पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी साजरी झाली. त्यांचे `बटाट्याची चाळ’ हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात वर्णिलेले काही चाळकरी दैनंदिनी म्हणजे `वासरी’ लिहितात. या विषयावर पुलंनी `काही वासर्या’ नावाचे हास्यस्फोटक प्रकरण लिहिले आहे. ते वाचनीय आहे.
आमच्या कांदेवाडीतील `फ्लॉवर प्लाझा’ सोसायटीमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागत कार्यक्रमात एकाने नेमके या भागाचेच अभिवाचन केले. प्रेक्षक या अस्सल विनोदाने `छप्पर फाडके’ (कार्यक्रम गच्चीवर असल्यामुळेही असेल) हसत होते. त्यातील अनेकांनी तोच मुहूर्त साधून स्वत:ची वासरी लिहायला सुुरुवातही केली.
दरवर्षी १ जानेवारीपासून अनेकजण दैनंदिनी लिहायला लागतात. पण हा दृढ संकल्प फार तर महिना दोन महिने टिकतो. आधी पानपानभर लिहिणारे शेवटी एकदोन ओळी व नंतर अधूनमधून लिहायला लागतात. आता नियमितपणे लिहिणे भाग पडले, कारण यावर्षी करोनासंकटाने सर्वांना हात धुवत घरीच बसायला लावले. तेव्हा या अतिस्वच्छ हातांना काहीतरी काम हवेच ना! नेमके या दिवसांचे कहाणीवर्णन करणारी एका सोसायटीकराची दैनंदिनीतील काही पाने इथे सादर…
तशी सर्वच दिवसांची पाने वाचनीय आहेत पण करोनाने हे शिकवले की मोजक्याच गोष्टीत चालवून घ्यायचे. त्यातही आनंद मिळतो.
२५ मार्च २०२०
`करोना’ व्हायरस भारतातही आला, पण यात आनंद मानण्यासारखे काहीही नाही. उलट फारच भयंकर झाले.. एकवेळ उकळता लाव्हारस परवडला, पण `हा’ नको!
जन्मदात्या चीनमध्ये त्याने हाहाकार उडवला. आता अमेरिका युरोपला दणका देत आहे. भारताने सावध राहायला हवे. आपलीही दाणादाण उडायला नको म्हणून आता `लॉकडाऊन’ म्हणजे टाळेबंदी सुरू… सारे व्यवहार बंद. फक्त जीवनावश्यक गोष्टी आणण्यापुरते घराबाहेर पडायचे.
आज गुढीपाडवा… मराठी नववर्षाचे स्वागत. `देवामहाराजा! हे वर्ष आम्हा सगळ्यांना चांगले जाऊं दे रे बाबा!’
बायकोने बासुंदीचा बेत आखला. सकाळी दूध आणायला खाली गेलो तर वॉचमनने हातातल्या वहीमध्ये मी बाहेर चालल्याची `दोध लानेकू’ या कारणासह नोंद केली. आमच्या दूधवाल्याकडचे दूध संपले होते. इतरत्रही कुठे मिळाले नाही. बहुधा लोकांनी पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत दररोज लागणार्या दुधाचा आजच साठा करून ठेवला असावा. मानलं बुवा या दूरदृष्टीला!
दुधाशिवाय परत आलो तर पुन्हा तीच तर्हा. आता वॉचमनने माझ्या येण्याची वेळ नोंदविली… माझ्यावर पाळत ठेवण्याइतका मी मोठा झालो की काय? या उत्सुकतेने मी विचारले, `ये क्या?’ तर बोलला, `सेक्रेटरी साब ने ऐसा करने को बोला! वो कोरोना-फिरोना है ना!’
काय गंमत आहे. करोना प्रश्नाचे अचूक उत्तर त्याने अनपेक्षितपणे त्या जोडशब्दातच दिले होते.
`करोना! फिरो ना!’
म्हणजे कुणीही कुठेही फिरू नका.
