• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोनाली नवांगुळबरोबर माध्यान्हीचा पाऊण तास

- डॉ. सई लळीत

सई लळीत by सई लळीत
September 30, 2021
in पुस्तकाचं पान
0

सोनाली नवांगुळच्या ‘मध्यरात्रीनंतरचे काही तास’ या अनुवादित पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं आहे. सोनाली माझी जुनी मैत्रीण आहे. त्यामुळे मुलाखत देशील का, असं न विचारता हक्काने ‘मार्मिक’साठी तिची मुलाखत घेतली.
—-

मी – तर सोनाली, तू सलमा या तमिळ लेखिकेच्या ‘द अवर्स पास्ट मिडनाइट’ या इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुस्तकाचा ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ असा मराठीत अनुवाद पुस्तक केलास. त्याला साहित्य अकादमीचं घसघशीत पारितोषिक मिळालं आहे. सगळीकडे प्रेम आदर आणि कौतुकाची जी लाट आली आहे, ती बघून कसं वाटतय तुला?
सोनाली – समुद्रावर गेल्यावर पाण्याची एखादी जोरकस लाट येते. त्यात आपण भिजून चिंब होतो, सुखावतो… आणि थोडेसे गोंधळूनही जातो, तशी काहीशी माझी अवस्था झालेली आहे. मला आनंद तर वाटलाच, पण जबाबदारी वाढल्यासारखी वाटली. आपण पूर्वी म्हणजे आत्तापर्यंत जो मॅडपणा करायचो, बालिशपणा करायचो, तो आता करता येणार नाही, आता गंभीरपणे वागायला हवं अशी जाणीव झाली.
मी – हे पुस्तक कसं आलं तुझ्याकडे आणि अनुवादाचा कसा काय अनुभव?
सोनाली – दिवंगत लेखिका कविता महाजन यांनी हे पुस्तक माझ्याकडे अनुवादासाठी सोपवलं. आपण तर जीव लावतोच पुस्तकासाठी, पण संपादक परखड विश्लेषक असला तर पुस्तक अधिक चांगलं व्हायला मदत होते आणि मग पुस्तक एकट्या लेखकाचं राहात नाही. माझं हे केवळ दुसरंच अनुवादित पुस्तक. मूळ लेखिका मुस्लीम असल्यामुळे मराठीत अनुवाद करताना मध्येमध्ये बरीच हिंदी वापरली होती. तेव्हा कविता ताई मला म्हणाली की, अनुवाद करताना बरेच बारकावे बघावे लागतात. तामिळनाडूमधील मुस्लीम हे हिंदी बोलत नाहीत तर तमिळीच भाषा बोलतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.
मी – या पुस्तकाला असं घवघवीत यश मिळेल असं वाटलं होतं का?
सोनाली – या पुस्तकाच्या अनेक भाषांमधे आवृत्या निघाल्या आहेत. इंग्रजी आवृत्ती खूप गाजली आहे. त्यामुळे या पुस्तकाचा कंटेंट जागतिक पातळीवर नावाजला गेला आहे, हे माहित होतं. या पुस्तकातली सूक्ष्म हिंसा लोकं कितपत स्विकारतील असं वाटत होतं. पण कंटेटबद्दल खात्री होती. २०१५ साली हे पुस्तक आलं. मी अनुवाद केल्यावर खूप काळ या पुस्तकातून बाहेर आले नव्हते. खूप काळ त्यात गुंतून पडले होते.
मी – सलमा ही लेखिका म्हणून कशी वाटली तुला? ती धाडसी लेखिका आहे का? कारण लेखिका म्हणून व्यक्त होताना आपल्यावर बरीच बंधनं येतात.
