भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजकारणाचा विद्रूप चेहरा प्रकट होत गेला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या जोडगोळीने त्यांच्या प्रतिभाशाली टोकदार ब्रश फटकार्यांनी आणि व्यंगचित्रांनी उधळलेल्या वृषभाला वेसण घातली. लक्ष्मण यांच्या रेषा संयमित तर बाळासाहेबांचे अचूक फटकारे, रेषा कंबरडे मोडणार्या. भारतीय व्यंगचित्रकलेचे निम्मे वय या दोघांनीच गाजविले. पण राजकारण खूपच कोडगे होत राहिले. या फटकार्यांनी त्यांना थोडाही ओरखडा उमटला नाही. सहस्र बाहूंचे बळ असलेल्या नृसिंहाप्रमाणे बाळासाहेब शिवसेनेच्या माध्यमातून नव्याने, अधिक सामर्थ्याने प्रकटले. पुढचा इतिहास आपणा सर्वांना ठाऊक आहेच. एक व्यंगचित्रकार म्हणून वेगवेगळ्या वळणांवर बाळासाहेबांबरोबर माझ्या ज्या काही थोड्या भेटीगाठी झाल्या, त्यातून माणूस म्हणून ते किती मोठ्या मनाचे होते, ते मला उमजत गेले.
—-
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आजवर खूप लिहिले गेले. आधी डॉक्युमेंट्रीज नंतर सिनेमा तयार झाला. असंख्य लेख छापून आले. त्यांनी दिगंत कीर्ती मिळवली. लाखो तरूण त्यांच्या शब्दावर कुर्बान व्हायला तयार होते. एकीकडे बेडर, बेधडक स्पष्टवक्ते असलेले बाळासाहेब दुसरीकडे कमालीचे हळुवारही होते… मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचे हेच रूप मला पाहायला मिळाले.
व्यंगचित्रकलेचे वय जेमतेम शंभर सव्वाशे वर्षांचे. तिच्याआधीच्या सर्व कला अभिजात. संगीत, चित्र, शिल्प, नृत्य, साहित्य, नाट्यकला वगैरे या सगळ्या कला काळानुसार बदलत समाजाला समृद्ध करीत राहिल्या. बदलत्या शतकात व्यंगचित्रकलेने जन्म घेतला. जगभर फोफावत ती महाराष्ट्रातही मराठीत स्थिरावली. शंकरराव किर्लोस्कर, हरिश्चंद्र लचके, नंतर दीनानाथ दलाल, शि. द. फडणीस, वसंत सरवटे अशा व्यंगचित्रकारांपैकी प्रत्येकाच्या हातून तिने हवे तसे रूप बदलून घेतले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजकारणाचा विद्रूप चेहरा प्रकट होत गेला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या जोडगोळीने त्यांच्या प्रतिभाशाली टोकदार ब्रश फटकार्यांनी आणि व्यंगचित्रांनी उधळलेल्या वृषभाला वेसण घातली. लक्ष्मण यांच्या रेषा संयमित तर बाळासाहेबांचे अचूक फटकारे, रेषा कंबरडे मोडणार्या. भारतीय व्यंगचित्रकलेचे निम्मे वय या दोघांनीच गाजविले. पण राजकारण खूपच कोडगे होत राहिले. या फटकार्यांनी त्यांना थोडाही ओरखडा उमटला नाही. सहस्र बाहूंचे बळ असलेल्या नृसिंहाप्रमाणे बाळासाहेब शिवसेनेच्या माध्यमातून नव्याने, अधिक सामर्थ्याने प्रकटले. पुढचा इतिहास आपणा सर्वांना ठाऊक आहेच. एक व्यंगचित्रकार म्हणून वेगवेगळ्या वळणांवर बाळासाहेबांबरोबर माझ्या ज्या काही थोड्या भेटीगाठी झाल्या, त्यातून माणूस म्हणून ते किती मोठ्या मनाचे होते, ते मला उमजत गेले.
बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची चित्रे काढणे थांबविल्यानंतर विकास सबनीस ‘मार्मिक’ची चित्रे काढू लागला (विकास व मी समवयस्क मित्र म्हणून एकेरी उल्लेख). व्यंगचित्रांच्या निमित्ताने बाळासाहेबांशी रोज भेट व चर्चा होई आणि तो साहेबांच्या घरचाच झाला. विकास बराचसा अबोल, चिडका आणि वाईट गोष्ट म्हणजे तो सरळमार्गी होता. काही निमित्ताने मी मुंबईस त्याच्या घरी गेलो गप्पा झाल्या. वहिनींनी उकडीचे मोदक केले होते. त्या लंगडतही होत्या. त्यांनी मला आग्रहाने मोदक खाऊ घातले. मी मोकळाच होतो. त्यास म्हटले, चल चक्कर मारू. आम्ही दोघे बाहेर पडलो. त्याला विचारले, वहिनींच्या पायाला काय झालं?
