डाव्यांचे केंद्र समजल्या जाणार्या या हॉटेलात विविध क्षेत्रातील दर्दी मंडळी येत. नाटक, सिनेमा, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा नेहमी वावर असायचा. याशिवाय कामगार चळवळ, काँग्रेसचे नेते १९७७ साली जनता पक्षात सहभागी झालेले जनसंघी व समाजवादी विचारवंत याची उठबस सुरू असे. त्यामुळे डिलाईटमध्ये कितीतरी डावे, उजवे, मधले, डाव्यातील उजवे, उजव्यातील डावे यांच्या अशा विविध छटांचे दर्शन होत असे त्यांच्या वैचारिक वादाच्या ठिणग्याही उडत. मात्र इथे डाव्यांचे प्राबल्य सवार्थाने अधिक होतं. वैचारिक मतभेदांमुळे त्यातले काही सोडून जात. तर काही व्यवस्थेला शरण जात. त्यामुळेच डिलाईटमधून निघालेली क्रांतीची एक्सप्रेस फुरंसुगीला अडकली अशा टोमणा काही समाजवादी मंडळी मारत. सोशल मीडियाच्या उदयाआधी लोक ऑफलाइन भेटायचे, त्या आठवणींना दिलेला उजळा!
—-
पुणे एक ‘हॅपिंनग `सिटी’. इथली खासियतच अशी की कुठल्या ना कुठल्या भागात काहीतरी सतत घडत असतं. प्रचंड वाढणार्या लोकसंख्येमुळे शहराच्या सीमा विस्तारू लागल्या; तशी भोवताल सॅटेलाईट शहरं वसू लागली. एका टोकाला हिंजेवाडीचं आयटी हब तर पार दुसर्या टोकाला कल्याणीनगरसारख्या नवश्रीमंतांच्या वस्त्या ही सांस्कृतिक अतिक्रमणाची सुरुवात. पुण्याच्या कल्चरवर त्याचा घाला पडलेला दिसत नाही. ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब. मुळा-मुठेचं पात्र जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला धोका नाही. असं इथं अभिमानानं सांगितलं जातं. याचं दुसरं कारण म्हणजे मुदलात पुण्यातील जुनी पिढी आजही ताठ उभी आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हा इथला स्थायीभाव. असाच एक सांस्कृतिक ठेवा म्हणजे फर्ग्युसन रस्त्यावरील `कॅफे डिलाईट’ नावाची वास्तू. आज या वास्तूचं नामोनिशाण शिल्लकच राहिलेलं नसलं तरी आमच्यासारख्या साठी पार केलेल्या असंख्य तरुणांच्या मनात डिलाईटचं अस्तित्व कायम आहे. सगळ्या स्मृती आजही ताज्या आहेत.
डेक्कनच्या गुडलक चौकातून तुम्ही एफ.सी. कॉलेजकडे (एफसी म्हणजे फर्ग्युसन कॉलेज, पण पुण्यात एफसीच्या पुढे कॉलेज म्हटलं जातंच) निघालात की दिसतात मुक्तपणे वावरणार्या तरुण तरुणींचे जथ्थेच्या जथ्थे. शनिवार-रविवार तर तोबा गर्दी. जेमतेम चालता येईल तेवढीच वाट. खाण्यापिण्याचे स्टॉल्स, विविधरंगी कपड्यांनी फुललेला बाजार, त्यात सुरू असलेला वाहनांचा ओघ बघून पार कातावून जायला होतं… अशाच एका संध्याकाळी या रस्त्यावरून जाताना नजर शोधत होती ‘डिलाईट’ नेमकं कुठं होतं ते. जुनी खूण कुठे दिसत नव्हती. शे दोनशे पावलं पुढे आणि तेवढीच पावलं मागे येऊन थांबलो ते सागर आर्केड या सुपर मार्केटपाशी. इमारतीपुढे तोंड करून उभं राहिलो. दोन-चार क्षण गेले असतील नसतील. तोच मन भूतकाळात गेलं आणि लखकन उभी राहिली डिलाईटची बंगली वजा वास्तू. हेच ते ‘कॅफे डिलाईट’ याची खात्री पटली नी मन शांत झालं. कॉलेजच्या काळात इथे जेमतेम पाच-सात वर्षे काढलीत, त्यावेळच्या सार्या आठवणी क्रमाक्रमाने पुढे येत गेल्या. १९८६ साली कॅफे बंद पडायच्या आधी १९७९-८०पासून या वास्तूशी नातं जोडलं गेलं. त्याला चार दशकांचा कालावधी लोटला. पण मनातून डिलाईटचं अस्तित्व काही केल्या जात नाही. उलट ते अधिक घट्ट होत जातं. जणू काही फेव्हिकॉल का जोड.
