मोठेपणी आपण काय व्हावे याबद्दल आपण पाहिलेली स्वप्ने, आपण घेतलेलं (किंवा आपल्याला घ्यावं लागलेलं) शिक्षण आणि आता प्रत्यक्षात आपण करीत असलेला व्यवसाय/नोकरी यात ताळमेळ नसण्याचीच शक्यता जास्त असते. लहानपणी, गावच्या न्हाव्याच्या दुकानातील मायापुरी वाचून बर्याच लोकांना आपण मोठेपणी एका फाईटमधे डझनभर गुंडांना लोळविणारा आणि सुंदर हिरोईनीसोबत बागेत प्रेम करणारा हिरो व्हावे किंवा झकपक कपड्यात मिरविणारी, नाचरी हिरोईन व्हावे असं लहानपणी सगळ्याच पोरापोरींना वाटत असते. (शेवटच्या बॉलवर षटकार मारून आपल्या देशाला क्रिकेटचा वर्ल्ड कप मिळवून देण्याची स्वप्नं पाहणार्यांचीही काही कमी नाहीये.) पण का कुणास ठाऊक, आमच्या बाळू लोखंडेने मात्र आपण मोठं झाल्यावर क्रिकेटर किंवा हिरोबिरो न होता सिनेमाचा डायरेक्टरच व्हायचं अशी खूणगाठ मनाशी बांधली होती.
शेवटी सगळ्यांच्या स्वप्नांचं जे होते तेच बाळूच्याही स्वप्नांचं झालं. नाही म्हणायला, गावच्या जत्रेत बाळूने दिग्दर्शित केलेल्या रेकॉर्ड डान्सनी, दशावतारी खेळांनी आणि शाळा-कॉलेजातील एकांकिकांनी परिसरातील लोकांची करमणूक केली. त्यामुळे बाळूच्या अंगात दिग्दर्शकी किडा असल्याचे जरी सिद्ध झाले तरी ‘किड्याची धाव उकिरड्यापर्यंत’ अशी म्हणच असल्याने बाळूची मजल रेकॉर्ड डान्स, दशावतारी खेळ आणि एकांकिकांच्या दिग्दर्शनापुढे जाऊ शकली नाही आणि देश एका महान दिग्दर्शकाला मुकला.
मराठीत चंदेरी, हिंदीत मायापुरी तसेच रंगभूमी, इंग्रजीत फिल्मफेअर, स्क्रीन, स्टारडस्ट अशा नियतकालिकांद्वारे शाळेत असल्यापासूनच बाळूचा सिनेमाचा चौफेर अभ्यास सुरु होता. नवीन येत असलेल्या सिनेमाची स्टोरी त्याला माहित असायची, सिनेमाची पूर्ण स्टारकास्ट त्याला पाठ असायची, सेटवर घडणार्या गमतीजमती, ‘मगर हम चूप रहेंगे’सारख्या सदरातून येणारं गॉसिप, कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोईनशी लफडं आहे याची इत्थंभूत माहिती बाळूला तोंडपाठ असायची. ज्या तन्मयतेने बाळू ही सिनेमाविषयक मासिके वाचायचा त्या गंभीरपणे त्याने यूपीएससीचा अभ्यास केला असता तर तो पहिल्या प्रयत्नातच कलेक्टर झाला असता. पण बाळूला असल्या फालतू नोकरीत रस नव्हता.
कुठे एखादी कथा वाचली, ऐकली की तो मनातल्या मनात त्याचा स्क्रीनप्ले लिहायचा, स्वप्नातल्या सिनेमाला बजेटची चिंता नसल्याने, बाळू त्याला हव्या तशा टॉपच्या हिरो, हिरोईन, व्हिलनची कास्टिंग करायचा आणि डोक्याला किरमिजी रंगाची फेल्ट हॅट घालून शूटिंगसाठी लोकेशन शोधत फिरायचा. सुरवातीला लोक बाळूला चिडविण्याच्या उद्देशाने ‘डायरेक्टर बाळू लोखंडे’ म्हणून संबोधायचे, पण बाळूला त्यातला उपरोध कधी कळलाच नाही. पुढे पुढे बाळू स्वतःची ओळखच ‘आय एम डायरेक्टर बाळू लोखंडे’ अशी करून देऊ लागला.
