नेमके याच काळात श्याम देशपांडे कोविड पॉझिटिव्ह आले. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात त्यांना भरती केलं होतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली होती. अधूनमधून त्यांच्याशी बोलणं व्हायचं. एकदा बोलता बोलता म्हणाले, ‘तुझं पुस्तक छापून मी तुझ्या हातात देतो की नाही याची सारखी चिंता वाटतेय.’ मी त्यांना उभारी दिली. म्हणालो, तुम्हाला काहीही होणार नाही. हे ऐकून तरतरी आल्यागत देशपांडे बोलले, रमेश तुझी कादंबरी तुझ्या हातात दिल्याशिवाय मी मरणार नाही…
—-
जालना जिल्ह्यातलं पिंपळगावकड हे गाव. तसं पाह्यलं तर ते गावही मामाचं, पण त्या गावात आम्ही बर्याच वर्षांपासून राहतोय. दोन एकर कोरडवाहू जमिनीच्या तुकड्यात बाबा बय राबराब राबले, तरी त्यांचा घाम हिरवा झाला नाही. धाड गावी वसंत जोशींचा पसत्तीस एकराचा मळा बाबा बय यांनी आपल्या घामातून हिरवागार फुलवला होता. दोन विहिरीच्या पाण्याचा दांड सगळं शेत भिजून काढायचा. गुलाब, कन्हेर, चाफा, झेंडू, कर्दळी आणि पारिजातकाचा गंध वावरभर पसरायचा. कधी कधी आम्ही भावंडं त्या सुगंधाला दोर्या बांधायचो आणि दुपारलोक ती दोरी धरून आम्ही सगळं शेत पालथं घालायचो. घरी परताना खाली हात परलेलं मला आठवत नाही. आंबे, जांब (पेरू), जांभळं, पपई, सीताफळं, रामफळं, करवंदं यापैकी काहीच मिळालं नाही तर हातात गावरान ऊस आणायला कोणीच विसरायचं नाही. ह्या सर्व मोसमातल्या फळांनी घर सदैवं भरलेलं राह्याचं.
पिंपळगावला याउलट परिस्थिती होती. एक तर वावर कमी होतं त्यातही कोरडवाहू- पाण्याचा पत्ता नाही. शेतात काम करणार्या बायकांना प्यायला जरी पाणी आणायचं म्हणलं तरी दूरपर्यंत पायपीट करत जावं लागायचं. गावातही पाण्याची समस्या सुटलेली नव्हती. नदीतल्या विहिरीवरून गाव पाणी भरायचं. लाईट टिकली तर त्या दिवशी गावच्या टाकीत पाणी पडायचं. तिथंही बायका जोरजोरात भांडायच्या. वरच्या पाण्याची आणि पिण्याच्या गत सारखीच म्हणून कितीही राबलं तरी सालाचे कष्ट फुकट! अशी सगळी आवस्था असायची. वर्षभरात वावरात जो खर्च केला तोही निघायला मोठं अवघड व्हायचं. एकतर गाव खेडं होतं, कोणत्याच सुविधा नव्हत्या. पोस्टसुद्धा गावात नसावं यापेक्षा दुर्दैव कोणतं? पंधरा दिवस पोस्टमन तोंड दाखवायचा नाही. एकदाच सातआठ घरची पत्र जमल्यावर तो गावात यायचा आणि चार घरचा चहा पिल्यावरच तो घरचा रस्ता धरायचा.
पिंपळगावकड तसं वारकर्यांचं गाव. भल्या पहाटं हरिपाठ, काकड आरती तर संध्याकाळच्या भजनाचा आवाज हरेक गल्लीत शिरत जातो. याच गावातून मी सात आठ किमीचं आंतर पायी चालत माहोर्याच्या जि.प. शाळेतून दहावी पास झालो. शेतात कामाला हाताशी बरा असं म्हणून मामा मला भोकरदनच्या कॉलेजमधी अॅडमिशन घे असं सांगायचे. धाडला असतांना बाबांची वट आणि आता स्वत:च्या वावरात काम करूनसुद्धा पिच्छा न सोडणारं दारिद्र्य आणि कोरड्याटाक आभाळाकडं टक लावून बघणारे बाबा पाह्यल्यावर मह्या पोटातली आतडी तटतट तुटायची. आपल्याला हे बदलायचं असेल तर गावात राहून उपयोग नव्हता. मनाला घट्ट करून मी जामनेरला पळून गेलो. जामनेरला मोठी बहीण दिलेली होती तिचं सासरही होतं. कॉलेजला शिकताना काय खर्च नाही, हा विचार माझ्या मनात सतत यायचा मग यांना आपला त्रास नको म्हणून मी तिथूनही पळ काढला आणि एका कनं औरंगाबाद शहर गाठलं.
