जालियनवाला बागेला भेट दिल्यावर आठवला पाहिजे जनरल डायर आणि त्यानं केलेल्या गोळीबारात जीव गमावलेली हजाराहून अधिक निरपराध माणसं आणि मुलं. ते भक्तांच्या मनोरंजनासाठी धारातीर्थी पडलेले नाहीत. ते काही मनोरंजनासाठी सहलीचं ठिकाण नव्हे, जे मोदी राजवटीनं केलं आहे. जालियनवाला बागेचं त्यांनी डिस्नेकरण केलं आहे. जी बखळ, जे निमुळता बोळ असलेलं प्रवेशद्वार, जी विहीर तेथील शोकांतिकेची प्रतीकं होती, त्यांचं रूपांतर मोदींच्या आत्मगौरवासाठी सुखांतिकेत करायच्या नादात प्रहसनात झालं आहे.
—-
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती।।
बा. भ. बोरकरांच्या या कवितेचं गुजरातीत भाषांतर झालं आहे, आणि ती तेथील शाळांत शिकवली जाते का हे आपल्याला माहीत नाही. अर्थात, नरेंद्र मोदी आणि अमित शहा शाळेत जाऊन काही शिकले असतील, असा आरोप त्यांच्यावर भक्तही करणार नाहीत. वरच्या काव्यपंक्ती उमजणारी व्यक्ती लहानपणापासूनच दिव्यत्व आणि भव्यत्व यात गफलत करू नये, हे शिकते. दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला की भव्यता कस्पटासमान वाटू लागते. भारतीय शिल्पकला भव्यतेपेक्षा दिव्यत्वाचे स्तोत्र गाताना दिसते. खजुराहो असो की ताजमहाल, वेरूळ असो की कुतुबमिनार, त्यांच्यात मानवी सृजनाच्या दिव्यत्वाचं दर्शन झालं नसतं तर त्या वास्तु इतिहासाच्या कचरापेटीत केव्हाच जमा झाल्या असत्या.
शब्दांची गडबड मेंदूत होत असते. अशीच गडबड आपल्या केंद्रातील राजवटीच्या मेंदूत झालेली दिसते. म्हणूनच त्यांच्या डोक्यात दिव्य आणि भव्य यांचा घोटाळा झालेला दिसतो. तिरंग्यातील दिव्यत्व भव्यतेच्या नादानं पुसून टाकण्याचा विकार या राजवटीला झाला आहे. म्हणून मग शेकडो फूट उंच तिरंग्याचे खांब उभारण्याचा वेडाचार सुरू होतो. समोर नजरेला यावा, भव्य पोलादी खांब. त्या पोलादीपणाला मान्यता मिळावी, यासाठी वर तिरंगा. सरदार पटेलांचं महान दिव्यत्व छोट्या पुतळ्यात कसं मावणार? त्यांच्या व्यक्तिमत्वातलं दिव्यत्व ५९७ फुटात संपल्यामुळे त्या पुतळ्याची उंची तिथंच थांबली का? पावणेदोनशे वर्षं भारतीयांच्या रक्तामांसाच्या चिखलातून उभारलेल्या भारतीय संसदेच्या वास्तुतलं दिव्यत्व टाकाऊ ठरल्यानं त्याची जागा सुलतानाच्या भव्य महालानं घेतलीच पाहिजे. ही संसदेची वास्तु म्हणजे जगात मोठेपणा गाजवायच्या कामी खुजीच ठरणार. कारण आमच्या सुलतानाची भव्यता त्या टुकार वास्तूत कशी मावणार?
