हिटलरने महिलांसाठी दोन संघटना निर्माण केल्या. तरूण मुलींसाठी ‘बंड डचर मेडल’ व महिलांसाठी ‘एनएस-फ्रॉन्सशाफ्ट’. यांना आदर्श जर्मन महिलेची व्याख्या म्हणजे, घरातील कौटुंबिक जवाबदारी पार पाडणारी आणि कुटूंबाच्या बाहेर नाझी पक्षासाठी वंशशुद्धी, ज्यूवंश तिरस्कार यांचा प्रचार प्रसार करणारी स्त्री अशी केली व याचा प्रसार प्रसारही केला. महिलांनी कुटूंबातील जवाबदार्यांव्यतिरीक्त काय करायचे तर केवळ नाझी पक्षाचे काम, असा शिरस्ता होता. विशेष म्हणजे या महिला विरोधी विचारांच्या वाहक हिटलरच्या समर्थक असलेल्या महिला होत्या. या महिला व्याख्यानातून, लेखातून, प्रवचनातून महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात मांडणी करायच्या आणि बहुसंख्य पुरूष वर्ग या व्याख्यान प्रवचनांचे स्वागत करून प्रचार करत असे.
—-
अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच असे वक्तव्य केले की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालेच नाही तर ते २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर मिळाले. हे वक्तव्य ऐतिहासिक सत्य नसले तरी नरेंद्र मोदी समर्थकांसाठी ते पूर्ण शतप्रतिशत सत्य आहे. म्हणून तर, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना कंगना राणावत यांच्या वक्तव्याचे अनेक मोदी समर्थकांनी स्वागत केले आहे.
भारत देश खरोखरच २०१४ सालीच स्वतंत्र झाला हा विचार सर्वच मोदी समर्थकांच्या मनात आहे व ते त्यांनी वारंवार व्यक्त केले असले तरी अभिनेत्री असल्यामुळे कंगना यांच्या वक्तव्यास प्रसिद्धी मिळाली आहे.
जर्मनीत नाझी काळात सर्व नाझी समर्थकांत देखील अशीच भावना होती. नाझी काळाचा उल्लेख सर्व नाझी समर्थक ‘थर्ड राईश’ असा करत. म्हणजे हिटलरचा काळ हा ‘थर्ड राईश’ म्हणजे ‘तिसरे पवित्र साम्राज्य!’ याचा अर्थ उर्वरीत राजवटी या अपवित्र होत्या. यातील ‘फर्स्ट राईश’ म्हणजे होली रपमन एम्पायर म्हणजे चर्चची अधिसत्ता असलेले इ.स. ८०० ते १८०८ या काळातील साम्राज्य. ‘सेकंड राईश’ म्हणजे सन १८७१ ते १९१८ या काळातील जर्मन एम्पायर आणि तिसरे अर्थातच हिटलरचे साम्राज्य! हिटलरपूर्वी असलेले ‘वायमार रिपब्लिक’ म्हणजे सर्व नाझी समर्थकांसाठी अपवित्र, वाईट आणि पारतंत्र्याचा कालखंड!
वायमार रिपब्लिकच्या कालखंडात म्हणजे १९१८ ते १९३३ पर्यंत जर्मनी ही खरेतर सामाजिक व राजकीय स्तरावर अतिशय प्रगतीशील होती. वायमर काळातील घटनेच्या अनुच्छेद १७ ते २२ नुसार महिलांना मतदानाचा, समतेचा, कौटुंबिक, सामाजिक विषयात समान अधिकाराचा तसेच राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला होता. अनुच्छेद-१०९नुसार स्त्रीपुरूष समता मान्य केली होती तर अनुच्छेद-१२८नुसार महिलांना स्वतंत्र रोजगाराचा, कार्यालयीन कामकाजात समतेचा अधिकार होता. पार्लमेंटमधे प्रतिनिधित्वही दिले गेले होते. विशेष म्हणजे महिलांना राजकीय पक्षातही महत्वाची व जबाबदारीची पदे होती. निवडणूक प्रचारावेळी संपूर्ण जबाबदारी प्रामुख्याने महिला नेत्यांकडे असायची.