तो म्हणाला, ती खूप मोठी कथा आहे. छोट्या मोठ्या कामांसाठी ती अॅक्टिव्हा वापरते. सहा महिन्यांपूर्वी सिग्नलवर ती सिग्नल पडायची वाट पाहात स्कूटरवर थांबलेली होती. इतक्यात एक कारवाला मागून आला व स्कुटीवर धडकला. ही खाली पडली. आजूबाजूच्या लोकांनी ओरडा सुरू केला, म्हणून त्याने व इतरांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. जुजबी खर्च करून तो सटकला. डॉक्टरांनी खर्चिक ऑपरेशन सांगितले. त्या माणसाला मी फोन केला आणि म्हटलं की असं असं आहे. तो म्हणतो, मेहेरबानी समजा की मी अॅडमिट केले. ऑपरेशन खर्चाचा व माझा संबंध काय? तो उद्धटपणे बोलला. मी त्याला म्हणालो, मी बाळासाहेबांच्या मार्मिकचा व्यंगचित्रकार आहे. त्यांना सांगेन. तो म्हणाला, मातोश्रीचा दम देऊ नकोस, माझी तिथे वट आहे. व्यंगचित्रकार म्हणवतोस आणि हसायचे सोडून रडतोस कशाला? एव्हाना आम्ही मातोश्रीच्या गेटपर्यंत पोहोचलो.
विकास म्हणाला, ज्ञानेश आपण पूर्वपरवानगी घेतलेली नाही. आता?
मी म्हणालो, विकास, तू साहेबांच्या घरचा माणूस आहेस. त्यांना सांग! आत पन्नास माणसे उभी होती. विकासने कार्ड दाखवलं. आम्हाला मोठ्या हॉलमध्ये सोडण्यात आले. हॉल गच्च भरलेला होता. पाच मिनिटात हॉलला लागून असलेल्या खोलीत साहेबांच्यापुढे आम्ही दोघे उभे राहिलो. नमस्कार करत ‘जय महाराष्ट्र’ म्हणालो. त्यांनी विकासला विचारले, हा कोण?
ज्ञानेश… ज्ञानेश सोनार..
मग याची शिंगं कुठंयत? काय रे..
‘कटिंग केली’ मी उत्तरलो.
त्या काळी माझे भरगच्च केस व दोन्ही बाजूला झुलपे असत. साहेबांच्या ते लक्षात होतं तर…
नेहमीप्रमाणे विकास मुकाट उभा होता. लाल टिळा लावलेले पाचसहा शिवसैनिक अदबीने उभे होते. माजी महापौर विशाखा राऊत बसलेल्या होत्या.
साहेबांनी विचारलं, विकास, सगळं ठीक आहे ना! खूप दिवसांत तू आला नाहीस?
मी म्हणालो, साहेब, तो बोलणार नाही, मीच सांगतो. मी विकासची रामकथा रंगवून सांगितली. मी सांगू नये म्हणून विकास सारखा मला ढोसत होता. साहेबांनी शांतपणे ऐकले व विकासला म्हणाले, एवढं दीड-दोन वर्षं अडचणीत आहेस. मला भेटावं असं वाटलं नाही?
मी म्हणालो, हा खूप संकोची आहे साहेब.. आज मीच त्याला खेचून आणलाय!
त्यांनी विचारलं, ऑपरेशनला कुणी कुणी मदत केली?
राजने पन्नास हजार दिलेत, बाकी बँकेचं लाखभर कर्ज घेतलं. बाकीचा खर्च मी केला. साहेबांनी सेक्रेटरीला चेकबुक आणायला सांगितले व विकासला म्हणाले, राजला पैसे परत करू नकोस, मी सांगतो त्याला. बरं तो माणूस कुठे राहतो?
विकासने पत्ता सांगितला.
शिवसैनिकांकडे पाहात साहेब म्हणाले, कोणाच्या वॉर्डात तो राहतो ते शोधा आणि त्याला इकडे आणा.
‘माझ्या जवळचा वॉर्ड आहे, मी बघते’, विशाखा म्हणाल्या.
‘तू नको, हे लोक बघतील. विकास, सवड मिळाली की सुनेला भेटायला येतो!’
