दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरिवली स्थानकाबाहेर ७०५ आणि ७०९ या बसगाड्यांच्या थांब्यावर घडलेली ही संतापजनक घटना. बेस्टचा ‘वर्स्ट’ अनुभव म्हणावी अशी. बोरिवली स्थानक अशी पाटी असलेली ७०५ क्रमांकाची बस तिथे येऊन पोहोचली. हीच बस पाटी बदलून मिरा भायंदरच्या दिशेने जाईल या समजुतीने २०-२५ प्रवासी तिच्यात चढले. बस सुरू झाली. काही मीटर अंतरावर गेल्यावर तिच्यातले दिवे मालवले गेले आणि तेव्हा कंडक्टरने सांगितले की ही बस पुढे जाणार नाही. हे आधी का सांगितले नाही, असे प्रवाशांनी विचारल्यावर बोर्ड वाचता येत नाही का, असे वाहक आणि चालक अत्यंत शिवराळ भाषेत उर्मटपणे बोलत होते. पुढच्या एका वळणावर प्रवाशांना उतरवून ते पुन्हा स्टॉपकडे धावत निघालेल्या प्रवाशांची ‘मजा बघत’ उलट्या दिशेने निघून गेले. यांना कसला माज चढलेला आहे? प्रवासी गफलतीने बसमध्ये चढले तर त्यांना त्याच स्टॉपवर उतरवून बस पुढे नेण्यात अडचण काय होती? वर्दी उतरल्यावर हीसुद्धा साधी माणसेच असतात ना? सर्वसामान्यांसारखी. मग दिवसभर कष्ट करून घरी जाण्यासाठी बसची वाट पाहणारे म्हातारेकोतारे, बायाबापड्या यांच्याशी असे विकृत वागून यांना काय समाधान मिळाले? आपण सरकारी नोकर आहोत, म्हणजे जनतेचे सेवक आहोत, आमच्या तिकिटाच्या पैशांतून आणि करांतून तुमचा पगार होतो, हे विसरलात का? प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट का पाहता? बेस्ट प्रशासन या उन्मत्त चालक-वाहकांना शोधून काही शिक्षा करेल का?