`कॉफी विथ पोक्या’ हे बॅनर मी आमच्या परिसरात जिकडे तिकडे झळकलेले पाहिले तेव्हा मला त्याचा इतका अभिमान वाटला की माझी छप्पन इंचाची छाती आणखी तीन इंच फुगली. पोक्या हा जरी माझा मानलेला परममित्र असला तरी कधी कधी मला तो माझ्या भावासारखा वाटतो. त्याची बुद्धिमत्ता माझ्यापेक्षा अफाट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तो सफाईदारपणे देतो. खरे तर हा कार्यक्रम `बीअर विथ पोक्या’ किंवा `व्हिस्की विथ पोक्या’ असा असायला हवा होता. परंतु आयोजकांचा आक्षेप असल्यामुळे पोक्याचा नाइलाज होता. या कार्यक्रमाची कल्पना मात्र वेगळी होती. त्यात पोक्याने एखाद्या खाजेपी पार्टी नेत्याच्या अंतरंगात शिरून आपणच तो नेता आहोत असे समजून उत्तरे द्यायची होती. त्याबद्दल त्याला भरपूर बिदागी देण्यात आली होती. `खाजेपी’ म्हणजे `खाता जेवता पीता!’
कार्यक्रम सुरू झाला. हॉलमध्ये तुफान गर्दी होती. व्यासपीठावर पोक्या `खाजेपी’ पार्टीचे अडगळीतले नेते देमारमामाच्या ऐतिहासिक वेषात अवतरले. त्यांनी बाजूलाच टीपॉयवर ठेवलेली कॉफी एका घोटातच संपवली आणि घसा साफ करून मोठ्या आवाजात माइक टेस्टिंग केली. घंटा वाजली आणि प्रश्नकर्ते त्याच्यासमोरच्या खुर्च्यांवर बसले. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
-देमारमामा, सध्या तुमच्या वरच्या सरकारने शेतकर्यांबाबत जी अतिशय अमानुष वृत्ती अंगिकारली आहे, ती योग्य आहे काय? शेतकर्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना मंत्र्यांची पोरे ठार मारतात!
-हे बघा. आमचे मंत्री सूज्ञ आहेत. मंत्र्यांची मुले तर त्यांच्याहून सूज्ञ आहेत. सिंधुदुर्गातील उदाहरण घ्या. शेतकर्यांविषयी आमच्या मनात किती प्रेम आहे ते तुम्ही आमच्या नेत्याचे महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील दौरे पाहिलेत ना की तुम्हाला कळेल.
-इथे शेतकर्यांविषयी एवढा कळवळा दाखवता पण उत्तर प्रदेशात शेतकर्यांचे जे रक्त सांडले त्याबद्दल निषेधाचा एक शब्दही तुमच्या खाजेपी पार्टीचा एकही नेता बोलत नाही. हा दुटप्पीपणा कसला?
-ते तुम्हाला नाही कळणार. आमच्या नेत्यांचे हृदय दगडाचे आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्यांनाही भावना आहेत. आमच्या दाढीवाल्या आदरणीय नेत्याने अमेरिकी नेते ट्रम्पेटना मारलेली ती भावनेने ओथंबलेली मिठी आठवा.
– ते पडले ना हो. पण भारतात येताना सोबत आणलेल्या पाहुण्यांबरोबर कोरोनाची भेट देऊन गेले असे काही लोक म्हणतात.
-साफ खोटे आहे ते. कोरोनाच काय, कोरोनाचा बापही त्यांना आणि त्यांच्या माणसांना स्पर्श करू शकणार नाही. म्हणून तर ते मास्क न घालता बागडायचे. मोदी जर तिथे असते तर त्यांनी बायडनला पाडण्याचा मंत्र त्यांना दिला असता. वाटल्यास प्रचाराला आमच्या तिरकिट भूमय्यालाही पाठवला असता.
-आता तुम्हीच त्या तिरकिटची आठवण केली ते बरे झाले. या माणसाला कुणी प्राणी चावला का हो?