‘मी काही करीन तर फिल्म-लाईनमधेच’ अशी गावात जाहीर प्रतिज्ञा करून, फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करण्यासाठी बाळू मुंबईलाही गेला. वर्षभर मुंबईतील यच्चयावत स्टुडिओच्या चकरा मारल्यावर, कुठेतरी चाळीत किडामुंगीसारखे राहून वडापाववर दिवस काढल्यावर, एक-दोन वेळा मॉबसीनचा भाग होऊन सात-आठशे रुपयांची कमाई केल्यावर ‘आपलं टॅलेन्ट बॉलिवुडला झेपणारं नाही’ याची बाळूला खात्री पटली आणि तो गावी परतला. गावी परतल्यावर त्याने आपल्या पिढीजात जमिनीतील अर्धी जमीन विकून दोन धंदे सुरु केले. पहिला म्हणजे मंडप डेकोरेशनसोबत लाऊडस्पीकर भाड्याने देणे आणि दुसरा म्हणजे पावसाळ्याचे ४-५ महिने वगळता उर्वरित काळात झापाचे थिएटर चालविणे. बाळू म्हणायचा, ‘मी बॉलिवुडमध्ये राहिलो असतो तर आज टॉपचा डायरेक्टर होऊन संपूर्ण जगाला चांगला सिनेमा काय असतो हे दाखवून दिलं असतं. पण हरकत नाही, सिनेमात काम करण्यापेक्षा गावोगावी तळागाळात चांगला सिनेमा पोहोचविणे जास्त महत्वाचे आहे. म्हणून मी हे थिएटर चालवितो आणि लाऊडस्पीकरद्वारे सिनेमाचं संगीत तळागाळात पोहोचवितो.’
जिथे कुठे लग्नकार्यासाठी किंवा सभा-सभारंभासाठी बाळूला लाऊडस्पीकरची ऑर्डर असायची तिथे तो जातीने, एलपी रेकॉर्ड प्लेयरच्या बाजूला आपली लाडकी लोखंडी खुर्ची टाकून बसायचा. कार्यक्रम काहीही असला तरी त्या विशिष्ट दिवशी बाळूचा जसा मूड असेल तशी गाणी वाजवली जायची. लग्नाच्या घरी लाऊडस्पीकरवर विरहाची गाणी आणि श्रद्धांजली-सभेच्या आधी लावणी वाजविण्यासारखे बरेच पराक्रम बाळूच्या नावी असूनदेखील परिसरात बाळू हा एकमेव लाऊडस्पीकर भाड्याने देणारा व्यावसायिक असल्याने लोकांना बाळूशिवाय पर्याय नव्हता. त्या काळी एखाद्या दुकानाच्या किंवा धंद्याच्या मालकाने स्वतःच्या नावापुढे प्रो. किंवा प्रोप्रायटर लिहायची फॅशन असतानाही बाळू मात्र हट्टाने स्वतःला आपल्या व्यवसायाचा डायरेक्टर म्हणवून घ्यायचा. त्याची लाल रंगाची फोल्डिंगची लोखंडी खुर्ची ही बाळूच्या मर्मबंधातली ठेव होती. मंडप डेकोरेटर म्हणून बाळूकडे असलेल्या इतर अनेक खुर्च्यांसारखीच तीही सामान्य खुर्ची असली तरी बाकीच्या खुर्च्यांपेक्षा एकदम हटके अशा लालभडक रंगात ती रंगवलेली होती आणि त्या खुर्चीच्या मागील बाजूला ठळक अक्षरात मायबोली मराठीत लिहिलं होतं ‘बाळू लोखंडे, डायरेक्टर’!
बाळूचं बोलणं, त्या बोलण्यातील उदाहरणे, उपमा सगळं काही फिल्मी असायचं. त्याच्या मनाच्या रेडिओवर कायम बॉलिवुड स्टेशन ट्युन्ड असायचं. बाळूच्या डायरेक्टर्स स्पेशल खुर्चीत बाळूशिवाय दुसर्या कुणाला बसायलाच काय, त्या खुर्चीला हात लावायलाही कुणाला परवानगी नव्हती. कुणी चुकून बसण्यासाठी ती खुर्ची नेऊ लागलाच, तर बाळू म्हणायचा, सिनेमाला आयुष्य समर्पित केलेल्या डायरेक्टर बाळू लोखंडेची खुर्ची आहे ही! कुणीही उचलून न्यायला ती सिनेमातील मिथुन चक्रवर्तीची बहीण आहे काय?