पहिल्यांदाच औरंगाबादला आलो होतो तेव्हा या शहराची मला कोणतीही माहिती नव्हती. बाबा पोल पंप चौक, क्रांती चौक, जालना रोड, आकाशवाणी अथवा जवाहर कॉलनी हे सगळे नावं शहरात आल्यावर माहीत झाली. नोकरी कशी मिळवावी याचं देखील ज्ञान नव्हतं. फक्त औरंगाबादला मुलं हॉटेलमधी नोकरी करून शिकतात एवढंच जामनेरला पोरांच्या तोंडावाटे ऐकलं होतं. या शिदोरीवर मी पाट्या वाचत शहरात फिरत होतो. कोणत्या भागात फिरतोय याची मात्र कोणतीच मालुमात नव्हती. या आगोदर हॉटेलमधी काम केल्याचा कोणताच अनुभव नव्हता. दारूची नावं कोणती असतात हेही माहीत नव्हतं. थोडक्यात, कशाचा कशाला पत्ता नव्हता.
फिरत फिरत पुसत पुसत शेवटी एका हॉटेलमधी काम भेटलं. अनुभव नसल्यानं त्यांनी सुरुवातीला मोरीत खरकटे भांडे धुवायला बसवलं. कस्टमरची ताटात उरलेली व्हेज, नॉनव्हेजची उष्टी खरकटी ग्रेवी हाताना काढताना भयंकर किळस यायची. सतत पाण्यात हात असल्यानं बोटं सडल्यागत व्हायचे, पण इलाज नव्हता. गावाकडं पहाटंच खायाची सवय होती. इथं दुपारी तीन वाजेपर्यंत खायला मिळायचं नाही. चहा, नाश्तात काहीच मिळत नसे, त्यामुळे पोटातली आतडी गोळा व्हायची. भूक सहन होत नसल्यानं हेल्पर रात्री रोट्या लपवून ठेवत किंवा तंदूरवरच्या जळालेल्या रोट्या दुसर्या दिवशी आम्ही पोरं मिरची पावडरमधी तेल नाही तर पाणी टाकून खायचो. वस्तादची नजर चुकवून हे सगळं करावं लागायचं. नसता शेठचा ओरडा खाल्ला समजायचा. अशावेळी कामावरून काढायलासुद्धा कमी करत नसत.
हॉटेलमधी काम करत एका बाजूनं मी शिक्षणही करत होतो. भांडी धूत पुढे किचन हेल्पर, टेबल हेल्पर आणि वेटर असं माझं प्रमोशन होत गेलं. ही सगळी हॉटेलमधली कामं करताना मी कधीच लाज बाळगली नाही. कोणतंही काम हलकं नसतं, अशा मताचा मी आहे. हॉटेलमधील बारबालांचं दुःख म्हणजे अश्वतत्थाम्याची भळभळणारी जखमच म्हणावी. चारी रस्ते जेव्हा बंद होतात त्यावेळी परिस्थितीला शरण गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. बारबालांमधी एक गृहिणी दडलेली असती. त्यांच्यासोबत काम करताना त्या स्त्रीरूपाचं मला अनेकदा दर्शन घडलं. बारबालांविषयी अनेकजन अतिशय आचकट विचकट बोलत. सुरुवातीला मलाही त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती. लेडीज बारमधी काम करण्याआगोदर या स्त्रियांविषयी माझ्यासकट अनेक वेटरला आकर्षण निर्माण झालं होतं. त्या बारमधी काम करण्याची एक सुप्त इच्छा मनात घर करायची. थोडी भीतीही वाटायची, तरीही का कुणास ठाऊक ते वेगळं जग बघण्यासाठी आम्ही काही वेटर आसुसलेलो होतो. अनेक वेळा आम्ही लेडीज बारपुढून चकरा मारायचो; पण कोणी पाहिन म्हणून तिथून लवकर सटकायचो. त्या जगाचं जसं आकर्षण होतं तसं घाबरणंसुद्धा होतं.
एकदा कुठंच काम मिळत नव्हतं त्यावेळेस हिंमत होत नसताना देखील लेडीज बारची नोकरी धरली. सुरुवातीला बारबालासंगं काम करताना लाज वाटायची. कोणी ओळखीचं बारमधी आल्यावर काय म्हणतील? हा प्रश्न पिच्छा सोडायचा नाही. हळूहळू रूळत गेलो. तिथले हेल्पर, वेटर आणि बारबाला ओळखीच्या झाल्या. बारबालांचं कस्टमरशी बोलणं, हातात हात धरणं, मांडीवर बसणं, पेग बनवून देणं या सगळ्या गोष्टी मला चीड आणणार्या होत्या. कधी कधी कस्टमर त्यांना आपल्या टेबलवरून दुसर्या टेबलवर जाऊ देत नसत. मला वाटायचं आता होतं भांडण, पण बॉडीगार्डला बघितल्यावर कस्टमर बिल्ली बनायचे.