विविध शहरात स्थानमहात्म्य असलेली अनेक ठिकाणं बघितली. पण डिलाईटचं भारावलेपण काही वेगळंच होतं. विद्यार्थी, तरुणांचा अड्डा यापुरतंच त्याचं महत्त्व नव्हतं, तर पत्रकारिता, व्यवसाय स्वीकारण्यापूर्वी राजकीय-सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं काम या विद्यापीठानं केलं. तसं पाहिलं तर डिलाईटच्या ३००-४०० पुढं रूपाली आणि त्यापुढे तेवढ्याच अंतरावर वैशाली. त्याचं जग मात्र वेगळं. ही दोन्ही हॉटेलं म्हणजे एक प्रकारच्या स्वायत्त संस्थाच. रूपालीच्या तुलनेत वैशाली काहीसं भारदस्त किंवा उच्चभ्रू म्हणता येईल असं. ठराविक वेळी ठराविक ग्रूप तिथं येणार म्हणजे येणारच; त्यात खंड पडायचा नाही. डिलाईट त्यापेक्षा कितीतरी वेगळं. उजाडल्यापासून रात्रीपर्यंत कोणी केव्हाही तिथं यायचं. त्याला कुणाची आडकाठी नाही. की कोणाचा मज्जाव नाही. एक प्रकारचा मोकळेपणा त्या वातावरणात होता आणि त्यापेक्षाही अधिक मोकळा स्वभाव होता कॅफेचे मालक भटसाहेब, त्यांचा मेव्हणा रमेश आणि व्यवस्थापक स्वामी यांचा. तिथं काम करणारे वेटर चंद्रू, बबन आणि तुकाराम हेदेखील दिलदार स्वभावाचे. कॅफे बंद झाल्यानंतर आम्ही काही मित्रांनी प्रत्येकी ५०-१०० रुपये गोळा करून तुकारामला वडापावाची गाडी काढून दिली होती. आजही त्याची गाडी जोरात चालते. लेमन-टी तिथे चांगला मिळतो. डिलाईटबाबत म्हणाल तर एक कप चाय आणि मिल बैठेंगे चार यार. सोबतीला सिगारेटीची कश. तासन तास वेळ कसा जायचा ते कळायचे नाही. `चाय पे चर्चा’ असला फालतू प्रकार तेव्हा अस्तित्वात यायचा होता. कधी काळी तर खाया-पिया कुछ नहीं, गिलास फोडा बारा आना, असला प्रकारदेखील व्हायचा. पण सहृदयी भटसाहेबांनी कधी ओरडा केला नाही. सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी खूपच गर्दी झाली की ते प्रेमाने बोलायचे, `काय रे पोरांनो जरा थांबा की बाहेर थोडावेळ, गर्दी कमी झाली की हॉटेल तुमचंच आहे ना!’