२ एप्रिल
सध्या थिएटरमध्ये नाटक सिनेमा बघण्यास बंदी, गार्डनमध्ये किंवा मॉलमध्ये जायलाही बंदी. तेव्हा टीव्ही बघणे हेच एकमेव मनोरंजन. साबणाने हात धुवा आणि रिमोट कंट्रोलने टीव्ही चॅनेल बदलत रहा. एवढेच आपल्या हातात आहे.
आज टीव्ही स्क्रीनवर बघतो तर वरच्या भागात वेगवेगळे आकडे दिसत होते. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचे निकाल दिसतात तसे! त्या आकड्यात डोकावलो. भारतातील विविध राज्यात अजूनपर्यंत सापडलेल्या करोनाग्रस्तांची ती संख्या होती. नंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आकडे दाखविले. एकंदर काय तर इथेही भारतात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात मुंबई अग्रेसर आहे.
मुंबईकरांनो! कर भरण्यात तुम्ही सर्वात पुढे आणि करोनाग्रस्तांमध्येही पुढे! आता आपल्या भन्नाट वेगाला जरा आवर घाला! घरातच बसा.
सध्या वर्तमानपत्र येत नाही. टीव्हीवरही जुन्याच मालिका दाखवतात. आता तर परत `रामायण’ सुरू केले. एकेकाळ प्रचंड गाजलेली मालिका. तेव्हा रामायण सुरू झाले की रस्ते ओस पडलेले असायचे, जणू काही अघोषित संचारबंदी म्हणायची. जो तो इकडूनतिकडे बाणांचे वर्षाव बघण्यात मग्न. काळाचा महिमा बघा. रस्ते ओस ठेवायला हवेत म्हणून सरकारने परत रामायण सुरू केले. आता राम पुन्हा घराबाहेर वनवासात आणि आपण सारे घरातच बसण्याची सक्ती झाल्याने वनवासातच.
`आराम हराम आहे’ असे म्हणतात पण आता आरामातच राम आहे.
आजची रामनवमी अशी साजरी होत आहे… जय श्रीराम!
७ एप्रिल
माझा पगार बँकेत जमा होतो. मी मध्यमवर्गीय असल्याने परंपरेनुसार मला पैसे काढून आणावेच लागतात. बँकेत गेलो. दाराजवळच सुरक्षारक्षकाने अडवले. माझ्यापुढे एक लुंगीवाला वयस्कर गृहस्थ होता, त्याला हात पुढे करायला सांगितले. सुरक्षारक्षकाने हातातल्या बाटलीतून लुंगीवाल्याच्या हातावर काहीतरी शिंपडले. आता माझी पाळी येणार तेवढ्यात चोरट्यांनी दिवसाढवळ्या बँक लुटल्याप्रमाणे क्षणार्धात सुरक्षारक्षकाचा चेहरा घाबराघुबरा झाला. जिवाच्या आकांताने तो ओरडला, `अरे रुको रुको! पिओ मत! सेनिटायझर है! हात पे मलने का! करोना की दवाई है!’
सुरक्षारक्षकाची भंबेरी उडाली, कारण लुंगीवाला `ते’ तीर्थ समजून प्यायला निघाला होता. `करोना की दवाई’ या शब्दप्रयोगाचे मला हसू आले. सॅनिटायझरमध्ये थोड्या प्रमाणात का होईना अल्कोहोल असते. ही दवाई मात्र अशी जालिम आहे की दारूप्रमाणे किक देता देता जिवावर बेतायचे आणि खात्यातले पैसे आपल्याऐवजी वारसदाराला मिळायची पाळी यायची.
बँकेत तर वेगळीच धमाल. कॅशियर महाशयांनी स्टीलच्या चिमट्याने माझ्या हातातून चेक घेतला. त्यावर गरम इस्त्री फिरवली. करोना संसर्गापासून सावधगिरीचा उपाय म्हणून हा सारा प्रकार चाललेला.
मला तर भीती वाटत होती की नोटा देताना आधी माझ्या हातावरही ती तापवलेली इस्त्री फिरवणार की काय… पण माझी भाग्यरेषा मजबूत असावी… तशी वेळ आली नाही.