वायमार रिपब्लिकने खरे तर महिलांना, अल्पसंख्याकांना, समलैंगिकांना समतेच्या आधारावर अनेक अधिकार, हक्क वा स्वातंत्र्ये बहाल करूनही नाझी समर्थक जर्मन लोक नि अगदी जर्मन महिला देखील वायमार रिपब्लिकला अपवित्र मानून पवित्र साम्राज्याची तिसर्यांदा सुरुवात हिटलर सत्तेत आल्यापासून झाली असल्याचे मानत असत. हिटलरची सत्ता हीच पवित्र असून हिटलरपूर्व काळातील जर्मन वायमार रिपब्लिक हे कसे अपवित्र होते, याच्या प्रचाराची जवाबदारी जोसेफ गोबेल्सने नाझी समर्थक सिनेनट्यांवर, उद्योजकांच्या पत्नींवर, विद्वेष पसरवणार्या हिटलरच्या मैत्रिणींवर, सामाजिक कार्याच्या नावाखाली ज्यू द्वेष पेरणार्या विविध क्षेत्रातील सेलेब्रिटी महिलांवर सोपवली होती. विशेष म्हणजे अशा अनेक महिला नाझी पक्षासाठी हे कार्य इमानेईतबारे करत होत्या.
वायमर रिपब्लिकचा पारतंत्र्य आणि अपवित्र म्हणून दुस्वास करणार्या महिलांची अवस्था पुढे खूपच बिकट झाली. हिटलर सत्तेवर आला आणि वायमार रिपब्लिक काळात पार्लमेंटमधे प्रतिनिधी म्हणून असणार्या महिलांची संख्या १९३३ साली ३७वरून चक्क शून्यावर आली. महिलांनी केवळ घरात राहावे, पुरूषांची कामे करू नये नयेत असा नियम बनला. गोबेल्सने जाहीरपणे सांगितले की, जी कामे पुरुषांची आहेत, ती कामे महिलांनी पुरुषांसाठी सोडावी.
नाझी काळात महिलांची राजकीय आणि कार्यकारी मंडळातून हकालपट्टी झाली. मात्र यातून काहींना सूटही दिली गेली. या अपवाद म्हणजे सिनेमात काम करणार्या नट्या, इतर कला व साहित्य क्षेत्रातील सेलेब्रिटी महिला आणि हिटलरच्या जवळच्या उद्योगपतींच्या पत्नी! याशिवाय वंशद्वेषी, ज्यूविरोधी, क्रूर, गुन्हेगार स्वत:ला समाजसेविका म्हणवणार्या महिलांनाही नाझी पक्षाने पक्षात महत्वाचे स्थान दिले.
हिटलरने महिलांसाठी दोन संघटना निर्माण केल्या. तरूण मुलींसाठी ‘बंड डचर मेडल’ व महिलांसाठी ‘एनएस-फ्रॉन्सशाफ्ट’. यांना आदर्श जर्मन महिलेची व्याख्या म्हणजे, घरातील कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारी आणि कुटुंबाच्या बाहेर नाझी पक्षासाठी वंशशुद्धी, ज्यूवंश तिरस्कार यांचा प्रचार-प्रसार करणारी स्त्री अशी केली व याचा प्रसार प्रसारही केला. महिलांनी कुटुंबातील जवाबदार्यांव्यतिरिक्त काय करायचे तर केव्ाळ नाझी पक्षाचे काम, असा शिरस्ता होता. विशेष म्हणजे या महिलाविरोधी विचारांच्या वाहक हिटलरच्या समर्थक असलेल्या महिला होत्या. या महिला व्याख्यानातून, लेखातून, प्रवचनातून महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात मांडणी करायच्या आणि बहुसंख्य पुरुष वर्ग या व्याख्यान प्रवचनांचे स्वागत करून प्रचार करत असे.
