टोमॅटो… वीस रुपये जाळी खुडणीची मजुरी + वीस रुपये जाळी वाहतूक. (एक जाळी : २० किलो). एकूण खर्च चाळीस रुपये. मार्केट यार्डात भाव मिळतोय फक्त वीस रुपये जाळी. म्हणजे रुपया किलो. याचा अर्थ वीस रुपये प्रति जाळी खिशातून घालायचे, माल विकायला. थोडक्यात, दोन रुपये किलोमागे खर्च आणि भाव मिळणार एक रुपया किलो. यात मशागत, बियाणे, औषध फवारणी, ड्रिप, प्लास्टिक कागद हा खर्च अजिबात पकडलेला नाही. काय करायचे शेतकर्याने? येवला तालुक्यात शेतकरी अक्षरश: रस्त्यावर टोमॅटो फेकून देत आहेत. काल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दीड लाख जाळी आली होती विक्रीला. कारले व काकडी यांची तीच परिस्थिती आहे. शेतकरी अक्षरश: कोलमडून पडलाय व कर्जबाजारी झालाय. शेतीत राम राहिला नाही हेच खरे!
आमचे द्राक्षमळे म्हणजे फक्त भूषण आहे. १९८० साली चौदा पंधरा रुपये किलो द्राक्षं मिळत. आजही तोच भाव आहे. उत्पादनखर्च प्रचंड वाढला आहे. पूर्वी गावात छोटे व्यापारी येत, कलकत्ता, बिहार भागातील पाचदहा लाख रुपये रोकडा घेऊन. बांधावरच रोख पेमेंट करून माल उचलायचे. थोडंफार भागायचं. नोटबंदीपासून तेही उन्मळून पडले. एखाददोन व्यापारी येतात, त्यांच्यामागे अख्खा गाव फिरतो, आमचा माल उचला म्हणून. मग तोही पडेल भावात मागतो. लोकांनी वैतागून बागा तोडायला सुरुवात केलीय.
फूलशेतीचीही तीच परिस्थिती. सव्वा लाख रुपये गुंठा पॉलिहाऊसचा खर्च. म्हणजे एक एकराचे पॉलिहाऊसला पन्नास लाख खर्च. सगळं कर्जावर. अनुदान बंद आहे. वीस लाखाची शेती आणि तीस लाख कर्ज असा सगळा प्रकार आहे. करोनापासून सगळा फुलांचा एक्स्पोर्ट बंद आहे. पॉलिहाऊसवाले तर संपलेच पण बँकाही भिकेला लागल्यात. यात मुख्यतः देना बँक आहे. बँकेचे अधिकारी ओटीएससाठी विनवण्या करत आहेत. परंतु सेटलमेंट करायला कोणाकडेच खडकूही नाही. शेतीचे अर्थशास्त्र पूर्णपणे बिघडले आहे. अर्थात ठिकाणावर होतेच कधी. पैसा किती येतो किती जातो कसलाच हिशोब नाही.
पूर्वी आमच्यासारखे मोठे शेतकरी पारंपरिक पिके घेत असत. गरजा कमी होत्या. भागून जायचं. आता पर कॅपिटा एक-दीड एकरचे मालक आहेत सगळे. वरवर ठीकठाक दिसतंय सगळं, पण कोणाकडेच रोकड नाही. अतिशय भीषण व भयावह परिस्थिती आहे गावाकडे. तरीही…
गावाकडे सगळे बार, ढाबे फुल्ल आहेत. देवळांचे बांधकामं, जीर्णोद्धार, सप्ते, सत्यनारायण पूजा, लग्न, बारशे धुमधडाक्यात चालू आहेत. याला लागणारा पैसा कुठून येतो, याचे उत्तर अमर्त्य सेन व मनमोहन सिंग यांना जरी आणून बसवले तरी ते शोधू शकणार नाहीत. सगळी रिकामटेकडी, रोजगार नसलेली तरूण मंडळी व्यसनाधीन आहे. व्यसन अंमली किंवा धर्माचे. आमची पिढी तशी भाग्यवान. विकायला जमिनी तरी होत्या. आताच्या पिढीकडे तेही नाही. गावोगाव बेरोजगारांचे तांडे विमल पुड्या खात पुढाऱ्याच्या मागे ‘… की जय’ करत फिरत आहेत, एकमेकांची टाळकी फोडत आहेत, केसेस अंगावर घेत आहेत. गलिच्छ राजकारणाला ऊत आलाय. तरूण पिढीला त्याची जाण नाहीये. जात व धर्माचे नावाने पोरांचे टाळके फिरलेय. या सगळ्या तरूण पिढीला शहरात येऊन हमाली कर, पानटपरी टाक, वडापाव विक पण गाव सोड हे सांगण्याची वेळ आलीय. कधीतरी त्यालाही हे कळतंय पण लगेच कोणीतरी ‘रामराम हो पाटील!’ अशी हाक मारतो किंवा आमदार याच्या खांद्यावर हात ठेवतो व हा जागीच वाकडा होऊन मकडतो व गावातच राहतो. हे सगळे बदलवण्यासाठी फारच द्रष्ट्या नेत्याची गरज आहे, अन्यथा विनाश अटळ आहे. आमचे आयुष्य संपत आलेय. पुढच्या पिढीच्या चिंतेने मन विषण्ण होते. भविष्यातील ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र विदारक असणार आहे.