• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कुटुंब रंगलंय फेकंफेकीत

- श्रीकांत आंब्रे  (टमाट्याची चाळ)

श्रीकांत आंब्रे by श्रीकांत आंब्रे
September 2, 2021
in टमाट्याची चाळ
0
कुटुंब रंगलंय फेकंफेकीत

बोलण्यासारखे काही नव्हतेच. आम्ही एकमेकांकडे गुपचूप हसत पाहिले आणि गच्चीचा जिना उतरू लागलो. बाजीरावाहून त्याच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असलेला त्याचा धाकटा भाऊ मगन हा तर अस्सल फेकाड्या होता. एकदा तो त्याच्या कोल्हापुरातल्या गावच्या गप्पा सांगायला लागला की त्याची थापेबाजी ऐकून त्याच्या मित्रांची खूप करमणूक व्हायची. ज्यावेळी चाळीतील बहुतेक कोकणात गाव असलेली मुले गावचे आंबे, काजू, फणस यांची झाडे, बागा यांच्या गप्पा सांगायची, तेव्हा हा मगन आपल्या गावातल्या फळांबद्दल जे सांगायचा ते ऐकून सगळ्यांचे डोळे चमकायचे.
—-

प्रत्यक्षात घडलेल्या घटनेपेक्षा ती घटना तिखटमीठ लावून सांगण्याची सवय काही व्यक्तींना असते. टमाट्याच्या चाळीत दामापूरकर नावाचे एक कुटुंब म्हणजे अशा अतिशयोक्त बोलण्याच्या बाबतीतला अर्क होता.
काही वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा बाजीराव अपेक्षेप्रमाणे पहिल्याच फटक्यात मॅट्रिकला सर्व विषयांत नापास झाला आणि त्यानंतर त्याने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. तो दिसायला काळासावळा पण हॅण्डसम होता. कपडे तर एकदम पॉश असत. डोळ्यावर गॉगल, एका हातात ब्रीफकेस आणि दुसर्‍या हाताच्या बोटात सिगारेट धरून तो स्टाइलमध्ये सकाळी घराबाहेर पडला की रात्री आठच्या सुमारास यायचा. कोणी कुठे गेला होतास म्हणून विचारले तर नोकरीसाठी चार-पाच कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू होते, असं बिनधास्त ठोकून द्यायचा. घरीही पिताश्रींना थापा ठोकून पैसे उकळायचा. त्यामुळे त्याच्या पॉश राहणीचे रहस्य सार्यांधना माहीत होते.
एकदा त्याने रात्री घरी आल्यावर मजल्यावर सर्वांना पेढे वाटून बातमी दिली की मला एका फॉरेनच्या इम्पोर्ट-एक्स्पोर्ट बिझनेस ऑफिसात कुलाब्याला सुपरवायझरची नोकरी मिळाली. साहेब सांगतील ती कामे करायची आणि इतर कामगारांच्या कामावर लक्ष ठेवायचे. पगार सुरुवातीला चाळीस हजार, आऊटडोअरलाही जावे लागेल. म्हणजे बँकेत वगैरे… यातली एकच गोष्ट खरी होती ती म्हणजे याला कुठल्या तरी ऑफिसात साधी प्यूनची नोकरी मिळाली होती, पण घरातून निघताना तो तसाच ब्रीफकेस घेऊन खाडखाड बूट वाजवत जायचा. चार-पाच दिवस गेल्यावर चाळीतल्या वात्रट पोरांनी तो रात्री गच्चीत आरामात झोपून सिगारेट पीत असताना त्याला गाठला आणि विचारले, कशी चाललीय नोकरी?