हॉटेलमधी नोकरी करत करत मी मराठी विषयात एम.ए. केलं. बी.एड. झालं. नेट परीक्षा पास झालो. ज्येष्ठ समीक्षक दादा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची संशोधन पदवी मिळवली. खरे तर दादा गोरे सर व सुनंदा गोरे मॅडम यांनी मला मायेचा जिव्हाळा दिला. वडिलांचं निधन झाल्यावर या दाम्पत्यानं मला स्वतःच्या मुलासारखं जपलं. यासोबतच कवी पी. विठ्ठल व कैलास अंभुरे सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेत. एकदा तर घरात काहीच नव्हतं. किराणा संपल्यानं बायको फक्त आसू गाळत होती. त्या दिवसात मुलीच्या शाळेनंही फीस भरा म्हणून सारखा तकादा लावला होता. माझ्याजवळ तेल, मीठ, मीरची आणायलासुद्धा पैसे नव्हते तर मुलीची शाळेची फीस मी कसा भरणार होतो? जवळ राशेनकार्ड असूनसुद्धा उपयोग नव्हता. तो दुकानदार गहू, तांदूळ मागायला गेल्यावर परत पाठवायचा. बायकोनंही राशेन दुकानदाराचे अनेकदा उंबरटे झिंजवले होते. ही सगळी परिस्थिती बघितल्यावर माझ्यातला बाप हतबल झाला आणि बायको व मुलींसाठी आपण काहीच करू शकत नाही याबद्दल मला स्वतःचीच चीड यायला लागली. राग व्यक्त करू लागलो. हा राग मनात भरून मी घराबाहेर पडलो. माझ्या मनात त्यावेळी आत्महत्याचे विचार घोळू लागले होते आणि तसा मी ठाम निर्णय घेतला.
आत्महत्येचे विचार मनात सुरू असतात तेव्हा तेच विचार आपल्यावर वजनदार ठरतात. आपल्या मृत्यूनंतर बायको, मुलींचे काय होणार याचा विचार मी बिलकुल केला नव्हता. या व्यवस्थेला मी कदरलो होतो. खरे तर एका विनाअनुदानित महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून रूजू होतो. पगार मिळत नसल्याने माझ्यावर ही वेळ ओढावली होती. २४ नोव्हेंबर २००१पूर्वीची मान्यता असलेल्या महाविद्यालयांना अनुदान देणार म्हणून सरकार अजूनही झुलवतं आहे. शासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून त्या दिवशी मी आत्महत्या करणार होतो. मुलीची शाळा, राशेन दुकानदार आणि शासन या सगळ्याविषयी माझ्या मनात प्रचंड आगडोंब उसळला होता. शेवटी फेसबुकवर एक आत्महत्येची पोस्ट लिहून मी माझ्या तयारीला लागलो तोच मित्र पी. विठ्ठल याचा फोन आला. बराच वेळ मोबाइल वाजत राहिला. तो परत परत फोन करत होता. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं पण विचार केला की आपण शेवटी मरणार तर आहोतच तेव्हा शेवटचे एकदा विठ्ठलशी बोलायला काय हरकत आहे? गळ्यातली दोरी काढली आणि विठ्ठलचा फोन घेतला. माझा आवाज ऐकताच त्यानं सुटकेचा निःश्वासच सोडला आणि भडाभडा बोलत सुटला. बर्याच गोष्टी समजवून सांगितल्या त्यानंतर कैलास अंभुरे, राम शिनगारे, विकास राऊत यांनीही आत्महत्या करून प्रश्न मिटणार आहे का? शासन कॉलेजला अनुदान देईन का? असं बरंच काही बोलत वास्तवाची भान आणून दिलं. मग मी बराच वेळ विचार करून शांतपणे घरी परतलो. त्यावेळी माझी मुलगी दिगिषा दरवाजात बसून माझी वाट बघत बसली होती…
…आणि त्या रात्री मी ठरवलं हातातली अर्धवट कादंबरी आता पूर्ण करायची. मागे वळून बघताना एकूणच हॉटेल जीवनातले सगळे अनुभव व सोबत काम करणार्या हॉटेलमधल्या सहकार्यांच्या अनुभवात परकायाप्रवेश करून ‘टिश्यू पेपर’ या नावानं मी लिहीत होतो. मध्यंतरी संपादक प्रशांत पवार यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी दै. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत अर्धं पान जागा दिली. यामुळं झालं असं की, ‘टिश्यू पेपर’ हा कॉलम महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचला. अनेकांचे फोन येऊ लागले. अल्पावधीतच ‘टिश्यू पेपर’ हा कॉलम सगळ्यांच्याच तोंडावाटी झाला. अनेक नामांकित प्रकाशक फोन करून पुस्तकासंबंधी विचारणा करू लागले. पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे श्याम देशपांडे (औरंगाबाद प्रतिनिधी) यांनी त्यावेळी पुस्तक दे म्हणून खूपदा पाठपुरावा केला तरीही मी त्यांना होकार दिला नव्हता. एके दिवशी दै. दिव्य मराठीच्या औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात राज्य संपादक संजय आवटे यांनी साहित्यिक वार्तालाप कार्यक्रम ठेवला होता. त्याला रा. रं. बोराडे सरांसह नवे-जुने कवी-लेखक उपस्थित होते. तिथं श्याम देशपांडे यांनी बोराडे सरांकडे माझी संहिता देत नाही म्हणून तक्रार केली. बोराडे सरांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि राजहंसला ‘टिश्यू पेपर’ दिली म्हणून सगळ्यांसमोर जाहीर केलं. मी सरांचा प्रत्यक्ष वर्गातला विद्यार्थी आहे. तेव्हा मला काहीच बोलता आले नाही.
