श्रद्धाच्या या ‘ओपन स्कूल’चं नाव सगळीकडे झालं आणि मग जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी त्या ‘शाळे’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा ते प्रभावित कसे झाले, ते त्यांचा चेहराच सांगत होता. वर्ग सुरू ठेवण्यासाठी मग त्यांनी तिला एक खोलीही देण्याची तयारी दाखवली. पण श्रद्धानं ती ‘ऑफर’ नम्रपणे नाकारली. त्याचं कारण म्हणजे शाळेच्या बंदिस्त वर्गापेक्षा शेतातल्या या शाळेतच तिचे विद्यार्थी अधिक मजेत आणि आनंदात शिकत होते!
—-
गेल्या दीड वर्षांत कोव्हिड-१९मुळे जगरहाटीला वेगळंच वळण लागलंय. या साथरोगाचा दैनंदिन जीवनावर जसा परिणाम झालाय तसंच काम करण्याच्या, शिक्षण घेण्याच्या आणि परस्परसंवादाच्या पद्धतीतही बदल घडून आला आहे. शारीरिक अंतर राखण्याच्या निकडीमुळे आपलं अस्तित्व आभासी होऊ लागलं आहे. ऑनलाइन पद्धतीत बदललेल्या अनेक गोष्टी सुरळीत होत असताना शिक्षणाची गाडी मात्र रुळावरून घसरली आहे. एका मोठ्या समुदायाला स्मार्टफोन आणि इंटरनेटचा खर्च परवडत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. पण या महामारीच्या आणि शैक्षणिक गोंधळाच्या काळात अनेक व्यक्ती आणि समूह मदत करण्यासाठी पुढे आले आहेत हे दिलासा देणारं आहे.
श्रद्धा पाटकर ही अवघ्या १९ वर्षांची युवती असंच काम महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली ब्लॉकमध्ये करत आहे. श्रद्धा ही कणकवली कॉलेजमध्ये कम्प्युटरसंबंधित शिक्षण घेत आहे आणि ती २५ विद्यार्थ्यांच्या एका गटास शिक्षणाबाबत मदतही करत आहे. जिल्हा शिक्षण विभागानं तिचा या कामाबद्दल गौरवही केला आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला आणि श्रद्धाच्या हाती बराच मोकळा वेळ आला. पहिला आठवडा तिनं काहीच न करण्यात घालवला खरा; पण नंतर लगेचच तिनं काहीतरी ठोस काम करण्याचं ठरवलं. ‘मला रस्त्यावर नुसतीच इकडे-तिकडे भटकणारी मुलं दिसत होती आणि शाळा बंद असल्यानं घरीच राहणं भाग पडल्यानं ती अस्वस्थ झालेली होती. या मुलांना काही तरी विधायक कामात गुंतवायला हवं, असं माझ्या लक्षात आलं होतं…’ श्रद्धाच आपली कहाणी सांगत होती.
अखेर आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांबरोबर नियमितपणे बोलायचं, असं तिनं ठरवलं. तिच्या या ‘ओपन स्कूल’मध्ये सामील होण्याची तयारी त्यांच्याच आवाठात काम करणार्या शेतमजुरांच्या सात मुलांनी दाखवली. श्रद्धाचं कुटुंब हे शेती तसंच फळबागांवर निर्वाह करणारं आहे. त्यामुळे आपल्याच शेतात वर्ग सुरू करण्याची कल्पना त्या मुलांनाही एकदम आवडून गेली, श्रद्धा सांगत होती. आपल्या मुलांचं आता काय करायचं, या काळजीत असलेल्या पालकांनाही ती कल्पना मग एकदम आवडली.
