त्याकाळी मी मुंबईत नव्हतो पण मुंबई माझ्यात होती. याचं सर्व श्रेय बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’ला. ‘रविवारची जत्रा’मुळे माझी व्यंगचित्रांची आवड जोपासली गेली. त्यातला बाळासाहेबांनी निर्माण केलेला गोबर्या गालांचा, लोकमान्य टिळक पद्धतीची भरघोस मिशी असलेला, उंच काळी टोपी घातलेला काकाजी हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी मला फार आवडायचा.
—-
माझं शालेय शिक्षण बुलढाणा जिल्ह्यात झालं. त्यातसुद्धा दोन गावांत झालं. पहिली ते पाचवी नांदुरा (तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा) तर सहावी ते अकरावी खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे झालं. खामगाव हे आमच्या भागातलं महत्वाचं शहर समजलं जातं. याचं कारण म्हणजे तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथं कोर्ट होतं. कोर्ट म्हटलं की मग वकील, त्यांच्याकडे येणारे पक्षकार, त्यांची कोर्टाच्या आवारातील लगबग वगैरे सर्वच आलं.
माझे वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांनी थोडी वर्षं इंग्रजांच्या आमदानीत तर उरलेली वर्षं प्रजासत्ताक भारतात नोकरी केली. तेव्हाच्या रेल्वेच्या नियमांप्रमाणे कर्मचार्यांच्या दर तीन ते पाच वर्षांनी बदल्या होत असत. मी सहावीत असताना आम्ही नांदुर्याहून खामगावला गेलो. याचा दुसरा आणि जास्त महत्वाचा परिणाम म्हणजे माझा मोठा अशोक ऊर्फ नाना आमच्यासोबत राहायला लागला. या विधानाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. मला समजल्यापासून तो कॉलेज शिक्षणासाठी खामगावच्या जी. एस. कॉलेजमध्ये शिकत होता आणि हॉस्टेलमध्ये राहत होता. आता आम्हीच खामगावला राहायला गेल्यामुळे तो आमच्यासोबत राहायला लागला. नाना म्हणजे आमच्या घरातला पहिला पदवीधर. शिवाय साहित्य, कला, संगीत वगैरे कमालीची रूची असलेला.
खामगावला आम्हाला सुरुवातीला रेल्वेचं क्वार्टर मिळाले नाही. म्हणून आम्हाला भाड्याच्या जागेत राहावे लागले. ती आमची जागा होती ‘सिव्हिल लाइन्स’ नावाच्या उच्चवर्णीय, उच्चवर्गीय वसाहतीत! सिव्हिल लाइन्सच्या अगदी जवळ कोर्ट असल्यामुळे आमच्या आजूबाजूला डोंगरे, देशपांडे, पंतवैद्य, ब्रह्मे वगैरे आडनावांचे आणि अशा आडनावांना साजेल असे उच्चार असलेल्यांचे बंगले होते. अशा सिव्हिल लाइन्समध्ये राहणं हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. इथूनच माझ्या भावविश्वात आणि जडणघडणीत ‘मार्मिक’चं महत्व काय, याची कथा सुरू होते.
माझा भाऊ अशोक घरात सर्वांचा लाडका. तो आईचा जास्त लाडका होता की वडिलांचा, याचा निर्णय अवघड होता. ही माहिती यासाठी की एरवी माझ्याशी केवळ डाफरल्यासारखे बोलणारे आणि माझा जवळजवळ एकही हट्ट न पुरवणारे वडील नानाचा मात्र एकही शब्द जमिनीवर पडू देत नसत. त्याच्यामुळेच आमच्या घरी दररोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि आठवड्याला ‘मार्मिक’ यायला लागला. शिवाय दर पंधरवड्याला फक्त माझ्यासाठी ‘इंद्रजाल कॉमिक्स’ची मराठी आवृत्ती.
