निव्वळ दहशतवादच नव्हे तर ‘सरफरोश’ पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रकाश टाकतो. पोलीस आणि राजकारणी यांचं नेक्सस दाखवणार्या हिंदी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर एसीपी अजय राठोड आणि त्याचं जाँबाझ पथक बघणं हा एक सुखद बदल होता. ‘सरफरोश’च्या पटकथेची खुबी ही आहे की प्रेक्षकांचा मानसिक प्रवास राठोड उकलत असलेल्या केसमध्ये राठोडच्या पथकाच्या सोबतीनेच होत राहतो.
—-
भारतीयांसाठी १९९९ हे वर्ष अनेक घडामोडींनी भरलेलं होतं. मुख्यत्वेकरून कारगिल संघर्ष आणि क्रिकेट वर्ल्डकप ह्या एकमेकांना समांतर घडलेल्या घटना. त्यानंतर घडलेलं कंदाहार विमान अपहरण प्रकरण. गंमत म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात येईपर्यंत वृत्तमाध्यमांनी कारगिलच्या बातम्या फार गंभीरपणे घेतल्या नव्हत्या. मात्र त्याचवेळी नुकताच प्रदर्शित झालेला आमीर खानचा देशभक्तीवर आधारित चित्रपट ‘सरफरोश’ मात्र गर्दी खेचत होता.
‘सरफरोश’ हा एक सरप्राइज हिट मानला जातो. एकतर त्यावेळी आमीर खान हा आजच्याप्रमाणे मार्वेâटिंग गुरू बनला नव्हता, ना त्या काळी इंटरनेट आणि सोशल मीडियाचं प्रस्थ होतं. दुसरं म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक जॉन मॅथ्यु मथान याचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याचाही तसा गाजावाजा नव्हता. चित्रपटाचं यश हे जरी त्याच्या दर्जामुळे असलं तरी त्या वर्षी आलेले आणि यशस्वी झालेले ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हम साथ साथ हैं’, ‘कच्चे धागे’, ‘बिवी नंबर वन’ हे सिनेमे पाहता ‘सरफरोश’ लोकांना आवडेलच अशी खात्री खुद्द आमीरलासुद्धा देता आली नसती. त्याआधी शाहरुखचे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’ असे शुगरकँडी सिनेमे तर ‘सत्या’, ‘जिद्दी’, ‘विनाशक’ यांसारखे सोशल अॅक्शन चित्रपट यांची चलती होती. ‘बॉर्डर’सारखा एखादा देशभक्तीपर चित्रपट चालला तेवढा. नाहीतर ‘दिल से’सारखा उत्तम सिनेमा प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरला नव्हता.
मात्र ‘सरफरोश’ सर्वच बाबतीत नावीन्यपूर्ण होता. कथा ओळखीची वाटली तरी कथेची मांडणी एखाद्या पाश्चात्य चित्रपटाप्रमाणे होती. कथा सुरू होते भारताच्या राजस्थानलगत असलेल्या सीमेवरून देशात येणार्या अवैध शस्त्रांच्या तस्करीने. हीच शस्त्रं राजस्थानवरून थेट महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंद्रपूरमध्ये पाठवली जातात आणि तिथे बाला ठाकूर नावाचा स्थानिक गुंड मग ती शस्त्र वीरन नावाच्या दहशतवाद्याला विकतो. वीरन ती शस्त्र वापरून स्थानिकांना लुटतो. सोनं-पैसे जमा करून परत त्या जिवावर आणखी दारूगोळा खरेदी करतो. हे चक्र चालूच असतं. पण वीरनच्या एका बसवरील हल्ल्याने आणि त्यात त्याने केलेल्या नृशंस कत्तलीने मुंबई क्राईम ब्रँच जागी होते. वरून दबाव येतो आणि एसीपी अजय राठोडच्या टीमकडून याचा तपास चालू होतो. ही टीम बाला ठाकूरपर्यंत पोहोचण्याआधीच बाला ठाकूर चंद्रपूरमधून पसार होऊन मुंबईला सुलतान नावाच्या त्याच्या सप्लायरकडे येतो. अजय राठोडची टीम तपास करतच असते. त्यात शस्त्रांची रसद थांबल्यामुळे चिडलेला वीरन बाला ठाकूरला शोधत मुंबईत येतो. वीरनला पुढचा पुरवठा देण्याचं मान्य करून बाला ठाकूर आणि सुलतान अजय राठोडच्या हातात सापडतात. सुलतान पळून जाण्यात यशस्वी होतो. अजय राठोड या प्रकरणाचा माग काढत त्याचा आवडता पाकिस्तानी गझल गायक आणि मित्र गुलफाम हसन यांच्यापर्यंत पोहोचतो. अजय राठोड आणि टीमच्या लक्षात येतं की ही साखळी मामुली नसून पाकिस्तान ते भारतातली छोटी गावं आणि अनेक असंतुष्ट लोकांच्या संघटना यांना जोडणारं एक मोठं नेटवर्क आहे आणि याला भिडायला अजय आणि त्याच्या सहकार्यांसारखे सरफरोशच हवेत.