-नाही. तो त्यांचा स्वभावच आहे. माकड उड्या कशा माराव्या याचा शैक्षणिक क्लास ते चालवतात त्यामुळे तुम्हाला तसे वाटते. पण फारच धाडसी माणूस आहे. त्यांचा सर्व स्थळी मुक्त संचार असतो. सगळ्या रेल्वेत त्यांना मुक्त प्रवास आहे. विडी-काडीच्याच नव्हे तर बीबीआयच्या कार्यालयातही ते जाऊ शकतात. राहू शकतात, गाऊ शकतात.
-त्यांचे पुराण तुम्ही गाऊ नका. तुमच्या त्या दाढीवाल्या आदरणीय नेत्याने त्या ट्रम्पेटच्या सरबराईत आधीचे दोन महिने `कोरोना’चे आगमन गांभीर्याने घेतले नाही म्हणून तर कोरोना भारतात शिरला. त्यानंतरही थाळ्या गुल करा असे नको ते प्रकार करण्याचे आवाहन केल्यामुळे खरा कोरोना दुर्लक्षित राहिला.
– उलट आमच्या नेत्याने मन की बात मधून कोरोनाला दहा वेळा खड्या आवाजात तोंड काळे करण्याचा सक्त इशारा दिला होता. त्याचे कानठळे बसावे म्हणून थाळी नाद आणि घंटानाद करण्याचे आवाहन केले होते.
-त्यामुळे जनतेचेच कानठळे बसले त्याचे काय? कोरोना लसीचेही उत्सव कसले साजरे करता? त्या उत्तर प्रदेशात अंत्यसंस्काराविना कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून जात होते तेव्हा त्यांचाही उत्सव साजरा करण्यास तुमच्या नेत्यांनी मागेपुढे पाहिले नसते.
-आमचे उत्तर प्रदेशाचे सिद्धपुरुष योगीराज महाराज सांगतात त्याप्रमाणे जन्म किंवा मृत्यू कुणाच्याच हातात नसतो. तो कधी, कुठे, कसा, केव्हा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. कोरोनाच्या मृत्यूबाबतही तेच म्हणता येईल. आमचे परमपूज्य दाढीवाले नेतेही तेच म्हणतात.
-पण त्यांनी एकीकडे विकासाचे नाव सांगत दुसरीकडे देशच विकायला काढलाय असे बहुतेकजण म्हणतात. ते खरे आहे का?
-मुळीच नाही. देश म्हणजे काही भाजी-पाला किंवा कांदे-बटाटे आणि टॉमॅटो आहे का विकायला? कोणी काहीही सांगतो आणि तुम्ही ऐकता. उलट ते आल्यापासून देश किती भरभर आत्मनिर्भर झालाय ते दिसत नाही का तुम्हाला? म्हणून तर जिकडे तिकडे त्यांचेच फोटो दिसतात. आज लस प्रमाणपत्रावरील फोटोमुळे तर ते घराघरात पोहोचले आहेत.
-पण ती महागाई थांबवायला सांगा ना त्यांना. आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो. ते पेट्रोल-डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव तरी कमी करा म्हणावं.
-ते त्यांच्या हातात नाही. उलट लोकांनी सायकली वापराव्या, आठवड्यातून तीन वेळा उपास करावा, घरातच भाज्यांची लागवड करावी. दोन वर्ष नवे कपडे घेऊ नयेत, अनावश्यक खर्च टाळावा ही त्यांची पाच कलमी योजना अंमलात आणलीत ना तर बघा तब्बेतही माझ्यासारखी गुटगुटीत राहील. आणि पैसेही वाचतील असे म्हणतात.
-मित्रांनो हे सारे ऐकून मला चक्कर येत आहे. तेव्हा आपण कॉफी पिऊन रजा घ्यावी. मी आता माझ्या, मूळ पोक्याच्या रूपात येतो आणि `कॉफी विथ रम’ सुरू करून श्रमपरिहार करतो. नमो नम:.