तर अशा या डिलाईटमध्ये पहिल्यांदा गेलो असेन ते १९७९च्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात. दर्शनी भागाच्या एका हाताला राजूची पानाची गादी, त्याला लागून सायकलचं दुकान, मगर हेअर ड्रेसर्स, मध्ये बोळ आणि बोळाला लागून भाजीचं दुकान. ओनियन डोसा, मटर उत्तप्पा, दही समोसा अतिशय चविष्ट, तर खास दाक्षिणात्य ‘काफी’ची चव दीर्घकाळ रेंगाळणारी. त्यानंतर चारपाच वेळा गेलो असेन नसेन. खर्या अर्थाने डिलाईटच्या जगात प्रवेश मिळाला तो १९८० साली. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी रानडे इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला तेव्हा. आमचे सहपाठी प्रवीण वाळिंबे आम्हा तीन-चार मित्रांना घेऊन तिथे गेले. त्यांच्या काही जुन्या मित्रांशी त्यांनी जुजबी ओळख करून दिली. त्यांनीही आमची बर्यापैकी थट्टामस्करी केली. ती मस्करी आम्हाला टोचली नाही. उलट मनावरचं दडपण दूर करून देणारी ठरली. मग रोज चक्कर ठरलेली. नवीन मित्रांच्या थट्टेत माझाही सहभाग वाढू लागला. तसं लक्षात येऊ लागलं की काही मस्कर्या आणि कल्ला करणार्या तरुणांचा हा ग्रुप नाही तर विविध विषयांवर गंभीर चर्चा करणारे ही मंडळी आहेत. कामगारांचे प्रश्न असो वा नोकरदारांचे, दलित शोषित महिला आणि देशभरातील विद्यार्थी चळवळीची अप्रतिम मांडणी ते करतात. या प्रश्नांविषयी प्रत्येकाचं आकलन वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
डाव्या विचारांशी जवळीक साधणार्या या युवकांनी `पुसु’ (पुणे युनिव्हर्सिटी स्टुडेंट्स युनियन) नावाची विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. प्रदीप आपटे, प्रवीण महाजन व रमण देशपांडे हे यांचे नेते होते. शिवाय सतीश जकातदार, शिरीष परांजपे, दीपक देवधर अशा विद्यार्थ्यांची दमदार साथ त्यांना होती. या विद्यार्थी संघटनेने अनेक आंदोलने यशस्वीपणे हाताळली. आंदोलनाच्या सगळ्या चर्चा डिलाईटला चालायच्या. काय डावपेच लावायचे, काय भूमिका घ्यायच्या. याविषयी सखोल चर्चा करून निर्णय घेतले जायचे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची कार भर रस्त्यात डिलाईटसमोर अडविल्याने मोठा गहजब झाला होता. शांत स्वभावाचे दादा खाली उतरले. प्रश्न समजावून घेतला आणि विद्यार्थ्यांना माफक आश्वासन देऊन मार्गस्थ झाले. परिणामी विद्यापीठात आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये `पुसु’चा चांगलाच दबदबा निर्माण झाला. त्यांच्या कोणत्याही आंदोलनात माझा प्रत्यक्ष सहभाग कधीच राहिला नाही. मात्र त्यांच्या चर्चा सातत्याने कानावर पडत राहिल्या. ही विद्यार्थी संघटना होती तरी त्यांचे विषय विद्यापीठापुरते मर्यादित राहिले नाही. शेतकरी आंदोलन असेल तर शेतकरी प्रश्नांवर चर्चा व्हायची. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉलेज बंदची हाक दिली जायची. याशिवाय अर्थशास्त्र, चित्रपट, साहित्य, नाट्य, इतिहास, राजकारण, समाजकारण काय किंवा धर्मकारण काय, असले असंख्य विषय चर्चेत असायचे. माझ्यासाठी हे सगळे विषय नवीन होते, त्यातलं फारसं गम्यही नव्हतं. बालपणापासून हिंदूराष्ट्राचा पगडा मनावर असल्याने वय वाढलं तरी शिशूअवस्थेतच मी वावरत होतो. रोज विविध विषयांवरील चर्चेमुळे कालांतराने त्यात स्वारस्य निर्माण होऊ लागलं आणि माझी मोल्ड होण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण मी डावा कधीच झालो नाही. आज डावं कोण आणि उजवं कोण हे सांगणं अवघड आहे. धार्मिक भावना चेतावून समाजात दुफळी पाडण्याचे राजकारण सध्या जोरात सुरू आहे. असो. मात्र त्यांच्या सहवासात राहून लिबरल म्हणता येईल इतपत माझ्यात बदल झाला.
डिलाईटमधल्या तरुणांचा हा गट डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असल्याने पुण्यात त्याला कम्युनिस्टांचा अड्डा म्हणत. एका अर्थानं ते खरंही होतं. इथं येणारा प्रत्येकजण या ना त्या कारणाने कोठल्यातरी चळवळीशी जोडलेला होता. मग ते सध्याचे कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर असो, वा श्रमिक संघटनेचे अशोक मनोहर महिला आघाडीच्या लता भिसे या सार्यांचा राबता डिलाईटमध्ये असायचा त्यामुळे डाव्या चळवळीचं हे प्रमुख केंद्रच बनलं होतं. पुसुच्या विद्यार्थ्यांनी केलेलं एक आंदोलन त्याकाळी फार गाजलं होतं. गणेश उत्सवात गणपती प्रदर्शन भरविण्याचा घाट त्यांनी घातला खरा; पण पतितपावन संघटनेच्या धटिंगण विद्यार्थ्यांनी तो उधळून लावला. पार हाणामारीपर्यंत मजल गेली. दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रारी दाखल झाल्या. धार्मिक भावना दुखावल्याचा पतितपावनचा आरोप होता. मग ह्याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी रां. चि. ढेरे यांना पाचरण केले. ढेरे सरांनी प्रदर्शनाचा मजकूर, त्यासाठी धर्मग्रंथातून घेतलेल्या संदर्भाचा आधार घेत पुसुच्या बाजूने कौल दिला. त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की धार्मिक भावना दुखावण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.
