वार : रविवार
स्थळ : घर.. अर्थातच स्वतःचं.
इतर दिवशी असणारी लंच टाइमची मर्यादा आज नसल्याने मटण सागुती आणि तांदळाची भाकरी यांचा मनसोक्त आस्वाद घेतल्याने जेवण छान अंगावर आले होते. यावर उतारा म्हणून आईस्क्रीम की मसाला पान यात पानाने बाजी मारली. तेच खायला घराखाली उतरलो आणि जवळच असलेल्या दादरच्या रानडे रोडवरील हल्लीच फक्त पानशौकीनांसाठी उघडलेल्या ‘शौकीन’ या पानाच्या दुकानात शिरलो. समोर गल्ल्यावर बसलेल्या एका उच्चशिक्षित तरुणीने माझे स्वागत केले आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पानभांडारांची ओळख करून दिली, कलकत्ता मसाला पान, मघई पान, चॉकलेट पान… असे अनेक अवीट चवीचे विडे खास विडेप्रेमींसाठी इथे सजवून ठेवले आहेत. दोन पानांचा आस्वाद घेतला, काही पाने कुटुंबीयांसाठी बांधून घेतली आणि दुकानात शिरताना जो पहिला प्रश्न मनात उपस्थित झाला होता तो मी काऊंटरवर पैसे देताना गल्ल्यावर बसलेल्या मुलीला विचारला… पुरुषांची मक्तेदारी असलेलं पानाचं दुकान चालवणारी एक मुलगी कशी?
तिने सांगितलं की पान अधिक संख्येने फक्त पुरुष खातात हा अनेकांचा गैरसमज आहे. माझ्या दुकानात ६० टक्के महिला ग्राहक आहेत आणि जसे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पान पार्सल घेऊन जात आहात तसे अनेक ग्राहक मित्र परिवार आणि कुटुंबीयांसाठी पान घेऊन जातात. हे ऐकून माझी उत्सुकता अजून वाढली. उच्चशिक्षण घेतल्यावर नोकरी न करता व्यवसाय म्हणून हे क्षेत्र का आणि कसे निवडले याबाबत दुकानाच्या मालकिणीला म्हणजेच कु. ऐश्वर्या धनंजय केतकर हिला अधिक बोलते करण्यासाठी मी गप्पा मारण्यासाठी वेळ मागून घेतली.
भारतीय खाद्यसंस्कृतीमधला भोजनोत्तर खाल्ला जाणारा एक महत्त्वाचा मुखशुद्धीचा पदार्थ म्हणजे पान होय. नागवेल या वनस्पतीच्या या पानाचे फायदे प्राचीन धर्मग्रंथात पण सांगितले आहेत. आयुर्वेदात पानांचे औषधी उपाय देखील सांगितले आहेत. अगदी आहाराच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास या पानामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि मिनरल्स यांचा अगदी उत्तम साठा आढळतो. नागवेलीची पानं म्हणे पूर्वी फक्त हिमालयातच सापडत. हिमालयात त्यांच्या विशिष्ट जातींची लागवड केली जात असे. स्वतः माता पार्वती आणि शिव यांनी पानाचे पहिले बीज हिमालयात रोवले आणि तेथपासून या पानांची उत्पत्ती सुरू झाली, असं तिथले लोक मानतात. विड्याच्या पानाच्या उत्पत्तीची अजून एक कथा सांगितली जाते… समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले, तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत ती जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पानं असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी तिला नागवेल हे नाव दिलं. भोजन झाल्यावर देवदेवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.
