सिंधुदुर्गातला चिपी विमानतळ या महिन्यात सुरू होणार अशी बातमी आली आणि पहिल्या काही दिवसांच्या फ्लाइटही फुल झाल्याचं कळलं तशी कोकणातून लाट उसळली… या विमानतळावरच्या खुसखुशीत मजकुरांची… खास कोकणी तिरकसपणा आणि बेरकीपणा यांचं मिश्रण असलेले हे दोन मजकूर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत…
—-
विमान कंपनीला सूचना…
सिंधुदुर्गातलो आमचो चिपी विमानतळ येत्या म्हैन्यात चालू होतलो अशी वार्ता आसा… सल्लो मागलो नाय तरी आपण देवकच होयो ह्या तत्वानुसार विमान कंपन्या आणि सरकारला काही सूचना करीत आहे…
१) चिपी विमानतळ हे नाव बदलून ‘श्री देव रवळनाथ’ ठेवावे आणि दरवाजावर ठळक अक्षरात ‘सातेरी माऊली’ प्रसन्न लिहिल्याशिवाय विमान लॅण्ड करू देऊ नये…
२) प्रत्येकाची चेकइन लगेज मर्यादा १५ किलोवरून कमीत कमी ५० किलो करावी. (मोठो सुरण.. कापो फणस.. लोणच्याच्यॉ बरण्यो.. पापलेटा.. असोले नारळ.. डझनभर हापूस आणि सोनयाळ केळ्याचो घड हेचा वजन कमीतकमी २० किलो जाता..)
३) कॅरीइन बॅग्स ठेवायचे विमानातील पोटमाळे किमान ‘हीर न मोडता अक्खी केरसुणी आडवी’ मावू शकेल इतके असावेत.. फणस सहज आडवा राहू शकतो. आतले अस्तर ‘डिक प्रुफ’ असावे.. (समस्त इंग्रजाळलेल्या मंडळींनो.. मालवणीत फणसाच्या देठाच्या चिकाला डिक असे म्हणतात याची नोंद घेऊन बाहेर काढलेले दात आत घ्यावेत!)
४) एअरहोस्टेसनी केस जास्त रंगवू नये.. नाहीतर बांधून आणलेल्या कोंबड्या ‘ह्यो नवो कोंबो खयसुन इलो’ म्हणून कलकल सुरू करतील…
५) कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा शेकड्यानी गुरं प्राणास मुकली.. तेव्हा धावपट्टीचे कुंपण ‘म्हशी प्रुफ’ असावे. नाहीतर विमानाचा धक्का लागून म्हैस आडवी पडली तर परत तशीच नवीन फर्मास ‘म्हैस’ लिहायला कुणीही ताकदीचे पुलं सध्या आपल्यात नाहीत!!
६) गणपती आणि शिवरात्रीला स्पेशल विमाने सोडण्यात यावीत.. आणि त्यात उभ्याने प्रवास करायची परवानगी असावी. सीट अव्हेलेबल असेल तरी धक्के बुक्के खात आणि कसो मी गर्दीत्सून रटमटत इलंय ह्याचे गजाली सांगल्याखेरीज कोकण्यांचे गणपती पावन होत नाहीत!
७) समादेवी, देवचार, बाहेरचा, भुतुतला, पावणाई, भावई, नितकरी, गावडोबा, ब्राह्मणदेव समंध आणि वेतोबा यांचा जा काय आसात ता प्रत्येक विमान कंपनीनं समजुतीनं वार्षिक सालाबादप्रमाणे देवक होया. नंतर ‘सिंधुदुर्गाच्या हद्दीत विमान शिरल्यावर वैमानिकास ताप चढून वारे भरले आणि असंबद्ध बडबडू लागला’ अशा बातम्या यायला नकोत!!
८) फ्लाईट अटेंडन्सनी ‘मायझयां.. फटकीचो वाको येवंदे तुझ्या’ वगैरे वाक्य ऐकून लगेच व्हॉयलन्स रिलेटेड कोड अॅमक्टिवेट करू नये.. ही आमची जनरल बोलायची पद्धत आहे.. आम्ही भांडतच बोलतो!
आणि..
९) गदगदत्या पोफळीच्या साकवावरून हात न धरता चालणारे आणि हुमले भरलेल्या काजीवर घट्ट पाय रोवून बोंडा पाडणारे आम्ही, त्यामुळे आम्हाला ‘कुर्सी की पेटी’ वगैरे बांधण्याचा शाणपणा शिकवू नये. (पंचाला बेल्ट बांधणं जरा बिकटच तसंही..)
शेवटची सूचना : कितीही सुधारणा केल्यात तरी शिव्या ह्या पडणारच. त्यामुळे कुठल्याही एअरलाइन्सने वाईट वाटून घेऊ नये. चार मॅनेजमेंट रिलेटेड धडे घेऊनच तुमचे मॅनेजर्स इथून परत जातील याची शाश्वती..!!!हॅपी फ्लाइंग…!
ही १०१ची फोडणी आमकाच कशाक?
मुंबैतसून शिंधुदुर्ग – २५२०
शिंधुदुर्गातसून मुंबै – २६२१
फरक – १०१
माल्वणी माणसाक पडलेले प्रश्न
येताना जाताना अंतर तितक्याच, मगे तिकिटीत १०१चो फरक कसो?
जाताना १०१ जास्त घेतालात म्हणजे आमच्या घराकडे थांबतलात काय?
मुंबैतसून येताना किसो गरम तेवा तुमचो दर कमी, जाताना किसो थंड तेवा दर जास्त कशाक?
येताना दर कमी, भायरचे यतले, त्यांचा फावतला…
आम्ही जातलव, तुमचो दर जास्त, आमी मरतलव…
जाताना सोला, आगुळ, नाल, तवशी, चिबुड नेतलव, त्याचा लगेज आधीच लावलात काय?
१०१ जादा घेतालात ती कशाची वर्गणी आसा काय?
बरा ही वर्गणी आसली तर कशाची आणि पावती देतालात काय?
बरा समजा यवचा तिकिट ताबडतोब काढलव तर १०१ कमी होतले?
जाताना १०१ जास्त घेतालात त्याच्याबद्दल वाटेत काय पेज पाणी?
बरा दरवाजात उभे रवान गेलव तर काय कमी करतालात?
याक सांगा ही १०१ ची फोडणी आमकाच कशाक?
बरा बारक्या पोरांका घेतलव तर काय कमी होतले?
मेले लुटूक उठले बाकी काय?