विद्यार्थी आंदोलनाच्या व्यतिरिक्त इतर अनेक अॅक्टिव्हिटीज डिलाईटचा अविभाज्य भाग होता. भारतीय भाषांव्यतिरिक्त जगातील उत्तमोत्तम सिनेमा दाखविण्याचे काम विद्यार्थी संघटनेमार्फत सुरू असे. त्यातूनच पुण्यातील नावाजलेल्या `आशय’ फिल्म क्लबची मुहूर्तमेढ इथंच रोवली गेली. सतीश जकातदार, प्रदीप आपटे यांचा त्यात पुढाकार असायचा. फिल्म इन्स्टिट्यूटमधील पी. के. नायर यांच्याशी त्यांची खाशी जानपहचान होती त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (फिल्म आर्चिव्ह) दर्जेदार सिनेमे बाहेर दाखविण्याची मुभा असे. खरे वाङ्मय सभागृहात ३५ एमएम पडद्यावर हे चित्रपट दाखविले जात. त्यातूनच ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘मेघ्ो डाका तारा’ किंवा ‘बायसिकल थीफ’सारखे सिनेमे बघायचा योग आला करीत होतं. पण हे सगळे विशिष्ट पठडीतले सिनेमे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ अशा एका दिवसात लागोपाठ चार चित्रपट पाहणारा मी. पुसुच्या निमित्ताने वेगळे सिनेमा पहायला लागलो. त्यातून नवीन काही शिकता आलं. कथा-पटकथा, दिग्दर्शन कॅमेरा यांचा विविध अंगाने कसा विचार करावा याचे धडे त्यातून घेता आले.
सिनेमाची चळवळ सुरू असतानाच पुण्यात पथनाट्यांनी जोर धरला होता. त्याची खरी सुरुवात डिलाईटमधूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. शाळा-कॉलेजमधील एकांकिका स्पर्धा वगळता माझा पथनाट्याशी दुरान्वयानेही संबंध आला नाही. पुण्यात ‘माध्यम’ नावाचा त्यावेळी ग्रूप जोरात होता. तेथे समीर नखाते, माधुरी पुरंदरे अशी मंडळी त्याचं नेतृत्व करीत. पुसुमधील मित्र दीपक देवधर पथनाट्य चळवळीत अग्रणी होते. त्यांच्या मते पथनाट्याचा प्रकार असलेला प्रसंगनाट्याचा पहिला प्रयोग प्रभाकर वाडेकरांनी पहिल्यांदा इथेच केला. जेमतेम १५-२० मिनिटांच्या या प्रसंगनाट्यात डिलाईटचा चंद्रू (खानसामा) यांचाही छोटासा रोल होता. त्यातून पथनाट्य सुरूवात झाली आणि पुढे महाराष्ट्रभर पसरली.
डाव्यांचे केंद्र समजल्या जाणार्या या हॉटेलात विविध क्षेत्रातील दर्दी मंडळी येत. नाटक, सिनेमा, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा नेहमी वावर असायचा. याशिवाय कामगार चळवळ, काँग्रेसचे नेते १९७७ साली जनता पक्षात सहभागी झालेले जनसंघी व समाजवादी विचारवंत याची उठबस सुरू असे. त्यामुळे डिलाईटमध्ये कितीतरी डावे, उजवे, मधले, डाव्यातील उजवे, उजव्यातील डावे यांच्या अशा विविध छटांचे दर्शन होत असे त्यांच्या वैचारिक वादाच्या ठिणग्याही उडत. मात्र इथे डाव्यांचे प्राबल्य सवार्थाने अधिक होतं. वैचारिक मतभेदांमुळे त्यातले काही सोडून जात. तर काही व्यवस्थेला शरण जात. त्यामुळेच डिलाईटमधून निघालेली क्रांतीची एक्सप्रेस फुरंसुगीला अडकली अशा टोमणा काही समाजवादी मंडळी मारत. डिलाईटच्या दर्शनी भागाला असलेला भाजीवाला तर पुसुच्या सदस्यांची कायम टवाळी करताना म्हणायचा, उधारीत सिगारेटी फुंकणार्यांनो, तुमची क्रांती किती दिवस टिकते ते बघूया. पण त्याचे म्हणणे कोणी कधीही मनावर घेतले नाही.
