एका टेस्टमध्ये भीमपराक्रम करणारी आपली क्रिकेट टीम दुसर्याच सामन्यात इतकी कशी ढेपाळत असेल? सातत्य का नसतं आपल्या खेळाडूंमध्ये?
श्रीरंग बेणारे, नंदूरबार
– कारण तो एक ‘खेळ’ आहे.
लखलखीत चांदण्यासारखा स्वर लाभलेल्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांचा या आठवड्यात वाढदिवस आहे… त्यांचं कोणतं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?
रुस्तम शेख, चिखलदरा
– त्यांनी ‘गाणं’ हीच एक गोष्ट इतकी आवडणारी आहे की, त्यांनी काय गायलंय याची यादी करायला जाण्याचा आणि त्याची क्रमवारी ठरवण्याचा प्रश्नच कधी आला नाही.
गायक मुकेश नाकातून गायचा असं त्याचे टीकाकार म्हणायचे; तो हृदयातून गातो, असं त्याचे चाहते म्हणतात. तुमचं मत काय?
माधुरी बेदाडे, खडकमाळ आळी
– तो त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच हृदयातून गायला.
दुसर्यावर फेकून मारलेला दगड अनेकदा कशावर तरी आपटून आपलाच कपाळमोक्ष करतो, हे सरळ दिसत असूनही लोक दगड फेकायला का जात असतील?
नरेश वारघडे, अमरावती
– आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत आणि आपलाच नेम बरोब्बर लागणार असं दगड फेकणार्या प्रत्येकालाच वाटत असतं म्हणून.
प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. पण प्रत्यक्षात युद्धकैद्यांना देहदंडाचीही शिक्षा होते आणि प्रेमात अपयशी होणार्यांबरोबरच यशस्वी होणार्यांनाही ‘देहांत प्रायश्चित्त’ भोगावंच लागतं… मग ही थापेबाजी कशासाठी?
रीना तोमर, मलकापूर
– अहो या दोन्ही विषयात कोणत्याही परिणामांना – क्षम्य असतं म्हणजे सहभागी लोकांना ‘क्षमा करणं’ हे अपेक्षित असतं. ते सगळीकडे केलंच जातं असं नाही. तेच तुम्ही लिहीत आहात. पण नेहमी तसंच घडतं असं काही नाही. क्षमेचा इतिहासही खूप मोठा आहे.
जिच्यात एकही व्यक्तिरेखा कारस्थानी नाही, एकही बाई घरात मंगळागौरीला सजल्यासारखी नटलेली नसते, सगळी माणसं एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने राहात असतात, अशी एखादी मराठी मालिका सुचवू शकाल का?
वैदेही कारखानीस, गोरेगाव
– १० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही मालिका बघायला घ्या. टिपरे, प्रपंच वगैरे… खूप मोठी यादी आहे.
नुकताच वडा पाव दिन साजरा झाला… त्यानिमित्त प्रश्न- तुमचा फेवरिट वडा पाव कुठला आहे?
मोहन शिधये, खेड
– माझ्या लहानपणी गावागावांत पाहिलेल्या वडाच्या झाडांशिवाय वड्याशी फार संबंध आला नाही. पण नंतर एखाद्याचा, किंवा एखाद्या विषयाचा ‘वडा करणे’ सोडून भुकेला त्या त्या ठिकाणचे सर्व वडे आवडतात.
पुढच्या आठवड्यात श्री गणरायाचं आगमन होणार आहे. श्रीगणेशचरणी तुमची प्रार्थना काय असेल?
विहंग अष्टपुत्रे, कर्नाळा
– ‘तुला वाजत गाजत आणण्याची परिस्थिती लवकरात लवकर निर्माण कर बाबा आता…’
‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है,’ हे नोटिस दिल्यासारखे शब्द गाण्यात कसे काय बसवले असतील गुलजार साहेबांनी?
सायली पंढरपुरे, साष्टी
– अहो ते गाण्यात बसवले आर. डी. बर्मन यांनी. कारण ते ‘पंचमदा’ होते.
आपल्या आयुष्यात मागे जाऊन एक गोष्ट बदलण्याची मुभा मिळाली तर तुम्ही कोणती गोष्ट बदलाल?
मोना टिळक, विलेपार्ले
– अशी संधी असतीच तर, छत्रपती शिवाजी महाराजांना नियतीने दिलेली अजून ३०-४० वर्ष पाहणं.
मित्राबरोबर त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेलो. ती मुलगी माझ्याशीच जास्त वेळ गप्पा मारत बसली होती. मित्र बिचारा अवघडला. आता मी काय करू?
समीर गोंधळे, भोर
– ही गाडी ट्रॅक बदलून आपल्याच प्लॅटफॉर्मला लागेल की काय या भ्रमात फार हुरळून जाऊ नका. ती मुलगी हुशार पण असू शकते. मुलाची संगत कशी आहे, हे चेक करणारच ती. तिला संसार निभवायचाय तुमच्या मित्राबरोबर. तुमची मैत्री प्रामाणिक असेल तर जबाबदारीने सोडवा हा पेपर.