हा झाला खायच्या पानाचा प्राचीन इतिहास. पण आज पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात उतरलेल्या ऐश्वर्याची पार्श्वभूमी काय? तिने फायनान्स अँड अकाउंट्सची पदवी प्राप्त केली आहे. ती म्हणाली, नोकरी करायची नाही हे मी लहानपणापासूनच ठरवलं होतं. मला माझ्या बाबांकडून बालपणीच व्यवसायाचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे सोने-चांदीच्या आभूषणांचं दुकान आहे. त्यामुळेच यदाकदाचित सोनेचांदीचा पारंपरिक व्यवसाय करण्याची वेळ आलीच तर त्याला पूरक असे जेमॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण मी घेऊन ठेवलं आहे. पण कौटुंबिक व्यवसायाच्या मळलेल्या वाटेने न जाता स्वतःच काहीतरी वेगळं निर्माण करावं आणि छोटासा का असेना स्वतंत्र व्यवसाय असावा, ज्याचे सर्व बरेवाईट निर्णय आपण घेऊ शकू, असा माझा विचार होता. तरूण वयात अपयश पदरी पडलं तरी ते पचविण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते व घरच्यांकडून देखील पाठिंबा मिळतो. सुरुवातीला चुका होतील, परंतु त्यांच्यामधून धडा घेत एक दिवस यशस्वी उद्योजक होऊ असा विचार मनात घोळत होता. मी घरी बोलले तेव्हा आईबाबांनी देखील या कल्पनेला पाठिंबा दिला.
ऐश्वर्याने आज जो व्यवसाय निवडला आहे ते पान आपल्या संस्कृतीमध्ये मंगलदायी समजले जाते. अगदी तुळशीपत्र, बेल, मांजरी, दुर्वा या वनस्पतीप्रमाणे विड्यालासुद्धा महत्व दिले जाते. कुठलाही लग्नसमारंभ असो, पूजा असो, विड्याची पाने अशा वेळी तांब्याच्या कलशात ठेवायला वापरली जातात. या पानांना सांस्कृतिक महत्व आहे. पूर्वीच्या काळी कुठली गोष्ट ठरायची तेव्हा करार म्हणून विड्याची पाने एकमेकांना देण्याचा प्रघात होता.
आपल्या शरीरासाठी पान अनेक प्रकारे उपयोगी ठरते. जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी पचनक्रिया वाढावी लागते. ती पचनक्रिया वाढवण्याचे काम पानामध्ये असलेल्या प्रोबियोटिक्समुळे होते. पचनाची समस्या असणार्यांना पान, लवंग, कात कुटून खायला आवर्जून सांगितले जाते. किंबहुना जुन्या काळी घरात जेवणानंतर पान, कात, लवंग वगैरे खलबत्यात कुटून खाण्याची पद्धत होतीच. तोंडाच्या विकारांमध्येही विड्याचे पान अत्यंत गुणकारी असते. आजकाल लोक तोंडाला दुर्गंध येऊ नये म्हणून मिंटच्या गोळ्या चघळत राहतात. पण, फार कमीजणांना माहित असेल की सकाळ-संध्याकाळ पान खाल्ले तर तोंडाचा दुर्गंध कायमस्वरूपी निघून जातो. अनेक गायकांना आपण पान खाताना बघितले आहे. गायक गळा ठीक करण्यासाठी आणि आवाज मोकळा ठेवण्यासाठी पान खात राहतात. पान हिरड्यांवरची सूजसुद्धा कमी करतं. सर्दीने घसा बसला असेल, कफ झाला असेल तरी त्यावर विड्याची पाने मर्यादित प्रमाणात खाल्यास फरक पडतो.
ऐश्वर्याची नजर या पानांकडे कशी वळली?