जराशाने आम्ही बाहेर आलो. विकासचे डोळे व मन भरून आले होते. माझी पाठ अलगत थोपटत तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, थँक्यू ज्ञानेश…
—
अंदाजे १९६५ साली शिवसेनेच्या निर्मितीच्या पूर्वसंध्येला बाळासाहेब जनमानसाचा वेध घेण्यासाठी अनेक ठिकाणी समक्ष जाऊन पत्रकार परिषद घेत होते. ते नाशिकला आले. साल पासष्ठ-सहासष्ठ दरम्यानचे असावे. दैनिक ‘गावकरी’त व्यंगचित्र द्यायचो. गावकरीचे संपादक दादासाहेब पोतनीस मला म्हणाले, ‘सोनार, महाराष्ट्रातले विख्यात व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरेंची पत्रकार परिषद आहे. अवश्य जा.’
मला खूप आनंद झाला. ‘मार्मिक’ त्यावेळी जोरात होता. आम्ही नवोदित एखादे चित्र ‘मार्मिक’मध्ये छापून आले तर सर्वांना दाखवत फिरायचो. वकील वाडीतल्या जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार परिषद होती. पाच पंचवीस पत्रकार हजर होते. बाळासाहेबांबरोबर बहुधा मनोहर जोशी आणि प्रसिद्ध नट काशिनाथ घाणेकरही होते. गावकरीचे एका ज्येष्ठ संपादक सर्व पत्रकारांचा परिचय करून देत होते. एकेकाचा परिचय करून देत माझ्यापर्यंत पोचले. माझ्याकडे उपेक्षेने पाहात म्हणाले, हा ज्ञानेश सोनार, काहीबाही व्यंगचित्रे गावकरीत करीत असतो.
तो उपरोध साहेबांच्या लक्षात आला, ते म्हणाले, ‘त्याला मी चांगला ओळखतो, तो आधी माझा ‘मार्मिक’चा चित्रकार आहे. पुढचे कोण ते सांगा!’
ते साहेब… तो प्रसंग मी आयुष्यभर स्मरणात ठेवला.
—
बाळासाहेब कलावंतांवर आणि त्याच्या कलेवर नितांत प्रेम करीत. पुणेस्थित ज्येष्ठ व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके प्रथमच मुंबईला गेले. बाळासाहेबांची ‘मातोश्री’ शोधत तिथे पोहोचले. पण गर्दी पाहून हबकले. अनेकांना मुंबईत गेल्यावर वेंधळ्यागत होते. कुणी ओळखीचे नसते, रस्ते-दिशा माहीत नसतात. लचके बराच वेळ थांबले गर्दी कमी झाली. त्यांनी दारातल्या एकाला म्हटले, साहेबांना भेटायचं आहे. मी हरिश्चंद्र लचके, पुण्याचा एक व्यंगचित्रकार.
दोनपाच मिनिटांत बाळासाहेब स्वतः बाहेर आले. वयस्कर लचकेंचा हात धरून आत नेले. प्रेमाने आगतस्वागत केले. अंगावर शाल घातली. एवढ्या मोठ्या कलावंतांकडून अनपेक्षितपणे मिळालेली आपुलकी, सौहार्द पाहून लचके हेलावले.
‘मार्मिक’चे एक ज्येष्ठ लेखक द. पां. खांबेटे गमतीने सांगत. ‘मार्मिक’ कार्यालयात आल्यागेल्याला बाळासाहेब दारापर्यंत सोडायला जात. पाहुणा भारावून जाई. त्यात मेख अशी होती की, तो भारावलेला पुन्हा आतून येऊन छळायला नको. कारण साहेबांना ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रे काढायची घाई असे.
माझ्या ‘स्केचबुक’ या लेखसंग्रहात साहेबांवर मी एक लेख लिहिला होता. ते पुस्तक त्यांना भेट दिले. त्यांनी ते वरवर चाळले व म्हणाले, मी सध्या वाचत नाही, मात्र चांगले वाटले तर वाचून घेतो. दोन दिवसांनी मला घरी फोन आला, ‘सोनार, मी राज ठाकरे बोलतोय. तुमचे स्केचबुक मला आवडले.
मी गोंधळून म्हटले, पण कॉपी तर मी साहेबांना दिली होती.
होय, त्यांनीच मला आतली स्केचेस पाहायला सांगितली. साहेबांवरचा लेख अप्रतिम उतरला आहे. ते कधीतरी सांगतीलच. पण स्केचेस पाहता पाहता पुस्तकही वाचून काढले. मला आवडले.’ मी थँक्स म्हटले.