याचा अर्थ डिलाईटमध्ये कायम गंभीर चर्चा, वादविवादी व्हायची, असा अर्थ त्यातून काढण्याची गरज नाही. कारण टिंगल-टवाळी, थट्टामस्करी हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे प्रत्येकाला वाटायचं आणि त्यावर ते ठाम होते. जितका काळ गंभीर चर्चा करण्यात जात, त्याच्या दुप्पट वेळ टिवल्याबावल्या, हँ हँ हू हू यात घालवत असू. त्याकाळी खिशात पैसे असण्याची अजिबात गरज नाही. पानाचा गादीवाला राजूकडून उधारीत सिगारेटी मिळत. तर चहाचा खर्च खात्यावर मांडला जाई. त्यात भूक लागलीच तर डिलाईटचे व्यवस्थापक स्वामी किंवा तुकारामसारखे मित्र धावून येत. बरं उधारी लवकर चुकवावी, असा तगादा मालक भटसाहेब किंवा व्यवस्थापक स्वामी यांनी कधी लावला नाही. उलट ‘आज पैसे नाहीत का? बरं ‘मोठा’ झाल्यावर पैसे दे’ असं स्वामी गमतीनं म्हणत. त्यांच्या या आधारावरच डिलाईटमध्ये क्रांतीची स्वप्नं पाहिली जात. असा ओलावा सहसा कुठे बघायला मिळायचा नाही.
आपसातल्या या बाँडिंगचा उत्तम अनुभव सतीश जकातदार यांना १९९५ साली दोन महिन्यांच्या अमेरिका दौर्यात आला. त्यांचा हा दौरा अर्धवट प्रायोजित होता, म्हणजे तिथे कुठेही हिंडण्यासाठी एक पैदेखील खर्च करण्याची गरज नव्हती. त्यासाठी त्यांना विमानाची १७ कुपन्स मिळाली होती. पण निवासव्यवस्थेचे काय? एक-दोन दिवस वगळता तुमचे तुम्ही बघून घ्या, असला प्रकार. पण तिथे वास्तव्याला असणार्या जकातदारांच्या मित्रांनी त्यांचा कब्जा घेतला. त्यांच्या सगळ्या दौर्याची आखणी करून दिली. तीदेखील विनामोबदला.
डिलाईटच्या लोकप्रियतेची दोन-तीन प्रमुख कारणं होती. रुपाली-वैशालीच्या तुलनेत हे हॉटेल गरीब असलं तरी जागा मात्र ऐसपैस. बोळातून शिरल्या शिरल्या पहिलं गार्डन लागायचं. त्यात पुसूचा अड्डा. त्याला लागून छोटा हॉल आणि पार्टिशनवजा जागा. काहीशी अंधार असलेली ही जागा फॅमिली किंवा प्रेमिकांसाठी सहज उपलब्ध असल्याने अनेक तरुणतरुणींची पावलं तिकडे वळत. हॉलच्या डाव्या बाजूला आणखी एक गार्डन. त्यामुळे बसायला जागा नाही असं कधीच घडायचं नाही. शिवाय ओनियन डोसा आणि खास दाक्षिणात्य कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी रूपाली-वैशालीचे दर्दीदेखील अधे मधे येत.
डिलाईटची सर्वात मोठी खासियत म्हणजे कोणी कितीही वेळ बसा. व्यवस्थापनची त्यात आडकाठी नसायची. परिणामी अनेकांचे ठिय्ये तेथे पडू लागले. सुरुवातीला पुसूबरोबरच बापू जगताप (त्याला सगळे बाप्याच म्हणत), नितीन लांडगे, समीर तांबे यांचा ग्रुप जमू लागला. मग त्यात आणखी दोन तीन गटांची भर पडली, पत्रकार जगतातील सतीश कामत, मुकुंद संगोराम, निखिल गजेंद्रगडकर, दिलीप करमरकर यांच्यासारखे अनेकजण चहाच्या तलफेबरोबरच वेळ काढायला तिथे यायचे. शिवाय मराठीतील प्रख्यात कवी सुधीर मोघे यांची गँगही तिथे जमायची. त्यात अजित सोमण, अरुण नुलकर, सुहास तांबे वगैरेंचा समावेश होता. ही सारी मंडळी एकदम म्युझिकल. त्यावरून या गँगला ‘तंतरलेल्या चैत्रबनात’ असं नाव दिलं गेलं.
