मोदी शहांच्या गुजरातमध्ये त्या दोघांच्या ताकदीला लोळवून स्वबळावर आमदार म्हणून निवडून येणारा हा तरूण अतिशय जिगरबाज आहे. तो हिंस्त्र प्राण्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारा भरत आहे. नुसत्या वल्गना न करणारा हा तरूण प्रगल्भ वाटतो. काँग्रेससाठी दलित समाज पूर्वीसारखा एकगठ्ठा मतदान करत नाही, त्यामुळेच हा दलित तरुणाईचा ताईत असणारा नेता काँग्रेससाठी मोठी जमेची बाजू आहे. काँग्रेसने जिगरबाज जिग्नेश तर घेतला पण सोबत कन्हैयासारख्या वादग्रस्ताला देखील घेतला. ‘हर तरह के लोगों को लेने की आझादी’ असेच या घटनेकडे पाहून वाटते.
—-
कन्हैया कुमारच्या ‘आझादी’च्या घोषणांनी तरुणाई जोषात येते. मनुवाद से आझादी म्हणणारा कन्हैया नुकताच कम्युनिस्ट पक्षातून आझाद होऊन काँग्रेस पक्षात सामील झाला. तो काँग्रेस पक्षात आल्याने काँग्रेस पक्ष हा सर्व प्रकारच्या ‘आझादी’ने परिपूर्ण आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण ज्या पक्षात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारखे लोक सत्तेची मोठी पदे उपभोगून झाल्यावर उतारवयात पक्षासोबतच शत्रुतापूर्ण वागू शकतात त्या पक्षाहून अनिर्बंध स्वातंत्र्य देणारा दुसरा पक्ष भारतात तरी नसेल. कन्हैयाने नेमकी ही आझादी बघूनच काँग्रेसमध्ये यायचा निर्णय केला असणार.
संघासोबत लढायची प्रतिज्ञा घेतलेला कन्हैय्या प्रकाशझोतात आला, तो दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपामुळे. पुढे या आरोपातून तो सुटला. पण त्याला खरा मोठा केला तो भाजपाने. विद्यार्थी आंदोलन हे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे. ते हाताळायला जो संयम लागते तो न दाखवता कन्हैय्याचा बिमोड करायच्या कामगिरीवर भाजपाने सगळी कुमक कामाला लावली. कन्हैयावर हल्ले झाले, केसेस दाखल झाल्या. या प्रत्येक गोष्टीचे मोठे भांडवल करत हा बिहारी युवक राजकारणात प्रस्थापित झाला. कम्युनिस्ट पक्षाने त्याला मोठी जबाबदारी दिली आणि एक मंच दिला. लोकसभेची निवडणूकदेखील त्याने कम्युनिस्ट पक्षातर्फे लढवली. पण तिथे तो मोठ्या फरकाने हरला. पक्ष पाठिशी नसता तर त्याचे डिपॉझिट पण वाचले नसते. हरलो तरी माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते असा बुद्धिभेद करून तो त्या पराभवाच्या जबाबदारीतून आझाद झाला.
ज्या कम्युनिस्ट पार्टीने त्याला घडवला, मोठा केला आणि एक विचार दिला तो पक्ष आज अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहे. देशात कोणाचे सरकार आणायचे हे ठरवण्याची ताकद असणारा हा पक्ष आज ग्रामपंचायतीसुद्धा जिंकू शकत नाही, हे सत्य आहे. पण या अवस्थेत देखील पक्षावर प्रेम करणारा निष्ठावान कम्युनिस्ट प्रत्येक खेड्यात दिसतो. कष्टकरी समाजाची बाजू घेऊन लढणारा हा पक्ष टिकवणे आणि वाढवणे सोडून कन्हैयाने पक्ष सोडायची आझादी म्हणत कोलांटी उडी मारली आणि तो काँग्रेसमध्ये आला. पत्रकार परिषदेत तो अशा थाटात बोलत होता की जणू त्याने काँग्रेस वाचवण्यासाठी एखादा अवतार घेऊन या भूतलावर जन्म घेतला आहे. खरेतर हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायची काँग्रेसची वृत्ती याला कारणीभूत ठरत आहे. विलासराव देशमुखांसारखा तगडा नेता असताना नारायण राणे हवे होते कशाला?
हल्ली मात्र याला खरे कारण आहेत ते पक्षाचे स्वयंघोषित हितचिंतक. एखादा माणूस चिंताग्रस्त चेहरा करून गंभीरपणे मोबाईलवर जोरात काही टाईप करत असेल तर नक्की तो काँग्रेस पक्षाच्या चिंतेने ग्रासलेला एखादा समाजवादी अथवा कम्युनिस्ट असण्याचा शक्यता दाट असते. हल्ली हे चिंतातूर सतत काय केल्याने काँग्रेसला उभारी येईल यावर लाह्या उडाव्यात तसे उडत असतात. या बुद्धिवादी चिंतातुरांचा लेखणी आणि वाणीवर जन्मसिद्ध हक्क आहे. या महाभागांना काँग्रेसची तोंडओळख देखील नसते. पण हे महाभाग काँग्रेसचे डॉक्टर बनून त्या पक्षाला नवनवीन उपचार करायला भाग पाडतात. त्यातून कन्हैया नावाचा रामबाण उपाय त्याना सुचला असणार.