—
बाळासाहेबांच्या मार्मिकमधील ‘रविवारची जत्रा’ने राजकारण्यांची उडवलेली दाणादाण आणि खिल्ली आम्ही मनसोक्त एन्जॉय करायचो. अमिताभ बच्चन जसा ‘अँग्री यंग मॅन’ बनून सिनेमात गुंडांची धुलाई करायचा तद्वतच ते वाटायचं. श्रीकांतजींचे (श्रीकांत ठाकरे) सिनेप्रिक्षान व सोबत नट वा नटीचे कॅरिकेचर याचीही आम्ही वाट पाहायचो. महाराष्ट्राची राजकारण्यांनी केलेली ग्रहदशा बाळासाहेबांमुळेच कळायची; अन्यथा राजकारण काय असते याचा पत्ताच नव्हता. बाळासाहेब सांगायचे, क्रूरकर्मा हिटलर व मुरब्बी राजकारणी पाताळयंत्री चर्चिल फक्त डेव्हिड लो या व्यंगचित्रकाराला खूप घाबरायचे. त्याने कागदाच्या तुकड्यावर काढलेल्या काळ्या पांढर्या रेषांची दहशत त्यांना खूप वाटे. बाळासाहेब व आर. के. लक्ष्मण डेव्हिड लो यांना गुरुस्थानी मानत. त्याच्या या दोन हिंदुस्थानी शिष्यांनी इथल्या राजकारण्यांना असाच घाम फोडला होता. विशेषत: बाळासाहेबांनी.
मोरारजी, नंदा, नेहरू, व्ही. के. कृष्ण मेनन, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, आचार्य अत्रे आणि कित्येक जण. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या स्वरूपात डायरेक्ट गुच्छ वा गोटे त्यांच्या अंगावर आदळत. त्या काळी टीव्ही चॅनल्सचा आकाशभरचा आक्रस्ताळी घोळ, लंपटगिरी, चापलुसी नव्हती. गल्लीबोळ भरमसाट दैनिकांचा, पुरवण्यांचा मारा नसे. मोजकी दर्जेदार दैनिके व त्यांना श्रद्धेने वाचणारे वाचक. या भाऊगर्दीत आठवड्याने निघणारे ‘मार्मिक’ सर्वांना भिडे. बाळासाहेबांची अचूक कॅरिकेचर्स, भेदक ब्रश-फटक्यांचा मारा नेत्यांना घायाळ करी. त्यात वास्तवता असे. आतासारखे ब्लॅकमेलिंग, चारित्र्यहनन नसे. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत ‘आसूड’बुद्धी होती, सूडबुद्धी नव्हती. कारण ज्यांची बाळासाहेब रोज षष्ठी करत, ते खाजगीत त्यांचे मित्रही असायचे. शरद पवार आणि साहेब यांच्यातली प्रगाढ मैत्री हे त्याचे एक उदाहरण.
—
२००४च्या मार्च महिन्यांत माझे फोटोशॉपमध्ये काढलेल्या रिएलिस्टिक पेंटिंग्जचे प्रदर्शन नेहरू आर्ट गॅलरी, वरळी येथे भरविले होते. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. ते नाशिकचे म्हणून त्यांनाच उद्घाटक म्हणून बोलवायचे मनात होते. या सर्व प्रदर्शन प्रकरणात मला खूप मदत करणारे पोलिस कमिशनर प्रकाश पवार नाशिकला असताना माझे चांगले मित्र झाले होते. आम्ही भुजबळ साहेबांकडे गेलो. त्यांना उद्घाटनाची विनंती केली. त्यावर ते म्हणाले, मी तर येईनच, पण उद्घाटनासाठी बाळासाहेबांसारखा कलावंत जाणकार अधिकारी शोधून सापडणार नाही. ते उद्घाटनाला नक्की येतील.
बाळासाहेबांवरील माझे प्रेम तर शब्दातीतच होते. भुजबळांचे आभार मानून आम्ही तेथून बाहेर पडलो. प्रकाश पवारांनी
ऑफिसमधून साहेबांना फोन लावला. मी फोन घेऊन साहेबांना नमस्कार केला. तिकडून ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणाले. नकळून मी इतर बोलू लागलो. ते दरडावून म्हणाले, प्रथम जय महाराष्ट्र म्हण, मग काय ते सांग. महाराष्ट्रप्रेम ते कटाक्षाने जगत होते. सहा वाजता त्यांनी भेटीस बोलाविले. पवारांसह मी त्यांच्याकडे गेलो. येण्याचे प्रयोजन सांगितले आणि प्रदर्शनानिमित्त तयार केलेला पेन्टिंग्सचा रंगीत फोल्डर त्यांना दाखवला. चित्रे पाहून ते चकित झाले. म्हणाले, ज्ञानेश, एवढी पेंटिंग्ज तू कधी काढलीस? आणि फिनिशिंग तर खूपच सुंदर. अगदी दलालांची मला आठवण झाली. महत्त्वाचे म्हणजे ही तुझी स्टाईल आहे, कुठेच कॉपी दिसत नाही.