कधीतरी कुणीतरी शहरातून आलेला दीडशहाणा चाकरमानी बाळूला सांगायचा की, तुझ्या थिएटरमध्ये इंग्लिश पिच्चर लाव की, लय मज्जा असते त्यात! यावर बाळू गंभीर होऊन त्याला शांतपणे समजवायचा, बाबा रे, तुला ठाऊकाय की आपल्या देशात विज्ञानात फार प्रगती झालेली असल्याने फुलांवर फुलं आपटली की पोरं होतात. त्यामुळे हिंदी-मराठी सिनेमा सुरु करून मी थिएटरबाहेर जरी गेलो तरी चालते. पण इंग्लिश सिनेमाचं तसं नाही ना! कधी कोण, कुठे कुठलं हत्यार काढील आणि फायरिंग करायला लागेल ह्याचा नेम नाही. आपल्याकडे फॅमिली ऑडियन्स असतो रे दोस्ता, इंग्लिश सिनेमे दाखवून आपल्याला तो ऑडियन्स आणि ऑडियन्सचा या डायरेक्टर बाळू लोखंडेवरील विश्वास घालवायचा नाहीये.
अंगात गोविंदा स्टाईल भडक लाल किंवा पिवळ्या रंगाचा सदरा, मोरपिशी निळ्या किंवा हिरव्या रंगाची बॅगी पॅन्ट, पायात जितेंद्र स्टाईल सफेद बूट, आणि डोक्याला फिरोजखान स्टाईल किरमिजी फेल्ट हॅट, डोळ्याला रेबनचा सेकंड कॉपी गॉगल, अंगाला अत्तराचा घमघमाट अशा थाटात बाळू वावरायचा. लोक सिनेमातील हिरोची स्टाईल कॉपी करतात तसा बाळू दिग्दर्शकांची स्टाईल कॉपी करायचा.
कॉलेजात असताना बाळूने विजय आनंदसारखा केसाचा कोंबडाही काढला होता, पण पुढेपुढे डोक्यावरील केसांचं ठाणं उठू लागलं तशी त्याने आपलं डोकं फिरोजखान स्टाईल फेल्ट हॅटला आंदण देऊन टाकलं.
लहानपणापासून वाचलेली सिनेमाविषयक नियतकालिके आणि वर्षभर मुंबईला जाऊन बॉलिवुडचा घेतलेला प्रत्यक्ष अनुभव या जोरावर बाळू सिनेमाच्या कोणत्याही अंगावर अधिकारवाणीने बोलू शकत होता. बाळूच्या थिएटरमधेही बाळू त्याची ती लाडकी लाल रंगाची फोल्डिंगची लोखंडी खुर्ची प्रोजेक्टरच्या बाजूला टाकून बसायचा आणि अधूनमधून सिनेमा थांबवून माइकवरून एखादा सीन, त्याचं टेकिंग किंवा त्या सिनेमाच्या सेटवर घडलेले किस्से प्रेक्षकांना ऐकवायचा. गावातील प्रेक्षकही बाळूची ही रनिंग कॉमेंट्री एन्जॉय करायचे. बाळूसाठी, त्याच्या थेटरात लागणारे सिनेमे हीच त्याची अर्धांगिनी होती आणि त्याच्या लाऊडस्पीकरवर वाजणारी गाणी हीच त्याची पोरंबाळं होती. असं म्हणतात की कॉलेजात असताना बाळूचा प्रेमभंग झाला होता. हजारातील एखाद्या अण्णांमुळे लोकांचा गांधीगिरीवरचा विश्वास उडावा तसा केवळ त्या एका नादान पोरींमुळे बाळूचा प्रेमावरील विश्वास, एकदा जो उडाला तो पुन्हा जडलाच नाही. त्यानंतर तो प्रेम, लग्नबिग्न या भानगडीत पडला नाही. शेजारीपाजारी समजावून सांगायचे की बाबा रे, लवकर लग्न कर. हा लग्न न करण्याचा किंवा जनसेवेसाठी बायका सोडायचा नाद लय वंगाळ! आपल्या व्यतिरिक्त खूप लोकांना त्याची किंमत मोजायला लागते. पण बाळू कुणाच्याच मनधरणीपुढे बधला नाही.
बाळूचा थिएटर आणि लाउडस्पिकरचा व्यवसाय झकास चालला होता. चांगले पैसे हातात येत होते. बाळूला छानछोकीने राहण्याव्यतिरिक्त बाकी कसलेही व्यसन नव्हते. बाळूचं लग्न झालेलं नाहीये या एका गोष्टीची मात्र, बाळू सोडून इतरांना खंत वाटायची.