आपण जन्मजात मोठे आहोत आणि हे जगच खुजं आहे, असा साक्षात्कार हिटलर आणि मुसोलिनीला झाला होता. त्यामुळे त्यांनी आपले देश पुन्हा बांधायला घेतले. मोठमोठी बांधकामं करायची म्हणजे गुलाम मजूर लागतातच. देशच नव्यानं बांधायचा म्हणजे सगळ्या देशकर्यांना कामाला लावलंच पाहिजे. काम झालं की त्यांनी त्याहून भव्य काही उभारू नये, म्हणून नंतर त्यांचे हात छाटायचे आहेतच. पण हिटलर मुसोलिनींचं व्यक्तित्व इतकं भव्य होतं की ते एका छोट्या देशात कसं मावणार? मग हे विश्वचि त्यांचे घर! ‘खादाड आहे माझी भूक, चतकोराने मला न सुख’ ही केशवसुतांची कविता त्यांना तोंडपाठ होती. त्यामुळे मोठं होण्याला आडवं येणार्याला कापणं हा त्यांचा छंद बनला. ‘उच्छेद’ आणि ‘उच्छाद’ हे पुरातन काव्यातील अनुक्रमे वृत्त आणि छंद असल्याचा शोध आर्यभटांनी लावला. गणितज्ञ आर्यभट्टानं शून्याची महती सांगून असत्यानसत्यातलं द्वंद्व सांगून नसता घोळ घातला. त्यामुळेच तर मोदीसेनेला नकारात्मकतेविरुद्ध युद्ध पुकारावं लागलं आहे. असले भ्रम ही व्याधीच असल्यानं समाज त्याचे भोपळे फोडतोच. तसे ते इटली, जर्मनीत फुटले.
भ्रमासारखीच स्मृतिभ्रंश हीही एक मानसिक व्याधीच आहे. ‘निवडक स्मृतिभ्रंश’ हा त्या व्याधीचा एक उपवर्ग. निवडक स्मृतिभ्रंशानं ग्रासलेला मनुष्य नाती विसरतो. जवळची नातीही त्याला नकोशी वाटतात. काही भावना त्याला स्पर्श करत नाहीत. जशी करुणेसारखी भावना काहीजणांच्या वाटेलाही जात नाही. त्यांच्यातल्या विशेष क्षमता एकाएकी नष्ट होऊन जातात. राजाची राज्य करण्याची क्षमता अंतर्धान पावते. नाही, आपण केवळ एका अद्वितीय, न भूतो न भविष्यति असलेल्या महापुरूषाबद्दल बोलत नाही आहोत. आपण समाजपुरूषाबद्दलही बोलत आहोत.
रा. स्व. संघ-भाजपच्या राजवटीला या निवडक स्मृतिभ्रंशाची जन्मतःच बाधा झालेली आहे, ब्रिटिशांच्या पावणेदोनशे वर्षांच्या जुलूमशाहीतला नरेंद्रास फक्त १४ ऑगस्ट १९४७ हाच दिवस आठवतो, १५ ऑगस्ट १९४७ म्हटलं की हटकून आठवतात महात्मा गांधी. गांधीजी आठवून कसं चालेल? म्हणून १४ ऑगस्ट १९४७. गांधीजींना विसरून जीना आठवले पाहिजेत. ‘जीना’शिवाय रा. स्व. संघाला जाना कहाँ? दुष्टाव्यातून दुष्टावाच जन्माला येतो, या म्हणीप्रमाणे फाळणीच्या मनोवृत्तीतून फाळणीच जन्मत राहणार.
मोदी सरकार जालियनवाला बागेच्या तथाकथित नूतनीकरणातून हीच मनोवृत्ती जोपासू पाहात आहे. जालियनवाला बाग हे ब्रिटिशांनी केलेल्या पंजाब्यांच्या निर्घृण हत्याकांडाचं स्मारक आहे. हे स्मारक हा काही पिकनिक स्पॉट नव्हे. अशा स्मारकाच्या जागी गेल्यावर आठवावा राजवटीचा जुलुमी दुष्टावा, स्मरावी राज्यकर्त्यांची अमानुषता. जशी बर्लिनच्या स्मारकात दिसते हिटलरची नृशंस मनोवृत्ती, दिसतात त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला बळी पडलेले लक्षावधी अभागी जीव. जालियनवाला बागेला भेट दिल्यावर आठवला पाहिजे जनरल डायर आणि त्यानं केलेल्या गोळीबारात जीव गमावलेली हजाराहून अधिक निरपराध माणसं आणि मुलं. ते भक्तांच्या मनोरंजनासाठी धारातीर्थी पडलेले नाहीत. ते काही मनोरंजनासाठी सहलीचं ठिकाण नव्हे, जे मोदी राजवटीनं केलं आहे. जालियनवाला बागेचं त्यांनी डिस्नेकरण केलं आहे. जी बखळ, जे निमुळता बोळ असलेलं प्रवेशद्वार, जी विहीर तेथील शोकांतिकेची प्रतीकं होती, त्यांचं रूपांतर मोदींच्या आत्मगौरवासाठी सुखांतिकेत करायच्या नादात प्रहसनात झालं आहे.
