स्व. बाळासाहेबांनी एका गणेशोत्सवात रेखाटलेली ही रविवारची गणेशोत्सव स्पेशल जत्रा… ती पाहताना लक्षात येईल की किती सहजगत्या त्यांनी गणरायांना ‘गणनायका’चं सामान्य माणसाच्या प्रतिनिधीचं स्वरूप दिलं आहे. इथे जवळचं भाडं नको म्हणून साक्षात श्री गणेशालाच टॅक्सीबाहेर काढणारा मुजोर टॅक्सीचालक आहे, कडाडलेल्या महागाईने संतापलेली सरस्वती माता आहे, साखरटंचाईच्या काळात नैवेद्यासाठीच्या साखरेकरताही गणरायांना साखर कारखानदारांपुढे हात पसरावे लागत आहेत, मुस्लिमांच्या प्रार्थनेत व्यत्यय येतो म्हणून आरती हळू करा असं सांगणारा पोलिस आहे… एखाद्या चित्रपटातल्या घटनांसारख्या सहजतेने आणि सजीवतेने उलगडणारं हे व्यंगचित्र अफाट आहे… आज इतक्या वर्षांनंतर त्यातले संदर्भ बदलले आहेत, एकाची जागा दुसर्या तापाने घेतली आहे, पण या व्यंगचित्राचा जो क्लायमॅक्स आहे त्यात गणरायाबरोबर आपणही विसर्जित व्हावे अशी इच्छा झालेला गांजलेला, नाडलेला सामान्य माणूस तिथेच आहे आणि तसाच आहे.