सगळीकडं कोरोनाच्या दुसर्या लाटेनं धुमाकुळ माजवला होता. पुण्याला राजहंसच्या कार्यालयात टिश्यू पेपरचं काम चालू होतं. प्रख्यात कादंबरीकार राजन गवस यांच्याकडं पाठराखणीसाठी टिश्यू पेपरची संहिता पाठवली होती. खरे तर ही कादंबरी माझ्याकडून लिहून घेण्यात राजन गवस सरांचा खूप मोठा वाटा आहे. या कोविड काळात सगळेचजन घरात कैद होते. हे दूषित वातावरण केव्हा निवळेल सांगणं मोठं कठीण होतं. नेमके याच काळात श्याम देशपांडे कोविड पॉझिटिव्ह आले. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात त्यांना भरती केलं होतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली होती.
ऑक्सिजनवर ठेवलं होतं. कोरोनासारख्या भयंकर आजारातून ते वाचले. अधूनमधून त्यांच्याशी बोलणं व्हायचं. एकदा बोलता बोलता म्हणाले, ‘तुझं पुस्तक छापून मी तुझ्या हातात देतो की नाही याची सारखी चिंता वाटतेय.’ मी त्यांना उभारी दिली. म्हणालो, तुम्हाला काहीही होणार नाही. हे ऐकून त्यांना काय वाटलं कुणास ठाव आणि तरतरी आल्यागत देशपांडे बोलले, रमेश तुझी कादंबरी तुझ्या हातात दिल्याशिवाय मी मरणार नाही… आणि आठ दिवसात ते ठणठणीत होऊन घरी परतले.
जुलै महिन्यात ‘टिश्यू पेपर’ प्रसिद्ध झाली आणि सर्वच समाजमाध्यमांवर टिश्यू पेपरचा गाजावाजा सुरू झाला. वाचक, अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी व अगदी सामान्य वाचकांपासून ते अभिजन वाचकांनी टिश्यू पेपरची मागणी केली. हे सगळं यश पाहून श्याम देशपांडे बेहद्द खूश होते. तत्पूर्वी त्यांनी लेखकाला पुस्तक भेट म्हणून एक छोट्याखाणी कार्यक्रम घेतला त्याला माझ्यासह अनिता रमेश, साक्षी, दिगिषा, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. हंसराज जाधव, नम्रता फलके, शाहू पाटोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. समारोप करतांना देशपांडे म्हणाले, आज मी रमेश रावळकर याच्या ओझ्यातून मुक्त झालो आहे. दवाखान्यात भरती असतांना मला रमेशला टिश्यू् पेपर देता येईल की नाही याची सारखी भीती वाटायची. पण आज खूप आनंदी आहे, स्वतः कादंबरीच्या प्रती मी लेखकाला भेट देत आहे, असे बोलतांना त्यांना गहिवरून आले होते.
त्यांनी पंधरा दिवस धडपड करून संपूर्ण महाराष्ट्रात व बाहेरही टिश्यू पेपर पोहोचवली. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात पुस्तक पोहोचले होते. पाठपुरावा करून राजहंस प्रकाशनाला एक उत्तम संहिता देण्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर झळकत होते. सर्व मीडियावरच्या चर्चा ऐकत असतांना एकदम त्यांची प्रकृती खालावली. मी त्यांना दवाखान्यात जाण्याबद्दलही सांगितले होते. पण १४ ऑगस्टच्या रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अजातशत्रू श्याम देशपांडे आपल्यातून कायमचे निघून गेले.