नाहीतर बहिणाबाईंचे शब्द बदलून मलाही म्हणावे लागले असते,
`अरे संसार संसार, जसा चेक इस्त्रीवर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’
१० एप्रिल
मला सकाळी पावणेसहा वाजता उठायची सवय आहे. म्हणजे उठणे भागच असते. आमचे घर सोसायटी गेटच्या अगदी जवळ दुसर्या मजल्यावर आहे. पहाटे यावेळी जंगमकाका मॉर्निंग वॉकला जातात. स्पोर्टस शूजपासून वॉटरबॅगपर्यंत अंगावरचे सारे `अलंकार’ घालून… ते जाताना गेटचा लोखंडी दरवाजा उघडताना व परत लावतानाचा मोठ्याने आवाज ऐकायला येतो. बस्स! तो कानात शिरल्याशिरल्या माझे डोळे उघडतातच. तोच माझा घड्याळाचा गजर समजायचा.
आता मात्र करोना चालतचालत प्रत्येकाच्या घरी यायला नको म्हणून मॉर्निंग वॉकला बंदी करण्यात आली आहे. तरीही काही धट्टीकट्टी पण हट्टी माणसे सकाळी फिरायला जातातच. संचारबंदी मोडली म्हणून पोलिसांनी अनेकांना दुपारपर्यंत भर उन्हात बसून राहण्याची शिक्षा दिली. उठाबशा करायला लावले. कठीणकठीण योगासने करायला लावली. एवढी फिरायची हौसच आहे तर गाळा घाम आणि करा रगडून व्यायाम!
जंगमकाका मात्र सावध झाले. ते घराबाहेर पडत नाहीत. घरच्यांसोबत बुद्धीबळ खेळतात. स्वत: चालण्याऐवजी हत्ती, घोडा, उंट यांना चालवून त्यामध्ये मॉर्निंग वॉकचे समाधान मानून घेतात. `दुधाची तहान ताकावर’… दुसरे काय!… त्यामुळे तो रोज सकाळचा `गजर’ आपोआप बंद झाला. मीही आरामात आठ वाजता उठतो.
आमचे अण्णा मात्र रोज सकाळी अर्धा तास प्राणायाम करतात आणि हाताच्या बोटांनी छातीवर टकटक आवाज करीत आभिमानाने म्हणतात, `सत्तरी ओलांडली तरीही फुफ्फुसे मजबूत आहेत. श्वास बाहेर सोडून बाराबारा सेकंद श्वासाविना राहू शकतो. तो करोना माझ्या फुफ्फुसात घुसला तर दम कोंडून मरेल बघ… माझ्याकडं तुझे पार बारा वाजतील म्हणावं!’
काही म्हणा… अण्णांचा श्वास लय भारी!… आणि आत्मविश्वासही!
१४ एप्रिल
खिडकीतून बघतो तर समोरच्या बिल्डिंगच्या आवारात पाचसहा माणसे जमलेली. बांबू, चटई, मडके वगैरे सामानही दिसले, कोणीतरी तिथल्याच झाडावरची फुले काढून हार तयार केला. काही वेळाने कळले की बाबूराव गेले… ज्येष्ठ नागरिक संघातले अण्णांचे ते सोबती.
अण्णांना हे सांगताना माझा जीव जड झाला होता. बातमी ऐकून अण्णा एकदम सुन्न झाले. नंतर बोलू लागले, `भला माणूस! बाबूराव दर गुरुवारी दत्तमंदिरात दत्ताची गाणी तल्लीन होऊन गायचे. तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचा भक्तिभाव… काय दिसायचा म्हणून सांगू! ती गाणीही त्यांनीच लिहिलेली… मला तर त्यांची दत्तगीताची वही वाचायला मिळाली होती. हे टप्पोरं अक्षर!… मोगर्याच्या फुलासारखं…’
अण्णा आठवणीत रमले. मुलाने मला बाजूला यायची खूण केली आणि हळू आवाजात बोलला, `आजोबांना बाबूरावांचे शेवटचे जवळून दर्शन घडवून आणतो!’ मी अवाक होऊन म्हटले, `वेडा आहेस काय! लॉकडाऊनच्या काळात या वयात अण्णांना घराबाहेर नेणं योग्य नाही’ यावर तो बोलला, `थांबा जरा!’
