तुम्ही म्हणता नया है वह… मग जुन्यांचं काय करायचं?
– मकरंद टिपणीस, पुणे
सगळं जुनंच असतं हो, आपण सतत नया है वह म्हणायचं. लोक गंडतात. मग काहीच जुना उरत नाही
सासर आणि माहेर यांना इंग्रजीत काय म्हणतात?
– अशोक परशुराम परब, ठाणे
त्यांच्या सिनेमात ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणं नसल्यामुळे असले प्रकार तिकडे नाहियेत.
तुम्ही मोठमोठ्या गायक-गायिकांची फर्मास नक्कल करता… ही शक्कल कुठून सुचली?
– रवींद्र महाडिक, रत्नागिरी
‘सतत माझ्याकडे लोकांचं कसं लक्ष जाईल’ या शक्कलेतून.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणे, तुमचे अभिनयगुण कधी दिसले?
– रवींद्र देशपांडे, दादर
खोटं बोलण्यात.
कोकणातला सुप्रसिद्ध बाल्या नाच तुम्ही कधी केला आहे का हो?
– शांता डोंगरे, राजापूर
नाही, तेव्हा जाडीमुळे कंबर हलत नव्हती.
लहानपणी तुम्ही शाळेत बाईंची मस्करी करत होता म्हणे! बाईंनी बरं खपवून घेतलं…
– गंगाधर साठे, पुणे
त्या तुमच्या मातोश्री आहेत का? नमन सांगा.
तुम्ही विग का वापरत नाही?
– रामदास पाथरे, गंगाखेड
विग लोकांसमोर वीक पडतो म्हणून (इथपासूनच मी खोटं वागणं सोडलं)
एक गंभीर प्रश्न. डोक्यावरचे केस तरूण वयात मागे हटले की अनेकांना न्यूनगंड येतो, तसा तुम्हाला आला नाही का? त्यावर कशी मात करावी?
लहानपणीच आत्मज्ञान झालं होतं. दात आणि केस परत येत नाहीत, जे काही करून जाणारं आहे त्याला धरून ठेवलं तरी ते राहणार नाही.. त्याचा न्यून बाळगू नये.
विनोदी अभिनयात तुमचा आदर्श कोण?
– रत्ना शिराळकर, कोल्हापूर
बायको
मारुती कांबळेचं काय झालं?
– शिल्पा कांबळे, जुन्नर
कालच भेटला होता. तुम्ही त्याचे पैसे थकवलेत म्हणे.
कॉलेजात मुली तुमच्यावर लट्टू होत्या का?
– विक्रम यंदे, नाशिक रोड
काय राव, सकाळपासून कोणी भेटलं नाय काय??
तुम्हाला मंत्रिमंडळात संधी मिळाली तर कोणतं खातं आवडेल? का?
– रमाकांत चिंदरकर, चिपळूण
जे खातं कधीही खातं राहण्यासाठी प्रसिद्ध नाही.
कोकणातला कोणता खाद्यपदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय आहे?
– शिवरंजनी अंधारे, सासवड
आंबोळ्या… काळ्या वाटण्याची उसळ
तुमचं पहिलं प्रेम काय? अभिनय, गाणे की चित्रकला?
– दिनकर कामतेकर, चिंचवड, पुणे
आईला सगळी पोर सारखीच, तरीही जे थोडं दुर्लक्षित असतं समाजात ते प्रिय असतं. चित्रकला.
तुम्ही बालनाट्यात अधिक रमता की प्रौढ नाट्यात?
– किमया देशमुख, नागपूर
माझ्या ज्या नाटकात आबाल वृद्ध रमतात ते
विनोदी अभिनयासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता?
– मोहन काळे, बेलापूर
हसणारे प्रेक्षक
तुमच्या नाटकवेडावर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांचा पाठिंबा होता?
– प्रथमेश यादव, काळाचौकी
त्यांची माझ्या कुठल्याच गोष्टीवर प्रतिक्रिया नव्हती. म्हणून इथवर आलो मी
नाटक आणि चित्रपट यापैकी कुठला अभिनय अधिक आव्हानात्मक वाटतो आणि आवडतो?
– सुवर्णा भोसले, कळवा
जिथे पैसे चांगले मिळतात
आपल्याकडे पुरुषांनी बायकांच्या भूमिका करण्याचा एवढा सोस का आहे?
– लता पांढरे, किनवट
विनोदाची वानवा
आपण मोठेपणी इतके चमकू असं तुम्हाला वाटलं होतं का लहानपणी?
– दिलवर शेख, सातारा
हो. ते केस लवकर जायला लागले दहावीत तेव्हाच लक्षात आलं.. टक्कल चमकणार.