मी म्हणालो, मी नवीन माध्यमांचा वापर केला आणि कॉम्प्युटरमधील फोटोशॉपमध्ये हे काम केलेय.
ते म्हणाले, अरे व्वा फारच सुंदर. पूर्ण फोल्डर पाहण्यात ते मग्न झाले. मग म्हणाले, मला शिकवशील का?
मी म्हणालो, साहेब, एवढ्या व्यापातून वेळ काढणार असाल तर नक्कीच शिकवेन.’
साहेब चकित झाले, त्यामागचे कारण सांगतो… त्या काळात पोस्टर कलर्समध्ये पेंटिंग्ज केली जात आणि ब्लॅक अँड व्हाइटमध्ये ते रंग वापरले तर कार्टून्सच्या रेषा पुसट होत आणि रेषा हे बाळासाहेबांचे व आरकेंचे सामर्थ्य होते. नंतर आम्हाला ट्रान्स्परंट कलरचा शोध लागला. ज्यात रंगांची तरलता होती आणि ब्लॅक आउटलाइन उठून दिसे.
बाळासाहेबांना दीनानाथ दलाल व एस. एम. पंडित यांची चित्रे खूप आवडत. उभयतांशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असे शिवराज्याभिषेकाचे मूळ पेंटिंग दीनानाथ दलाल यांचे असून साहेबांच्या वेटिंग हॉलमध्ये भिंतीवर ते पाहिल्याचे मला स्मरते. आज काही कोटीत त्याचे मूल्य आहे.
आता थोडं मागे जाऊ या.
साहेबांना प्रदर्शन उद्घाटनाचे निमंत्रण दिले. त्यावर ते म्हणाले, तब्येतीच्या कारणामुळे मी उद्घाटनाला येणार नाही, पण राज आणि उद्धव यांना घेऊन मधूनच येऊन जाईन. निघता निघता म्हटलं, साहेब नक्की ना? मी वाट पाहीन!
त्यावर उसळून ते म्हणाले, मी थापा मारत नाही.
मी काही कमी आगाऊ नव्हतो. धिटाईने म्हटलो, काय सांगता साहेब, थापा तर चोवीस तास तुमच्याबरोबर आहे.
ते काय ते समजले आणि माझ्या पाठीवर जोराची थापट मारून म्हणाले, वात्रट कुठला?
चोवीस तास साहेबांची काळजी घेणार्या थापाकडे माझा रोख होता, हे त्यांच्या लक्षात आले.
उद्घाटनाला साहेब नाहीत म्हटल्यावर प्रश्न पडला. लग्न लावायला गुरुजी लागतातच ना? आम्ही मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांनी पटकन हो म्हटले. कारण ‘जत्रा’तील माझ्या मुखपृष्ठांचे, जादुई खिडक्यांचे ते फॅन होते. निमंत्रणपत्रिकेत मात्र साहेबांचे नाव कार्यक्रम अध्यक्ष म्हणून होतेच. महिनाभरावर लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि साहेब उद्घाटन करणार म्हणून उद्घाटनाच्या वेळी सगळा मीडिया हजर होता.
सुशीलकुमारजींनी अडवाणींच्या भारतपरिक्रमा यात्रेवर खुसखुशीत टिप्पणी केली. उद्घाटनास छगन भुजबळ, रामदास फुटाणे आदी अनेक मान्यवर हजर होते. गंमतीची गोष्ट म्हणजे राजकीय बॅकग्राऊंडवर झालेल्या या प्रदर्शनाच्या बातम्या सर्व
चॅनल्सवर रात्रभर चालू होत्या.
दोन चार दिवसांनी मी आवतन देण्यासाठी पुन्हा साहेबांना भेटायला गेलो. कार्यकर्त्यांबरोबर साहेब सभेला निघाले होते. मला पाहून तडकले, आता मी तुझे प्रदर्शन पाहायला येणार नाही. उद्घाटनाला तुला काँग्रेसवालेच बरे सापडले? शिवसेनेत नेते नाहीत का?
मी नि:शब्दसा झालो.
बहुदा त्यांना माझी दया आली असावी. म्हणाले, पुढचे प्रदर्शन जहांगीरला भरव. मीच उद्घाटन करीन. इतर कुणी नाही.
याआधीचा एक मजेशीर किस्सा. साहेबांवर अतूट प्रेम करणार्या सामान्य माणसाचा. प्रदर्शनाची मोठमोठी ट्रकभर पेंटिंग्ज घेऊन आम्ही नाशिकहून निघालो. जकातीसाठी ट्रक ठाण्याला अडवला. पंचवीस-तीस हजार रुपये जकात सांगितली. आम्ही परोपरीने सांगितले ही चित्रे विकणार नाहीत, प्रदर्शनानंतर परत आणायची आहेत. जकातवाले ऐकेनात. आम्ही त्यांच्या साहेबांकडे गेलो. परिस्थिती समजावून सांगितली.
