अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून अखेरच्या महायात्रेला निघालेले शिवशाहीर अखेरीस स्वर्गलोकाच्या महाद्वारापाशी साक्षात आपले आराध्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उभे पाहून बाबासाहेबांना आपले जीवन सार्थ झाल्यासारखेच वाटले. काही पाऊले आधी थांबून महाराजांना लवून मुजरा केला. आपल्या लाडक्या बळवंताला तिथे पोहोचलेला पाहून शिवप्रभूंनी स्वतः पुढे होत या मोरेश्वरसुताला कवेत घेतले, त्या पळी शिवसाधकाला साधनेचे फळ पावले. इतक्यात द्वारापाशी जमलेल्या राणीवशातून वाट काढत स्वतः जातीने सईबाई हातात औक्षणाचे तबक घेऊन आल्या. आपल्या लाडक्या बाळाचे त्यांनी औक्षण केले आणि त्याला मनभरून आशीर्वाद दिला. बाबासाहेबांचे अंतःकरण समाधानाने ओसंडून वाहू लागले. इतक्यात त्यांना कोणाचीतरी हाक आली.
—-
कार्तिक मासातल्या शुक्ल पक्षाची ती एकादशी. पुरंदरेवाड्यावर कसली तरी लगबग सुरु होती. ‘जाणता राजा’ची सिद्धता असावी असा कयास बांधून वाड्याच्या महाद्वारानजीकच्या मार्गावरून जाणारे पादचारी निर्धास्त होते, परंतु ही जी शिवशाही पुरंदरेवाड्यावर अवतरली होती यातील कोणीही मर्त्य नव्हते. काहीतरी अलौकिक घडायचे असावे म्हणूनच शिवप्रभूंचे हे समस्त भक्त लगबगीने पुरंदरेवाड्यावर अवतरले होते.
अवघ्या दोन-तीन मासांपूर्वीच त्यांनी आपल्या लाडक्या बालकावर स्वर्गाहून पुष्पवृष्टी केली होती, त्याला कारणही तसेच होते. सर्वांचा लाडका ‘बाबा’ वयाच्या शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत होता. तेव्हापासूनच सार्यांना आजच्या या दिवसाची आतुरतेने प्रतीक्षा होती. आपल्या ‘बाबा’ने आपल्या सर्वांमध्ये बसून लाडक्या शिवबाचे आख्यान मांडावे आणि आपण सर्वांनी ते याचि देही याचि डोळा अनुभवावे अशी आस सर्वांनाच लागली होती. या प्रतीक्षेतच गेली कित्येक दशके रितीच गेली होती.
नाही म्हणायला आजवर अनेकदा कधीतरी कुठल्यातरी कार्यक्रमस्थळी ‘बाबा’ येणार म्हणून आधीच एखादी प्रभृती येऊन सभामंडपातील जागा पकडत असे, न जाणो ‘बाबा’च्या आख्यानासाठी प्रभृतींचीही दाटी झाली तर? अशा एखाद्या कार्यक्रमात महाराष्ट्रशारदेस वंदन केल्यावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचा लाडका ‘बाबा’ त्यांच्याकडे पाहून तिथूनच दोन्ही हातांनी नमस्कार करत असे आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ वाहत असत. तरीही त्यांचा ‘बाबा’ हक्काने अजूनही त्यांच्यात बसत नाही, अजूनही आपली कर्तव्यपूर्ती झाली नसल्याचे सांगतो याची त्यांना रुखरुख लागली होती.
अखेरीस आज ३२ मणांच्या सुवर्णसिंहासनावरून आदेश झाला. ‘पालखी पाठवा, आमच्या ‘बाबा’च्या स्वागताची घटिका जवळ येत आहे.’ आणि आदेश देणारे कोण? तर साक्षात गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनीतीधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज! म्हणूनच आता महाराजांचे आवतान ‘बाबा’ अव्हेरणार नाही, याची समस्तांस खातरी होती आणि म्हणूनच एकेक करत स्वर्गलोकीचा एकेक शिवधर्मी पुरंदरेवाड्यात हजेरी लावू लागला होता. आता प्रतीक्षा निर्वाणाची!
महाराजांचा आदेश बाबासाहेबांसी पावला आणि आदेश वाचतावाचता बाबासाहेबांचे ते तेजस्वी मुखकमल कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने प्रफुल्लित जाहले. शयनकक्षाबाहेर जमलेल्या गर्दीबाबत बाबासाहेबांना समजताच त्यांनी समस्तांस लोटांगण घातले. कार्तिकी एकादशीच्या दिवशी जणू विठूमाऊलीची लेकरे एकएका पायी लागावीत, त्याक्षणी जितका आनंदसोहळा होतो तितकाच हाही शिवरायांच्या लेकरांचा आनंदसोहळा! पळांमागून पळे लोटली, घटिकांमागून घटिका लोटल्या, प्रहरांमागून प्रहर लोटले, दिन उलटत गेले. संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होत होती म्हणून मर्त्य लोकातल्या कोणालाच या निर्वाणाची कुणकुण लागली नाही, पण तरीही या महानिर्वाणाची वार्ता दिगंतात पसरत गेली.
