दादरच्या रेल्वे स्थानकावरील टिळक ब्रिज १०० वर्षांपूर्वी बांधलेला असून तोही आता जुना झाला आहे. कालगतीमध्ये तोही कधीतरी पाडावा लागणारच. टिळक ब्रिजशी प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सार्वजनिक गणेशोत्सवाचे काही नाते आहे.
तो महत्त्वाचा प्रसंग प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातच नोंदवून ठेवलेला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९९७मध्ये या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीचे पुर्नमुद्रण केले आहे. या पुस्तकाच्या पान क्र. ३०६ ते ३०९मध्ये ‘दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव’ या शीर्षकाखाली हा सारा प्रसंग देण्यात आला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णिलेला १९२६ सालचा हा प्रसंग पुढीलप्रमाणे आहे.
१९२६ सालच्या आधी मुंबईतील दादर भागामध्ये त्यापूर्वी कधीही ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा वाद नव्हता. मुंबईसारख्या `ये रे दिवसा भर’ वृत्तीच्या लोकांनी गजबजलेल्या विभागात कसलाही वाद खेळायला लोकांना उसंत असणारच कोठून? दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव सालोसाल थाटामाटात साजरा व्हायचा. सर्व थरांतील लोकांकडून गणेशोत्सवासाठी वर्गण्या गोळा व्हायच्या. कोणीही नाही म्हणायचे नाही. आपल्याला जमत नाही नि दादरकर ब्राह्मण मंडळी पुढाकाराने उत्सव साजरे करतात, अलबत सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे, अशा समजुतीने लोक वर्गण्या देत. पण हा `पुढाकार’ इतका बळावला की, उत्सवाचे कार्यकारी मंडळ एकजात ब्राह्मणांचे. इतरांचा तिथे शिरकाव नाही. कार्यक्रमासाठी येणारे कवी, वक्ते, शाहीर, कीर्तनकार सारे ब्रह्मवृंदच. गणेशोत्सवाचा उद्देश हा अखिल हिंदूंची एकजूट करणे असा असेल तर त्यात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता आला पाहिजे, हा विचार बळावू लागला.
सार्वजनिक उत्सवाला गणेशमूर्तींचे प्रत्यक्ष स्पर्श करुन पूजन करण्याचा कोणत्याही अस्पृश्याला हक्क असला पाहिजे, अशी मते ठामपणे मांडली जाऊ लागली. सामाजिक ऐक्यासाठी सक्रिय असलेल्या युवक मंडळाने तसे पत्र दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे पाठविले. त्यामुळे खळबळ माजली. दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष त्यावेळी डॉ. जावळे हे प्रतिष्ठित असामी होते. दुसर्या बाजूला समाजसुधारक युवक मंडळाने पाचशे अस्पृश्य बांधवांकडून प्रत्येकी चार आणे वर्गणी जमवून ती उत्सव समितीकडे भरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्यत्व मिळविलेले होते. त्या युवक मंडळाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
दादरच्या टिळक ब्रिजच्या दक्षिणेकडील पायथ्याजवळ सगळी जागा त्यावेळी रिकामी होती. तेथेच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप होता. आम्हाला उत्सव मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे पूजन करू द्यावे, अशी मागणी करत युवक संघाच्या अनेक सभासदांचा घोळका टिळक ब्रिजपाशी जमला. दुसर्या बाजूला उच्चवर्णीयांचाही घोळका जमला. या दोघांशीही बोलणी करण्यात रावबहादूर बोले यांनी पुढाकार घेतला. बोले यांनी आपल्या मदतीला प्रबोधनकार ठाकरे यांना बोलावून घेतले. अस्पृश्य बांधवांना गणेशपूजनाचा हक्क बजावता आलाच पाहिजे यासंबंधी अनुकूल निर्णय घेण्यासाठी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी समितीला प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली. या सार्या प्रकाराने हादरलेल्या दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी समितीने मग सुधारणावादी युवक मंडळाचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा केली. त्यातून असा तोडगा निघाला की या गणेशमूर्तीची रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजार्याने प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्रोक्त पूजाअर्चा करायची. ती झाल्यावर कोणत्याही अस्पृश्याने एक पुष्पगुच्छ स्वत: नेऊन त्या पुजार्याच्या हातात शिवून द्यावा व त्याने तो बिनतक्रार घेऊन गणपतीला वाहावा. याप्रमाणे ठरताच अस्पृश्य वर्गातील नामांकित कार्यकर्ते मडकेबुवा यांना प्लाझा गार्डनच्या नळाखाली आंघोळ घालण्यात आली आणि त्यांनी सर्वांसमक्ष लाल गुलाबाचा गुच्छ पुजार्याच्या हातात दिला. पुजार्याने तो टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला. त्यानंतर पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत मंडपातले कार्यक्रम सुरळीत पार पडले.
दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव पुढच्या वर्षीपासून बंद करण्यात येत आहे. अशी घोषणा त्या मंडळाचे अध्यक्ष डॉ. जावळे यांनी गणेशोत्सवाच्या अखेरच्या रात्री केली! दादरचा १९२६मध्ये बंद पडलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव पुढे तीस वर्षांनी समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक हे विशेषण लावून सुरू झाला.