आपण कोणतातरी व्यवसाय करावा हे खूप जणांना वाटत असतं, पण नक्की कोणता करायचा याबद्दल काही ठरत नसतं. शेकडो कल्पना मेंदूभोवती रुंजी घालत असतात, अनेक यशस्वी गाथा मोहित करत असतात. परंतु आपल्याला आणि आपल्या खिशाला काय झेपणार आहे, याचा अंदाज घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते. याच मुद्द्यावर ऐश्वर्या म्हणाली, कॉलेजशिक्षण पूर्ण केलेली मुलगी स्वयंरोजगार शोधताना काय काय विचार करेल, ते सर्व मार्ग मी पडताळून पाहिले. पण त्यात काही नावीन्य जाणवलं नाही. अनेक पर्याय चाचपडून पाहिले पण काही ठरत नव्हतं. एकदा मित्र-मैत्रिणींसोबत चर्चा करताना एका मैत्रिणीने पुण्यातील प्रसिद्ध ‘शौकीन पान’ या फ्रँचायजीविषयी सुचवलं. हे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. आपण ज्या व्यावसायिक कल्पनेचा शोध घेत आहे, ती ही आहे का याची खात्री करायला दुसर्याच दिवशी तातडीने पुण्यात पोहोचले. तिथे जाऊन पाहते तर काय, लहान मुलांच्या स्वप्नात जसा चॉकलेटचा बंगला असतो, अगदी तसाच हा पानाचा बंगला होता. खायचे पान या प्रकारातील विविधता आणि सजावट पाहून थक्क व्हायला झालं आणि दोन चार पानं खाल्ल्यावर तर मी तिथल्या चॉकलेट पानाच्या प्रेमातच पडले. मी हाच व्यवसाय का निवडला यामागे आणखी एक कारण आहे. मी लहानपणापासूनच पान खाण्याची शौकीन आहे. पण कॅडबरी घ्यायला आपण दुकानात जातो तसं मला कधीच पानाच्या गादीवर मसाला पान विकत घ्यायला जाता आलं नाही. कारण पानाच्या टपरीवर एक ‘असंस्कृत’ माहोल असतो, अशी आपली समजूत आहे. तिथे उभे राहून गुटखा-पान चघळणारे काही लोक मुलींना पाहून टिंगलटवाळी करत असतील, अशी भीती कायमच मनात असायची आणि म्हणूनच तिकडे जाणे मी नेहमीच टाळले आहे. मग वडील किंवा भाऊ हेच माझ्यासाठी पान घेऊन येत असत. यामुळेच आमचे पानाचे दुकान सुरू करताना माझ्यासारख्या कोणत्याही मुलीला ताठ मानेने दुकानात येऊन आवडती चीज खाता यायला हवी ही भावना माझ्या मनात होती.
कोणतेही दुकान उघडताना त्याचे लोकेशन फारच महत्त्वाचे असते. चांगल्या लोकेशनची जागा मिळाली तर धंद्याची अर्धी लढाई तुम्ही जिंकून जाता. या गोष्टीत ऐश्वर्याला तिच्या बाबांची मदत झाली. त्यांनी फार वर्षांपूर्वी घेऊन ठेवलेली एक दुकानाची जागा आता रिकामी झाली होती. पण स्वाभिमानी मुलगी म्हणून तिला कोणतीही सवलत नको होती. तिने बाजारभावाप्रमाणे मासिक भाड्याचा करार बनवून घेतला. दुकान सुरू करताना लक्षात आलं की कोणत्याही दुकानाची विक्रीची वेळ साधारण १० ते १२ तास असते, त्यामुळे इतका वेळ एकट्याने दुकानात थांबणे शक्य होत नाही आणि नोकरांवर दुकान टाकून जाणे हेही सुरुवातीला तरी योग्य नसतंच. यावर उपाय म्हणून ऐश्वर्याने तिच्यासारखाच बिझनेस पॅशन असणारा विराज लेले नावाचा मित्र भागीदार म्हणून निवडला. मग हे दोघे फ्रँचायजीसंबधी पुढील बोलणी करण्यासाठी पुण्यात शरद मोरे यांना भेटले. मोरे यांनी सर्वोत्कृष्ट अणि अत्यंत दर्जेदार तंबाखूरहित पानांचा स्वाद पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोचविण्याचा विडा उचलून हे ‘कम्प्लीट पान शॉप’ २००५ साली सुरू केलं आहे आणि आतापर्यंत पुणे, पंढरपूर, शिर्डी, खारघर असा विस्तार केल्यानंतर ते मुंबईत शिरकाव करण्यासाठी त्यांच्यासारख्याच ध्येयवेड्या तरूण उद्योजकांच्या शोधात होते. या दोघा मुलांची प्रामाणिक इच्छा, मेहनत करण्याची तयारी पाहून त्यांनी ‘शौकीन कम्प्लीट पान शॉप’ मुंबईत सुरू करण्याची परवानगी आनंदाने दिली.
