आपल्या मधुर आवाजाने कानरसिकांना बेधुंद करणार्या पार्श्वगायिका आशाताई भोसले यांचा ८ सप्टेंबरला वाढदिवस. त्यांची एक साधी भेटही एखाद्यासाठी आयुष्याची आठवण असते, पण अरुण काकतकर यांनी तर दूरदर्शनसाठी आशाताईंचा खास कार्यक्रम केला होता. त्याच आठवणी त्यांनी जागवल्या आहेत.
—-
१९८३ सालची एक मनात घर करून राहिलेली आठवण… दूरदर्शनसाठी आशाताईंनी खास कार्यक्रम करण्याचे ठरले. सुंदर दिवाणखान्याचा सेट लावला होता. पाठीमागच्या भिंतीवर होतं दूरदर्शनच्याच चित्रकारानं काढलेलं भव्य वनराईचं चित्र. आशाताई येतानाच स्वत: एक सुंदर गुलाबी सुवासिक फुलांचा गुच्छ घेऊन आल्या होत्या. कशा काय माहित नाही, पण त्या फुलांभोवती अगणित माश्या घोंघावू लागल्या! काही केल्या जाईनात. शेवटी तो गुच्छच बाहेर न्यावा लागला. कार्यक्रम दिवाणखान्यात असल्याने अतिशय निवडक व मोजकेच निमंत्रित प्रेक्षक बोलावले होते. मला आठवतंय त्यात सुप्रसिद्ध कवी अनिल कांबळे हे सपत्नीक उपस्थित होते.
नंतर `शूरा मी वंदिले’च्या चित्रीकरणाची आठवण. आशाताई बैठकीवर मांडी घालून बसल्या होत्या. हार्मोनियमच्या साथीला डॉ. विद्याधर ओक आणि तबल्याच्या साथीला शिवानंद पाटील. आशाताईंच्या उजव्या हाताला पाठीमागे आमच्याच चित्रकाराने काढलेलं मास्टर दीनानाथांचं भव्य तैलचित्र. गोगरकर आणि रेहमान हे आमचे ते चित्रवाणी चित्रकार, रंगकर्मी. एका हातात रंगाचा डबा आणि एका हातात ब्रश, तोंडातून एक शब्दही नाही. चित्रं मात्र पहात राहावीत अशी! असे ते दोघे अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत.
बैठकीवर बसलेल्या आशाताईंनी केवळ मोजकेच दागिने घातले होते. तीन हिर्यांच्या पेंडंटचं एक गळ्यातलं आणि कानात ५-५ हिऱ्यांच्या दोन कुड्या बस! इतकंच! अगदी साधे दागिने! ‘शूरा मी वंदिले’च्या वेळी आशाताईंना मास्टर दीनानाथांची आठवण येणं स्वाभाविकच! ती सांगताना आशाताई म्हणाल्या, बाबांनी आम्हाला सांगितलं होतं, कावळा कितीही उंच उडाला किंवा कोणत्याही शिखरावर जाऊन बसला तरी त्याचा गरूड होत नाही. त्याचं मूळ संस्कृत सुभाषितही बाबा म्हणून दाखवत. तेही आशाताईंनी म्हणून दाखवलं.
ह्या कार्यक्रमासाठी निवडलेल्या गाण्यात दोन गाणी बाबुजींची होती. `कधी रे येशील तू’ आणि `माझा होशील का’. वसंत पवारांचं `बुगडी माझी सांडली गं’ आणि बाळासाहेबांचं `तरुण आहे रात्र अजुनी’ आणि ‘जैत रे जैत’मधील स्मिता पाटीलवर चित्रित झालेलं `मी रात टाकली’ आणि सी. रामचंद्रांचं `मलमली तारुण्य माझे’ अशा सुंदर गाण्यांचा समावेश होता. या कार्यक्रमातली एक मजा म्हणजे `सांगते ऐका’ आणि `जैत रे जैत’मधील गाणी दाखवताना आशाताई गात होत्या आणि गाण्याची दोन कडवी जोडणार्या मधल्या स्वरावलीच्या वेळी आम्ही त्या चित्रपटातील त्या गाण्याच्या वेळची दृश्येही दाखवली. ही जरा तेव्हा नवीन पद्धत आणली होती. ‘सांगते ऐका’च्या वेळी ते नायकाचं पाटावर येऊन बसणं किंवा स्मिता पाटील ‘जैत रे जैत’मधील ते रानोमाळ फिरतानाचं दृश्य वेगळाच परिणाम करून गेली. मजा म्हणजे हा कार्यक्रम पाहिल्यावर जब्बार पटेलचा मला फोन आला की अहो काकतकर, माझ्या ‘जैत रे जैत’ चित्रपटातील दृश्यं अशी कशी परवानगी न घेता वापरलीत? मी म्हटलं ते तू थेट आशाताईंनाच विचार! मग काय विषयच संपला.
