मीम्सकलेचे प्रेरणास्थान ‘मार्मिक’
‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचे ६१ वर्षात पदार्पण झाले हे समजलं. ऑनलाइन मीडियाचे प्रस्थ वाढण्यापूर्वी मराठी समाजमनाची नस पकडणारी जी मोजकी माध्यमं होती, त्यात ‘मार्मिक’ अग्रस्थानी राहिले आहे. सद्यस्थितीत लोकप्रिय असलेल्या मीम्सकलेचे प्रेरणास्थान ‘मार्मिक’सारखे अंकच आहेत. राजकारणातील व्यक्ती, घडामोडी हा ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांचा मुख्य विषय असला तरी त्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांवर केलेले मुके भाष्यही लक्षात राहते. संपादकीय लेखांसोबतच चित्रपट रसग्रहण, विविध क्षेत्रातील दिग्गजांवरचे लेख, अनुभवकथन असे राजकारणापलीकडील लेख आणि त्यांचं संकलन यामुळे मार्मिकचा अंक संग्राह्य असतो.
सहसा साठीनंतरच्या कालखंडात व्यक्ती असो वा संस्था, या जुन्या वाटू लागतात. मात्र ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे झालेलं परिवर्तन हा सुखद धक्का आहे. खरंतर ‘मार्मिक’ साप्ताहिकाची किंमतवाढ हा पहिला धक्का होता. मात्र ‘मार्मिक’च्या माध्यमातून लेख/चित्र कलेची चांगल्या दर्जाच्या छपाईसह मिळणारी मेजवानी पाहता हा मोबदला रास्त वाटतो.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात घडलेल्या अनपेक्षित आणि सुखद सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर ‘मार्मिक’चा चेहरापालट आणि नवीन-जुन्या बाजाचा अफलातून मिलाप ही माध्यम क्षेत्रातील एक सुखद बदल आहे. ‘मार्मिक’ आणि संपादकीय मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!
– नकुल चुरी, वसई
‘मार्मिक’चे सातत्य अभिमानास्पद!
कै. बाळासाहेब ठाकरेंनी ऑगस्ट १९६०मध्ये साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केलं. आता मार्मिकचा ६१वा वर्धापन दिन आहे. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना आहे.
‘माणूस’, ‘मनोहर’ अशी अनेक नामवंत साप्ताहिकं यथावकाश बंद पडली. अशा स्थितीत ‘मार्मिक’चं सातत्य नक्कीच अभिमानास्पद! सुदृढ लोकशाहीसाठी विविध विचारांची माध्यमं असलीच पाहिजे. म्हणूनच ‘विवेक’, ‘पांचजन्य’, ‘युगांतर’चं असणं महत्वाचं. माओ म्हणत असे तसं ‘लेट हंड्रेड फ्लॉवर्स ब्लूम!’
‘मार्मिक’ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!!
– अविनाश कोल्हे, मुंबई
‘मार्मिक’शी भावनिक नाते
माझे पहिले व्यंगचित्र १९९२ साली प्रथम ‘मार्मिक’मध्ये आणि नंतर ‘सामना’मध्ये प्रकाशित झाले… त्यानंतर मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटण्याचा योग आला… तेव्हापासून मी ‘मार्मिक’ परिवाराशी जोडला गेलो आहे… हे नाते भावनिक आहे. पंढरीनाथ सावंत सरांशी आमचे जवळचे संबंध होते.
नव्या ढंगात ‘मार्मिक’चा कायापालट झाला, ही खूप मोठी जमेची बाजू आहे. ‘मार्मिक’ची सेवा ‘मार्मिक’च्या टीमच्या आणि आमच्या हातून अशीच होत राहो, हीच साईचरणी व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी प्रार्थना…
– भरत सावंत, व्यंगचित्रकार, खोपोली
नव्या ‘मार्मिक’चा लेखक झालो!
‘मार्मिक’च्या वर्धापन दिनी मी अनेकदा षण्मुखानंदमध्ये कार्यक्रमात सहभागी झालो. सर्व ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक निर्माण झाली आणि आता नव्या ढंगातल्या ‘मार्मिक’मध्ये लेखनाचाही योग आला, याचा आनंद वाटतो.
खूप शुभेच्छा!
– अशोक नायगावकर, चेंबूर, मुंबई
स्वरूप आकर्षक झाले
‘मार्मिक’च्या ६१व्या वर्धापनदिनानिमित्त मनापासून भरभरून शुभेच्छा! ‘मार्मिक’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ जवळपास एकाच काळातले. दोन्ही अंक आवडते. ‘मार्मिक’ दर आठवड्याला घेत असेच. नव्या काळात अंकाचे रूप आकर्षक झाले आहे. साहित्य-चित्रे छान येऊ लागली आहेत. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
– ज्ञानेश सोनार, नाशिक