सोनाली – या पुस्तकात हिंसेबद्दल, विशेषत सूक्ष्म हिंसेबद्दल खूप लिहिलं आहे, जी बर्‍याचवेळा उंबरठ्याच्या आत होते आणि कुठल्याही वयोगटाच्या स्त्रीला, गरीब, श्रीमंत, कुणालाही कोणत्याही जातीच्या स्त्रीला ती सहन करावी लागते. ही हिंसा ओरखडे आणत नाही. पण आपल्याला ती जायबंदी करते. अगदी मलाही या सूक्ष्म हिंसेला कित्येक वेळा तोंड द्यावं लागलं आहे. शिवाय लैंगिकतेबद्दल पण तिने खुलेपणाने लिहिलं आहे. आपण जनरली मराठीत असं लिहायला धजावत नाही. मग त्यासाठी सेक्ससारखे इंग्रजी शब्द वापरतो. परकी भाषा या दृष्टीने आपणाला बरी पडते. पण सलमाने या सगळ्याची अभिव्यक्ती एवढी सक्षमपणे केलीय की हे पुस्तक झाल्यावर मी अ‍ॅमस्टरडॅममधे रेड लाइट एरिया बघायला जावू शकले. नाहीतर आपल्या शुभंकरोती घरातून- जिथे पाळीबद्दलही स्पष्टपणे बोललं जात नाही- आलेल्यांना हे कसं काय शक्य होवू शकतं? या पुस्तकाने लैंगिकतेबद्दलचे शब्द सहज उच्चारायला मला बळ मिळालंय.
मी – हे सलमा यांचं पहिलंच पुस्तक आहे का?
सोनाली – नाही. पहिला त्यांचा कवितासंग्रह आहे. मासिक पाळी आल्यावर त्यांचं शिक्षण बंद करण्यात आलं. लग्न लावून देण्याचा विचार सुरू झाला. लग्न झाल्यावर त्यांनी कविता लिहिल्या. कुणाला त्या दिसू नयेत म्हणून बेडखाली, कपाटात, अडगळीत लपवून ठेवत. पण तिथूनही त्या नाहीशा होवू लागल्या. मग त्यांनी त्या गुपचूप आईकडे आणि भावाकडे पाठवून दिल्या. त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या. त्या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाला, तेव्हा कवीची शोधाशोध सुरू झाली. सलमा हे त्यांचं खरं नाव नाही. हे त्यांनी धारण केलेलं नाव आहे. त्यांचं खरं नाव आहे रूक्साना. त्या सगळ्या बंडखोर कविता होत्या. त्या लैंगिकतेवर भाष्य करणार्‍याही होत्या. मग त्यांनी पुढे निर्भयपणे लेखन सुरू ठेवलं.
मी – कविता छापायला पाठिंबा देणारी आईही ग्रेटच म्हणायला हवी. नवर्‍याचा या सगळ्याला कितपत पाठिंबा होता? (आम्हाला आधी ती उत्सुकता!)
सोनाली – कधी होता… कधी नव्हताही… कारण त्याच्यावरही समाजाचा दबाव होता.
मी – आणि मुलं?
सोनाली – मुलं पण वैतागून म्हणायची की आई बस कर आता… तू आता बुरखा घालायला सुरुवात कर.
मी – या पुस्तकात चमकदार वाक्य आहेत का कोणती? एखाद्या वाक्याला एक अ‍ॅवॉर्ड द्यावं किंवा प्रतिभेची खूप उंची याठिकाणी हिने गाठली आहे, असं कधी वाटलं का?
सोनाली – नाही. पाचशे साठ पानांच्या या पुस्तकात दहा पण चमकदार वाक्यं नसतील. या पुस्तकाची भाषा ही तुझ्यामाझ्यासारखी आहे. बायका बोलतात तसं ती सविस्तर बोलत गेली आहे.
मी – थोडसं पाल्हाळीक..
सोनाली – हो, पाल्हाळीक आहे. पण तरीही तिने हिंसेविषयी असा आवाज उठवलाय, स्त्रियांच्या लेखनाला हसणार्‍यांना, नाकं मुरडणार्‍यांना, बायकी लेखन म्हणून हिणवणार्‍यांना असं चोख उत्तर दिलंय की बसच. स्त्रियांचं लेखन हे ज्ञान नसणार्‍यांचं लिखाण समजलं जातं. पण तिने उंबरठ्याच्या आतला जगण्यातला अंतर्विरोध टोकदारपणे मांडला आहे.
मी – अनुवाद करताना तुला असं वाटलं का की आता बस झालं सगळं. जरा आठ पंधरा दिवस जावूंदेत मधे… थांबू या थोडा वेळ..
सोनाली – वाटलं कधी कधी थोडा वेळ. अगदी थोडा वेळ. पण आता हिचं पुढे काय झालं असेल या विचाराने पुन्हा ओढही वाटायची. अगदी सलगपणे बैठक मारून लिहिलेलं हे माझं पहिलं पुस्तक आहे.
मी – यात सगळा संघर्षच आहे की विनोद वगैरे फुललाय कुठेतरी?..
सोनाली – यात विनोद आहे. मुक्तपणे बोलणं आहे. मिस्कीलपणाही आहे, पण त्याचाही काहीवेळा त्रास होतो. अशा तर्‍हेने तो आलेला आहे.
मी – प्रत्यक्ष लेखिकेशी तुझं कधी बोलणं झालं का?
