राजा विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. झाडावर लोंबकळत असलेले प्रेत त्याने उचलले आणि पाठीवर घेऊन तो पुन्हा स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतामधे बसलेला वेताळ त्याला म्हणाला, विक्रमा आयुष्याच्या संध्याकाळी का असा सैरभैर झाल्यासारखा वागतो आहेस? तुझे आयुष्याचे जे काही ध्येय आहे ते साध्य केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही हे मला ठाऊक आहे. पण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तू तू आजवर कमावलेली स्वतःची पत आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे हे तुला कळतंय की नाही? नोकरीसाठी लाचार झालेल्या प्रधानासारखी तुझी अवस्था झाली आहे. त्या प्रधानाचीच गोष्ट आज मी तुला सांगणार आहे. आटपाट नावाची एक स्मार्ट सिटी होती. एके दिवशी आटपाट नगरीचा राजा इंद्रसेन भोजन करीत असता त्यांचा प्रधान चक्रमसेन बाजूला उभे राहून इथल्या-तिथल्या गोष्टी, वर्तमानपत्राच्या ऑनलाईन पोर्टलवर आलेले सिनेमातील हिरो हिरोईनचे किस्से, देशाच्या कानाकोपर्यातील खुशमस्कर्यांनी फेसबुकवर लिहिलेले राजाचा धोरणीपणा व दूरदृष्टीबद्दलचे काल्पनिक लेख आणि व्हॉट्सअपवर वाचलेल्या इतिहासाच्या गोष्टी सांगून राजाचे मनोरंजन करीत होता. जेवता जेवता राजाने ताटातील भरलेलं वांगं उचललं आणि म्हणाले, अरे काय कसली भाजी करतात हे लोक. वांगं ही काही राजाने खायची वस्तू आहे काय! ह्या वांग्याला ना कसली चांगली चव, ना आकर्षक रंग आणि ते खाल्ल्यावर घशाला खाज करते ती आणखी मुसिबत. यापुढे मला कुठल्याही भाजीत वांगं दिसलं तर मी त्या खानसाम्याचा शिरच्छेदच करून टाकीन. प्रधान चक्रमसेन म्हणाला, बरोबर आहे तुमचं म्हणणं महाराज. वांग्यासारखी वाईट चवीची आणि ओंगळ दिसणारी भाजी मी जन्मात पाहिली नाही. मला तर असं वाटते की, वांगं या भाजीच्या उत्पादन, विक्री आणि सेवन यावर राज्यात बंदीच घालायला पाहिजे. निदान वांग्याला जीएसटी च्या कक्षेबाहेर काढून त्यावर तीनशे टक्के अबकारी कर लावायला पाहिजे.
जेवता जेवता डोळ्याच्या कोपर्यातून प्रधानांकडे मिश्कीलपणे पाहत राजा इंद्रसेन म्हणाला, प्रधानजी, मागच्या आठवड्यात मी जेव्हा वांग्याचं भरीत छान झालंय म्हटलं होतं तेव्हा तुम्ही वांग्याची स्वर्गीय चव, वांग्याच्या डोक्यावर शोभून दिसणारा हिरव्या देठाचा मुकुट, त्याचं देखणं रूप, त्यातून मिळणारी जीवनसत्वे यावर भरभरून बोलला होतात. प्रधानजी आपल्या स्वभावाचं इतके तोरसेकरण करणे बरं नव्हे.
इतकी कथा सांगून वेताळ थांबला आणि राजा विक्रमाला म्हणाला, पहिल्यांदा राजा इंद्रसेनाने वांग्याबद्दल जरा बरं बोलताच वांग्याची स्तुती करणारा आणि नंतर राजा इंद्रसेनाने वांग्याबद्दल नाराजी व्यक्त करताच वांग्यावर बंदी घालायला निघालेला प्रधान चक्रमसेन असा का वागला याचे उत्तर ठाऊक असूनही तू मला दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील हे तुला ठाऊक आहेच. आपला ठेवणीतला दीर्घ पॉज घेऊन, चेहर्यावरील मिशीच्या जागी आपल्या उजव्या हाताचे मधले बोट ठेऊन खर्जातल्या आवाजात राजा विक्रम वेताळाला म्हणाला, आयटी सेलकडून सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचा माझा प्रचंड व्यासंग आहे. त्यावरून मी हे सांगू शकतो की वरवर पाहता, प्रधान चक्रमसेनाच्या विचारात आणि वागण्या-बोलण्यात विरोधाभास दिसत असला तरी त्याची विचार करण्याची पद्धत ठाम आणि व्यवहारी आहे. आपला नफा-नुकसान कशात आहे याचे त्याला पक्के भान आहे. आपण वांग्याचे नोकर नसून राजा इंद्रसेनाचे नोकर आहोत. इंद्रसेनाची खुशमस्करी करण्यातच आपले हित आणि उत्कर्ष आहे हे समजण्याइतका चक्रमसेन नक्कीच चतुर आहे. विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ पुन्हा हसला. पण यावेळी ते हास्य मामींच्या गाण्याइतके बेसूर किंवा भेसूर नव्हते, तर आपली पुन्हा एकदा सुटका झाल्याचे आनंदी हास्य होते. विक्रमाच्या खांद्यावरून सटकून वेताळ झाडांकडे सरसावला आणि पुन्हा उलटा लटकू लागला.