नामावलीपासूनच ‘सरफरोश’ थेट विषयाला हात घालतो. सोनू निगमच्या आवाजात ‘जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो’ या कव्वालीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित उंटांना वापरून हत्यारांची केलेली छुपी घुसखोरी, मग ती मिरचीच्या पोत्यांमध्ये भरून मुंबई ते चंद्रपूर अशी वाहतूक आणि मग वीरनने केलेलं थरकाप उडवणारं हत्याकांड. ‘सरफरोश’ प्रेक्षकांना जे गुंतवून ठेवतो ते सीमाच्या (सोनाली बेंद्रे) उत्फुल्ल वावरातही ती पकड अजिबात सुटत नाही. याचं श्रेय पटकथाकार जॉन मॅथ्यु मथान, हृदय लानी, पथिक वत्स यांना. जॉनने १९९२पासून या विषयावर काम चालू केलं होतं. म्हणजे १९९३चे मुंबई स्फोट आणि जगभरासह भारतात पसरत असलेली दहशतवादाची मुळं त्याने व्यवस्थित बघितली असावीत. त्या शिवाय इतकी सशक्त आणि बारकावे टिपणारी कथा, पटकथा जवळपास अशक्यच वाटते. ‘सरफरोश’ हा पहिला बॉलिवुड मेनस्ट्रीम सिनेमा असावा ज्यात दहशतवादाचं नेटवर्क इतक्या वास्तववादी पद्धतीत उलगडून दाखवलं असावं.
निव्वळ दहशतवादच नव्हे तर ‘सरफरोश’ पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रकाश टाकतो. तोवर भ्रष्ट यंत्रणा म्हणून पोलीस आणि राजकारणी यांचं नेक्सस दाखवणार्या सरधोपट हिंदी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर एसीपी अजय राठोड आणि त्याचं जाँबाझ पथक बघणं हा एक सुखद बदल होता. आधी म्हटल्याप्रमाणे ‘सरफरोश’च्या पटकथेची खुबी ही आहे की प्रेक्षकांचा मानसिक प्रवास राठोड उकलत असलेल्या केसमध्ये राठोडच्या पथकाच्या सोबतीनेच होत राहतो. अगदी सुरवातीला बाला ठाकूरच्या चंद्रपूरच्या घरी मुंबई क्राइम ब्रँचने टाकलेला छापा असो किंवा इन्स्पेक्टर सलीमने सुरुवातीला केलेला गँगस्टर राजनचा पाठलाग असो. सरफरोशची पटकथा सरळसोट असूनही अभ्यासावी अशी आहे, कारण एखाद्या गोष्टीचा पोलिसांना जसा क्लू मिळतो तसाच प्रेक्षकांनाही. कुठेही एखादी गोष्ट प्रेक्षकांना धक्का म्हणून येत नाही. फक्त आमीर खान याचं एसीपी अजय राठोड असणं. अर्थात तोही फार मोठा धक्का असा नाही. नायक आमीर आहे म्हटल्यानंतर तोच एसीपी राठोड असणार हे आलंच. याआधी आमीरने आशुतोष गोवारीकरच्या ‘बाजी’मध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. ‘बाजी’ फारसा चालला नव्हता आणि आमीर पोलीस शोभत नाही अशी त्यावेळी चर्चाही झाली होती. दिग्दर्शक जॉनवर मात्र ‘बाजी’च्या आमीरने उभ्या केलेल्या अमर दामजीचा प्रभाव होता असं त्याने एका ठिकाणी म्हटलेलं आहे.