याशिवाय साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेला अरुण साधू, ग्रंथालीचे दिनकर गांगल, कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांचाही कधी कधी वावर असायचा. त्यावेळच्या तरुणांमध्ये नेमाडे यांची भारी क्रेझ. त्यांच्यासारखं लिहिण्याचा अनेकजण प्रयत्न करीत. नेमाडे पंथाच्या एका भक्ताने ‘अमुकचे स्वातंत्र्य’ नावाची कादंबरी लिहिली. त्यावरून पुसूचे काही सिनियर त्यांची खेचायचे. एकदा ते नवकादंबरीकार चहाचे घोट घेत होते. तेवढ्यात आपटे-जकातदार जोडीला भेटायला नेमाडे तिथे आले. तेव्हा आपटे जोरात म्हणाले, ‘अहो बघा हे ओरिजनल नेमाडे’. काय अवस्था झाली असेल या तरुणाची. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख प्र. ना. परांजपे अधूनमधून कॉफी प्यायला येत. ग्रंथालीने त्यांचे ‘कविता दशकाची’ असे पुस्तक काढले होते. त्याला डिलाईटमध्ये ‘कविता धसक्याची’ असं नाव दिलं गेलं.
डाव्या आणि समाजवादी विचारांच्या बरोबरीने काही संघपरिवारातील मंडळी तिथे येत. त्यापैकी भटबंधू ही मस्त जोडगोळी होती. काहीशा भांडखोर स्वभावाच्या या भटांना त्यांच्या टेबलवर कुणी बसलेलं खपत नसे. त्यांच्या या स्वभावामुळे परिवारातील काही संस्थांशी त्यांचे बरेचदा खटके उडत. रा. स्व. संघाचे एक दिग्गज डॉ. श्रीपती शास्त्री या भटांना भेटायला आवर्जून येत, डॉ. शास्त्रींना इथली कॉफी आणि राईस प्लेट भारी आवडायची. त्यामुळे ते एकटे देखील खास राईस प्लेटसाठी डिलाईटला भेट द्यायचे. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत तर पक्के डिलाईट मेंबर. स्वभावाने दिलदार असलेले रावत हे पतितपावन या रावडी विद्यार्थी संघटनेने मुख्य सूत्रधार. त्यांना सगळी मंडळी दादा म्हणत. अशा या दादांची प्रदीप आपटे यांच्याबरोबर कायम वैचारिक जुगलबंदी व्हायची. दोघेही डोक्याला डोके लावून मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करायचे. हार कोणीच मानत नसे. वैचारिकदृष्ट्या दोघेही दोन ध्रुवांवर, पण त्यांच्यात कटुता कधीच आली नाही. उलट आता तर ते जिवलग मित्र झालेत. रावत दादांचा विद्यार्थी संघटनेत भारी दरारा. कधी काळी पुसु आणि पतितपावनमध्ये हाणामारीची वेळ आली, तर दादा आपल्या पोरांना निरोप धाडत. १५ मिनिटांत मी तिथे पोचतोय, तोपर्यंत पसार व्हा. अन्यथा खैर नाही. रावत भाजपवाले असले तरी त्यांच्या संघटनेत ते आपली मते खुल्लमखुल्ला मांडत. त्यांची ही मते काहीशी डाव्या विचारांशी सलगी करणारी वाटावी. पण कोठल्याही परिस्थितीत संघटनेचे नुकसान होऊ नये यासाठी कायम दक्ष असत, असे त्यांचेच निकटवर्तीय सांगतात.