अखेरीस ज्याची आतुरता देवादिकांनाही लागली होती, तो सुदिन उजाडलाच. कार्तिक मासातली एकादशी. महाराष्ट्रभूमीतील आणि हिंदू धर्मातील विशेष महत्त्व असणार्या या कार्तिकी एकादशीलाच महानिर्वाणाचे पुण्य भाग्यवंताच्याच नशिबी यावे आणि आपले जीवन शिवचरणी वाहिल्यावर या शिवतपस्व्याचे अवघे जीवन खचितच भाग्यवंत ठरले होते. आजच्याच दिवशी हे महानिर्वाण व्हायचे होते आणि म्हणूनच समस्त प्रभृती एव्हाना पुरंदरेवाड्यावर जमल्या होत्या. हरी आणि हर यांच्या अद्वैत भेटीचा आजचा सुदिन, आजच्याच दिवशी दैवत आणि साधक यांची गळाभेट व्हायची होती. सुदिन उजाडला होता, पण सुवेळ? ही सुवेळ कुठली याचा अंदाज स्वतः शिवप्रभूंनासुद्धा नसावा म्हणूनच तर ते स्वर्गलोकीच्या महाद्वारापाशी या लेकराच्या आगमनाची आतुरता बाळगून उभे होते. पळामागून पळे लोटत होती, तशी ही आतुरता देखील वाढतच जात होती.
संध्या लोटली, घरोघरी कार्तिकी व्रताचा संकल्प जाहला. रायरेश्वराच्या पिंडीवर तुळशीपत्र आणि विठ्ठलाच्या पायांवर बिल्वपत्र समर्पित होऊ लागले. या शिवसाधकाने इतरांच्या साधनेत खंड पडू नये याची ही खबरदारी घेतली. प्रहर उलटत गेले. निशा सरली, ब्राह्ममुहूर्त उजाडला. आंग्ल दिनदर्शिकेनुसार नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारीखेची ती पहाट. ब्राह्ममुहूर्त सरतासरता सात दशके अथक अविश्रांत सुरू असलेल्या शिवयज्ञात अखेरीस पूर्णाहुती पडलीच. एक शिवयोगी शिवतेजात विलीन झाला. लौकिकार्थाने सांगायचे तर श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या एका दोस्ताला कडकडून आलिंगन दिले. या दोस्ताचे नाव मृत्यू! हा दोस्त रंगरूपाने फार भेसूर दिसतो. सगळे भितात त्याला. पण तो फार प्रेमळही आहे. सर्व यातनांतून मनुष्याला एका निमिषांत सोडविण्याचे सुखदायक सामर्थ्य त्याच्या एका हाकेत असते.
अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून अखेरच्या महायात्रेला निघालेले शिवशाहीर अखेरीस स्वर्गलोकाच्या महाद्वारापाशी साक्षात आपले आराध्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उभे पाहून बाबासाहेबांना आपले जीवन सार्थ झाल्यासारखेच वाटले. काही पाऊले आधी थांबून महाराजांना लवून मुजरा केला. आपल्या लाडक्या बळवंताला तिथे पोहोचलेला पाहून शिवप्रभूंनी स्वतः पुढे होत या मोरेश्वरसुताला कवेत घेतले, त्या पळी शिवसाधकाला साधनेचे फळ पावले. इतक्यात द्वारापाशी जमलेल्या राणीवशातून वाट काढत स्वतः जातीने सईबाई हातात औक्षणाचे तबक घेऊन आल्या. आपल्या लाडक्या बाळाचे त्यांनी औक्षण केले आणि त्याला मनभरून आशीर्वाद दिला. बाबासाहेबांचे अंतःकरण समाधानाने ओसंडून वाहू लागले. इतक्यात त्यांना कोणाचीतरी हाक आली. वाट चुकलेले वासरू गोमातेचा आवाज ऐकून ज्या लगबगीने धावत जाऊन मातेला बिलगते, तसेच बाबासाहेब आवाजाच्या दिशेने धावत सुटले.
सदरेपासच्या आसनांवर जिजा माऊली आणि शहाजी राजे आपल्या लेकराची वाट पाहत होते. बाबासाहेब त्या आसनांपाशी पोहोचले, लवून मुजरा केला. जिजामाऊलींचा स्वर घुमला, ‘बळवंता, असा दूर का रे उभा?’ बाबासाहेब हर्षातिरेकाने दांपत्याच्या पायांशी कोसळलेच. श्री भक्तशिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला बिलगावेत तसेच बाबासाहेब दोघांच्याही पायांना बिलगले. सारी सारी भोसले वंशावळ, शिवरायांचे सवंगडी आणि बाजिंदे, मराठी इतिहासाचे सारे मेरूमणी कार्तिकी एकादशीच्या या सुदिनी ‘बाबा’ला येऊन भेटले आणि बाबासाहेबांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. आता त्या स्वर्गलोकीच्या शिवमंदिरी बाबासाहेब शिवप्रभू, संभाजीराजे, जिजाबाई, शहाजीराजे, मालोजीराजे आणि सार्या खाशा मंडळींसमोर शिवआख्यान मांडत आहेत, आख्यान अगदी रंगात आलंय आणि असंच निरंतर रंगत राहणार आहे. जणू काही ज्योतीने तेजाची आरतीच होत आहे.