लाला वासुमल हे त्या हत्याकांडात बळी पडलेले एक हुतात्मा. त्यांचे नातू सुनील कपूर यांच्या मते जालियनवालाचं प्रवेशद्वार आता एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारासारखं करण्यात आलं आहे. ज्या बोळात माणसं किडेमुंग्यांसारखी चिरडून मारण्यात आली त्या बोळाच्या भिंती सजवल्या आहेत हसर्या माणसांच्या भित्तीशिल्पांनी! ज्या मैदानात बेछूट गोळीबार केला तेथे करण्यात आला आहे झगमगाटी साऊंड आणि लाईट शो. गोळीबारातून वाचण्यासाठी लोकांनी ज्या शहिदी खू नावाच्या विहिरीत जीव दिला, ती काचेच्या भल्यामोठ्या भिंतींनी शाकारली आहे आणि शहिदांची छायाचित्रं काढून टाकली आहेत. जालियनवाला बागेत शहीदच नसतील तर ते आत्माहीन कलेवर ठरेल. नशीब, त्याच्या प्रवेशद्वारावर भारतीय इतिहासातील एकमेव महापुरूषाची हसरी छबी झळकत नाही!
त्या शहिदांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनी त्यांची स्मृती जागवत कसलाही गाजावाजा न करता लाल रंगाच्या उत्सवी बांगड्या घालायची प्रथा गेली शंभर वर्षे सोडून दिली आहे. स्वातंत्र्ययुद्धात भाग न घेणार्या रा. स्व. संघाला त्यांच्याविषयी करूणा वाटायचं कारण नाही. पण स्वयंसेवकांसाठी त्या इतिहासाची उजळणी केली पाहिजे. नाहीतर तेच सामुदायिक स्मृतिभ्रंशाचे शिकार व्हायचे.
जुलमी, दरवडेखोर ब्रिटीश राजवट मुळापासून हादरली १९१९ मध्ये. ब्रिटिशांनी आणलेल्या रौलट विधेयकामुळे पंजाब खवळून उठला. तो त्यावेळीही आजच्यासारखा शेतकरी समाजच होता. १८ मार्च १९१९ रोजी व्हाईसरॉयच्या कौन्सिलनं ते विधेयक मंजूर केलं आणि त्याचा रौलट कायदा झाला. मदन मोहन मालवीय, मझहर उल हक आणि महंमद अली जीना या कौन्सिलच्या तीन सदस्यांनी कौन्सिलचा राजीनामा दिला. त्या कायद्यानं ‘अ-राजकी आणि क्रांतिकारक चळवळी’ दडपण्यासाठी सरकारला ‘आणीबाणीचे अधिकार’ दिले. सरकारवरील किरकोळ टीकाही शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला. सीआयडीच्या हवालदारासही कुणालाही देशद्रोही म्हणून अटक करण्याचा अधिकार देण्यात आला. इतकंच नव्हे, तर आरोपीला न्यायालयात जाण्याचाही अधिकार नव्हता की आरोप दाखल झाल्यावर वकील देता येत नसे. पोलिसांवर आरोपपत्र दाखल करायची जबाबदारीही नव्हती. या गोष्टी मोदी राजवटीला आरसा दाखवतात, म्हणून तर ते सारे झगमगाटात पुसून टाकायचे आहे? राजरोस घालण्यात येत असलेले देशद्रोहाचे खटले, यूएपीए खाली जामीन नाकारणार्या कलमांखाली केलेल्या विचारवंत, राजकीय कार्यकर्त्यांच्या अटका, आरोपत्रांविना वर्षानुवर्षे तुरूंगात खितपत ठेवलेले कार्यकर्ते हा मोदींच्या रौलट कायद्याचा प्रताप आहे. आणि रौलटच्या ‘अ-राजकी आणि क्रांतिकारकांना’ मोदी राजवटीने नाव दिलं आहे, अर्बन नक्षल.