आशाताईंची आणि माझी भेट झाली ती मुंबईला आशाताईंच्या घरी. कार्यक्रमासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या दर वेळेसारखं मी स्टेजवर उभी राहून गातीये आणि मधे येऊन कोणीतरी बोलतंय असं नको. काही तरी छान वेगळं करू या. तेव्हा खरं तर माझ्या डोक्यात आशाताईंबरोबर शांताबाई (शेळके) संवादासाठी घ्याव्यात असं होतं, पण दोन-दोन सेलिब्रेटी एकाच वेळी नकोत असं मनात आलं.
गाण्यात वैविध्य आणायचं म्हटल्यावर माझ्या डोक्यातही नवीन कल्पना आली की त्या स्टुडिओत गाताहेत, अशीही १-२ गाणी करू. एक गाणं त्यांच्या घरीच करू! त्यांच्या सूनबाईंबरोबर. `सांगते ऐका’ आणि `जैत रे जैत’मधलं गाणं त्यांच्या अंतर्यांच्यामध्ये नवीन दृश्य घालून करू; एक गाणं स्टुडिओत बसल्या आहेत आणि मुलाखतकारानं प्रश्न विचारल्यावर त्याविषयी बोलून मग गाताहेत. आणि `शूर मी वंदिले’ छान बैठकीवर बसून तबलापेटीच्या साथीनं! ह्या गाण्याच्या वेळी तर आम्ही नऊपासून ध्वनिमुद्रणाची तयारी करून बसलो होतो आणि आशाताई दहानंतर आल्या. म्हटलं `का हो उशीर? कुणी आलवतं का?’ त्या म्हणाल्या, `नाही हो उद्या मी लंडनला चाललेय आणि रेकॉर्डिंग करायलाच हवं. त्यात आज मी बाबांचं गाणं गाणार आहे म्हणून येताना दिदीला नमस्कार करायला गेले होते. कारण आमचा छोटा बाबाच ना दिदी म्हणजे!’
त्यांच्या खारच्या घरी जे गाणं केलं त्याची सुरुवात अशी केली की त्यांच्या सूनबाई केस विंचरत गाणं गुणगुणताहेत आरशासमोर. आशाताई म्हणतात म्हण आता ते सगळंच गाणं. सूनबाई म्हणाल्या, तुम्हीच म्हणून दाखवा आणि आशाताई दिवाणावर बसून सूनबाईंचे लांबसडक केस विंचरतायेत आणि गाण चाललंय असं छायाचित्र घेतलं. तिथेच राहुलदेवजींचं छायाचित्र दिसलं. त्या छायाचित्राचं आरशात छान प्रतिबिंब पडलं होतं. त्याचेही आमच्या अजित नाईकने सुंदर फोटो घेतले आणि सगळे तुकडे गाण्यात जोडून एक सुंदर गाणं मी तयार केलं.
कार्यक्रमात दोन गाण्यांचं स्टुडिओत रेकॉर्डिंग, त्यासाठी खास बाबूजींना बोलावलेलं, ती गाणी तुकड्या तुकड्यांनी रेकॉर्ड केली. मधेच बाबूजींच्या रिअॅक्शन्स, त्याचे फोटो आणि मग ते तुकडे जोडले असा तो सोहळा! मग त्या सगळ्या गाण्यांचे तुकडे घेऊन मी पुण्याला आलो आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये रात्रंदिवस बसून ते एडिट केलं. फायनल कामासाठी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आलो तर त्या दिवशी दसरा. सगळ्या खोल्या बंद. आदल्या दिवशी खंडेनवमीला सर्व यंत्रसामग्रीची हळदी-कुंकू वाहून पूजा केलेली. म्हणे `आज काम बंद’… म्हटलं `अहो पांडवांनीसुद्धा खंडेनवमीला पूजा केलेली शस्त्रास्त्रं दसर्याला युद्धासाठी वापरून काढली आणि तुम्ही काम बंद काय ठेवताय?’ कोण ऐकेना… शेवटी डीनला फोन लावून त्या खोल्या उघडून घेतल्या आणि फायनल एडिटिंग स्वत: केलं. त्यातही एक अडचण आली. गाणी जोडताना एक इनसर्ट मोड असतो तो मला माहित नव्हता. मला फक्त कनेक्टींग मोड माहीत होता. त्यामुळे मी हैराण, पण मी कोणाकडून तरी तो इनसर्ट मोड शिकून घेतला आणि तो कार्यक्रम तयार करून मुंबईला घेऊन गेलो. १९८४ दिवाळी दिवस. सकाळी तो कार्यक्रम झाला. मला पुढे दिल्लीला जायचं होतं. `शब्दांच्या पलिकडले’ इतका कट टू कट प्रोग्राम होता की शेवटी माझं नाव द्यायलाही वेळ नव्हता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला `निर्माता अरुण काकतकर’ असं टायटल नाही, पण मला तेवढं भान होतं की तो कार्यक्रम महत्त्वाचा आहे माझं नाव नाही. असा झाला `आशाताईं’चा शब्दांच्या पलिकडले’.