त्यांनी विचारले, बाळासाहेब ज्या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत, ती ही चित्रे आहेत का?
मी म्हणालो, हो साहेब, आपणास कसे ठाऊक?
टेबलाच्या ड्रॉवरमधून त्याने सामनाचा अंक काढला. पहिल्याच पानावर ठळक बातमी होती.
ते म्हणाले, बसा, बसा! चहा सांग रे! आपल्या साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे या चित्रांचे! नॉमिनल पावती फाडा. परत येताना दाखविण्यासाठी असू द्या!
यथाकाल एक दिवस ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचा फोन मला आला. साहेबांकडे त्यांचे नेहमी जाणे येणे असायचे. वाईरकर म्हणाले, ज्ञानेश, साहेबांनी मला खूप झापले. अरे, तू मागे त्यांना पेंटिंगचा फोल्डर दिला होतास ना?
मी म्हटले, हो!
त्याविषयी ते तुझ्याबद्दल कौतुकाने बोलत होते. मी सहज म्हणालो, त्याने ती कॉम्प्युटरवर काढलीत. ते जे संतापले माझ्यावर चिडले आणि म्हणाले कॉम्प्युटरचा उपयोग लोक अश्लील चित्रे पाहायला करत असताना त्या मुलाने किती देखणी व सुंदर पेंटिंग्ज केलीत, पाहायचीत तुला? असे म्हणत ते तरातरा उठले. फोल्डर कपाटातून काढून मला दाखवत म्हणाले, बघ, ही चित्रे किती सुंदर प्रपोर्शनेट, ओरिजिनल आहेत. म्हणजे कॉम्प्युटरवर काढलीत?
त्यांचा आवेश पाहून मी सर्दच झालो व त्या तिरमिरीतच तुला फोन केलाय.
—
कार्टुनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष, कार्टुनिस्ट संजय मिस्त्री हे काही काळ ‘मार्मिक’चे स्टाफ आर्टिस्ट होते. विकास सबनीस फ्रीलान्सर होते. दोघेही चांगले मित्र. आठवड्यातून दोन तीन वेळा ‘मार्मिक’ची चित्रे व स्वरूप याविषयी चर्चा करायला साहेबांच्या घरी जात. १९९४च्या आसपास मिस्त्री असेच कामानिमित्त बंगल्यावर गेले. साहेब एका विदेशी डॉक्टरशी चर्चा करीत होते. संजय ते पाहत होता. त्याने स्केचबुक काढले व साहेबांचे कार्टून करू लागला. पण मनासारखे जमेना. स्केचपेनचा आवाज साहेबांचं चित्त विलचित करत होता. संजयने घाबरून स्केचबुक मिटले. साहेबांच्या ते लक्षात आले. म्हणाले, अरे चालू दे तुझं स्केचिंग.
कार्टून जमेना म्हणून संजयने रिएलिस्टिक चेहरा रेखाटला. साहेबांची मीटिंग संपली. त्यांनी म्हटले, पाहू काय चित्रं काढलीस ते.
स्केच साहेबांना दाखविले. ते म्हणाले, चेहरा उत्तम काढलास पण खाली काय?
त्याने चेहर्याला वाघाचे शरीर व शेपटीचा ब्रश दाखविला.
साहेब बेहद्द खूश झाले, त्यांनी मुलांना बोलावलं. चित्र समजून सांगितले. चित्रावर साहेबांनी सही केली आणि म्हणाले, मलाच भेट दे.
संजय म्हणाला, साहेब फ्रेम करून देतो.
ते चित्र देण्यासाठी नंतर त्याने अनेक फोन केले, पण उचलले गेले नाहीत. मध्ये बरीच वर्षं गेली. बंगल्यावर जायची एक संधी चालून आली. फ्रेम घेऊन तो मित्राबरोबर मातोश्रीवर पोहोचला. साहेबांभोवती गर्दी होती. चर्चा चालू होती. पण ते खूपच थकले होते. चालताना आधारही लागे. जरा वेळाने उद्धव साहेबांनी त्यांना आधार देऊन उठविले. गर्दी पांगली. संजय एकटाच बसला होता. जाता जाता साहेबांनी वळून त्याच्याकडे पाहिले.
काय रे काय हवंय, त्यांनी विचारलं.
साहेब, ही फ्रेम भेट द्यायची होती.
साहेबांनी चित्र ओळखलं, फोटोग्राफर्सला म्हणाले, अरे फोटो काढा!
संजय मनातून धन्य झाला.