हिंदी सिनेमाने बाकी कुणाचा काय लाभ झाला याविषयी मतभेद असू शकतील. पण विरहाच्या किंवा प्रेमभंगाच्या वेदनेत होरपळणार्या जिवांना बॉलिवुडने जितका आधार दिला तितका इतर कुणीच दिला नसेल. जिच्यासाठी आयपीएस बनण्याचं स्वप्न पाहून आपण रात्रंदिवस अभ्यास करावा ती आपल्याला टांग देऊन कुणा भंगारवाल्यासोबत पळून गेली असेल तर अशावेळी प्रेमभंग झालेला सिनेमाचा नायक ‘मीही आहेच की तुझ्याचसारखा’ म्हणत आपली सोबत करतो, सिनेमातील थोरथोर गीतकार आपल्या हृदयाच्या विदीर्ण अवस्थेला चपखल शब्दांत गुंफतात, प्रतिभावान संगीतकार त्या शब्दांना संगीताचं कोंदण देतात, दर्दभर्या आवाजात लिजंडरी गायक आपल्या प्रेमभंगाच्या वेदनेला सूर देऊन आपला वेदनेचा प्रवास सुखकर करतात. आणखी काय हवंय!
आपला बाळू तर अंतर्बाह्य सिनेमात बुडालेला माणूस! प्रेमभंग पचविण्याचे धडे त्याने दुपारी तीन ते सहा, संध्याकाळी सहा ते नऊ आणि रात्री नऊ ते बारा असे दिवसातून तीनतीन वेळा गिरवलेले होते. बाळूला एकटेपणाचं दुःख असेलही, पण त्याने ते कधी कुणासमोर बोलून दाखवलं नाही. डोळ्यातले आसू त्याने थियेटरच्या अंधारात कुणाला दिसू दिले नाहीत, हृदयाची कुरकुर प्रोजेक्टरच्या खर्रखर्र आवाजाखाली बेदखल करून टाकली, पडद्यावर एखादा प्रसंग पाहताना गळ्यात आवंढा आलाच, तर आवंढ्याला स्टॉलच्या मोडक्या खुर्चीत बसवून बाळू एकतर बाल्कनीत बसून राहिला किंवा बाहेर टपरीवरील चहा पिऊन तनामनाला तरतरी आणल्याचा आव आणत राहिला, चेहर्यावर ७०एमएम स्मितहास्य दाखवत राहिला.
नियती ही क्राइम थ्रिलर वेबसीरिजला चटावलेल्या प्रेक्षकासारखी असते. बाळूच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं पाहून नियतीला प्रचंड बोअर झालं. तिने ठरवलं की ‘आज कुछ तुफानी करते है’. त्या दिवशी थिएटरमध्ये सिनेमा सुरु असताना बाळू धार मारण्यासाठी म्हणून बाहेर शेतात गेला अन तेवढ्या वेळात कशी कुणास ठाऊक पण थिएटरला आग लागली. जीव वाचविण्यासाठी पळणार्या लोकांच्या आरोळ्या ऐकून बाळू धावत धावत आला, पण झापांचं आणि कनातीचं बनविलेलं ते थियेटर, लाकडी फळ्यांची बनविलेली प्रोजेक्शन रूम, पडदा, बाल्कनीच्या लाकडी खुर्च्या, स्टॉलच्या लोखंडी खुर्च्या अशी सगळीकडे आग पसरली होती. ते दृश्य पाहून बाळू जागच्या जागीच मटकन बसला. अवघ्या तासाभरात बाळूच्या व्यवसायाची अन स्वप्नांची जळून राख झाली होती. जड पावलांनी उद्विग्नावस्थेत बाळू घराकडे गेला. तापाने फणफणून आठदहा दिवस घरातच पडून राहिला. जरा हुशारी वाटल्यावर थिएटरचे भग्नावशेषात काही वाचलंय का हे पाहण्यासाठी आणि विशेषतः आपल्या लाडक्या खुर्चीसाठी तो थिएटरच्या जागी गेला. तोवर उरलंसुरलं जे काही होतं ते कुणा संधीसाधू इसमाने भंगारवाल्याच्या हवाली केलं होतं. सगळं काही गेल्यापेक्षा आपली लाडकी खुर्ची गेल्याच्या दुःखाने बाळू पार खचून गेला. बाळूच्या उत्साहाचा नायगारा तान्ह्या बाळाच्या सूसूइतका आकसून गेला.