२००५मध्ये मी बालचित्रवाणीतून निवृत्त झालो आणि २००८-०९च्या सुमारास माझे तिथले जुने सहकारी प्रसन्न पोतदार यांचा फोन आला, म्हणाले, अहो काकतकर एक कल्पना सुचलीय. ह्या वर्षीच्या बालभारतीच्या आठवीच्या क्रमिक पुस्तकात आशा भोसले ह्यांच्यावर एक धडा आहे. त्या धड्याबाबत स्वत: आशाताई आठवीच्या मुला-मुलींसाठी काही बोलतील असं काही करता येईल का? मी म्हटलं, ठीक आहे बोलून बघतो आशाताईंशी. आशाताईंना फोन केला. आशाताईंनी फोन घेतल्यावर त्यांना क्रमिक पुस्तकातल्या त्यांच्यावरच्या धड्यासंबंधी त्याच काही बोलतील का विद्यार्थ्यांशी असं विचारलं. म्हणाल्या, `मला धड्याबद्दल काही माहित नाही, पण कल्पना चांगली आहे. तुम्ही मुंबईला या, आपण बोलू त्याबद्दल. ‘मग काय मी, प्रसन्न पोतदार आणि आमचे राजेश कंगे प्रभुकुंजला आशाताईंकडे हजर. दिदींच्या शेजारचाच फ्लॅट आशाताईंचा. मधल्या माईंच्या खोलीतून जोडलेला. मग चहा, पोहे झाले. आशाताईंना कार्यक्रमाची कल्पना दिली. प्रसन्न पोतदारांनी आशाताईंना तो धडाही वाचून दाखवला आणि आशाताईंनी त्या धड्याबद्दल बोलायचे असे ठरले. आशाताईंनी धड्याबद्दल दोनचार वाक्यं बोलण्यापेक्षा त्याबाबत विद्यार्थ्यांशीच बोलते असं म्हटल्यावर चित्रीकरण कुठे आणि कसे करायचे? आशाताई म्हणाल्या इथेच मुंबईत `बालमोहन’मध्ये करूया. तिथे माझी ओळखही आहे, पण परत त्याच म्हणाल्या, बालमोहनच्या परवानग्या वगैरे काढत बसण्यापेक्षा आपण सरळ कोल्हापूरला जाऊ आणि मी, उषाताई, मीनाताई, दिदी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत जाऊन थेट तिथल्या मुलांशीच बोलते की, मग काय! आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन! अशी माझी अवस्था झाली! खूप आनंद मनात घेऊन आम्ही पुण्याला पोहोचलो.
मग कार्यक्रमाची तयारी सुरू. कोल्हापूरच्या शाळेचे प्राचार्य श्री. गबाले यांना फोन केला आणि असं असं आशाताईंचं त्यांच्यावरच्याच धड्यासंबंधातलं चित्रीकरण आपल्या शाळेत येऊन करायचं आहे असं सांगितलं. त्यांना खूपच आनंद झाला, कारण त्यानिमित्त आशाताई शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होत्या. मग ९ फेबु्रवारी २००९ला कोल्हापूरला चित्रीकरण करावयाचे ठरले. आठ तारखेला आशाताई पुण्यात आल्या. मग मी माझ्या गाडीतून आणि आशाताईंबरोबर आपले पुण्याचे निवेदक. आशाताई म्हणाल्या त्यांनाच करू दे ते काम. तर असे आम्ही सगळे कोल्हापूरला पोहोचलो. संध्याकाळी हॉटेलमध्ये मुक्काम केला.
