कोकणात आणि सांगली, सातारा, कोल्हापुरात पावसाने घातलेला विध्वंसक आणि प्राणघातक धुमाकूळ पाहिल्यानंतर तरी बेबंद विकासकामांना चाप बसेल, असं वाटतं का तुम्हाला?
– राजन परदेशी, पुणे
दुर्दैवाने नाही.
मराठी नाट्यक्षेत्रात प्रायोगिक रंगभूमी फार विचारप्रवर्तक काम करते. पण त्यातल्या लेखक, कलावंत, दिग्दर्शकांना व्यावसायिक यश कमावण्यासाठी ठराविक विषयांची चाकोरी स्वीकारावी लागते, हे चित्र बदलणार कधी?
– सुव्रत दामले, चिपळूण
आपण किती आणि कोणती नाटके पाहून हा निष्कर्ष काढला आहे त्यावर याचं उत्तर अवलंबून आहे. व्यावसायिक नाटक बघणार्या प्रेक्षकांची स्विकारार्हतेची चाकोरी जोपर्यंत बदलत नाही तोवर ते कसे बदलणार?
तुमच्या आजवरच्या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आणि कोणत्या भूमिकेने सगळ्यात जास्त समाधान दिलं?
– दिवाकर कदम, भायंदर, पूर्व
‘आजचा दिवस माझा’, ‘यलो’, ‘पोश्टर बॉईज’, ‘सायकल’, ‘विष्णुपंत दामले’, ‘मसाला’ अशी अनेक नावं घेता येईल. माझी छोटीशी भूमिका असली तरी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘देऊळ’, ‘निशाणी डावा अंगठा’ हे आवडलेले सिनेमे आहेत. समाधान म्हणाल तर तसं ते पूर्ण कधीच होत नसतं.
जो तुम्ही फक्कड बनवता आणि घरातले लोक मिटक्या मारत खातात, असा कोणता पदार्थ आहे?
– आशा दळवी, रामवाडी
गोडाचा शिरा, गाजर हलवा, खोबर्याची बर्फी, तिखटामध्ये आमटी, कारल्याची भाजी, मसालेभात.
मुलांना मराठी माध्यमात शिकवावे की इंग्लिश माध्यमात?
– वसंत बोरगावकर, निपाणी
मातृभाषेत
‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ असा प्रसंग तुमच्यावर ओढवला होता का? तेव्हा काय केलंत?
– अंबर झोटिंग, कल्याण
झालं की. पण तेव्हा मी असं केलं की ते मी कुणालाच सांगितलं नाही.
शहाण्याला शब्दांचा मार, तर मूर्खाला?
– रमण चित्राव, नाशिक
शिव्यांचा.
माझे दोन प्रश्न
१) महाराष्ट्रातलं तुमचं आवडतं शहर कोणतं आणि का?
कोल्हापूर कारण माझं ते जन्मस्थान आहे. आणि मुंबई कारण ते माझं जीविताचं स्थान आहे.
२) कोणत्या शहरात नाट्यप्रयोग सगळ्यात जास्त रंगतो?
– विनिता वर्तक, वसई
रंगवलेल्या.
सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे… मग हा पर्वत छातीवर घेऊन माणसाने जगावं तरी कसं हो?
– चिन्मय कोळंबकर, घोरपडी पेठ, पुणे
हसत हसत
तुम्हाला पुढच्या जन्मात काय बनायला आवडेल?
– अस्लम खान, गोवंडी
अवतारी पुरुष
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात, पुरुषांच्या तोंडात तो भिजतो?
– नीला पाध्ये, सानपाडा
अहो भिजणंच काय, तेवढीही संधी न देता तो ते गिळूनही टाकतात. त्याशिवाय का ते मूग गिळून गप्प बसतात?
आम्ही पदकं मिळवली की भारतीय ठरतो, एरवी आम्हाला चिंकी, नेपाळी, चिनी, कोरोना अशा नावांनी संबोधलं जातं, असं ईशान्य भारतातल्या एका भगिनीने म्हटलं आहे. आपण कधी सुधारणार?
– प्रिया सानप, भायखळा
लवकरच
चानू मीरा या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टरने २९व्या वर्षी वजन उचलणे हा स्त्रीत्वाचा अपव्यय आहे, तिने लग्न करून योग्य वयात मुलं जन्माला घालायला हवी होती, असा विचार सोशल मीडियावर वाचण्यात आला. तुमचं मत काय?
– वृंदा भगत, दासगाव
मी काही चांगल्या पुस्तकांची नावं सुचवतो. ती वाचण्यात वेळ घालवा.