म्हणूनच ‘सरफरोश’मध्ये आमीर खानची एंट्री एका साध्याशा प्रसंगात होते. अजय त्याच्या आवडत्या गायकाच्या म्हणजे गुलफाम हसनच्या कार्यक्रमात जातो, तिथे तो सीमाला पाहतो आणि मग त्याचा दिल्लीचा भूतकाळ आपल्याला दिसतो. त्याच्या कुटुंबावर कोसळलेली परिस्थिती कळते आणि मग पुढच्या प्रसंगात आपल्याला अजय राठोड एक तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून दिसतो. हिंदी चित्रपटात एरवी दिसणार्या पोलीस अधिकार्याच्या स्टायलिश एंट्रीला किंवा एकंदरीतच स्टाईलबाजीला इथे काट दिलेला आहे. हेच नव्हे तर एका प्रसंगात अजय म्हणतो, ‘आयपीएस बनने के लिए जी तोड़ मेहनत की है मैंने. आयएएस के लिये चुना गया था, लेकिन मैंने आयपीएस चुना. क्योंकि हर मुजरिम को मैं कानून के सामने भिखारी की तरह देखना चाहता हूं.’ लेखक-दिग्दर्शक एखाद्या गोष्टीला किती समर्थपणे मांडू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.
खरं तर चित्रपटातले सगळेच प्रसंग मोजून-मापून लिहिल्यासारखे आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक प्रसंग इतका उठावदार आहे की ‘सरफरोश’ हा एक असा चित्रपट आहे ज्यातला कुठलाही प्रसंग स्टँड अलोन ठरवावा इतका रंजक आहे.
‘सरफरोश’चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या वेळेपर्यंत हिंदी चित्रपटात होणारं हिंदू-मुस्लिम भाई-भाई हे उथळ आणि पलायनवादी चित्रण न करता दिग्दर्शक जॉन भारतीय मुस्लिम तरुणांचा दहशतवाद आणि गुन्हेगारीसाठी धर्माच्या नावे होणारा गैरवापर, त्यामुळे भारतीय मुसलमानांची होणारी कुचंबणा, संताप, नेहमी संशयाच्या परिघात उभं केलं जाणं या मुद्द्यांना थेट भिडतो. यातला स्मगलर हाजी हा इन्स्पेक्टर सलीमला जाळ्यात ओढून घ्यायला म्हणतो, ‘मुसलमान होकर काफिर का साथ दे रहे हो मियां.’ आणि त्यावर सलीम त्याला ‘तुम गद्दार हो, तुम लोगों की वजह से कुछ लोगों को पूरी कौम को बदनाम करने का मौका मिलता है,’ असं सुनावतो. अजय राठोडबरोबरच्या एका प्रसंगात, अगदी खोलात न जाता आणि क्लिष्ट न होता इन्स्पेक्टर सलीम या पात्राकडून दिग्दर्शक म्हणवून घेतो, ‘फिर किसी सलीम से मत कहना ये मुल्क उसका घर नहीं हैं साहब.’ हा एकंदरीतच प्रसंग अतिशय सुरेख भिडतो त्यातील संवादांमुळे. हृदय लानी आणि पथिक वत्स यांची संवादलेखक म्हणून कामगिरी लाजवाब आहे. शेवटच्या प्रसंगातले अजय राठोड आणि गुलफाम हसन यांच्यातले संवाद नुसत्या टाळ्या घेणारे नाहीत तर दहशतवाद, धर्म, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, फाळणी अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करतात. हेच नव्हे तर, ‘क्या ठाकूर, तुझे कितनी बार बुलाया, तू आता ही नहीं,’ यासारख्या साध्या ओळी तेव्हा फार लोकप्रिय झालेल्या. अजूनही आहेत.
‘सरफरोश’च्या खूप आधीच आमीर खानने एका वेळी एकच चित्रपट हे बॉलिवुडसाठी अनोखं असणारं धोरण अवलंबलं होतं. पण ‘सरफरोश’नंतर त्याच्या चित्रपटांत एक बदल दिसून येतो. तो म्हणजे नायक आमीर हाच सर्वेसर्वा नसणं. जसं ‘सरफरोश’मध्ये इन्स्पेक्टर सलीम, यादव, बज्जू, कदम हे एसीपी अजय राठोडचं पथक हे राठोडइतकीच महत्त्वाची कामगिरी बजावतं, तसंच आमीरच्या नंतरच्या ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’मध्ये आमीरने सहकलाकारांना समान महत्त्व दिल्याचं दिसतं.