सहावी ते अकरावी हा प्रत्येकाचा घडण्याचा काळ होता. माझ्यासाठी दर आठवड्याला येणारे ‘मार्मिक’ साप्ताहिक म्हणजे आनंदाचा ठेवा होता. ‘मार्मिक’चा अंक आला रे आला की मी आधी ‘रविवारची जत्रा’ बघत असे. त्यातला बाळासाहेबांनी निर्माण केलेला गोबर्या गालांचा, लोकमान्य टिळक पद्धतीची भरघोस मिशी असलेला, उंच काळी टोपी घालत असलेला काकाजी हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी मला फार आवडायचा. आर. के. लक्ष्मण यांच्या सामान्य माणसासारखा बाळासाहेबांचा सामान्य माणूससुद्धा अबोल होता. दररोज लक्ष्मण यांची व्यंगचित्रं आणि दर आठवड्याला बाळासाहेबांच्या कुंचल्याचे तिखट आणि कल्पक फटकारे. माझी व्यंगचित्रांबद्दलची गोडी इथूनच आकाराला यायला लागली. मग शि. द. फडणीस, ग. ल. ठोकळ, हरिश्चंद्र लचके, वसंत सरवटे हा पुढचा टप्पा गाठणे अवघड नव्हते. (मी सहावी की सातवी असताना नानाबरोबर पुण्याला गेलो असताना स. प. महाविद्यालयात भरलेल्या फडणीसांच्या ‘हसरी गॅलरी’चे प्रदर्शन बघून आलो होतो.)
आज एवढी वर्षं झाली पण ‘मार्मिक’मध्ये बघितलेली व्यंगचित्रं स्पष्ट आठवतात. एका वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. नाईकसाहेब पाईप ओढणारे. बाळासाहेबसुद्धा पाईप ओढत असत. बाळासाहेबांनी ‘मार्मिक’च्या कव्हरवर नांगराला जुंपलेली बैलजोडी दाखवली. पण नांगराच्या ऐवजी नाईकसाहेब ओढत असलेला पाईप दाखवला. यातली कल्पकता मला विलक्षण प्रभावित करून गेली. ‘रविवारची जत्रा’तील काही व्यंगचित्रांमध्ये संवाद असत किंवा व्यंगचित्रकाराची कॉमेंट असे. मला आठवतं की झेकोस्लोवाकियात (किंवा तत्सम नाव असलेला देश) काहीतरी राजकीय गडबड झाली होती. बाळासाहेबांच्या चित्रात एक खाष्ट सासू चकल्यांचं पीठ कांडताना तरूण सुनेला म्हणते ‘अगं, त्या झेकोस्लोवाकियासारखं कांडलं पाहिजे हे चकल्यांचं पीठ’.
‘रविवारची जत्रा’प्रमाणेच ‘मार्मिक’चं दुसरं आकर्षण म्हणजे शेवटच्या पानावर प्रसिद्ध होणारं ‘शुद्धनिषाद’ यांचं चित्रपट परीक्षण! नंतर अनेक वर्षं हे ‘शुद्धनिषाद’ कोण, याबद्दल कुतूहल होतं. अलीकडेच समजलं की शुद्धनिषाद म्हणजे श्रीकांत ठाकरे. ‘शुद्धनिषाद’ची चित्रपटांची समीक्षा हा और प्रकार होता. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये येणारी परीक्षणं वाचत होतो. शिवाय ‘दस्तुरजी रतनजी लायब्ररी’त जाऊन ‘रसरंग’ वगैरे ठिकाणी प्रसिद्ध झालेली परीक्षणंही वाचत असे. या सर्वात माझ्या लक्षात राहात ती ‘शुद्धनिषाद’ची परीक्षणं. मला त्यातल्या बोचर्या, खोचक शैलीचं जबरदस्त आकर्षण होतं. तेव्हा ‘कब? क्यू? और कहाँ?’ नावाचा हिंदी चित्रपट आला होता. यात धमेंद्र, बबिता आणि प्राण होते. चित्रपट रहस्यप्रधान जरी असला तरी ‘शुद्धनिषाद’च्या मते चित्रपटाचे कथानक भरकटले होते. पण हे एवढ्या साध्या शब्दांत सांगेल तो ‘शुद्धनिषाद’ कसला? त्याने परीक्षणाचे शीर्षक दिले : ‘कब? क्यू? और कहाँ?… जहां ले जाओगे वहाँ’.
