विजेवर चालणारी वाहने प्रदूषण करत नाहीत असं ज्यांना वाटतं, टेस्ला नावाच्या कंपनीचा एलन मस्क नावाचा माणूस ज्यांना तंत्रज्ञानाचा मसीहा वाटतो, प्रगतीची एकरेषीय संकल्पना ज्यांना ठाऊक आहे, प्रगती आणि विकास यामधला नेमका फरक ज्यांना समजत नाही, अशा सगळ्या लोकांसाठी.
दक्षिण अमेरिकत मोठी पर्वतरांग आहे, अँडीज, त्यामधला एक छोटा पर्वतीय देश बोलेव्हिया, प्राचीन माचूपिचू शिखर आणि संस्कृती याच भागातली. तर या बोलेव्हियामध्ये लिथियम खनिजाचे मोठे साठे आहेत. कदाचित जगातले सगळ्यात मोठे. हे लिथियम साठे असणार्या परिसरात एक मोठ शहर आहे युआनी.
इथे पूर्वी असणार्या सरकारचे प्रमुख होते इव्हा मॉरेल्स, त्यांची चळवळ आहे ‘मूव्हमेंट टुवर्ड्स सोशलिजम (एमएएस). त्यांनी असं ठरवलं की या लिथियमच्या साठ्यांची मालकी देशाची आहे म्हणून याचं उत्खनन करताना ते मर्यादित करायचं, तिथली जैवविविधता शक्य तेवढी वाचवून उत्खनन करून या लिथियमवर देशातच प्रक्रिया करून देशाने ते विकायचं. यासाठी जर्मनीसोबत एक करार करण्यात आला.
आता हा असा लोकहितकारी निर्णय भांडवलशाही कंपन्यांना कसा रुचणार?
मग त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने टेस्लाला पत्र लिहून मदतीची मागणी केली. मग सीआयए आणि स्थानिक असंतुष्ट नेत्यांनी मिळून १० नोव्हेंबर २०१९ला सरकार लष्करी उठावाच्या माध्यमातून उलथून टाकलं.
दरम्यान एलन मस्क यांचं सोशल मीडियावर याचबद्दल एक ट्वीटसुद्धा व्हायरल झालेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आम्ही आमच्या हितासाठी काहीही करू शकतो, असं म्हटलेलं होतं. ‘वुई विल कू हूएव्हर वुई वॉन्ट! डील विथ इट.’
जसं उजव्या विचारांचं सरकार आलं, त्यानंतर चमत्कार झाला, खाजगी कंपन्यांना उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली, अनिर्बंध लूट सुरू करायला परवानगी मिळाली. उजव्या विचारांचे नेते सॅम्युअल डोरिया मेदिना यांनी ब्राझीलसोबत संयुक्तपणे लिथियम उत्खनन करून निर्यात करण्याची घोषणाही केली.
इथवर सगळं या कंपन्यांना सोपं, सोयीचं होतं, पण आता नवीन बातमी आलीय.
या सत्तेच्या उलथापालथमध्ये इव्हा मॉरेल्स यांना मेक्सिकोमध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला, मात्र स्थानिक जनतेमध्ये असंतोष वाढतच होता, परिणामत: पुन्हा निवडणुका लागल्या.
नव्याने झालेल्या निवडणुकात जनतेने पुन्हा इव्हा मॉरेल्स यांना सत्तेत आणलेलं आहे आणि त्यांनी समाजवादाची चळवळ कायमच ठेवण्याचा निर्धार जाहीर केलेला आहे.
लिथियम वीजेवर चालणार्या वाहनांच्या बॅटरीमधला मुख्य घटक आहे तसाच तो इतरही अनेक उपकरणांच्या बॅटरीचा घटक आहे. मात्र हे लिथियम मिळवायला कंपन्या कुठल्या थराला जातात आणि एखाद्या देशातली सरकार उलथून पाडतात हे भयावह आहे. टेस्लाचा सर्वेसर्वा एलन मस्क अंतराळात जातो, विजेवर चालणारी वाहने बनवतो म्हणून अनेकांचा आवडता असला तरीही त्याचा हा चेहरा अतिशय क्रूर आहे.
महत्वाची बाब म्हणजे या लिथियम बॅटरी त्यांचं आयुष्य संपल्यावर विल्हेवाट लावताना प्रचंड प्रदूषण करतात, ही बाबसुद्धा लक्षात ठेवली पाहिजे, मग विजेवर चालणारी वाहन पर्यावरणाचे रक्षण करणार आणि त्यातली बॅटरी पुन्हा पर्यावरण प्रदूषित करणार हे आपल्याला चालणार आहे का हेही महत्वाचं.