आतल्या खोलीतून त्याने दुर्बीण आणली आणि बाल्कनीत स्टँडवर नीट बसवली. अण्णांचा हात पकडून त्यांना सावरत तिथे घेऊन गेला. दुर्बीणीच्या भिंगातून बघायला सांगितले. अण्णांनी तसे केले आणि भारावल्या आवाजात बोलले, `बाबा माझ्या! काय प्रसन्न चेहरा दिसतो!… देवाची गाणी गाताना असायचा! अगदी तस्साच!’
अण्णांनी नमस्कार केला. डोळ्यासमोरच्या बाबूरावांना आणि नातवालाही! ‘ज्या दुर्बीणीतून मला आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र दाखवायचास, त्यामध्ये हे बघायचा योग येईल, अशी मी कधीच कल्पना केली नव्हती… आता पटले की बाबूराव हेही आमच्यातले नक्षत्रांच्या उंचीवरचे व्यक्तिमत्व होते!’
अण्णांचा चेहरा भक्तिभावाने फुलला होता… सध्या मंदिरे बंद असतानाही.
१७ एप्रिल
यावेळी आम्ही ताडोबा अभयारण्यात मस्त भटकंती करणार होतो. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हाच बेत आखला, पण आले करोनाच्या मना तिथे कोणाचे चालेना, इथे काँक्रिटच्या जंगलात जेरबंद झालो.
हल्ली मात्र काही आगळेवेगळे घडू लागले आहे. समोरच्या रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट नाही. त्यामुळे नीरव शांतता असते. प्रदूषणही नाही. रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर लावलेली फुलझाडे याआधी अशी कधी फुलली नव्हती. यंदा छान बहरली आहेत. आणि हो!… पक्ष्यांचा किलबिलाटही कानावर पडतो. चारपाच वेळा `कुहू कुहू’ ऐकले काल तर चक्क रात्रीही… कान अगदी तृप्त झाले. एकंदर निसर्ग थुईथुई नाचू लागलाय. ताडोबा इथेच अवरतल्यासारखे वाटते. चला! कुठे जायची गरज नाही. सहलीचा खर्च आणि दगदगही वाचले. हासुद्धा फायदा आहेच.
हे सर्व निसर्गायण लिहिण्याचे कारण आज टीव्हीवर अभिनेता अनुुपम खेर सांगत होता की त्याने गानसरस्वती लता मंगेशकर यांना फोन करून विचारले, `लॉकडाऊनमध्ये तुम्ही काय करताय’… उत्तर आले…
`आपल्यासोबत जो कायम असतो तो म्हणजे आपला श्वास! त्यावर लक्ष ठेवून ध्यान करते.’
वा! वा! लताजी नव्वदीतही वेळ किती सत्कारणी लावत आहेत… आवाज ही त्यांना दैवी देणगी. आवाजाचे इंधन म्हणजे श्वास. लताजींनी जणू श्वासाची मानसपूजा बांधली आहे… नाव `लता’! त्यांना ध्यानाचा `ताल’ गवसलाय.
काय जादू आहे… कधीही कानावर न पडणारे कोकिळकूजन आता ऐकू येत आहे आणि गानकोकिळा श्वासपूजन करत ध्यानस्थ झाली आहे… दोघेही आपापल्या आनंदात मग्न!
हे खरे जगण्याचे गाणे.
२७ एप्रिल
गेला महिनाभर माझे `वर्क फ्रॉम होम’ चालले आहे.