या अनोख्या दुकानाला कसा प्रतिसाद मिळाला याबद्दल ऐश्वर्या म्हणाली,
१६ ऑगस्ट २०२१ रोजी ‘शौकीन’चे उद्घाटन झाले. अनेक मान्यवरांनी त्याला हजेरी लावली. पहिल्या दिवसापासूनच पानशौकीन खवय्यांनी पानविविधतेला चांगला प्रतिसाद दिला आहे. मराठी नाटक-सिनेमातील अनेक सेलिब्रिटी आमच्याकडे नियमित हजेरी लावत असतात आणि एक मराठी उद्योजक म्हणून प्रोत्साहनही देतात. अभिनेते संजय मोने उद्घाटनप्रसंगी आले होते आणि त्यांना आमचे पान आवडले म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना त्याविषयी सांगितले, तर त्यांनी देखील दुकानाला भेट देऊन आमचे कौतुक केलं. फक्त तीन महिन्यातच आम्ही या व्यवसायात सर्व खर्च काढून चांगला नफा कमवायला लागलो आहोत. सुरुवातीच्या काळात कोविड-निर्बंध असल्याने दुकान लवकर बंद करावे लागायचे, आमचा प्रमुख ग्राहकवर्ग रात्रीच्या जेवणानंतर येणारा आहे. त्यामुळे काही ग्राहकांची निराशा होत असे. परंतु आता निर्बंध शिथील झाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. अधिक वेळ दुकान सुरू राहून दुकानाची विक्री जोरदार वाढली आहे.
पानाच्या या गुहेत शिरताना काचेचा दरवाजा उघडल्यावर आतमधून एक थंडगार हवेचा झोत एअर कंडिशनरमधून अंगावर येतो आणि बाहेरील उकड्याने तप्त झालेल्या शरीराला मेंटॉसचा गारवा मिळतो. अशा या पॉश दुकानात विक्रीस ठेवलेल्या पानाची किंमत कमीत कमी शंभर रुपयांपासून सुरू होत असेल, असा विचार आपल्या मनात येतो; पण इथेच तर खरी गोम आहे. या दुकानात पान अगदी वीस रुपयांपासून म्हणजेच पानाच्या टपरीपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहे, हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. सुरुवातीला कमी किंमत ठेऊन ग्राहकांना आकर्षित करणे ही यांची मार्केटिंग स्टेटर्जी आहे का? त्यावर ऐश्वर्या म्हणाली की भरपूर व्हरायटी आणि उत्तम दर्जा राखून देखील सर्वसामान्यांना परवडणारी किंमत हीच आमची यूएसपी आहे. आमच्याकडे अगदी २० रुपयांपासून तब्बल साडेतीन हजारापर्यंतचं, सोन्याचा वर्ख असलेलं पान तुम्हाला पाहायला व खायला मिळेल. लहान मुलांना सर्वात जास्त आवडतं चॉकलेट, म्हणून बाळगोपाळांसाठी आम्ही त्यांना आवडणार्या टेस्टची पाने आम्ही विकसित केली आहेत. ‘स्ट्रॉबेरी चॉकलेट’, ‘ड्रायफूट पान’, ‘चॉकलेट मघई’, ‘ऑरेंज चॉकलेट’, ‘बर्थ डे सेलिब्रेशन पान’ अशी लहानग्यांना आवडणार्या फ्लेवर्सची रेंज आमच्याकडे आहे. आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलांसाठीची पानं आमच्याकडे कात आणि सुपारी न वापरता बनवली जातात.
मोठ्या माणसांसाठी रसना तृप्त होईल इतकी व्हरायटी आमच्याकडे आहे.