वर्ग सुरू होण्यापूर्वी श्रद्धाने काही खेळ घेतले. त्यामुळे मुलांना श्रद्धाताई फारच आवडू लागली आणि काही शिकण्याच्या आणि करण्याच्या ओढीने ती मुले वेळेआधीच हजर राहू लागली. ‘गमती-जमतीत काही वेळ गेल्यावर मी त्यांना गणित शिकवायला सुरुवात केली. बेरीज, वजाबाकी, गुणाकार म्हणजे काय तेही त्यांना नीट समजत नव्हतं. हे सारं अवघड आहे, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलं…’
श्रद्धाने पुढे विचारपूर्वक काही गणिती स्वाध्याय घेण्याचे ठरवले. ‘बेरजा-वजाबाक्या शिकवण्यासाठी दगड-गोट्यांचा वापर करावयाचं मी ठरवलं. दुसर्या दिवशी वर्गात येताना सहा किंवा आठ दगड-गोटे घेऊन यायचा ‘गृहपाठ’ मी त्यांना देऊ लागले आणि ते नेमके तेवढेच गोटे घेऊन येऊ लागले. त्यांना साध्या बेरका-वजाबाक्या करायला शिकवण्यासाठीही दगडांचा उपयोग करू लागले. समजायला मग ते सोप्पं वाटायला लागलं आणि ते पाढेही लक्षात ठेवू लागले. आता त्यांना एक ते २२ पर्यंतचे पाढे येऊ लागले आहेत. त्यांना आता मी वर्ग तसंच वर्गमूळ म्हणजे काय ते शिकवत आहे. हा जरासा गुंतागुंतीचा प्रकार आहे. पण त्यांचा गणिताचा पाया पक्का झाल्यानं त्यांना ते तितकसं अवघड जात नाहीये.’
साध्या दगडगोट्यांचा वापर करून गणितातली साधी उदाहरणं श्रद्धानं मुलांना शिकवली आणि गणितासारख्या विषयातही ते रस घेऊ लागले. खरं तर शाळेत गणित हा विषय त्यांना समजत नसल्यामुळे त्यात ही मुलं मागे पडू लागली होती. श्रद्धाच्या थेट शिकवण्याच्या पद्धतीमुळे खूप फरक पडला. आपण काय शिकलोय, ते इतरांना करून दाखवण्यासाठीही ती उत्सुक असतात. एकदा ते असेच गोटे गोळा करण्यासाठी बाहेर पडले आणि मग बेरजा-वजाबाकी करून दाखवल्यावर त्यांना त्याचा प्रचंड अभिमान वाटू लागला. ‘आमच्या शिक्षकांनी शाळेतही हीच पद्धत वापरली असती, तर गणित वा शाळा याविषयी आमच्या मनात अशी रागाची भावना कधीच आली नसती,’ असं तिचे विद्यार्थी आता सांगतात. पाढे पाठ झाल्यामुळे श्रद्धाने चौथीच्या वर्गातील मुलांनाच मग वर्गमूळ आणि घन म्हणजे काय ते सांगायला सुरुवात केली आणि त्यांना ते अजिबात अवघड गेलं नाही, श्रद्धानं सांगितलं. ‘मी त्यांना दोन गुणिले दोन, तीन गुणिले तीन आणि असंच विचारत राहिले आणि त्यातूनच चौरसाची संकल्पना त्यांना उमजत गेली. एक ते २०पर्यंतच्या आकड्यांचे वर्ग आणि वर्गमुळेही मी त्यांच्याकडून पाठ करून घेतली. फळ्याचा वापर मी कधीच केला नाही आणि त्याऐवजी जमिनीचाच फळा म्हणून वापर करून मी सारं त्यांना समजावून सांगत गेले… त्यामुळेच ते विद्यार्थी आणि फळा यातील अंतरही एकदम कमी होऊन गेलं.
विश्वाची संकल्पना आणि पृथ्वी तसंच सूर्य यांच्या भ्रमणाचा खेळही श्रद्धानं त्यांना अशाच प्रकारे शिकवला. एकात एक अशी दोन वर्तुळे करून तिनं विद्यार्थ्यांना गोलाकार उभं केलं आणि त्यातूनच पृथ्वीचं भ्रमण एकाच वेळी स्वत:भोवती तसंच सूर्याभोवतीही कसं होतं, ते तिनं त्यांना समजावलं. त्याचवेळी ती त्यांना एक ते दहा पाढे, बेरीज-वजाबाकीची एक-एक गणितं तसंच कोणत्याही विषयावर छोटे छोटे निबंध लिहून आणायला सांगायची. ए पासून झेड पर्यंतची इंग्रजी अक्षरंही तिने त्यांच्याकडून लिहून घेतली. सगळ्या विद्यार्थ्यांना सारखाच गृहपाठ असायचा आणि छोटी-छोटी पुस्तकं तसंच वर्तमानपत्रं वाचणं, हेही त्यांच्याकडून ती करून घेत आहे. ही मुलं चांगल्या प्रकारे शिकत आहेत, हे लक्षात आल्यामुळे आणखी काही मुलं तिच्या ‘शाळे’त येऊ लागली आणि आता ती २५ मुलांना शिकवत आहे.
