगितले.
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये चालत, सायकलवर स्वतःच्या राज्यात गेलेल्या लाखो व्यक्तींपैकी एकाही व्यक्तीची सरकारला माहिती नाही.
कोविडच्या दुसर्या लाटेत शेकडो लोक ऑक्सिजनशिवाय तडफडत मरताना मीडियाने दाखवले, पण सरकारकडे त्याचीही माहिती नाही.
त्याच लाटेत वाळूत पुरलेली हजारो प्रेते गंगेत आणि यमुनेत वाहिली, त्यांचीही माहिती सरकारकडे नव्हती.
अरुणाचल प्रदेशमध्ये चीन गाव वसवते, जे अमेरिका आपल्याला सांगते. पण त्याचीही माहिती या सरकारकडे नसते.
या सरकारला नेमकी कशाची माहिती असते?
– डॉ. विनय काटे
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवासासाठी कोणताही नियम का नाही?
कॉविड हे ग्लोबल पॅनडेमिक आहे ह्याचा अर्थ संपूर्ण जगात पसरले आहे. जेव्हा ह्याची सुरुवात झाली तेव्हा हा रोग काही देशांतच होता. तेव्हा ज्या देशांत एकही केस नव्हती त्यांच्यापुढे बाहेरील देशांतून येणारे प्रवासी थांबवणे, त्यांना क्वारंटीन करणे हे उपाय होते. जेव्हापासून आपल्या देशात रोगी सापडू लागले तेव्हा देशाच्या ज्या भागात सापडत आहेत तिथून रोगी नसलेल्या ठिकाणी जाण्यावर निर्बंध घालणे, क्वारंटीन हे उपाय होते. जेव्हा केसेस खूप वाढल्या तेव्हा लॉक डाऊन हा उपाय होता. आता हा रोग जगात सगळीकडे आणि देशातही सगळीकडे पसरला आहे.
लस आली तेव्हा साथ जोरात सुरू होती. तेव्हा कमीत कमी वेळात सर्वांचे लसीकरण करणे हा उपाय होता.
तो तितक्या परिणामकारक पद्धतीने झाला नाही. तरीही साथ आटोक्यात आली. त्यामुळे निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. मात्र देशाचा असा एकही भाग नाही जिथे कोरोना पोचलेला नाही.
प्रवासासाठी लसीकरण केव्हा गरजेचे असते ते पाहू.
आपण जेव्हा दक्षिण आप्रिâकेत जातो तेव्हा आपल्याला यलो फिव्हरची लस घ्यावी लागते कारण हा रोग तिथेच आहे. किंवा भारतात काही वर्षांपूर्वी राजस्थानात स्वाइन फ्लूची साथ चालू होती, पण मुंबईत नव्हती. तेव्हा तिथे जाताना ती लस घ्यावी असे सजेशन होते. जबरदस्ती नव्हती.
आता वेगवेगळ्या देशांत कॉविडच्या केसेस वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ह्या अटी असणे साहजिक आहे.
पण भारतात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी परिस्थिती असूनही लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवासासाठी कोणताही नियम नाही आणि मुंबईतल्या मुंबईत रोजच्या प्रवासासाठी लसीचे दोन डोस आवश्यक असणे आणि बाकीच्या कोणत्याही वाहनांसाठी तसा काही नियम नसणे ह्याचे काय शास्त्रीय कारण आहे हे मला समजत नाही. लस घेऊनही कॉविड होऊन मृत झालेल्यांची संख्याही भरपूर असताना हा नियम का आणि खोटी सर्टिफिकेट घेऊन पास काढणार्यांना कसे ओळखणार हे मला समजत नाही.
– डॉ. मंजिरी मणेरीकर