ऑफिसला दांडी, घरातूनच काम करायचे. बॉस डोळ्यासमोर नसल्याने कसे हलकेहलके वाटते. बॉसचेही `वर्क फ्रॉम होम’. पण तो खूप खूप काम करतो. ऑफिसचे शिवाय घरचेही! घरकामवाली सुट्टीवर… म्हणून त्याला हे प्रमोशन…
बॉसला फोन केला तर खूप वेळानंतर फोन उचलतो. आधी खरे कारण सांगायचा नाही, पण आता मोकळेपणाने सांगतो की कचरा काढत होतो, भाजी निवडतोय, चहा करतोय… त्यात गेले दोन दिवस त्याच्या बायकोची दाढदुखी सुरू झाली. पार आतली एकदम शेवटची दाढ… दाताच्या डॉक्टरचा दवाखाना बंद. त्यामुळे घरगुती उपाय चालू. दाढेला लवंगतेल लावून बायको गालाबाहेरून बर्फ चोळत झोपून रहाते. बॉस नवीन ड्युटीवर.. बर्फ वितळल्याने खाली पडणारे पाणी फडक्याने पुसत रहायचे… हे ऐकूनच माझे पाणीपाणी झाले. नशीब बायको कशीबशी जेवण करते म्हणून ठीक आहे. जेवण तरी काय तर फक्त खिचडी… तेवढेच चावता येते ना तिला… बॉसच्या आयुष्याचीच खिचडी झाली आहे, असे वाटते.
यावरून मी धडा घेतलाय. घरी कायम लॅपटॉप उघडून बसतो. खूप काम आहे असे दाखवतो. नाहीतर बायकोने घरकाम करायला सांगण्याचा धोका आहे. सावध असलेले बरे!
याच्या उलट आमच्या ऑफिसमधील प्युनची तर्हा. होळीला बोंब मारायला म्हणून सहकुटुंब गावी गेला आणि कोरोनाने बोंब ठोकली. आता कोकणातच अडकलाय. पण मजेत आहे. भात, पिठी आणि सुक्या मासळीवर ताव मारतोय. मातीच्या मडक्यातले रसरशीत मटण बनवायला शिकला… यावर्षी ऑफिसात गटारीच्या पार्टीत करेन, म्हणतो. त्याला ढीग करून दाखवायचे असेल पण तोपर्यंत ऑफिस सुरू तर व्हायला हवे.
माणसे आता कामावर जायचा रस्ताही विसरू लागली असतील… काही जण कामावर जायचेही!
५ मे
आज आम्ही (खरं तर माझ्या बायकोनेच) लग्नात मिरवण्याचा दिवस. पण तो उजाडलाच नाही. हिच्या मावसबहिणीच्या चुलत नणंदेचे लग्न म्हणजे हिच्या दृष्टीने आपल्या घरचेच. आता करोनाकृपेने ते पुढे ढकले गेले.
हा लग्नसराईचा मौसम. परंतु सर्व समारंभ बंद. मौजमजा करायला मिळणार नसेल तर ते लग्न कसले म्हणायचे! त्यामुळे अनेकांनी लग्नसोहळा पुढे ढकलला. प्रत्येकाची लग्नगाठ देव स्वर्गात बांधतो. बांधलेली गाठ त्याने थोडी ढिली करून ठेवली आहे… की संधी दिली म्हणायची, `अरे पुन्हा नीट विचार करा!’… यातल्या काही जणांनी असे केले आणि लग्नाच्या भानगडीतून निसटले नाही म्हणजे मिळविली.
काही जोड्या मात्र थांबायला तयार नाहीत. भटजी आणि जवळची एकएक व्यक्ती पकडून लग्न थोडक्यात पार पाडली जात आहेत. यात प्रत्यक्ष `कन्यादान’ करू न शकलेले अनेक दु:खी आईबाप मनातून प्रचंड खूष असतील. पोरीने पैसे वाचवले ना! ते जास्त महत्त्वाचे.