दुसर्या दिवशी ९-९.३०च्या सुमारास आशाताई तयार होऊन शाळेत आल्या. तिथल्या स्वागताचा थाट काय वर्णावा! प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला सर्व शिक्षक स्वागताला उभे! मधून आशाताई चालताहेत, रांगोळ्या, फुलांची सजावट! एक वर्ग निवडला होता. सगळी मुलं तयार होऊन बसलेली. आमची चित्रीकरणाची सामग्री सिद्ध. शाळेच्या प्रवेशद्वाराशी फळ्यावर काढलेलं आशाताईंचं सुंदर मोठं चित्र आणि स्वागतपर वाक्यं लिहिलेली, त्याचंही त्यांनी कौतुक केलं. मग मुलांनी त्यांना नमस्कार केला आणि गप्पा सुरू. मुलांना त्यांनी सांगितलं की लहानपणी आम्ही चारही बहिणी ह्याच शाळेत होतो. तेव्हा आमची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. पण आम्हाला शिकवायचंच म्हणून मुद्दाम बाबांनी शाळेत घातलं होतं. मी, उषाताई, मीनाताई शाळेत असलो तरी दिदी काही फारशी शाळेत आली नाही. कपडे पण आम्ही एकमेकांचे वापरत असू. पुढे तेही परवडेनासं झालं. दिदी सिनेमात गाऊ लागली आणि आम्ही कोल्हापूर सोडलं. अशा सगळ्या परिस्थितीचं त्यांनी मोकळेपणानी वर्णन केलं.
मग त्या त्यांच्या गाण्याविषयी मुलांशी बोलत होत्या. `मी किती भाषातली गाणी गायली आहेत! फक्त भारतीय नव्हे तर आप्रिâकेतल्या स्वाहिली भाषेतही मी गायली आहे.’ अशा परकीय भाषेतील गाणी गाताना काय शिकावं लागतं. त्या भाषेतील उच्चार, हेल आणि खास लहेजा. याचा अभ्यास कसा केला, जी लिपी आपल्याला समजत नाही, ती ती गाणी मराठीत लिहून घ्यायची आणि मग संगीत दिग्दर्शकाकडून उच्चार कसे शिकायचे याचंही वर्णन केलं. मुलांच्या असंख्य प्रश्नांना, शंकांना मनमोकळी उत्तरं दिली. अशी साधारण दोन तासाची मुलाखत रंगली. नंतर प्राथमिक शाळेत त्या ज्या वर्गात शिकल्या त्या वर्गातही त्या जाऊन आल्या. हायस्कूलच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला त्यांचा वर्ग होता. तिथे गेल्यावर त्या थोड्या भावविवशही झाल्या. मीही आधीच जाऊन शाळेत नोंदवहीतील आशाताई, मीनाताई आणि उषाताई ह्यांच्या नावांची नोंद दृश्यांकित करून ठेवली आहे. बाहेरच्या पटांगणातही सतरंजी घालून बसलेल्या इतर विद्यार्थी-शिक्षकांशी अर्धा-एक तास गप्पा झाल्या आणि हे अडीच-तीन तासाचं चित्रीकरण संपलं. त्यानंतर आशाताईंनी शेजारीच असलेल्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यांची शाळा आणि महालक्ष्मी मंदिराची भिंत एकच आहे इतकं ते जवळ आहे़ मग म्हणाल्या चला आपण ज्योतिबालाही जाऊन येऊ. मग आमची सगळी वरात ज्योतिबाच्या दर्शनाला. नंतर आम्ही सगळे तीन गाड्यांतून परत आलो आणि मग त्या चित्रीकरणाचे तीन भाग करून `सप्तसुरांचे जीवन गाणे’ या कार्यक्रमांतर्गत बालचित्रवाणीच्या प्रसारणात दाखवला गेला. त्यानिमित्तानी झालं काय, पुस्तकात ज्या व्यक्तीवर जो धडा आहे त्या व्यक्तीनेच त्या संदर्भात बोलणं म्हणजे आपण ‘फ्रॉम हॉर्सेस माऊथ’ म्हणतो ना तसं. असा एक आशाताईंचा संग्रहित कार्यक्रम होऊन गेला की जो विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष बघता येईल.
(लेखक दूरदर्शनवरील नामवंत निर्माते आणि बालचित्रवाणीचे माजी मुख्य कार्यक्रम अधिकारी आहेत.)