शेवटी, ईडीची धाड माझ्यावर पडलीच नाही. केवढा घोर लागला होता जिवाला. माझा मानलेला परममित्र पोक्या याने जरी मला कितीही दिलासा दिला होता, तरीही पोटात धाकधूक होत होतीच. पण एक गोष्ट मानली पाहिजे की ज्यांना ज्यांना मी माझ्यावर ईडीची धाड पडणार ही बातमी फोनवरून दिली होती त्या सर्वांनी माझी भेट घेऊन मला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकजण म्हणत होता की ईडीची धाड पडायला भाग्य लागतं. शेवटी मी अभागी निघालो. कोणत्याही पेपरात टोक्या टोचणकर याच्या घरावर धाड पडणार, अशी बातमी छापून आली नाही की एकही चॅनलवाला माझी मुलाखत घ्यायला माझ्या घराकडे फिरकला नाही. कंगनाला वेडाचा झटका आल्याची खोटी बातमी पसरल्यामुळे सगळा मीडिया तिची बडबड आणि त्यावरील तथाकथित मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यात मग्न होता. खरेच, त्यामुळे माझ्या ज्ञानात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या माहितीविषयी इतकी भर पडली की माझ्या अपरिपक्व ज्ञानाचा धबधबा परिपक्व होऊन ओसंडून वाहू लागला.
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची इतकी परिपूर्ण माहिती असलेली ज्ञानयोगिनी कंगनाई भाजपसारख्या पक्षाला पाठराखीण म्हणून लाभली याबद्दल मला तिचा खरोखरच हेवा वाटतो. झाशीच्या राणीच्या भूमिकेत लाकडी घोड्यावरून रपेट करताना तिला पाहिले होते, पण तिचा इतक्या तरूण वयात आधुनिक इतिहास संशोधनाचा एवढा गाढा अभ्यास असेल याची सुतराम कल्पना नव्हती. आपण मटक्याच्या आकड्यांचे संशोधन करणारी किडुकमिडूक माणसे. तिचे ज्ञान पारखायला विक्रम गोखलेंसारखे तिच्या तोडीस तोड असलेले पुण्यनगरीच्या अर्वाचीन इतिहास संशोधन मंडळातील जुने-जाणते नटश्रेष्ठ नटवर्यच हवे. त्यांनी तत्काळ आधुनिक स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची बाडे काढून अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने त्यातील जीर्ण पाने आधी चोळून आणि नंतर चाळून पाहिली. दिल्लीत सूक्ष्मातिसूक्ष्म खात्याचे कॅबिनेट कॉर्पोरेट मंत्री नारायणराव तातू राणे यांना फोन करून स्वातंत्र्याची भीक मागताना नक्की किती बळी गेले याची खातरजमा करून घेतली आणि खात्री पटल्यानंतरच कंगनाईला तिच्या भिकेच्या संशोधनाबद्दल क्लीनचिट देणारे जगातील ते पहिले गाढे संशोधक ठरले.
त्यांच्या या विक्रमाला तोड नाही याची पावती मधुबालाच्या एका फॅनकडून मिळताच ते कृतार्थ झाले आणि म्हणाले, पाहिलेत ना! माझ्या संशोधनावर किती लोकं फिदा आहेत ते! ‘नटसम्राट’मधले नटसम्राट गणपतराव बेलवलकर ‘कुणी घर देता का घर? एका म्हातार्याला कुणी घर देता का घर?’ अशी घराची भीक मागत होते. तसेच ‘कुणी स्वातंत्र्य देता का स्वातंत्र्य?’ असं म्हणत स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा न भोगणार्या, फासावर न जाणार्या, अंदमानच्या काळकोठडीत अंधारात कोल्हू न चालवणार्या, भारत छोडो आंदोलन न करणार्या, इंग्रजांच्या गोळ्या छातीवर न झेलणार्या, जपानला आझाद हिंद फौज न उभारणार्या आणि केवळ स्वातंत्र्याची भीक आमच्या पदरात घाला अशा अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्याची भीक मिळवणार्यांचे हे स्वातंत्र्य आहे, हा कंगनाईच्या विचारांचा गाभा माझ्या मनावर इतका बिंबला की त्या विचाराने मी विक्रमवीरांप्रमाणेच भारावून गेलो. खरे स्वातंत्र्य भारताला २०१४ला मोदींनी दिले आणि आज त्याची गोड फळे आपण चाखत आणि चोखीत आहोत… विक्रमवीरांना हेच सांगायचे होते, फक्त कंगनाईने मंजुळ आवाजात आपली भूमिका गायली आणि या भूसंशोधक, इतिहास सूक्ष्मशोधक नटसम्राटाने मोदीचरणी निष्ठा वाहून स्वत:ला कंगनाईच्या पातळीवर आणण्याचा प्रामाणिकपणा केला.