नाझी पक्षाचा अजेंडा लोकात पोचविण्याची जवाबदारी प्रामुख्याने सिनेनट्यांवर, उद्योगपतींच्या पत्नी व मैत्रिणींवर १९२२पासून सोपवली होती. त्यात मागदा गोबेल्स ही हिटलरची मैत्रीण, हाना रितेश ही फिल्म निर्माती, लेनी रेफेनस्टाही ही नटी, समाजसेविका म्हणवणारी, ह्युगो ब्रुकमन या हिटलर समर्थक पत्रकाराची पत्नी एल्सा ब्रुकमन, एडविन बेचस्टेन या उद्योगपतीची पत्नी हेलन बेचस्टेन अशा अनेक स्त्रिया होत्या. विशेष म्हणजे गरट्रुड वोन सेडलिज या राजवंशातील एका महिलेने १९२३ साली नाझी पक्षास ३० हजार मार्क्सची देणगी दिली, तर हेलन या उद्योगपत्नीने तिची मिळकत नाझी पक्षास दान दिली. जर्मनीतील श्रीमंत नि अतिशिक्षित महिलांना हिटलरचं असं समर्थन करायला प्रचंड आवडत असे. यातून महिला मतदारवर्ग हिटलरकडे आकर्षित करण्याचे काम झाले. यामुळे महिलांनी हिटलरला प्रचंड मतदान केले हे वास्तव आहे.
हिटलर हा अविवाहित होता आणि तो समाजात पुरुषी अहंभावाची पेरणी करत असतानाच त्यास राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे वेष्टन वापरून ज्यू वंशाचा द्वेष करत होता. यासाठी महिलांचा वापर करणे त्याच्या डावपेचाचा भाग होता. परंतु प्रत्यक्षात हिटलरच्या काळात वायमार रिपब्लिकने महिलांना दिलेले स्वातंत्र्याचे व समतेचे सर्व अधिकार हिरावले गेले. पण प्रचारकी महिला मात्र वायमार रिपब्लिकच्या कालखंडास ज्यूंचे लांगूनचालन करणारा कालखंड असा प्रचार करत स्वत:च्याच पायावर कुर्हाड मारून घेत होत्या.
हिटलर काळात प्रत्यक्षात स्त्रीपुरुष समता हा विषय संपला आणि स्रीपुरुष समरसता रूढ झाली. सन १९३३मध्येच मुलींच्या शिक्षण धोरणात बदल झाला व मुलींनी उच्चशिक्षण घ्यायचे नाही, असा अलिखित नियम झाला. मुलींनी लॅटिन भाषा आणि विज्ञान शिकण्याऐवजी घरातील जबाबदारीचे शिक्षण घ्यावे असा विचार प्रचलित झाला. मुलींनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे नाही, असाही प्रयत्न सुरू झाला. कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट विचारांच्या स्त्रियांवर बंदी आणली, काहींना अटक केली गेली तर काहींना मृत्यूदंडही दिला गेला. सन १९३६मध्ये महिलांनी न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि प्राध्यापक होता कामा नये असा आदेश स्वत: हिटलरने दिला. ८ जून १९३७च्या एका अध्यादेशानुसार या सर्व पदांवर केवळ पुरुषांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. गणिततज्ञ महिला रूथ मॉफंग या महिलेस विद्यापीठात शिकवण्यास बंदी आली. एवढेच नव्हे तर महिलांनी कसे राहावे, कोणते कपडे घालावे हेदेखील नाझी पक्षाने ठरवले. गंमतीची बाब अशी की, हे सर्व करणारा गोबेल्स हा परंपरावाद्यांच्या लिपस्टिक विरोधी अजेंड्याचा विरोधक होता. महिलांनी हवी ती लिपस्टिक लावली पाहिजे असे त्याचे मत होते आणि या त्याच्या विचारांवर फिदा होऊन लिपस्टिक लावून नाझी अजेंडा कसा स्त्री स्वातंत्र्यवादी आहे, हे सांगणार्या महिला जर्मनीत लोकप्रिय होत्या, सेलीब्रिटी होत्या. कारण त्या हिटलरच्या पवित्र व नव स्वातंत्र्यवादी साम्राज्याच्या समर्थक होत्या.
हिटलरचे व नाझी विचारांचे समर्थन, प्रचार नि प्रसार करण्याचे काम प्रामुख्याने सिनेमातील नट्यांवर, सेलेब्रिटी महिलांवर, पत्रकार व उद्योगपतींच्या पत्नीवर सोपवले होते.
इतिहास हा वर्तमान आणि भुतकाळ यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद असतो, या संवादातून मानव कल्याणकारी भविष्य घडवणे हेच इतिहासाच्या अध्ययनाचे मुख्य ध्येय असते. हे ध्येय गाठायचे की कोणत्या राजवटीस ‘थर्ड राईश’ म्हणत ‘फर्स्ट राईश’च्या धुंदीत जगायचे हे प्रत्येकाने स्वत: ठरवायचा विषय आहे.