काँग्रेस हा पक्ष निवडणुकीत संपला असं वाटत असलं तरी या पक्षाची पाळेमुळे फार खोलवर रूजली आहेत, हे या महाभागांना कोण सांगणार? साधा तालुक्याच्या अध्यक्ष होण्यासाठी आजही ज्या पक्षातील कार्यकर्ते दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून लॉबींग करत असतात, तो पक्ष संपला असं ठरवणे म्हणजे विराट कोहली सलग दोनदा शून्यावर बाद झाल्यावर त्याने क्रिकेट सोडले पाहिजे असे म्हणण्यासारखे ठरेल. रिलायन्सचे शेयर काही काळ आपटले म्हणून अंबानी समूह डबघाईला येत नसतो, तसेच दोन निवडणुकांत हार झाली म्हणून काँग्रेस आणि गांधी कुटुंबाचे महत्व शून्यावर येत नाही. प्रियांका आणि राहुल गांधी हाथरसच्या पीडितेला न्याय द्यायला निघाले, तेव्हा योगी सरकारचे धाबे दणाणले होते हे तो पक्ष विसरला का? काँग्रेसची जडणघडण इतर पक्षापेक्षा फार वेगळी आहे. तिथे सर्वोच्च स्थानी गांधी कुटुंबीयच आहेत, पण तेथील निर्णयप्रक्रिया मात्र फार किचकट आणि वेळखाऊ आहे. काही झाले तरी शेवटी गांधी कुटुंबीय हेच पक्षाचा तारणहार आहेत, असे काँग्रेसजनांना आजही वाटते. राहुल गांधीना राजकारणातून निष्प्रभ करणे हे भाजपाचे एकमेव राजकीय लक्ष्य आहे ते यामुळेच. त्यात त्यांनी आघाडी घेतली तरी ते पूर्णपणे यशस्वी नाही ठरले.
गेल्या काही दिवसात पंजाबमध्ये साचलेला गाळ साफ करून काँग्रेसने योग्य तेच केले आहे आणि तडफदार युवानेत्यांचा काँग्रेस प्रवेश ही तर पक्षासाठी फार मोठी संजीवनी आहे, वगैरे मेसेज लगेच सगळीकडे फिरू लागले आहेत. हल्ली भक्त ही संकल्पना भाजपापुरती उरलेली नाही हे सोशल मीडियाचा फेरफटका मारला तर लगेच समजते. कालपर्यंत पक्षासाठी हिरो असणारे नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदरसिंग अचानक गाळ वगैरे कसे ठरू लागले? काँग्रेसने गाळ समजून फेकलेली माती दुसर्यांची जमीन मात्र विनासायास कशी बरे सुपीक करून देते? विहिरीतील जिवंत झरे आटले असतील तर गाळ काढून काय उपयोग? दोन पाण्याचे टँकर ओतून विहीर जिवंत होत नसते. त्यासाठी जिवंत झरे लागतात.
कन्हैय्या हा भाजपावर आणि मोदींवर जहाल हल्ला करतो हे खरे असले तरी कन्हैयावरील फुटीरतावादी असण्याचा शिक्का मारण्यात भाजपा अंशतः यशस्वी ठरली आहे. या गोष्टीत अजिबात तथ्य नसले तरी अशा वादग्रस्त प्रतिमा असलेल्यांचा फायदा निवडणुकीत फारसा होत नाही, झाले तर नुकसान होते. कन्हैया हा काँग्रेसमध्ये नवीन प्राण आणण्याची भाषा करत होता, पण तो हे विसरतो की काँग्रेस पक्षासाठी कन्हैय्या हे एका लहान टेकओव्हर व्हेंचरसारखे आहे. सिद्धूंचा नारायण राणे कसा झाला हे कन्हैय्याने अभ्यासावे. कन्हैय्याला झटपट राजकीय यश मिळवायचे असेल तर ‘आले दरेकर घे डोक्यावर’ असा सुटसुटीत निर्णय घेणारा एखादा पक्ष त्याने शोधायला हवा होता. गांधी कुटुंबाचे नेतृत्व संपूर्ण विनाशर्त मान्य केले तर मग कन्हैयाचा राजकीय प्रवास सोपा आहे. कन्हैय्या हा काँग्रेस पक्षासाठी थोडीफार तरी जमेची बाजू आहे का हे येणारा काळच ठरवेल; पण काँग्रेसचा खरा मास्टरस्ट्रोक हा जिग्नेश मेवानीचा पक्षप्रवेश म्हणावा लागेल. मोदी शहांच्या गुजरातमध्ये त्या दोघांच्या ताकदीला लोळवून स्वबळावर आमदार म्हणून निवडून येणारा हा तरूण अतिशय जिगरबाज आहे. तो हिंस्त्र प्राण्याच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारा भरत आहे. नुसत्या वल्गना न करणारा हा तरूण प्रगल्भ वाटतो. काँग्रेससाठी दलित समाज पूर्वीसारखा एकगठ्ठा मतदान करत नाही, त्यामुळेच हा दलित तरुणाईचा ताईत असणारा नेता काँग्रेससाठी मोठी जमेची बाजू आहे. काँग्रेसने जिगरबाज जिग्नेश तर घेतला पण सोबत कन्हैयासारख्या वादग्रस्ताला देखील घेतला. ‘हर तरह के लोगों को लेने की आझादी’ असेच या घटनेकडे पाहून वाटते. या दोघांना पक्षाची संजीवनी ठरवणे मात्र अति धाडसाचे ठरेल. रामाकडे मारुतीसारखा निस्सीम भक्त होता. लक्ष्मणाचा जीव वाचायला मारुतीरायाने द्रोणागीरी पर्वत उचकटून आणला आणि मग संजीवनी मिळाली. मारुतीराया हल्लीचा राजकीय नेत्यांच्या चमच्यांसारखा असता तर जवळचेच गवत उपट्रून आणून तीच संजीवनी आहे, असे ठामपणे त्याने पटवून दिले असते.