चित्रपटाची गुंतागुंतीची पटकथा संकलित करून मांडणं फार मोठं काम होतं आणि संकलक जिथू मोंडलने ते अप्रतिम केलेलं आहे. हीच गोष्ट सिनेमॅटोग्राफर विकास सिवारामनबद्दल म्हणता येईल. चित्रपटाचा गंभीर आणि गडद टोन रंगसंगती आणि प्रकाशयोजनेतून साधलेला दिसून येतो. मात्र अजय आणि सीमा यांच्यातल्या हळुवार, गमतीदार प्रसंगात हेच रंग चित्रपटाची कलर पॅलेट न सोडता खुलताना दिसतात. ‘जो हाल दिल का इधर हो रहा है’ या गाण्यात ओल्या हिरव्याकंच निसर्गात, चिंब भिजलेले आमीर आणि सोनाली या गाण्याला हिंदी चित्रपटातल्या सर्वोत्तम देखण्या गाण्यांमध्ये नेऊन ठेवतात. दिग्दर्शक आणि छायाचित्रणकाराची कल्पकता म्हणजे या गाण्यात आमीर आणि सोनालीकरता वापरलेले कपड्यांचे लाल, निळा, पिवळा असे सॉलिड कलर्स. कारण हे स्वप्नदृश्य अजय राठोडसारख्या पोलिसी अधिकार्याच्या मनातलं आहे. त्यामुळे बेसिक कलर्स आणि बेभान, भन्नाट निसर्ग यात हे गाणं अविस्मरणीय असं चित्रित झालेलं आहे.
चित्रपटाचं संगीत ही एक जमेची बाजू झालेली आहे, कारण त्यावेळी अगदी फॉर्मात असलेले जतीन-ललित. ‘जिंदगी मौत ना बन जाए’, ‘जो हाल दिल का’, ‘इस दिवाने लडके को’ या गाण्यांनी ‘ये जवानी हद कर दे’ला झाकोळलं असलं तरी त्या वेळच्या डान्स बार संस्कृतीमध्ये हे गाणं अनेकांचं पसंदीदा होतं आणि जगजीत सिंह यांच्या आवाजातील ‘होश वालों को खबर क्या’बद्दल काय बोलावं? आजही ही गझल अनेकांच्या हृदयात सुलगत असेल. ‘हम लबों से कह ना पाये, उनसे हाले दिल कभी’ अशी हालत असणारे अनेक अजय राठोड नव्वदच्या काळातल्या तारुण्याला आठवत म्हणत असतील हे नक्की.
आमीरने यातला अजय राठोड अतिशय सुंदर आणि संयत उभा केलेला आहे. सीमाबरोबर बुजलेला अजय, गुलफाम हसनसमोर अगदी फॅन बॉय अजय, कुटुंबासोबत अगदी नॉर्मल अजय आणि कर्तव्याकरता कठोर एसीपी अजय राठोड ही सगळी रूपं आमीरने सहज व्यक्त केली आहेत. लहान चणीच्या आमीरने देहबोली, आवाज यावर केलेली मेहनत त्याला एकाही क्षणी अजय राठोडपासून वेगळं करत नाही. नसीरुद्दीन शाह यांचा गुलफाम हसन टिपिकल पाकिस्तानी खलनायक नाही. भारतातून फाळणीच्या वेळी इथली हवेली, इथली हुकूमत सोडून पाकिस्तानला परागंदा व्हायला लागण्याचं, कुटुंबाच्या वाताहातीचं दुःख त्याला छळते आहे. मात्र त्याचा बदला घेताना तो ‘तुम्हारी आनेवाली नस्लें इस दर्द को भुगतेंगी’ म्हणतो तिकडे तो माणूस म्हणून बाद होतो. नसीर साहेबांनी शेवटच्या प्रसंगात संवादात आणलेला चिरका सूर अफलातून आहे. गुलफामचा कलाकार म्हणून असलेला उमदा मुखवटा फाडणारा तो सूर आहे. चित्रपटाचा गंभीरपणा हलका आणि सुंदर केलाय सोनाली बेंद्रेच्या सीमाने. डोन्ट माइंड हे तिचं पालुपद तिच्या वावराइतकंच गोड आहे. मुकेश ऋषी या खलनायक म्हणून कंटाळवाण्या भूमिका मिळणार्या नटाला इन्स्पेक्टर सलीम हे लेखक-दिग्दर्शकाने जबरदस्त लिहिलेलं पात्र रंगवायला मिळालेलं आहे आणि मुकेश ऋषीने ते चोख पार पाडलं आहे. बाला ठाकूर केलेले राजेश जोशी दुर्दैवाने फार लवकर अपघाती मृत्यू पावले. या चित्रपटात त्यांचे थोरले बंधू मनोज जोशी यांनीही भूमिका केली आहे. एकंदरीत अजय राठोडच्या पथकातले अधिकारी सगळेच उत्तम. फटकाच्या छोट्या भूमिकेतल्या कलाकार आणि त्याचं ‘आसमान में लाखो तारे’ हे गाणं म्हणणं ही फार लोकप्रिय झालेलं होतं तेव्हा. इतर भूमिकांमध्ये स्मिता जयकर, आकाश खुराना, सुकन्या मोने, गोविंद नामदेव, प्रदीप रावत, अखिलेंद्र मिश्रा जमले आहेत. त्या वेळचा नवोदित नवाजुद्दीन सिद्दिकी एका गमतीदार तर दिवंगत सुरेखा सिक्री ह्या एका सुंदर भावपूर्ण प्रसंगात दिसतात.