ही साधारणतः वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. मागील वीस वर्षे बाळूचं आयुष्य डिमोनेटाईझ झालेल्या हजाराच्या नोटेसारखं झालंय. आजही लोक, एकेकाळी असलेल्या त्याच्या रुबाबाचे गोडवे गातात पण त्या रुबाबाचा आजच्या चलनात काहीही फायदा नाही. सिनेमाशी संबंधित कोणताही व्यवसाय आपल्याला लाभत नाही हे बाळूने मनोमन जाणले होते. मागील वीस वर्षे आपलं घर आणि आपली शेती ह्यातच बाळूने स्वतःला गुंतवून ठेवलं. बाळूला आजूबाजूच्या जगात काही रस नव्हता आणि बाळू जगाच्या खिजगणतीतच नव्हता! पण…
सोशल मीडियाचा जमाना आला. हाती मोबाईल असलेला हरेक इसम पत्रकार झाला. अशाच एका पत्रकाराला त्याच्या लंडनच्या भटकंतीत एका रेस्टॉरंटमध्ये एक जुनीपुराणी, लोखंडी खुर्ची दिसली. तिचा मूळ लाल रंग तपकिरी झालेला आणि ठिकठिकाणी तो रंग उडालेला असला तरी तिच्या पाठीवर ठळक अक्षरात लिहिलेला ‘बाळू लोखंडे, डायरेक्टर’ असा देवनागरी मराठी मजकूर उठून दिसत होता. त्या इसमाच्या अंगातला शोध-पत्रकार जागा झाला आणि त्याने ते रेस्टॉरंट आणि त्यातील खुर्चीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करून टाकला.
‘मेल्या म्हशीला मणभर दूध’ ही केवळ एक म्हण नसून आपली उदात्त परंपरा असल्याने सोशल मीडियावरील बहाद्दरांनी बाळूच्या लोखंडी खुर्चीला भवानी तलवार, १०५.६ कॅरेटचा कोहिनूर हिरा, टिपू सुलतानाची अंगठी, शहाजहानचा वाईन ग्लास, टिपू सुलतानाचा लाकडी वाघ, सुलतानगंजचा बुद्धपुतळा, अमरावतीची कोरीव शिल्पे, रणजितसिंहाचे सिंहासन इत्यादींच्या पंगतीत नेऊन बसवले.
‘ब्रिटिशांच्या भारतावरील जुलमांची हद्द झाली’ आता आपण आपले हे पुराणवैभव सन्मानाने आपल्या देशात आणायलाच हवे असा सगळीकडे (म्हणजे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर) सूर उमटू लागला. सोशल मीडियावरील एका निवृत्त उत्साही पत्रकाराने ‘सरकारचा बोचा ठिकाणावर आहे काय?’ या शीर्षकाखाली एक बुलेटिन प्रसिद्ध केलं. त्याचं म्हणणं होतं की आता मागील सत्तर वर्षासारखी परिस्थिती राहिली नाहीये. बुळे सरकार जाऊन आत्मनिर्भर सरकार आले आहे. आपण महाशक्ती झालो आहोत. संपूर्ण जगच नव्हे तर विश्वमंडळ आज आपल्याकडे आशेने पाहते आहे. मागील पाचसात वर्षात, हे पुराव्यानिशी शाबीत झालेलं आहे की जगातील सर्व शास्त्रीय शोध आपण फार पूर्वीच लावलेले आहेत. असे असताना आपल्या देशातील मौल्यवान वस्तू ब्रिटिशांच्या वस्तुसंग्रहालयात खितपत पडलेल्या असाव्यात हे आपल्याला शोभनीय नाही. मागील भ्रष्टाचारी सरकारांच्या काळात बाळूसारख्या एका देशभक्त इसमाची खुर्ची ब्रिटिश हिसकावून नेऊन त्याला बेखुर्ची करतात. त्याला न्याय मिळवून देणे हे आपल्या छप्पन्न इंची छातीच्या सरकारचं कर्तव्यच आहे.’