सोनाली – बोलणं? मी प्रत्यक्ष भेटले आणि बोलले आहे. डॉ. श्रुती तांबे यांनी पुण्यात लेखक-लेखिकांचा मेळावा ठेवला होता. स्त्रियांविषयीच्या चळवळीत काम करणारी बरीच लोकं तिथे आली होती. त्यावेळी सलमा यांची भेट झाली. आम्ही पहिल्यांदा एकामेकींना मिठी मारली आणि मग बोललो. ती खूप शांत प्रगल्भ आणि हसरीही आहे. ती आता मोठ्या शहरात राहते. वेगवेगळया समित्यांवर तिची नेमणूक झाली असल्यामुळे तसंच बर्‍याच ठिकाणांहून तिला बोलण्यासाठी आमंत्रण येत असल्यामुळे एक छानसं व्यक्तिमत्व आकाराला आलेलं आहे. ती आपल्या गावाची एकदा सरपंचही झाली आहे. आता ती कमी वयात मुलींची लग्नं होवू नयेत यासाठी तसंच मुलींच्या शिक्षणासाठी धडपडत आहे.
मी – या पुस्तकात मुस्लीम पद्धतीच्या खाण्यापिण्याची वर्णनं आली आहेत का?
सोनाली – हो.. अगदी भरपूर आली आहेत. पहाटे उठून उन्हं व्हायच्या आत ईदसाठी केलेला साग्रसंगीत स्वयंपाक याविषयी सविस्तर आलेलं आहे. त्यानेच पुस्तकाची सुरवात होते.
मी – आता नेहमीचा प्रश्न.. तुला पुस्तकाचा अनुवाद करताना बस झालं आता, आपण आपल्या प्रतिभेने पुस्तक लिहूया असं वाटतं का कधी?
सोनाली – असं काही नाही.. मला अनुवाद करायला खूप आवडतो. अनुवाद करताना लेखक आपल्या शेजारी बसून आपणाला सगळं सांगत आहे, असा फील येतो. माझ्या शारीरिक अडचणीमुळे मला हवं तसं सगळीकडे फिरता येत नाही. एकट्याने स्वतंत्रपणे काही गोष्टींचा आनंद घेता येत नाही. थोडंसं अवलंबून राहावं लागतं. दुसरं माणूस जे दाखवील ते बघावं लागतं. मला सहजपणे अनेक ग्रुपमधे सहभागी होता येत नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारची बोलणी गोष्टी माझ्या कानावर पडत नाहीत. अशावेळी अनुवादित पुस्तकामुळे मी एक आयुष्य जगून घेते.
मी – या पुस्तकाने सलमा यांना खूप काही दिलंय. तुलाही खूप काही मिळालंय. केवळ कीर्ती, प्रसिद्धी, पैसा हे नाही, तर मुक्त अभिव्यक्तीसाठीचं बळही. हे बळ हे पुस्तक सगळ्यानाच देत राहील. त्यांच्या कवितेच्या चार ओळी आठवतायत का?
सोनाली – त्यांची एक कविताच मी या पुस्तकात दिलीय. ती वाचते.
वेळा उत्तर घटिकांच्या
मुलं झाल्यानंतरच्या भेटीत
तू शोधत राहतोस
माझं पूर्वीचं न डागाळलेलं सौदर्य
आणि म्हणतोस की, तिरस्करणीय आहेस तू..
ओटीपोटावर उमटलेल्या या खुणा
आता मी मिटवू शकत नाही.
एखादा कागद सहजतेने कापून परत चिकटवावा तसा..
तू मात्र मिरवत राहतोस तुझा देह कसाही, कुठेही,
कदाचित याआधीही जन्म दिला असशील तू.. कित्येक मुलांना
आणि त्याच्या कोणत्याही खुणा नाहीत तुझ्यापाशी
निसर्ग बेईमान झालाय माझ्याशी तुझ्यापेक्षाही
आणि तुझ्यापासूनच सुरू झालाय माझा उतरणीचा प्रवास
भयंकर विचित्र स्वप्नं पडू लागतात..
पूर्वरात्रीपेक्षाही उत्तररात्रीत
मध्यरात्रीनंतर आतापर्यंत भिंतीवरच्या चित्रात शांतपणे बसून असलेला
हिंस्त्र वाघ माझ्या दिशेने झेपावू लागतो
आणि टक लावून डोळे वटारून पाहू लागतो माझ्याकडे

– डॉ. सई लळीत

(लेखिका खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)

Previous Post

इमानतळ चालू होतलो…

Next Post

टपल्या आणि टिचक्या 2-10

Next Post

टपल्या आणि टिचक्या 2-10

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.