पुढे श्रद्धाचं कॉलेज सुरू झालं आणि रोज नियमित वर्ग घेणं तिला कठीण जाऊ लागलं. आता ती फक्त रविवारी आणि सुटीच्या दिवशीच वर्ग घेते. तरीही तिच्या ‘शाळे’तील एकाही विद्यार्थ्यांनं पळ काढला नाही आणि रविवारच्या तिच्या वर्गांना सर्वच्या सर्व २५ विद्यार्थी अगदी नियमितपणे हजर राहतात.
श्रद्धाच्या या ‘ओपन स्कूल’चं नाव सगळीकडे झालं आणि मग जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी त्या ‘शाळे’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा ते प्रभावित कसे झाले, ते त्यांचा चेहराच सांगत होता. वर्ग सुरू ठेवण्यासाठी मग त्यांनी तिला एक खोलीही देण्याची तयारी दाखवली. पण श्रद्धानं ती ‘ऑफर’ नम्रपणे नाकारली. त्याचं कारण म्हणजे शाळेच्या बंदिस्त वर्गापेक्षा शेतातल्या या शाळेतच तिचे विद्यार्थी अधिक मजेत आणि आनंदात शिकत होते!
शिक्षणाधिकार्यांनी मग तिला कार्यालयात बोलावलं आणि तिथं तिचं एक सादरीकरण आयोजित केलं. तिच्या विद्यार्थ्यांचे निबंध, त्यांनी काढलेली चित्रं तसंच अन्य हस्तकलाकृती यांचा त्या सादरीकरणात समावेश होता. शिवाय, श्रद्धाच्या विद्यार्थ्यांनीही तेथे पाढे आणि काही कविता म्हणून दाखवल्या. त्यानंतर शिक्षण खात्यातील आणखी एका अधिकार्यानं या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘तुम्हाला ताईची शाळा आवडते का? -आणि का आवडते?’ असे त्या अधिकार्याने तेव्हा विचारले. काही विद्यार्थ्यांनी तर तेव्हा असंही सांगितलं की त्यांनी ‘लॉकडाऊनच्या आधीच शाळेत जाणं सोडून दिलं होतं कारण शिक्षक फक्त हुषार विद्यार्थ्यांकडेच लक्ष द्यायचे.’
श्रद्धाच्या या अभिनव उपक्रमापासून स्फूर्ती घेऊन तिच्या मैत्रिणी आणि तिच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळालेल्या इतर अनेक व्यक्तीआता त्यात सामील झाले असून त्यांनी एक गटही स्थापन केला आहे. शाळाबाह्य किंवा अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांनी आता मिळून प्रयत्न सुरू केले आहेत. ‘जी मुलं कधी शाळेतच गेलेली नाहीत वा ज्यांनी मध्येच शाळा सोडून दिली आहे, अशांना शिकवण्यासाठी तुमच्याकडे खूप संयम असायला तर हवाच, शिवाय तुम्ही संवेदनशील असायला हवे. अशा मुलांशी संवाद साधण्याची काही कौशल्येही तुमच्याकडे हवीत… आता कणकवली परिसरातील अशा सगळ्याच मुलांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असं श्रद्धानं सांगितलं.
अशा मुलांवर खासकरून लक्ष द्यायला हवं; अन्यथा ती शैक्षणिक व्यवस्था आणि मग पुढे समाज आणि नोकरी-व्यवसायांच्या क्षेत्रातूनच बाहेर फेकली जातील, असं तिला वाटतं. त्यांना शिकवण्यासाठी काही नव्या पद्धती शोधून काढायला हव्यात. वर्गात साचेबंद पद्धतीनं दिलं जाणारं शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसं नाही, हे श्रद्धाने दाखवून दिलं आहे आणि त्यासाठी श्रद्धाच्याच मार्गाने जायला लागेल.
(चरखा फीचर्स)
– अलका गाडगीळ
(लेखिका युनिसेफच्या प्रकल्पात काम करतात.)