पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षांच्या सक्तीच्या स्वदेशमुक्कामानंतर अखेर देशाबाहेर पडले आणि अमेरिकेच्या दौर्यावर जाऊन आले.
त्यांच्या अमेरिकावारीची चर्चा सुरू झाली ती त्यांच्या विमानातल्या फोटोपासून. त्यात ते काही हजार कोटींच्या शाही विमानाच्या एका कोपर्यात, फर्स्ट क्लास
पॅसेंजरइतक्याच जागेत बसून काही फायली हातावेगळ्या करताना दिसत होते… ते किती साधे आहेत आणि कसे सतत कार्यरत असतात, हे दाखवण्याची योजना असावी. पण, त्या फोटोची चर्चा झाली ती हातातल्या कागदांवर (बहुधा फोटो तेज:पुंज यावा म्हणून) खालच्या बाजूने टाकलेल्या प्रकाशाची… अशा प्रकारे कागदपत्रं कोण तपासतं? ते एक्सरे पाहतायत का, अशी टिप्पणी सोशल मीडियात झाली… याआधी पंतप्रधान निवासाच्या बागेत त्यांनी हिरवळीवर उघड्या पानांच्या बाजूने पालथ्या ठेवलेल्या पुस्तकाबद्दलही ‘कोणता पुस्तकप्रेमी असं पुस्तक ठेवेल’ अशी चर्चा झालीच होती.
मोदी यांच्या याआधीच्या अमेरिका दौर्याला ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाची झळाळी होती. सर्व राजनैतिक संकेत धाब्यावर बसवून आणि डेमोक्रॅटिक पक्षाशी अनावश्यक पंगा घेऊन मोदी तिथे ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा द्यायला गेले होते. त्यावेळी ज्यांना हरवण्यासाठी मोदी यांनी आवाहन केलं होतं, ते जो बायडेन आता अध्यक्ष आहेत. ज्या कमला हॅरिस यांनी (एका पालकाकडून भारतीय वंशाचा वारसा असूनही) मोदी यांना आणि त्यांच्या विचारधारेला खडे बोल सुनावले होते, त्या आता उपाध्यक्ष आहेत… साहजिकच ही अमेरिका भेट मोदींसाठी फार सौहार्दाची असणार नव्हती. तिचा निर्वाळा मोदी यांच्या स्वागताला कोणीही मान्यवर हजर राहणार नाही, याची व्यवस्था करून देण्यात आला.
मोदी यांच्याबरोबरच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याबद्दल ट्वीटही केलं नाही. मोदींबरोबरच्या जाहीर भेटीतही त्यांनी ‘देशांतर्गत लोकशाही टिकवणं ही उभय देशांवरची महत्त्वपूर्ण जबाबदारी’ असल्याचं भाष्य केलं. अध्यक्ष जो बायडेन यांनी मोदी यांच्यासोबतच्या भेटीमध्ये राजनैतिक शिष्टाचार पाळला. गांधी-नेहरूंच्या वारशाचा उल्लेख करून कानपिचक्याच दिल्या. त्यांनी मोदींचे हात दूर धरून त्यांची ती जगप्रसिद्ध ‘मिठी’ टाळली, याचीच चर्चा अधिक झाली.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने मोदी इतर अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांप्रमाणे अमेरिकेत गेले होते. ती काही खास, स्वतंत्र भेट नव्हती, तिच्यात काहीही द्विपक्षीय महत्त्वाच्या चर्चा होणार नव्हत्या. अशा भेटींमध्ये अनौपचारिकपणे काही मुद्द्यांवर चर्चा होते, पण त्यासाठी मोदींबद्दल आवश्यक स्नेहभाव अमेरिकेच्या नव्या राजवटीत नाही, हेच स्पष्ट झाले. तरीही, मोदी हे विश्वगुरूच आहेत, या गंडाने पछाडलेल्या चाहत्यांनी आणि ‘गोदी मीडिया’ने मोदींनी जणू अमेरिकाच पादाक्रांत केल्याचा असा आव आणला. दुर्दैवाने तो पदोपदी उघडा पडत गेला. मोदीभक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका वृत्तनिवेदिकेने अमेरिकेतले एनआरआय कामधंदे सोडून मोदींच्या स्वागताला कसे जमले आहेत, असे दाखवण्यासाठी एका ढोलवादकाची मुलाखत लाइव्ह घेतली. त्याने ‘मी भाडोत्री वादक आहे,’ असं सांगून सगळी हवा काढून घेतली. मोदींच्या अमेरिकावारीच्या बातम्यांनी अमेरिकेतली वृत्तपत्रं ओसंडून वाहात असतील, अशा कल्पनेने तिने सर्वांसमक्ष ती चाळली आणि त्यात दोन ओळींची बातमीही नाही, असं लाइव्ह लक्षात आल्यानंतर ती खजील झाली. हे सगळं एरवी भारतीय जनतेला कळलंही नसतं. या बाईच्या अतिउत्साहामुळे ही नाचक्की सर्वांसमोर आली. मोदींवर
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने कव्हर छापलं आहे, असाही हास्यास्पद देखावा नंतर काहींनी उभा केला. कोणत्याही राष्ट्रप्रमुखाचा ताफा जसा प्रवास करतो, तशा प्रवासाची क्लिप व्हायरल करून ‘आजतागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची झाली नाही, अशी पाठवणी’ म्हणून तिचाही केविलवाणा गाजावाजा केला गेला. कोणत्याही खास कामाविना अमेरिकेला गेलेले पंतप्रधान कोणतंही खास उद्दिष्ट साध्य न करता मायदेशी परतले तर त्यांचं अमेरिका जिंकून आल्यासारखं स्वागत केलं गेलं.
दरम्यान, मोदी अमेरिकेत असताना इकडे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारने इटलीला जाण्यापासून अडवल्याचे समोर आले आहे. रोम इथे होणार्या एका शांतता परिषदेला संबोधित करण्यासाठी ममता यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं. ती परिषद एका मुख्यमंत्र्याने हजर राहावं या योग्यतेची नाही, असं हास्यास्पद कारण परराष्ट्र मंत्रालयाने पुढे केलेलं आहे. याआधीही ममता यांना चीन आणि शिकागो येथे जाण्यापासून असाच मज्जाव करण्यात आला होता. त्या परदेशात गेल्या तर केंद्र सरकारचं नेमकं काय बिघडेल? भारत देशात कोणी एकच नेता नाही, हे बाहेरच्यांना कळेल? ममता दीदी परदेशातल्या नागरिकांची, सत्ताधार्यांची मनं जिंकून घेतील? त्यांची परदेशांतली लोकप्रियता वाढीस लागून मोदींच्या तथाकथित विश्वगुरूपदाला धक्का पोहोचेल?
कधीकाळी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचावर चालवलेली भारताची बदनामी मोडून काढण्यासाठी जिनिव्हाला पाठवायच्या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे सोपवलं होतं. आज विराेधी पक्षनेते तर सोडाच, मोदी अशी जबाबदारी अमित शाह यांच्यावर तरी सोपवतील का, याबद्दल शंका आहे. गेल्या ७० वर्षांत जे घडले नाही ते आम्ही घडवतो आहोत, असे पंतप्रधान सतत गरजत असतात… ममतांना अडवण्यासारखा क्षुद्रपणा याआधी झाला नव्हता, हे खरंच आहे.