माझा मानलेला परममित्र पोक्या हे सारे ऐकून जाम अस्वस्थ होता. आम्ही गुंड, मवाली असलो तरी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची बाजी लावली त्यांचा अपमान करणार्या आणि तो मुकाट सहन करणार्यांना आम्ही कधीच क्षमा करणार नाही, असे तावातावाने बडबडत तो माझ्या घरी आला आणि म्हणाला, तू कंगनाईला फोन लाव. तिच्याशी तुझी ओळख मागेच झाशीच्या राणीच्या शूटिंगच्या वेळी सर्किट भूमय्याने करून दिली होती. मी म्हणालो, सर्किट नव्हे तिरकीट तर त्यावर तो उद्गारला यापुढे तो स्वत:ला सर्किटच म्हणवून घेतो. आपणही तेच म्हणायचे. अखेर पोक्याच्या म्हणण्यानुसार मी कंगनाईला फोन लावला. बराच वेळ तो एंगेज्ड लागत होता. शेवटी एकदाचा लागला. तिने माझा आवाज ओळखला. म्हणाली, टोक्या भाय, मालामाल हो गये ना? मुझे मालूम पडा ईडी से. मी तिकडे लक्ष दिले नाही. फक्त एवढेच म्हटले की, आपण सध्या मोदींचे शूर शिपाई असलो तरीही तू सध्या जे काही तुझ्या स्वभावाप्रमाणेच बडबडत आहेस ते योग्य नाही मला वाटत. भारताच्या स्वातंत्र्याचा तो अपमान आहे. त्यावर ती भडकली आणि म्हणाली, टोक्या भाय, मैं झूठ नहीं बोलूंगी. त्यावर मी म्हणालो, ‘झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, तुम जेल चली जाओगी, मैं देखते रहियो…’
– फालतू बकबक बंद कर टोक्या. मैं जो बोलती हूं उसके पीछे जरूर कोई सस्पेन्स है. चोली के पीछे क्या है ये राज ये गाना लिखनेवालों को मालूम था क्या? मैंने जब झांसी की रानी का रोल निभाया तब मैंने लकडी के घोडे पे बैठकर शूटिंग के ब्रेक टाइम में पकोडे खाते खाते भारतीय बेगर्स याने भिखमंगे लोगों का स्टडी किया. मुझे इस पर रिसर्च करना है. इसलिए भारतवर्ष में दुसरों के पास भीख मांगने की शुरुआत कौन से काल में हुई इसका संशोधन करना मैंने शुरू किया. टोक्या तुला सांगते, भारतातील पहिला भिकारी कोण होता याची एक्सक्ल्युझिव माहिती माझ्याकडे आहे. आर्य-अनार्यांच्या काळापासून ते आज मोदी पिढीच्या काळापर्यंतच्या भिकार्यांच्या इतिहासावर मी मोठा प्रबंध लिहून घस्मानिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवणार आहे. परवा मी जे स्वातंत्र्याच्या भिकेविषयी बोलले तो त्यातील एक क्षुल्लक आणि छोटा टॉपिक आहे. तुझ्यासारख्याला तर तो समजणारही नाही. त्याला अमृताताई फडणवीस, चित्राताई वाघ यांच्यासारख्या, माझ्यासारख्या विद्वान, अभ्यासू आणि अनुभवी तज्ज्ञ विदुषी लागतात. हसू नकोस विदूषक नाही बोलले मी. विदुषी… विदुषी… मी मोदींकडून गांधीबाबांसह सर्वांची पद्धत समजावून घेतली आहे. आता आपणसुद्धा इतर देशांपुढे मदतीसाठी कटोरा पुढे करतो, पण त्यात स्वाभिमान असतो. तो सिंधुदुर्गातला स्वाभिमान नाही. तो त्यांनीच स्वहस्ते गाडला. म्हणूनच तू ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नकोस, स्वातंत्र्याची पहाट मोदींमुळे उगवली हे जेव्हा जगाला कळेल तेव्हाच मी भीक का म्हणाले हे अज्ञानी लोकांना समजेल. गुडबाय!
मी फोन जोरात आपटला. पण तो लोखंडाचा असल्यामुळे फुटला नाही एवढेच!