‘सरफरोश’चा एकंदर पसारा, पात्रं आणि अनेक पातळ्यांवर घडणारी कथा पाहता भारतीय मुख्य धारेतल्या फार कमी चित्रपटांनी हे धाडस करून यशस्वी होण्याचा मान पटकावलेला आहे. ज्या वेळी हा चित्रपट आला तेव्हाचा प्रेक्षक आधी म्हटल्याप्रमाणे मसाला आणि मारधाड चित्रपटांना सरावला होता, म्हणूनच ‘सरफरोश’ कितपत टिकेल याची रास्त शंका मेकर्सना होती. पण ‘सरफरोश’ने लोकांना बांधून ठेवलं. चित्रपट वर्ड ऑफ माऊथने जास्त चालला. सिनेमागृहाच्या बाहेर पडल्यानंतर लोकांच्या लक्षात राहिला. नुसतं तेवढंच नाही तर बर्याच तरुणांवर सकारात्मक परिणामही केला. आयपीएस आणि मुंबई पोलीस यांची प्रतिमा उंचावण्याचं काम केलं. देश‘भक्ती’पेक्षा देशकर्तव्य यावर लक्ष केंद्रित करणार्या लेखक-दिग्दर्शक जॉन मॅथ्यु मथानच्या ‘सरफरोश’मध्ये प्रत्येक प्रसंग वाखाणण्यासारखा आहे. मात्र दोन प्रसंग इथे नमूद करायलाच हवेत.
एसीपी अजय राठोडवर दुसर्यांदा हल्ला झालाय तोही त्याच्या घराखाली. पायाला झालेली इजा घेऊनच तो टीमबरोबर राजस्थानला जायला निघाला आहे. जिवाला धोका तर आहेच. त्याची आई त्याला अजिबात सोडत नाहीये, कारण तिचा मोठा मुलगा, अजयचा थोरला भाऊ आधीच दहशतवाद्यांकडून मारला गेलेला आहे. अजयच्या वडिलांना लुळं करून फेकण्यात आलेलं होतं. मात्र अजय या परिस्थितीतही पोलीस अधिकारी बनला आहे. आईच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून तो बॅग भरून निघाला आहे. इतक्यात त्याचे वडील आरतीची थाळी घेऊन त्याला सामोरे येतात. त्याला तिलक लावतात. एखाद्या युद्धावर जाताना क्षत्रिय लोकांमध्ये असलेली परंपरा. त्याच्या वडिलांना बोलता येत नाहीये. त्याचं कारण म्हणजे दहशतवाद्यांना न जुमानता एकेकाळी त्यांनीही हिम्मत दाखवली होती. आज त्यांचा दुसरा मुलगाही दहशतवादाचा मुकाबला निर्भीडपणे करतोय याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. ‘सरफरोश’ या शब्दाचा अर्थ विदित करणारा हा प्रसंग.
दुसर्या प्रसंगात पाय मोडलेला अजय हॉस्पिटलमध्ये रूममध्ये आराम करतोय. पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेने त्रस्त झालेला स्मगलर हाजी भाई अजयच्या रूममध्ये शिरतो आणि दिवा बंद करून अजयला धमकी द्यायला लागतो. शांतपणे ऐकत असलेला अजय अचानक हाजीवर झेप घेतो. भेदरलेला हाजी आणि त्याचा साथीदार अजयला लाथा मारून कशीबशी सुटका करून घेऊन पळून जाण्यात यशस्वी होतात. उठून चालण्याची ताकद नसलेल्या अजयने तोवर मजबूत पकडीने हाजीला चांगलाच आवळला होता. हाजी पळून गेल्यावर कॉरिडॉरमध्ये पडलेला अजय ते पळालेल्या दिशेकडे म्हणजे कॅमेराकडे बघतो… आणि …हसतो.
देशासाठी, इथल्या लोकांसाठी, समाजासाठी जिवाची पर्वा न करणार्या माणसाचं…
ते वेडं आणि हट्टी हसू…
उसी को सरफरोश कहते हैं.
कट इट!
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)