अशा या खुल्या वातावरणाचा आनंद लुटताना वैचारिक जडणघडणीची प्रक्रिया कधी सुरू व्हायची हे कळायचं नाही. प्रा. राम बापट, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, लाल निशाण पक्षाचे ए. डी. भोसले, कॉ. शरद पाटील जेव्हा केव्हा येत, तेव्हा काहीतरी देऊन जात. तर केसरीचे संपादक चंद्रकांत घोरपडे एकदा डाव्या विचारांची पोरं नेमकं करतात तरी काय, या उत्सुकतेपोटी डिलाईटला आल्याचं स्मरतं. धारदार लेखणी. ऑफिसमध्ये कमालीची वचक असलेले घोरपडे बघून अनेकांना आश्चर्य वाटे. पुणे विद्यापीठातील काही मंडळी या कॅफेला अधूनमधून भेटी देत. डिलाईट हे प्रकरणच इतकं भारी होतं की तिथल्या वातावरणावर एखादी कादंबरी सहज निघावी. कादंबरीचं माहीत नाही, पण दिलीप करमरकर यांचं ‘पेंड्युलम’ आणि रमण देशपांडे यांचं ‘अॅट दी क्रॉस रोड’ ही दोन पुस्तकं निघाली. सुधीर मोघे यांच्या रोजनिशीत डिलाईटचा उल्लेख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे हे पक्के डावे. त्यांनीदेखील कालनिर्णयमधील लेखात डिलाईटचे ऋण मान्य केले आहे. पर्यावरण क्षेत्रात मोठे नाव असलेले अतुल देऊळगावकर इथलेच प्रॉडक्ट. डिलाईटचा कॅनव्हास फार मोठा होता. या विद्यापीठात खूप काही शिकायला मिळालं, असं ते आवर्जून सांगतात.
कॅफे डिलाईटचे सारे दिवस मंतरलेले होते. वेगळीच धुंदी त्यात होती. इथे आल्यानंतर वेळ कसा घालवायचा याची चिंता नव्हती. जेवण आणि रात्रीची झोप या व्यतिरिक्त आमचा सारा मुक्काम डिलाईटमध्येच. माझे पत्रकारिता अभ्यासक्रमातील मित्र प्रवीण वाळिंबे आणि जाहिरात क्षेत्रातील मोठे प्रस्थ अजेय झणकर तर अनेकदा डिलाईटलाच झोपत. मग त्यांना शोधत त्यांचे वडील येत. कदाचित चपटीतल्या सोनेरी पाण्याचा तो परिणाम असावा. झणकर यांनी नंतर ‘सरकारनामा’ नावाचा मराठी चित्रपट लिहिला आणि प्रोड्युस केला होता. मात्र एके दिवशी त्यांनी अचानक एक्झिट घेतली ती चटका लावून जाणारी. त्याकाळी फिल्म इन्स्टिट्यूटच्या सर्व्हेचे काम आम्हाला मिळत असे. त्याचे मानधन ‘केअरऑफ कॅफे डिलाईट’ या पत्त्यावरच येत. शिवाय अनेकांचा पत्रव्यवहारही याच पत्त्यावरचा होता. अनिल शिदोरे यांचे परगावी असणारे एक मित्र पुण्यात आले. त्यांना ना घरचा पत्ता माहीत, ना फोन नंबर ठाऊक. मग ते थेट डिलाईटलाच आले.
अनेकदा असं व्हायचं की अड्ड्यावर पोचलं तरी कोणी आलेलं नसायचं, पण वेळ कसा घालवायचा याचा प्रॉब्लेम नव्हता. एक सिगरेट पेटवायची, विझवायची, मग पुन्हा पेटवायची, धूर निघेपर्यंत थोटकाची सुटका नसायची. या काळात खिशाचा अंदाज घेऊन सिगरेटचे वेगवेगळे ब्रॅण्ड्स आम्ही ट्राय केले. मग एक दिवस अचानक लहर आली की आता कॅप्स्टन विदाऊट फिल्टर ओढायची. कारण काय तर म्हणे ती सुभाषचंद्र बोस यांची आवडती होती. आणि सुभाषबाबू डावे होते. मग काय आमच्यातील अनेकांचा डावेपणा जागृत झाला. वेळ घालवण्यासाठी काडीपेटीचा भारी गेम आम्ही खेळत असू. सपाट टेबल आणि काड्यांनी गच्च भरलेली माचिस मिळाली की झालं. टेबलाच्या किनार्यावर माचिस ठेवायची, अंगठा व तर्जनीच्या सहाय्याने ती अशी उडवायची की छापील बाजू आली पाहिजे. छापील बाजू आली तर पुन्हा चान्स. आडवी उभी राहिली तर १० आणि आणि सरळ उभी राहिली तर २० गुण. सवंगडी आले तर त्यांच्यासोबत, न आले तर आपला आपणच खेळत रहायचं.