महाराष्ट्रात यापूर्वी अनेक समाजसुधारकांनी विवाह सोहळ्यात होणारी वारेमाप उधळपट्टी थांबवण्यासाठी स्वत:चे आयुष्य खर्ची घातले, पण त्यांना जे जमू शकले नाही ते या अदृश्य करोनाने करून दाखवले.
करोनात असे मंगलम…
आजची नवी बातमी म्हणजे सरकार तुरुंगातील वैâद्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडत आहे. करोनासंसर्ग टाळण्याचा उपाय म्हणून… खरे तर `साडेतीन हजार कैदी दुसर्या तुरुंगात रवाना, अशी बातमी देणे योग्य ठरले असते.
`लग्न ही पुरुषांसाठी उमरकैद आहे’ असे कुणीतरी लिहून ठेवले आहे अशा `घरगुती’ कैद्यांसाठीही सरकारने काहीतरी उपाययोजना करायला हवी. करोना असो वा नसो… या कैद्यांची कायमच घाबरगुंडी उडालेली.
१७ मे
संचारबंदी शिथिल केली की जिकडेतिकडे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसते. सरकार वारंवार बजावते, ‘दोघात अंतर ठेवा!’… पण माणसे ऐकतील तर शपथ.
मी लहानपणी शाळेत जाताना नेहमी एक सरकारी जाहिरात लक्ष वेधून घ्यायची. भिंतीभिंतीवर, खांबाखांबावर ते वाक्य परतपरत दिसायचे… `दोन मुलांत अंतर ठेवा’ माझ्या बालमनावर ते पक्के बिंबले. मी तेव्हा नेहमीच इतर मुलांपासून `चार हात दूर’ रहायचो. खूप वर्षांनी कळले की हा संदेश मोठ्या माणसांसाठी होता. पण तेव्हाच्या बहुतेक मोठ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या अण्णांनी मात्र `ते’ काटेकोरपणे पाळले. माझ्यानंतर तीन वर्षांनी बहिणीचा जन्म झाला. त्यानंतर फुलस्टॉप…
यालाही कारण परत दुसरी सरकारी जाहिरात. `हम दो, हमारे दो’… त्याकडेही मोठ्यांनी सवयीने दुर्लक्ष केले. खरे तर तेव्हाच सर्वांनी हे पाळले असते तर आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात असती आणि आता एकमेकांत अंतर ठेवण्याबाबत सक्ती करायची वेळच आली नसती.
असे अंतर पाळणे मला आता सोपे जाते. एकूण काय तर लहानपणी पक्के संस्कार झाले असतील तर मोठेपणी ते उपयोगी पडतात हे खरे.
मला एकच मुलगा. त्यामुळे तशी काळजी नाही. तरीही बायकोला आज नवीन चिंता सतावू लागली… लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढवला जातो. एक टप्पा संपला की पुढची तारीख मिळते… कोर्टातील केसप्रमाणे… हे असेच चालू राहिले तर आणखी दहा वर्षांनी एकुलत्या एका पोराचे लग्न करायची वेळ येईल तेव्हा तेही घरातच करायचे काय!
मी बायकोला म्हटले, `सून आयुष्यभर तुझ्या सेवेला घरात असेल हा बक्कळ फायदा लक्षात घे!’ तिची पुढची चिंता लगेच तय्यार, `अहो, उलट पोरालाच तिने घरगडी केलेलं बघायची वेळ आली नाही म्हणजे मिळविली… त्याबाबतीत तुम्ही अजूनपर्यंत तरी सुटलात…?
मी निमूटपणे लॅपटॉप उघडला. अशा आपल्यावरच उतरणार्या चर्चेपासून `चार हात दूर’ रहाणे उत्तम. लहानपणापासूनचे संस्कार पाळलेच पाहिजेत.