साहेबांपुढे छोटा मोठा कोणी नसे. मायेचा हात सर्वांसाठी एकच होता. कसा ते सांगतो. साल १९८३ कोल्हापूरच्या ‘आम्ही रसिक’ संस्थेने महाराष्ट्रातले पहिले व्यंगचित्र संमेलन भरविले होते डॉ. अविनाश जोशी, अरुण नरके, रवींद्र ओबेराय आदी नामांकितांनी. आम्ही सगळे तरूण होतो, शि. द. फडणीसांखेरीज. मात्र त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजविणारा. सर्वश्री शि. द. विजय पराडकर, प्रभाकर झळके, प्रभाकर सिन्नरकर, श्रीनिवास प्रभुदेसाई, विवेक मेहेत्रे आदी बरेच लोक होते, आता सगळे स्मरत नाहीत. उद्घाटक बाबुराव सडवेलकर होते आणि समारोप बाळासाहेब ठाकरे करणार होते. सकाळचे सत्र प्रात्यक्षिकांचे होते. कोल्हापूरची मंडळी रसिक. नामांकित पेंटर्स, मूर्तिकार आवर्जून हजर होते. भरपूर गर्दी झाली होती. प्रत्येकाला कडकडून हशा व टाळ्यांची दाद मिळत होती. कोल्हापूर हे नामवंत चित्रकार, मूर्तिकार, सिनेनट, दिग्दर्शक यांचे माहेरघर. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, सूर्यकांत चंद्रकांत हे नट व चित्रकार भाऊ. एकापेक्षा एक दिगंत कीर्तीचे लोक. मात्र कोल्हापूरला व्यंगचित्रकला ही नवी व कुतुहलाचा विषय होती. दुपारचे सत्र एका मोठ्या पटांगणात भरले होते. भव्य स्टेज, दोन अडीच हजार रसिक प्रेक्षक. बाळासाहेबांच्या व्यंगचित्र प्रात्यक्षिकाने समारोप होणार होता. सव्वा चार वाजता स्टेजच्या डाव्या हाताने हर हर महादेव अशा घोषणा करत साहेबांचे शिवसैनिक व साहेब आले. त्यावेळी त्यांची प्रकृतीही छान होती. मलमली सोनेरी कुर्ता, सुरवार, अंगावर लपेटलेली ऑफ व्हाइट शाल. तरूण भुजबळसाहेब दिमतीला होते. साहेबांचे तुतारीने स्वागत झाले आणि ते स्टेजवर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या व्यंगचित्रकारांना साहेबांच्या हस्ते ‘आम्ही रसिक सन्मानचिन्हे’ वाटण्यात आली.
आता शिवसेनाप्रमुख व भारताचे लाडके व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र प्रात्यक्षिक करून दाखवतील व दोन शब्द बोलतील, असे माइकवरून सांगण्यात आले. पुन्हा दणकून टाळ्या पडल्या. साहेब ड्रॉईंग बोर्डकडे सरसावले. प्रेक्षकांतून ओरडा झाला. सकाळचे सत्र मी गाजविले होते. विनोदी व्यंगचित्रे व कॅरिकेचर्स काढली होती. ज्यांनी ती पाहिली होती, ते लोक ओरडून म्हणाले, आधी ज्ञानेश सोनारांना साहेबांचे व्यंगचित्र काढायला बोलवा.
साहेब हसले. कमरेवर हात ठेवत म्हणाले, कुठेय तो ज्ञानेश? बोलवा त्याला.
एका कोपर्यात आम्ही सर्व व्यंगचित्रकार बसलो होतो. फडणीस म्हणाले, सोनार उठा, साहेब बोलावत आहेत. झक्क चित्र काढा.
मी पुढे झालो, टाळ्या पडत होत्या. स्टेजवर मी प्रथम साहेबांना वाकून नमस्कार केला. त्यांनी छातीशी धरले. हसत म्हणाले, होऊन जाऊ दे.
त्यांनी छान पोझ दिली. दैव माझ्याबरोबर असावे. साहेबांचे कॅरिकेचर अत्यंत उत्तम उतरले. ओठात पाईपही टाकून दिला. साहेब खूष झाले, म्हणाले, अरे मी पाइप सोडलाय! त्यांनी माझी पाठ थोपटली, पुन्हा टाळ्या. नंतर साहेबांनी चर्चिल, हिटलर, नेहरू, इंदिराजी यांची कॅरिकेचर्स लिलया काढली. या व्यक्तिरेखांचे वैशिष्ट्यही लोकांना समजावून सांगितले. चर्चिलचा मुत्सद्दीपणा त्याच्या डोळ्यात होता, तसेच डोळे काढून दाखविले. इंदिराजींचे नाक, नेहरूंचे टोपीतल्या छबीपेक्षा टकलातले चित्र जास्त ओळखू कसे येते, ते दाखविले. हिटलरचा भांग व मिशी हे वैशिष्ट्य कसे होते, ते रेखाटून दाखविले. पहिले व्यंगचित्र संमेलन भरवल्याबद्दल ‘आम्ही रसिकचे’ त्यांनी भाषणात कौतुक केले.
