काशीमिरा येथे मुंबईच्या दिशेने जाणार्या बेस्ट आणि अन्य परिवहन मंडळांच्या बसगाड्यांचा थांबा काशीमिरा चौकाच्या थोडा पुढे आहे. ठाण्यावरून बोरिवलीला जाणार्या आणि ठाणे मार्गे बाहेरगावाहून येऊन बोरिवलीला जाणार्या एसटीच्या बसेस मात्र काशीमिरा चौकात, शंभर दीडशे फूट मागे थांबतात. बसस्टॉपवर अनेक प्रवासी बोरिवली स्थानकाला जाणारे असतात. ते या एसटीमधून सहज प्रवास करू शकतात. विरुद्ध बाजूला काशीमिराचा ठाणे-वसईकडे जाणार्या गाड्यांचा बेस्टचा बसस्टॉप आणि एसटीचा स्टॉप एकमेकांच्या नजीक आहेत. इकडे उभा असलेला प्रवासी तिकडची बस सहज पकडू शकतो. तसेच बोरिवलीच्या दिशेलाही करावे. एसटीचा थांबा बेस्टच्या थांब्याजवळ आणला तर बोरिवलीला जाणार्या प्रवाशांची मोठी सोय होईल आणि एसटीलाही वाढीव उत्पन्न मिळेल.