मराठी माणूस धंद्यात ‘पडायचे’ दिवस आता गेले, मराठी माणूस आज सर्व प्रकारच्या व्यवसायांत पाय रोवून उभा आहे. भले त्यांची संख्या उणेअधिक असेल, पण वस्तू विकताना, वस्तू तयार करताना, वस्तूंची जाहिरात करताना ते आज आजूबाजूला दिसत राहतात. कधी कधी आपण त्यांना ओळखण्यात चूक करतो आणि त्यांच्यासोबत उगीचच हिंदीतून बोलायला लागतो. जागतिकीकरणानंतर एका पिढीने आयटी उद्योगात नोकरी करून समृद्धीकडे वाटचाल केली व आज त्यांचीच मुले कॉर्पोरेट क्षेत्रातील सोन्याच्या साखळदंडांना झुगारून उद्योजक बनत आहेत.
व्यवसाय म्हटला की टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, पेंढारकर यांची नावे डोळ्यासमोर येतात किंवा आणली जातात. या यशस्वी उद्योजकांची चरित्रं, त्यांची देदीप्यमान वाटचाल आपल्याला भारावून टाकते, प्रेरणा देते, पण लाखात एखादाच युवक त्या अत्युच्च शिखरावर पोहचू शकतो व बाकीचे पहिल्याच चढणीला धाप लागून लांब दिसणारे शिखर सोडून नोकरी नावाच्या हमरस्त्याला लागतात. त्यात त्यांना किती यश मिळतं हा प्रश्न वेगळा; कारण आर्थिक सुरक्षिततेची हमी देणार्या सरकारी नोकर्यांची संख्या मे महिन्यातील पाण्याच्या साठ्यासारखी आटत चालली आहे. यूपीएससीच्या एक हजार जागांसाठी पाच लाख मुले स्पर्धा परीक्षेला बसत आहेत. वयाची तिशी उलटली तरीही नोकरीचे मृगजळ वास्तवात उतरत नाही, त्यामुळे लग्न, संसार, प्रपंच याचे गणित पार बिघडले आहे. यातील बहुसंख्य तरूण मुलांनी व्यवसाय करणे हा दुसरा पर्याय निवडायचा ठरवला तर अगदी कमी भांडवलात आणि अगदी कमी जागेत करता येणारे आणि त्यांच्या आवाक्यात असणारे वडापाव, पानपट्टी, भाजीविक्री, किराणा दुकान असे अनेक पारंपरिक व्यवसायप्रकार पर्याय म्हणून तरुणांच्या डोळ्यासमोर उभे राहतात. परंतु या प्रकारचा धंदा करणे हे आजच्या मराठी तरुणांना डाऊनमार्केट वाटते. आठ हजार पगाराची प्यूनची नोकरी सांगा, ती करू पण ज्यात पंधरावीस हजार महिनाकाठी मिळतील पण लोक काय म्हणतील, ते हसतील अशी भीती असणारे उद्योग नकोत, असे त्यांचे म्हणणे असते. मोटिवेशनल स्पीकरने सांगितलेले शंभर करोड उलाढालीचे प्रेरणादायी उद्योग कितीही हवेहवेसे वाटले तरी ते युवा पिढीच्या आवाक्यात नाहीत आणि पाच दहा हजारांत चालू होणार्या धंद्याला फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासारखे ग्लॅमर नाही अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या तरुणाईची आजची अवस्था नाजूक आहे. मराठी मुलांनी पदवी प्राप्त केल्यावर स्पर्धा परीक्षा, सरकारी किंवा खासगी नोकरी हेच एकमेव मार्ग न निवडता स्वयंरोजगार करून आपल्या पायांवर उभं राहायला हवं. जितकं मिळालं त्यात समाधान आहे असा अल्पसंतुष्टपणा नको. आता तरूण पिढीने तरूण वयात रिस्क घेऊन व्यवसायात पदार्पण करायला हवं. सुरुवातीला मेहनत जास्त आहे पण एकदा का व्यवसायात जम बसला की तुम्हाला नोकरी करून मिळाले असते त्याच्या अनेक पटीत पैसे कमावता येतात. मराठी मुलांनी व मुलींनी संकोच न करता या व्यवसायात उतरण्याचे धाडस करायला हवं.
मराठी माणूस आळशी आहे, उद्धट आहे, त्याला धंदा करता येत नाही, तो नेहमी धंद्यात ‘पडतो’, त्याला महत्त्वाकांक्षा नाही, तो अल्पसंतुष्ट आहे या व अशा अनेक वर्षांपासून कानावर पडणार्या समजुतींना धक्का देत, त्या खोट्या ठरवत अनेक मराठी तरूण उद्योजकांनी नोकरीचा महामार्ग सोडून स्वतःचा जेसीबी दौडवत पायवाटेने सुरुवात केली आणि स्वतःचा एक्स्प्रेसवे बांधला. ज्यांचे मासिक उत्पन्न ५० हजार ते पाच लाख रुपये आहे अशा अनेक मराठी मुलांची माणसांची यशोगाथा आपल्यासमोर ठेवताना या उद्योजकांकडून त्यांनी आकर्षक नवीन वेष्टनात गुंडाळलेले अपारंपारिक आणि पारंपरिक व्यवसाय करताना अवलंबलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना पाहून तरूण मराठी मुलांमध्ये स्वयंरोजगाराची इच्छा उत्पन्न व्हावी यासाठी वाहिलेले हे सदर आहे.