□ नऊ महिन्यांत सहा मुख्यमंत्र्यांची गच्छंती, त्यातले चार भारतीय जनता पक्षाचे
■ फरक आहे, इतर पक्षांमध्ये हायकमांडची घराणेशाही असते, इथे गुजरातशाही आहे… केवढा मोठा फरक आहे हा!
□ महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल : नारायण राणे
■ आले किती गेले किती, संपले भरारा, आघाडीच्या एकीचा अजूनी दरारा…
□ देशात नऊ तासांत दोन कोटी लोकांचं लसीकरण
■ या असल्या खुळचट विक्रमांसाठी लसीकरणासारखी जीवनावश्यक आणि राष्ट्रीय महत्त्वाची गोष्ट वेठीला धरणार्यांवर खरं तर खटले भरले पाहिजेत.
□ अडाणींच्या मालकीच्या मुंद्रा बंदरात ९ हजार कोटींचं हेरॉइन जप्त, जगातील सर्वात मोठ्या ड्रगतस्करीचा पर्दाफाश
■ मुंबईत एखाद्याकडे दोन ग्रॅम गांजा सापडला म्हणून २४ तास कोकलणार्या न्यूज चॅनेलांवरच्या, सुशांत सिंग राजपूतच्या छातीपिटू विधवा कुठे गायब झाल्या? गांजा मारून झोपल्या का त्याही?
□ राज्यपाल कोश्यारी यांची विशेष अधिवेशनाची मागणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फेटाळली
■ राज्यात लोकनियुक्त मुख्यमंत्री बॉस असतो, केंद्राने अपशकुन करायला नेमलेले चावीचे बाहुले बॉस नसतात, हे या निमित्ताने स्पष्ट झालं असेल तर बरं.
□ हिंदुत्वाला धोका असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत : केंद्रीय गृहमंत्र्याचा खुलासा
■ आता योगींचे अब्बाजान निवडणुका कशाच्या अपप्रचारावर लढणार मग?
□ लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवून नंतर पत्रिका न जुळणं हे लग्न मोडण्याचं कारण ठरू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
■ ढोंगी याचिकाकर्त्याच्या पत्रिकेत साडेसातीचा कठोर योग पत्रिका न पाहताच दिसतो आहे…
□ उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या आमदारांना भेटतात, त्यांचं ऐकतात, त्यांची कामंही करतात : बेलापूरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे
■ आपण सर्व राज्याचे मुख्यमंत्री आहोत, विरोधी पक्षाचेही मुख्यमंत्री आहोत, विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नसतो, असे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत; फरक तर असणारच ना!
□ महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी शिष्य आनंद गिरी यांना अटक
■ काय सांगता, साक्षात रामभूमीमध्ये साधू संत असुरक्षित, त्यांना त्यांच्याच शिष्यांकडून धोका? अरे देवा, अधिवेशन बोलवा तिकडे ताबडतोब! कसं बोलवायचं ते मलबार हिलवर विचारा.
□ ऑनलाइन गेमवर निर्बंध, चीनमधले पालक खूष
■ हिंस्त्र हुकूमशाहीच्या निर्बंधयुक्त वातावरणात जगणार्या पालकांना झालेल्या या क्षुद्र आनंदावर हसावं की रडावं, हे मुलांना कळत नसेल.
□ चायनीज पदार्थांच्या अतिसेवनाने पोटाचे विकार; अजिनोमोटोपासून सावधान
■ अजिनोमोटो चायनीज आहे काय? इतके दिवस आम्ही आजीने खाण्याचे लाड करून फुगवून ठेवलेल्या गुजराती मुलाला अजिनो मोटो म्हणतात, असं समजत होतो…
□ चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा : रूपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली
■ आयडिया बेस्ट आहे. देशभरातल्या यांच्या अशाच वाचाळ आणि विनोदी पुढार्यांवर आणि यांच्या भजनी लागलेल्या न्यूज चॅनेलांच्या अँकरांवर असा कर लावला, तर इतका कर गोळा होईल की पेट्रोल-डिझेल-गॅसचे भाव खाली येतील पटापट.
□ अधिक तास काम करण्यात कष्टाळू भारतीयच शेर : जागतिक पाहणीचा निष्कर्ष
■ त्या कष्टांचा न्याय्य मोबदला मिळण्याच्या बाबतीत आपण शेवटून कितव्या क्रमांकावर आहोत, त्याची नाही झाली का पाहणी?
□ सर्व निवडणुका मोदींच्या नावावर जिंकता येणार नाहीत : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा
■ मुळात मोदींच्या नावाने निवडणुका जिंकल्या जातात, हाही आयटी सेलने पसरवलेला भ्रमच आहे… येडियुरप्पांना खुर्ची गेल्यावर ते कळलं इतकंच.
□ कर भला तो हो भला, अंत भले का भला – सोनू सूद
■ भावा, आपल्या देशात जो हल्ली भाजपमध्ये जातो, त्याचाच अंत भला होतो… बाकीच्यांच्या मागे पाळीव एजन्सी सोडून सार्वजनिक जीवनात अंत घडवण्याचे प्रयत्न होतात… सांभाळून राहा.
□ तोकडे कपडे घातल्याने कोणी महान बनू शकत असतं, तर राखी सावंत महात्मा गांधींपेक्षा महान ठरली असती : उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षाचे उद्गार
■ तोकड्या बुद्धीचं आकलन तोकडंच असणार…