अशीच एका वर्षी पावसाळ्यात मुंबईला डोळ्यांची जबरदस्त साथ आली. महापालिकेने लोकांना ‘गर्दीची ठिकाणं टाळा’ असा सल्ला दिला. आजच्या भाषेत ‘सोशल डिस्टन्सिंग’. शुद्धनिषादने एका चित्रपटाचे परीक्षण (चित्रपटाचं नाव आठवत नाही) करतांना महापालिकेच्या सल्ल्याचा वापर करून लिहलं की ‘लोकांनी हा सल्ला फार मनापासून पाळला. सिनेमागृहात शुकशुकाट होता.’
आज माझं मन ‘मार्मिक’च्या आठवणींत रमलं आहे. १९७०च्या दशकातल्या ‘मार्मिक’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या कारभारावर दर आठवड्याला एक सदर असायचं. या सदराचं शिर्षक होतं ‘भाटिया बागेतून’. या सदरामुळे मी मुंबईकर नसूनही मला मुंबईची बरीच माहिती झाली होती. तेव्हा मी मुंबईला एकदोनदा आलेलो होतो, पण पर्यटक म्हणून. आमचा एकही नातेवाईक मुंबईकर नव्हता. त्यामुळे माझी मुंबई म्हणजे फोर्ट, गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्सचे तारापोरवाला मत्स्यालय आणि गिरगाव चौपाटी. पण ‘भाटिया बागेतून’ हे सदर वाचत असल्यामुळे मला भांडुप, मुलुंड, कांदिवली, सायन वगैरे नावं पाठ झाली होती. मी १९८० साली मुंबईकर झालो. मला नोकरीनिमित्त अनेकदा फोर्ट, व्ही.टी. स्टेशन वगैरे भागात जावे लागत असे. असाच एकदा मुंबई महापालिकेच्या बाजूने जात असताना व्ही.टी. स्टेशनच्या अगदी बाहेर असलेलं वर्तुळाकार गार्डन दिसलं. त्याअगोदर मी हे गार्डन असंख्य वेळा बघितले होते, पण कधी आत जावं असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी मला या गार्डनच्या नावाची पाटी दिसली ‘भाटिया बाग’. मला अक्षरश: रोमांचित झाल्यासारखं वाटलं. लहानपणीचा जिगरी दोस्त भेटल्यासारखं वाटलं आणि मी त्या बागेत जाऊन मस्त भटकून घेतलं.
त्याकाळी मी मुंबईत नव्हतो पण मुंबई माझ्यात होती. याचं सर्व श्रेय बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’ला. ‘रविवारची जत्रा’मुळे माझी व्यंगचित्रांची आवड जोपासली गेली. नंतर पुण्याला आल्यावर, फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतल्यावर यथावकाश फर्ग्युसनच्या शेजारी असलेल्या ‘ब्रिटिश कौन्सिल’ लायब्ररीचा सभासद झालो आणि नियमितपणे ‘पंच’चे अंक चाळायला लागलो. मुंबईकर झाल्यावर चर्चगेटच्या अमेरिकन सेंटर लायब्ररीत जाऊन ‘न्यूयॉर्कर’च्या अंकांतील व्यंगचित्रं बघणं, या आनंदाच्या जागा निर्माण झाल्या. पु. ल. देशपांडेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की विनोदाने त्यांना ‘सेन्स ऑफ प्रपोर्शन’ची जाणीव झाली. तसंच मला व्यंगचित्रांबद्दल म्हणण्याची इच्छा आहे. मी बघितलेल्या असंख्य व्यंगचित्रांनी मला जीवनात प्रमाणाची जाणीव करून दिली आणि दु:खात फार वेळ मन गुंतवायचं नाही, असा धडा दिला, जो जीवनात अनेक प्रसंगी कामी आला. याची सुरुवात मात्र बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’पासून झाली. म्हणूनच मी ‘मार्मिक’बद्दल अतिशय कृतज्ञ आहे!
– अविनाश कोल्हे
(लेखक निवृत्त प्राध्यापक, लेखक आणि नाट्य समीक्षक आहेत.)