त्या दिवशी सहज भाजपमधल्या वाचाळवीरांची यादी काढत होतो. मला आणि माझा मानलेला परममित्र पोक्या याला थोडेफार राजकारण समजू लागल्यापासून आम्ही दोघेजण टाईमपास म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांतील गुण आणि अवगुण यांची यादी तयार करतो. त्या त्या नेत्यांनी काही आणखी गुण-अवगुण दाखवले तर त्या यादीत भर पडत जाते. तेव्हा कॉम्प्युटर नव्हते. त्यावेळी आम्ही मस्टरसारख्या लांबुडक्या वहीत अशा नेत्यांची यादी लिहायचो. सर्वगुणसंपन्न आणि सर्व अवगुणसंपन्न अशी प्रत्येक पानावर दोन विभागांत वर त्या नेत्याचे शीर्षक लिहून मग ही गुणवारी आम्ही लिहायचो. आमचा तो फावल्या वेळात आवडता छंदच होता म्हणा.
भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर मात्र आम्हाला रोज केंद्र आणि राज्य अशा वेगवेगळ्या वह्या कराव्या लागल्या. पुन्हा नेत्यांच्या वर्गवारीत त्या त्या वाचाळवीर नेत्यांचे नाव आणि त्याने केलेली अक्कल पाजळणारी विधाने याची तारीखवार नोंद असते. पुन्हा त्यात खासदार, आमदार, मंत्री, नेते यांच्या विधानांची वर्गवारी करावी लागते. काही विधाने शाकाहारी, तर काही मांसाहारी अकतात. काही असंबंद्ध असतात. कधी कधी एखाद्या विषयावर या चित्रविचित्र विधानांचे एवढे पेव फुटते की ती वाचून प्रचंड करमणूक होते.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार यातील भाजपाचे काही खासदार, आमदार, मंत्री आणि सटरफटर नेतेही यात आघाडीवर असतात. काही नेते राज्यातून केंद्रात जातात तर काही केंद्रातून राज्यात जातात तेव्हा त्यांची बदलणारी भाषा आणि देहबोली पाहण्यासारखी असते. अगदी ताजी उदाहरणे डोळ्यांसमोर आहेतच. पुन्हा त्यात काही आली तर काही माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, नेते असतात. त्या सर्वांची टोपणनावे सर्वांनाच माहीत असतात. साधा मतदार तर त्यांना कधीच सरळ नावाने हाक मारत नाही. तो आपल्या ठेवणीतल्या उपमा, अलंकारांनी त्यांना मढवतो. काही नेते हे लाईटली घेतात तर काहींना मात्र त्याचा प्रचंड राग येतो.
कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील हे त्यापैकी एक. तसे निरुपद्रवी असले आणि पक्षातही फारसे कुणी विचारत नसले तरी प्रदेशाध्यक्ष केल्याने त्यांना सत्ताधारी पक्षाविरुद्ध काही ना काही वादग्रस्त वा धमकीवजा विधाने करून प्रकाशात राहावेच लागते. कोल्हापूरचे असल्यामुळे भाषा तिखट, आवेश आखाड्यातल्या मल्लासारखा असला तरी केवळ शाब्दिक डावपेचांनी कुस्ती लढल्याचा आव आणतात आणि कोल्हापूरचे रांगडेपण दाखवण्याऐवजी पुण्यातली संस्कृती जपल्याचा आव आणतात. आम्ही दोघे त्यांना पहिल्यापासून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातील पोकळपणाच्या नोंदी आमच्या वहीत आहेतच. त्याशिवाय याबाबतीत नाव घेण्याजोगे रावसाहेब दानवे, रामभाऊ कदम, आशिषकुमार शेलार, प्रवीणभाई दरेकर, आलाबाजार नारायणराव राणे, परागकुमार अळवणी, इडली फेम किरीटय्या अशी कितीतरी नावे आमच्या मास्टरलिस्टवर आहेत. यातील प्रत्येकाच्या बोलण्याच्या टोनचा, आवाजाच्या डेसिबलचा, त्यातील हवेच्या दाबाचा आम्ही शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्षही तयार आहेत. मात्र यातली एक-दोन व्यक्ती सोडून बाकी कोणी फारसे गरम डोक्याचे असलेले कधी भासले नाही. एकाचा आपण विचारच करू शकत नाही, मात्र दुसर्याचा करू शकतो, असे आमचे बौद्धिक झाल्यावर मत पडले. ती व्यक्ती म्हणजे कोल्हापूरचे पुण्याला आंदण दिलेले नेते चंद्रकांतदादा पाटील.
ते कोणाबद्दल काहीही बोलतात. मात्र त्यांच्यावर टीका केलेली त्यांना आवडत नाही. किंवा त्यांना टोपणनावाने संबोधलेलेही पसंत पडत नाही. ते तांबड्या रस्स्यासारखे लालधम्मक होतात. मिशा फेंदारतात आणि अस्सल कोल्हापुरीत मनातल्या मनात वंगाळ वंगाळ ओव्या हासडतात. त्यांना राजकीय वर्तुळात, चौकोनात आणि आयतात चंपा म्हणूनच संबोधले जाते. कोणी त्यांना चंदूदादा म्हणतो. काही वात्रट विरोधक चंपाबाई किंवा चंपाकली म्हणतात. पण ते अशा गोष्टी इतरांसारखे लाईटली घेत नाहीत. म्हणून तर त्यांना मुद्दाम डिवचण्यासाठी काहींचे त्यांना टोपणनावाने बोलण्याचे किंवा लिहिण्याचे उद्योग सुरू असतात. असे काही कानावर आले की ते त्याला धारदार प्रत्युत्तर देतात. पुन्हा कोणी असे बोलण्याचे धाडस केले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असाही इशारा देतात.
एकदा अलीकडे पोक्या आणि मी कोल्हापुरात गेलो असताना त्यांना उसाच्या मळ्यात भेटलो. त्यावेळी राणेंच्या त्या शोभायात्रेनंतरच्या वादावादीचा विषय निघाला. आमचा पोक्या म्हणजे अगदी सरळसोट माणूस. त्याने अगदी थेट त्यांना विचारले, सध्या तुमच्या पक्षात जी भरती चालू आहे त्याने पक्षाचे भले होईल असे तुम्हाला वाटते का? तुम्ही नारायणरावांना थेट केंद्रात घेतले आणि शिवसेनेच्या अंगावर सोडलेत. यात तुमच्या पक्षाची जी काही उज्वल म्हणतात ती संस्कृती लयाला गेली असे वाटत नाही काय? ते फडणवीस नाना त्यांच्याविषयी वेगळे काही बोलतात आणि तुम्ही वेगळे बोलता. याचा अर्थ तुमच्या पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. एक हत्ती आणि सात आंधळे ही गोष्ट माहीत आहे ना तुम्हाला? यात बिचार्या प्रवीणभाईंचे हाल झाले. त्यावर चंपा आमच्यावर डोळे वटारून खेकसले. म्हणाले, आधी राजकारणाचा अभ्यास करा. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी बाहेरून आलेल्या नेत्यांची बाजू घ्यावीच लागते. राणे तर केंद्रीय मंत्री आहेत.
म्हणजे तुमच्या पक्षाच्या वाचाळवीरांच्या यादीत आणखी भर पडली तर…
पोक्याने तिथून काढता पाय घेताना शेवटी एक टोला लगावलाच!