अगदी फस्क्लास. साहेबांचा माझ्यावर इतका विश्वास की तिसर्‍या दिवशी त्यांनी मला पन्नास लाखांची रोख कॅश घेऊन बँकेत पाठवले. बरे, बँकही जवळ नाही. आमचे ऑफिस कुलाब्याला आणि बँक भायखळ्याला. ब्रीफकेसमध्ये माझे प्रायव्हेट सामान असल्यामुळे तिच्यातून एवढी रक्कम घेऊन जाणे शक्यच नव्हते. शिवाय जोपर्यंत मी स्वतःच्या मालकीची कार घेत नाही तोपर्यंत कुठेच टॅक्सीने जाणार नाही, अशी शपथ मी गावच्या म्हसोबाच्या मंदिरात घेतलीय. त्यामुळे बसने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मी ती नोटांचे बंडले जाड सुतळीत दोन गठ्ठ्यांमध्ये बांधत होतो. मी दोन खांद्यांवर दोन गठ्ठे घेऊन जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा माझी कसरत पाहण्यासारखी होती. बसमध्ये बसायला जागा नव्हती. मी कसातरी एका सीटला रेलून उभा होतो. कंडक्टर ओळखीचा असल्यामुळे त्याने पैसे न घेताच तिकीट माझ्या खिशात कोंबले. बसला ब्रेक लागला की मी एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे त्या गठ्ठ्यांसह पडावासारखा हलायचो. नशीब खाली पडलो नाही. शेवटी स्टॉप आला आणि मी बंडले सावरत उतरलो.
मारुतीने द्रोणागिरी पर्वत आणल्यासारखा बँकेच्या दरवाजापाशी येताच द्वारपालाने बंदूक सावरत मला सलाम ठोकला आणि दरवाजा उघडला. मी आत गेलो. कॅशियरने मला डायरेक्ट आत बोलावले आणि चहाची ऑर्डर दिली. चहा प्यायल्यावर माझ्या जिवात जीव आला. कॅश मोजण्यात एक तास गेला. आणि पावती घेऊन मी बसनेच ऑफिसात आलो. डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना ती पावती दिली. साहेबांचा माझ्यावर इतका विश्वास बसला की म्हणाले, या महिन्यापासून तुझ्या पगारात आणखी दहा हजार रुपये वाढ करतो. आपल्या कंपनीला तुझ्यासारख्या विश्वासू माणसांची गरज आहे. आता बोला!
बोलण्यासारखे काही नव्हतेच. आम्ही एकमेकांकडे गुपचूप हसत पाहिले आणि गच्चीचा जिना उतरू लागलो. बाजीरावाहून त्याच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असलेला त्याचा धाकटा भाऊ मगन हा तर अस्सल फेकाड्या होता. फेकाड्या या टोपणनावानेच त्याच्या बरोबरीचे मित्र त्याला हाक मारायचे. एकदा तो त्याच्या कोल्हापुरातल्या गावच्या गप्पा सांगायला लागला की त्याची थापेबाजी ऐकून त्याच्या मित्रांची खूप करमणूक व्हायची. ज्यावेळी चाळीतील बहुतेक कोकणात गाव असलेली मुले गावचे आंबे, काजू, फणस यांची झाडे, बागा यांच्या गप्पा सांगायची, तेव्हा हा मगन आपल्या गावातल्या फळांबद्दल जे सांगायचा ते ऐकून सगळ्यांचे डोळे चमकायचे. एकदा तो सांगत हाता, गावाला आमच्या स्वतःच्या कलिंगडाच्या खूप बागा आहेत. एकेका बागेत कलिंगडाची शंभर शंभर झाडे आहेत. एकदा का झाडावर कलिंगडे धरली की ती वर चढून खाली उतरवताना रश्शीने बांधून उतरावी लागतात. जास्त पिकून खाली पडून फुटले तर माती झाली ना! आणि कुणाच्या टकुर्‍यावर पडले तर झाला ना कपाळमोक्ष. आम्ही डायरेक्ट झाडावरून काढून ट्रकातून मार्केटला पाठवतो.
एकदा तर त्याने चाळीतल्या मुलांना, आमचा एक काका आफ्रिकेत असून त्याच्या कितीतरी सोन्याच्या खाणी आहेत अशी एका लोणकढी फेकली. लवकरच आम्ही आमच्या गावच्या घरावर सोन्याची कौले बसवून घेणार आहोत या त्याच्या जबरदस्त थापेने तर सार्‍यांना आपले तोंड कुठे लपवावे असे होऊन गेले. तेव्हापासून दर शिमग्यातील धुळवडीला चाळीतली पोरं प्रत्येकाच्या दारावर ‘ऐना का बैना घेतल्याशिवाय जायना’ हा नाच करून पैसे मागतात, तेव्हा मगनच्या दारात, ‘त्यांच्या घरावरी, त्यांच्या घरावरी, सोन्याची कौले घरावरी’ हे रचलेले गाणे हमखास म्हणतातच.