या विधेयकाला जबरदस्त विरोध पंजाबमध्ये १९१९ च्या फेब्रुवारीतच सुरू झाला. अमृतसरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. १३ एप्रिलला बैशाखी होती. रौलट बिलाला विरोध केल्याबद्दल ब्रिटिशांनी डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दिन किचलू या देशभक्तांना अटक केली होती. सच्चे देशभक्त देशद्रोही ठरले होते, आजच्यासारखेच. त्या अटकेचा निषेध करण्यासाठी लोक दुपारी चार वाजता जालियनवाला बागेत जमू लागले. सभा सुरू झाली आणि संध्याकाळ व्हायच्या आत त्या लोकांच्या प्रेतांचा खच पडला. जनरल डायरच्या पोलिसांनी त्या जमावाला चहूबाजूंनी घेरून बेधुंद गोळीबार केला. प्रवेशद्वाराचं निरूंद बोळ हा एकमेव बाहेर पडायचा मार्ग होता. त्या खिंडीत गाठून डायरनं लोकांना ठार केलं. ज्या ठिकाणी जास्त लोक जमले होते त्यावरच गोळीबार केंद्रित करण्याचा डायरनं आदेश दिला. भिंतीवरून चढून जाणार्यांना गोळ्यांनी टिपलं. ‘शहिदी खू’ म्हणून पुढं ओळखल्या जाणार्या त्या विहिरीत शेकडो लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारून प्राण गमावले. बागेजवळच्या रस्त्यातही प्रेतांचे खच पडले होते. गोळीबाराच्या १६५० फैरीमध्ये हजाराहून जास्त लोक ठार झाले. आपण लोकांना ठार करण्यासाठीच गोळीबार केल्याची शेखी डायरनं नंतर झालेल्या चौकशीत मिरवली. ते ब्रिटिशांनी ठरवून केलेलं शिरकाण होतं. रेषेच्या आत येणार्या प्रत्येक शेतकर्याचं डोकं फोडण्याचा आदेश देणारा अधिकारी या डायरचाच वारसदार आहे. यूएपीए हा अमित शहांचा रौलट कायदा आहे.
मानवी क्रौर्याचं स्मारक सुंदर असू शकत नाही. त्याची झगमगाटी कबर करणं, आर्त किंकाळ्यांचे प्रतिध्वनी उमटवणार्या भिंती हसर्या चेहर्यांनी सजवणं ही नुसती संवेदनशून्यता नसून तो दुष्टपणा आहे. हे ओळखून जगभरची स्मारकं त्या भयावहतेची आठवण करून देतात. त्यामागे त्या पशुत्वाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, हे स्वतःला दिलेलं वचन असतं. जालियनवाला बागेचा मॉल करून मोदी राजवटीनं त्या हुतात्म्यांचा घोर अवमान केला Dााहे. अर्थात, स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी माजघरात लपलेले दुसरं काय करणार? ते दिवाभीत आता राज्यावर आले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट भारताची लूट करत ब्रिटनचे खजिने भरत होती. मोदी राजवट ही त्या ईस्ट इंडिया कंपनीचीच आवृत्ती आहे आणि खजिने भरत आहे अदानी-अंबानींचे. हा आहे मोदींचा ‘नया भारत’. लोकलढ्यांच्या स्मृती पुसणारा. विशेषत: जनतेच्या लुटीविरुद्ध, तिच्यावर लादलेल्या जुलमाविरुद्ध जनतेनं उभारलेल्या लढ्यांच्या. म्हणून तर राज्यकर्त्यांच्या स्मृतिभ्रंशावर इलाज करायला हवा. त्यासाठी जालियनवाला बागेच्या हुतात्म्यांना स्मरून भारतीय जनतेला बोरकरांच्या खालील पंक्ती गात लढा करावाच लागणार आहे:
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाही चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती
(साप्ताहिक जीवनमार्गच्या सौजन्याने)