एक डास इतर डासांपेक्षा आकाराने मोठा झाला.
इतर डास त्याला राजाधिराज, महाराज वगैरे मानू लागले.
बाकी सगळे डास डबक्यात, वेगवेगळ्या घाणींवर, कोणी झाडांवर वगैरे राहात होते. पण महाराजांसाठी वेगळा महाल असला पाहिजे, असं सगळ्यांचंच मत पडलं. शेवटी बराच शोध घेतल्यानंतर एका हत्तीच्या कानाचा भव्य परिसर महाराजांच्या बांधकाम विभागाला पसंत पडला आणि त्यांनी महाराजांसाठी हा महाल निश्चित केला.
महालात प्रवेश करण्याच्या दिवशी महाराज कानाजवळ पोहोचले आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी हत्तीच्या कानात म्हटले, हे महाकाय प्राण्या, तुझ्यावर आम्ही प्रसन्न झालो आहोत आणि तुझ्या कानात निवास करून तुला उपकृत करण्याचा आमचा मानस आहे. तुझ्यासाठी हे अहोभाग्यच आहे, पण तरीही तुझी काही हरकत तर नाही ना?
हत्तीला ही गुणगुण ऐकू येण्याची काही शक्यताच नव्हती. प्रथेप्रमाणे तीन वेळा परवानगी विचारून, त्याचं मौन हा रुकार मानून महाराजांनी हत्तीच्या कानात मुक्काम ठोकला.
तिथेच त्याचा संसार वाढला, मुलं झाली, पाहुणेरावळे यायचे, सरबराई व्हायची. तेवढ्यात बांधकाम विभागाने आणखी मोठ्या हत्तीच्या आणखी मोठ्या कानाची निवड नव्या महालासाठी केली आणि महाराजांनी हा महाल सोडला.
निघताना ते पुन्हा हत्तीच्या कानात म्हणाले, हे महाकाय प्राण्या, तुझ्यावर आमची इतके दिवस कृपा होती. साक्षात विश्वसम्राटाचा तुझ्या कानात मुक्काम होता. आता मी ही जागा सोडून चाललो आहे. तुला खूप वाईट वाटेल. पण माझा नाईलाज आहे. आपल्या महाराजांना निरोप दे.
यावेळी हत्तीला गुणगुण ऐकू आली आणि त्याने डासाचं सगळं बोलणं कान देऊन ऐकलं आणि म्हणाला, मी पाहायचं ठरवलं तरीही मला दिसू शकणार नाहीस, अशा आकाराच्या हे कीटका. तू आलास कधी याचा मला पत्ता नाही, तू निघालास कधी हेही मला ठाऊक नाही. यायचं तर ये, जायचं तर जा. मला कशानेही फरक पडत नाही.
एवढं बोलून हत्तीने निरोपासाठी कान फडफडवला आणि अचानक झालेल्या या हालचालीच्या फटकार्याने महाराज आणि त्यांचे सगळे दरबारी, निम्मं सैन्य धराशायी झालं… हे अर्थातच हत्तीला कळण्याचा प्रश्नच नव्हता.