एव्हाना ज्या क्षुल्लक खुर्चीला खुद्द तिचा मालक बाळूही विसरला होता त्या खुर्चीचा व्हिडिओ आधी सोशल मीडियाने राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न बनवून ‘आग की तरह फैलाओ’ म्हणत व्हायरल केला आणि मग टीव्ही आणि प्रिंट मीडियाने त्या आगीत आपापल्या वकुबाप्रमाणे तेल ओतून तो मुद्दा भडकत ठेवला. विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरत जागोजागी धरणे, मोर्चे, चक्काजाम अशी आंदोलने करायला सुरुवात केली. ‘बाळूची खुर्ची इंग्रजांकडून सोडवून आणून ती बाळूला सन्मानाने सोपविण्यात यावी’ असा ठराव बाळूच्या गावच्या ग्रामपंचायतीने केला. बाळूच्या जातीच्या संघटनेने आपल्या जातीवर सरकारकडून नेहमीच अन्याय झाल्याचा आरोप केला. राज्य सरकारने या निमित्ताने केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप करण्याची संधी साधली. सरकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आयटी सेलने, बाळूची खुर्ची जेव्हा देशाबाहेर गेली तेव्हा आमचे सरकार नव्हते म्हणत विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात कोणताही फिल्मस्टार किंवा सेलेब्रिटी सामील नसल्याने सरकारच्या सर्वोच्च नेत्यांनी मात्र या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
बाळू सोशल मीडिया वापरात नसल्याने, टीव्ही मीडियावाले बाळूचा बाईट घ्यायला गेले तोवर त्याला या घटनेची कल्पनाही नव्हती.
मीडियावाल्यांनी बाळूला, त्याने खुर्चीवर आपले नाव का लिहिलंय म्हणून छेडले तेव्हा बाळू म्हणाला की मी लहानपणापासूनच आत्मनिर्भर होतो. मला ठाऊक होतं की आपलं नाव एखाद्या स्टेडियमला दिले जाईल असे आपण कुणी गावस्कर, तेंडुलकर किंवा मोदीसारखे खेळाडू नाहीत. म्हणून मीच लहानपणी शाळेत ज्या बाकावर बसायचो त्या बाकाला माझं नाव कर्कटकने कोरून दिलं होतं आणि मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरु केल्यावर त्या खुर्च्यांना माझं नाव देऊन टाकलं.
मीडियावाले बाळूला म्हणाले, ‘तुम्ही सोशल मीडिया वापरत असता तर आज या बातमीमुळे तुमच्या फॉलोअर्समध्ये लाखभर फॉलोअर्सची भर पडली असती. यावर बाळूने शांतपणे त्यांना सांगितले की, मी जमिनीशी नाळ जोडून असलेला माणूस आहे. सोशल मीडियावर हजारांत किंवा लाखात फॉलोअर असण्याला माझ्या लेखी काही महत्व नाही. अमुक हजार फॉलोअर झाले म्हणून आपला पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही. जरा विचार केल्यास तुमच्या हेही लक्षात येईल की ज्या इसमाचे भारतात सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहेत तो इसमदेखील आयुष्याची पस्तीस वर्षे भीक मागत होता.
देश धर्म आणि संस्कृतीबद्दल जनतेची खरी-खोटी अस्मिता चेतवून सत्तेवर आलेल्या सरकारने सुरवातीपासूनच बाळूच्या खुर्चीबाबत ठरवून मौन धारण केलं होतं. बाळूच्या खुर्चीबाबतचा धुरळा मीडियावर उठला, व्हायरल झाला आणि मीडियाला चघळायला दुसरं हाडूक मिळताच बाळूची खुर्ची मीडियाच्या अडगळीत पडली.
दोनेक वर्षे गेली. एक दिवशी संध्याकाळी अचानक देशाच्या सर्वोच्च नेत्याने रेडिओवर येऊन बाळूच्या खुर्चीचा विषय काढला. बाळूची खुर्ची हा कसा आपल्या देशाच्या अस्मितेचा भाग आहे, विरोधी पक्ष सत्तेवर असताना आपल्या देशातील मौल्यवान चिजा कशा देशाबाहेर गेल्या, मीच या देशाचा तारणहार असून बाळूची खुर्ची इंग्लंडहून सोडवून नाही आणली तर मी माझ्या पदाचा त्याग करीन असं अत्यंत भावपूर्ण भाषण करीत डोळ्यातून टिपा गाळल्या. त्या भाषणाने जनता मंत्रमुग्ध झाली.
योगायोगाने दुसर्या दिवशी सकाळी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली! आता बाळूची खुर्ची, सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी कामी येणार होती.