—
शिवसेनेचे एवढे मोठे साम्राज्य निर्माण करूनही साहेबांचे पाय जमिनीवर होते. ते पॅरेलिसिस झालेल्या आरकेना आवर्जून भेटून त्यांना गोंजारत तर नाशिकला आल्यावर ज्ञानपीठविजेते नटसम्राटकार कुसुमाग्रज यांना वाकून नमस्कार करताना त्यांना संकोच वाटला नाही. मनाने सांगितले तेथे ते बेधडक जात. गरजू कलावंताला तेथेच आर्थिक मदत करून आणखी काही लागलं तर संकोच करू नकोस, असे सांगत. आल्यागेल्या कलावंताला प्रथम प्रश्न विचारत, तुला कुणी अडविले तर नाही ना? कोठे उतरलास? कधी जाणार? जेवायचं काय? मी तसलाच अभ्यागत.
१९९८च्या सुमारास माझा मुलगा सुनील ऑर्थोपेडिक सर्जन झाला. नाशिकचे डॉ. दौलतराव आहेर हे आरोग्यमंत्री होते. त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना बंगल्यावर यायला अवकाश होता. म्हणून आम्ही बापलेक साहेबांना भेटायला मातोश्रीवर गेलो. तेथे बरीच वर्दळ होती. पोलीस व सिक्युरिटीचे लोकही होते. एका कार्यकर्त्याला आम्ही म्हटले की, साहेबांना भेटायचंय. त्यावर तो म्हणाला, अपॉइंटमेंट घेतली का? आत हॉलमध्ये पाचपन्नास प्रतिष्ठित माणसे दुपारपासून बसलेली आहेत. साहेब सहा वाजता खाली अँटीचेंबरमध्ये येतील. आत साहेबांचे पीए बसले आहेत त्यांना भेटून बघा.
तेथेही गर्दी असल्याने एका सज्जनाच्या हाती माझे व्हिजिटिंग कार्ड आत पाठविले. दोनतीन मिनिटांत पीएने आम्हाला हॉलमध्ये बसण्यास सांगितले. तेथे खूप गर्दी होती. आमदार, खासदार, महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते जमा झालेले होते. ते पाहून आम्ही अस्वस्थ झालो. साहेब अँटीचेंबरमध्ये आल्याची वर्दी मिळाली. नावे पुकारली गेली. पहिले नाव माझे होते. इतर चकित झाले. दार उघडून आम्ही आत गेलो, आम्ही दोघांनी वाकून नमस्कार केला.
साहेबांनी विचारलं, मुंबईत कधी आलास? हा मुलगा कोण?
‘साहेब हा माझा मुलगा सुनील. नुकताच ऑर्थोपेडिक सर्जन झालाय!’ साहेब म्हणाले, ‘काय रे मी मुंबईला बोलावलं तर येशील का? बिंदा अचानक कार अक्सिडेंटमध्ये गेल्याने मुंबईत ट्रॉमा केअर युनिट करायचा मी विचार करतोय.’
दचकलेला मुलगा म्हणाला, हो सर, आपण बोलवाल तेव्हा नक्की येईल.
काय नाव तुझं… सुनील, हे बघ जग झपाट्याने पुढे चाललंय. आमचे राजकारण जागेवरच चालू द्या. तुम्ही शिकलेली मुलं त्यात डॉक्टर थांबू नका. जमेल तेवढी रुग्णांची सेवा करा. आपला महाराष्ट्र निरोगी दमदार ताकदवान करा. आम्ही आश्वासनं देतो तुम्ही श्वास द्या.
इतक्यात दार उघडून साहेबांच्या स्नुषा रश्मी आणि छोटा आदित्य आत आला. साहेबांनी त्याला जवळ घेतले व मला म्हणाले, हा माझा मोठा नातू. कालच याला बॅटबॉल घेऊन दिला. पठ्ठ्याने पहिल्याच बॉलने महापौराच्या गेटवरचा दिवा उडवला. शेवटी ठाकरेंचाच नातू ना…
बाहेर खूप गर्दी झाली होती, नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. गर्दीतल्या एकदोघांनी कुतूहलाने विचारले, आप कौन हैं? सबसे पहले आपका नंबर लगा!
मी त्याला म्हटलं, भय्या, मेरे को भी पत्ता नहीं मैं कौन हूँ और आपको समझेगा भी नहीं!