पुसुचं कार्यक्षेत्र जसं वाढू लागलं तसं पोलिसांना या चळवळीवर नजर ठेवायची आवश्यकता वाटू लागली. त्यासाठी एसआयबीचे सुर्वे नामक पोलीस नियुक्त करण्यात आले. कोणाच्या अध्यात ना मध्यात येता ते कोपर्यात एकटे बसून नोट्स काढत बसायचे. कितीतरी वर्षे त्यांचं काम अव्याहतपणे सुरू होतं. डिलाईट बंद पडल्यानंतर पुसुची चळवळ अस्ताला गेली. काही वर्षांनी जकातदारांची अचानक सुर्वे यांच्याशी गाठ पडली आणि त्यांनी विचारलं ‘काय सुर्वेसाहेब काय चालू आहे?’ त्यावर सुर्वे उत्तरले ‘काही नाही हो, पण पार प्रâस्ट्रेट झालोय.’ प्रâस्ट्रेट हा शब्द ऐकताच जकातदारांना हसू आवरेना. अरे हा आपलीच भाषा बोलतोय, असं त्यांचं म्हणणं. कारण प्रâस्ट्रेट हा शब्द त्यावेळी वारंवार वापरला जाई. यातली गंमत अशी की सुर्वे कम्युनिस्टांची भाषा बोलू लागले तर डावा विचार करणारी मंडळी व्यवस्थेचा भाग बनू लागली होती…
जाता जाता डिलाईटवरच्या आठवणीत वारंवार प्रदीप आपटे यांचा उल्लेख असल्याने ते नेमके कोण होते हे सांगितल्याशिवाय लेख पूर्ण होणार नाही. पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय व गोखले इन्स्टिट्यूटमध्ये महनीय प्राध्यापक असलेले आपटे महाराष्ट्रातील अग्रगण्य अर्थतज्ञ आहेत. अफाट वाचन, चौकस बुद्धी आणि जगातल्या कोणत्याही विषयावर बोलण्यासाठीची अभ्यासपूर्ण तयारी यामुळे ते आमचे हीरो होते. आमच्यापैकी कोणीही त्यांचा गंडा बांधला नाही. पण चर्चेत ते म्हणतील ती पूर्वदिशा हा अलिखित नियम होऊन बसला. रशियातील महत्त्वाच्या घडामोडींपासून प्रभात रोडच्या लेन क्रमांक सहामधील बारीकसारीक घटनांची त्यांना माहिती असे. डाव्या चळवळीशी ते नाळ राखून असले तरी कोणत्याही पक्षाचे चार आण्याचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे कोणावरही टीका करायला ते मोकळे असत. त्यातूनच आपट्यांचा १९८२ साली पुण्यातील कम्युनिस्टांशी मोठा वाद झाला होता. पोलंडमधील घटनांवरून त्यांनी ‘तात्पर्य’ मासिकात दोन मोठे लेख लिहिले. आणि कम्युनिस्टांचे पित्त खवळले. त्यानंतर कोणी त्यांच्या नादी लागले नाही. वादात एकदा भूमिका घेतली की तार्किक शेवटापर्यंत नेण्याकडे त्यांचा कल असे. मग भूमिका चूक की बरोबर हा भाग निराळा.
असाच एकदा आपटे यांचा राज व्होरा यांच्याशी वाद रंगला. त्यात व्होरा यांचे म्हणणे असे की तू पोजिशन घेत नाही. त्यावर आपटे म्हणाले, माझी पोजिशन पक्की आहे तू बोलशील त्या विरोधात मी बोलणार, मग दोघांनीही विषय तिथंच संपविला. राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, संस्कृती अशा क्षेत्रात चौफेर वावर असलेल्या आपटे यांचा कुमार गंधर्व हा एक वीक पॉईंट. त्यांच्यामुळेच आम्ही कुमारांच्या गाण्याला जाऊ लागलो. अशा या विद्वान व्यक्तीकडून आम्ही कोणताही गुण घेतला नसला तरी बोलघेवडेपणा मात्र जरूर उचलला.
विशेष नोंद : विस्मृतीत गेलेल्या डिलाईटमधील स्मृती जागविण्यास आपटे यांच्याबरोबरच सतीश जकातदार, दीपक देवधर आणि सतीश कामत यांचे बहुमोल सहकार्य लाभले.