त्याच्या बहिणीच्या लग्नाचे ठरत होते तेव्हाची गोष्ट. तिला बघायला नवरा मुलगा चाळीत येणार होता. ती मुलगी जेमतेम पाचवी शिकलेली. तीही मारून मुटकून. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होण्याआधीच आईने नवर्‍या मुलाचे विक्रोळीला तीन मजली स्वतःचे घर आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, गाडीशिवाय फिरत नाही, अशा बातम्या पसरवल्या. अखेर रविवारी संध्याकाळी पाच वाजता मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला भावी जावई येणार असल्याची बातमी पसरली. चाळीच्या गच्च्चीचा कठडा आणि चाळीच्या दोन्ही गॅलर्‍या मुलगा गाडीतून येणार असल्याचे कळल्यामुळे त्याला पाहण्यासाठी हाऊसफुल्ल झाल्या. शेवटी सव्वा पाच वाजता सायरनचा आवाज करत हॉस्पिटलची काळी शववाहिनी आत शिरताच चाळकर्‍यांच्या छातीत धस्स झाले. शुभकार्यात आता कसले विघ्न आले या भीतीने सारे भांबावले. इतक्यात गाडीतून सजून धजून तीन-चार स्त्रिया, चार-पाच पुरुष मंडळी आणि सफेद कपडे, पायात बूट घातलेला ड्रायव्हर बाहेर पडला. कोणीतरी कुजबुजले हाच तो नवरा मुलगा. हॉस्पिटलात ड्रायव्हर आहे. विक्रोळीत तीन मजली झोपडे आहे. मागे डोंगर आहे. पुढे मोकळे मैदान आहे. हवेशीर वातावरण आहे. सारेजण न बोलता आपापल्या घरी पांगले.
होणार्‍या जावयाच्या सासूबाई शेजारच्या चंपा वहिनींना सांगत होत्या, हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर असला म्हणून काय झाले, त्याच्या आतल्या डॉक्टरांशी इतक्या ओळखी आहेत की आमच्या पुढच्या आजारपणाचा प्रश्न सुटला. सगळी ट्रीटमेंट फुकट. परवा त्याच्याशी मोबाईलवर बोलताना मला साधा खोकला आला तर आता येताना कफ सिरपच्या चार बॉटल, गोळ्या आणि इम्युनिटी वाढवणारी औषधं सोबत घेऊन आला. वर म्हणाला, डायबिटीसपासून हार्टपर्यंतच नव्हे तर मेंदूपर्यंत कसलाही आजार असो, मला रिंग करा पाच मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स पाठवतो.
मी त्याला म्हणाले, अ‍ॅम्ब्युलन्सच पाठवा हो. ती काळी गाडी नको. त्यावर तो म्हणाला, त्या दिवशी सगळ्या अ‍ॅम्ब्युलन्स बिझी होत्या, त्यामुळे नाईलाजाने हर्स आणावी लागली. ते काहीही असो, पण ही सोयरिक आम्ही पक्की केलीय. ती तुमची तुम्हाला लखलाभ होवो, असे सांगून चंपा वहिनी तिथून सटकल्या.
एका भोंदू बाबाच्या नादी लागलेले बाजीरावचे बाबाही त्या भोंदू बाबाच्या तथाकथित चमत्काराच्या सुरस कथा अशा रंगवून सांगायचे की चाळीतल्या वात्रट मुलांचा चांगलाच टाइमपास व्हायचा. आता ते कुटुंब चाळीतली खोली विकून विक्रोळीला बंगल्यात राहायला जाणार असल्याची बातमी चाळीत पसरलीय. ती तरी खरी की खोटी हे समजेलच लवकर.

(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)

Previous Post

आता चर्चा होऊकंच व्हंयी

Next Post

माया आटली, `माया’ नडली!

Next Post
माया आटली, `माया’ नडली!

माया आटली, `माया’ नडली!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.