ऑन द रॉक्स खवय्यांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवलेले ‘राम प्यारी’, महाबळेश्वरची आठवण करून देणारे स्ट्रॉबेरी पान, बंद अकल का ताला खोलणारे बनारसी पान, कोकणच्या हापूस आंब्याचा रस असलेले मँगो चॉकलेट, कुल्फीसारखं लागणारे केशर पिस्ता चॉकलेट, खतरों के खिलाडींसाठी ‘फायर पान’, महाराष्ट्रीयन परंपरा जपणारे ‘पुणेरी पान, फार कष्ट न करता तोंडात विरघळणारे ‘मघई मसाला पान’… इतकंच काय तर मोठ्या कुटुंबाकरता चक्क वेगवेगळे ‘फॅमिली पॅक’ही उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात पानपट्टीचा व्यवसाय करणारी माणसे प्रामुख्याने उत्तरेकडील आहेत, पण तो त्यांचा पिढीजात धंदा आहे का? काही मोजक्या मंडळींचा तो होता; पण बहुसंख्य पानविक्रेत्यांचा मूळ धंदा हा नव्हता. त्यांची पाहिली पिढी त्यांच्या राज्यात रोजगार मिळत नाही म्हणून महाराष्ट्रात स्थलांतरित झाली तेव्हा जगण्यासाठी मिळेल ते काम करून पोट भरणे हाच एकमेव उपाय होता. त्यातूनच घरच्या पानाच्या डब्यात पान, सुपारी, कातरलेला कात, चुना असं जे काही असतं त्याच्यापेक्षा डोळ्यांना सुखावणारे, रसना तृप्त करणारे पदार्थ उदा. गुलकंद, खजूर, सुवासिक खोबरे, थंडगार मिंट, लालभडक चेरी पानात घालून तयार केलेला विडा असे पर्याय नाक्यानाक्यावर किफायतशीर दरात उपलब्ध करून दिला या लोकांनी. कामधंद्याला जाताना पानसुपारीचा डबा सोबत नेण्याची मराठी माणसांची सवय त्यांनी मोडली आणि पानपरंपरा जनसामान्यापर्यंत सुलभ रीतीने पोहचवली. आज हाच व्यवसाय उत्तरेकडील मंडळींची पुढील पिढी करत आहे. पण आज त्यांना देखील आकर्षक वेष्टनातील, शर्टाच्या व पँटीच्या खिशात मावणारे, पानाचा डाग कपड्याला लागेल अशी भीती नसणारे आणि बॉलीवूड हीरोंच्या दमदार मार्केटिंगने तरूण पिढीला वश करणार्या पानमसाल्यांच्या जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. पानाच्या तोंडाला पानमसाल्यांची पाने पुसून गुटखा खाणार्या तरूण पिढीला पुन्हा तंबाखूविरहित पानाकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांना आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या सुरेख पानांचा पर्याय द्यायला हवा.
हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात व कमी जागेत उभा राहू शकतो. या व्यवसायात कच्चा माल खराब होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे त्यामुळे एखादवेळेस विक्री नाही झाली तरी नुकसान होत नाही. या व्यवसायात येण्यासाठी कोणत्याही फ्रँचाइजीसोबत करार करायला हवाच असं नाही. पारंपरिक पानाच्या दुकानाला रंगरंगोटी करून पानात नवनवीन प्रयोग करत अनेक टपरीवजा दुकानं ‘कात’ टाकताना दिसताहेत. कमी भांडवलात धंदा सुरू करण्याची इच्छा असलेल्याने हा मार्ग स्वीकारायला हरकत नसावी. मुंबईतील नळबाजार आणि नवी मुंबईत एपीएमसी मार्केट येथे पान व त्याला लागणार्या साहित्याचे घाऊक व्यापारी आहेत. तिथे जाणे शक्य नसेल तर पानाचा व्यवसाय कसा सुरू करावा व त्याचा कच्चा माल कुठे उपलब्ध होईल याबद्दल कार्यशाळा घेणार्या अनेक संस्थांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अनेक मराठी तरूण मुलांसोबत बोलताना कळलं की या मुलांना अशा व्यवसायाच्या छोट्या टपरीवर उभे राहायला संकोच वाटतो आणि ते व्यवसाय कमी दर्जाचे वाटतात. अशीच आपल्या मुलांची मानसिकता असेल तर आपण सतत तिला दोष देण्यापेक्षा त्या व्यवसायाचा दर्जा वाढवावा, जेणेकरून अनेक तरूण उच्चशिक्षित मुले-मुली देखील अशा व्यवसायात पदार्पण करू शकतील व ‘पान खिलाए सैंय्या हमारे’ असे अभिमानाने सांगू शकतील.