१ जून
लॉकडाऊननंतर आता अनलॉक-१
करोना पसरण्याचा वेग आटोक्यात येत आहे. तेव्हा देशाला लावलेले कुलूप आता खोलायचे. एक एक गोष्ट हळूहळू परत सुरू होणार. सर्व पूर्वपदावर यायला आणखी काही महिने लागतील. तोपर्यंत कोरोनावर लसही निघेल. यापुढे चेहर्यावर मुखपट्टी लावूनच काम करायचे. एक बरे झाले, तुमची ओळख तुमच्या चेहर्याने नाही तर खर्याखुर्या कामाने निर्माण होईल. वॉर्डबॉय, नर्स, डॉक्टर, पोलीस ड्रायव्हर यांनी तसे दाखवून दिले.
कोरोनामुळे असेही कळले की आपण आपल्या माफक गरजांचे रुपांतर नस्त्या चैनीत करून ठेवले होते खरे तर फारफार कमी खर्चात सारे काही भागू शकते.
सगळ्यांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा काळ विश्रामावस्थेत गेला, त्यात काहींनी नुसताच टाईमपास करण्यात आनंद मानला तर इतरांनी नवनवीन गोष्टी सिकून आपल्या व्यक्तिमत्वाला `कल्हई’ लावायची संधी घेतली असेल. अंतरंगाला नवीन झळाळी घेऊन ते सज्ज आहेत.
टीव्ही चॅनेलवर हल्लीच पाहिलेली वाशिम भागातील बातमी आठवली. लॉकडाऊनमुळे शेतावर कामाला जाऊ शकत नाही अशा आफत आलेली… या परिस्थितीत एका गरीब शेतकरी दांपत्याने कंबर कसली. घराच्या आवारात विहीर खणायला घेतली. ते दोघेच तासन् तास राबत होते. या अपार कष्टाचे फळ म्हणून पंचवीस फूटावर पाणी लागले. त्यांची पाण्यासाठीची आयुष्यभर चालणारी पायपीट यापुढे वाचणार… हा चमत्कार कॅमेर्यापुढे सांगताना त्या शेतकरी महिलेचा पाणीदार आनंदाने उजळलेला चेहरा आत्ताही माझ्या डोळ्यासमोर दिसतो… आणि माझेही डोळे पाणावतात… पाणी म्हणजे जीवन… `जीवन त्यांना कळले हो!’ असेच म्हणायला हवे.
आपण प्रत्येकाला आपापले जीवन असे समृद्ध करता आले तर…
दिनांक —
आज सकाळी ब्रेकिंग न्यूज…
करोनावरची लस सापडली. चला उत्तम झाले. सार्या जगावरचे मोठे संकट आता टळले म्हणायचे. हा आनंद साजरा करण्यासाठी संध्याकाळी कामावरून येताना पेढे घेऊन आलो. घरात पाऊल टाकले तो माझीच वाट पहात असल्यासारखे अण्णा खुर्चीवरून उठून माझ्याजवळ येत बोलले.
`का रे! तुला काही कळलं का!’
मी म्हटले, `हो ना करोनावरची लस सापडली हे घ्या पेढे’
अण्णांचे समाधान झाले नव्हते, `त्याचे नव्हे रे! नीट लक्ष देऊन ऐक! आत्ताच मी ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन आलो. तिथं बातमी कळली… त्या करोनाचा म्हणे जुळा भाऊ आहे. लहानपणी चीनमधल्या जत्रेत हरवला होता. तोही आता बंधुप्रेमापोटी भावाला भेटायला भारतात येतोय… करोनापेक्षाही जास्त खतरनाक आहे म्हणे! आता आपलं काही खरं नाही…’
बोलणे थांबवून काही सेकंदाने अण्णा हसू लागले. म्हणजे ते विनोद करत होते तर.
मीही म्हटले, `अण्णा! माणसे अशाच अफवा पसरवणार असतील तर परत म्हणावं लागेल… करोना! फिरो ना!’
कधी नव्हे ते अण्णांनी मला टाळी दिली आणि परत मोठमोठ्याने हसू लागले.
कारुण्याची झालर असलेला विनोद सर्वश्रेष्ठ समजतात. करोनाकाळात असे अनेक विनोद घडले आणि प्रत्येकाला `आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ म्हणत दु:ख विसरुन नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा देऊन गेले.