चित्रांगदाचे चित्र अस्तित्वात आहे, पण ते शापित नाही!! ज्या कोणाला हे चित्र प्राप्त होईल तो त्रिभुवनाचा राजा होईल. अगणित संपत्ती, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेईल आणि वार्धक्य त्याला कधीही हात लावू शकणार नाही. आजवर ज्यांचा ज्यांचा संपूर्ण नाश झाला, तो या चित्राच्या प्राप्तीमुळे नाही, तर चित्र प्राप्त करण्याच्या हव्यासामुळे झाला आहे. काय आहे चित्रांगदाचे रहस्य?
—-
‘ताज आर्ट डीलर्स’ अशी भव्य पाटी वगैरे लावून चालू असलेल्या त्या दुकानाचा खरा धंदा प्राचीन वस्तूंच्या नावाखाली डुप्लिकेट वस्तू बनवून विकण्याचा होता, हे एक ‘ताज’चा मालक असलेल्या सरताजला माहिती होते आणि दुसरे त्याची प्रेमिका असलेल्या प्रांजलला. अर्थात प्रांजलला फक्त सरताजच्या पैशातच रस असल्याने तिने कधीही त्याच्या धंद्यात फारसा रस दाखवला नव्हता. तिच्या शॉपिंग अन हॉटेलिंगचा पैसा एकदा हातात पडला की, मग सरताज देखील तिला नको असायचा. अर्थात सरताज तिला काय आज ओळखत होता अशातला भाग नव्हता; पण प्रांजलची जादूच अशी होती की तिचे नखरे सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते. तसेही आता ५७-५८च्या वयात प्रांजलसारखी तरुण ‘हूर’ मिळणार तरी कुठे?
कर्नल डिकोस्टा येताना दिसला आणि सरताजच्या चेहर्यावर प्रचंड आनंद झळकायला लागला. गेले तीन चार महिने फारसा कुठे हात मारायला मिळाला नव्हता. पण आता डिकोस्टासारखे गिर्हाईक स्वतःहून चालत येत आहे म्हटल्यावर सरताजच्या डोळ्यासमोर नोटा नाचायला लागल्या होत्या. कर्नल डिकोस्टा नोकरीनिमित्ताने अनेक दुर्गम भागात, जंगल-दरी-खोर्यात हिंडलेला होता. सैन्यात सेवाकाल पूर्ण करून जगाचा अनुभव घेऊन झाला असला, तरी या वयात देखील कर्नल परी, राक्षस अन् जादूच्या दिव्याच्या दुनियेत वावरायचा. दुर्मिळ ग्रंथ, खडे, मणी अशा गोष्टींमध्ये त्याला प्रचंड रस होता. दुर्मिळ गोष्टीच्या नावावर सरताजने आजवर त्याला काय काय टोप्या घातल्या होत्या, त्या प्रत्येकीची एक सुरस कथा तयार झाली असती. अगदी सहा महिन्यांपूर्वीच रस्त्यात सापडलेला एक चमकता दगड सरताजने कर्नलला ‘इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये उत्खननात सापडलेला’ म्हणून पन्नास हजाराला विकला होता. वर ही गोष्ट उघड न करण्याचे वचन घेतले ते वेगळेच.
कर्नल समोर येऊन बसला आणि सरताजचा उत्साह सोड्यासारखा फसफसायला लागला. पण कर्नल आज काही मूडमध्ये दिसत नव्हता. खोल गेलेले लाल डोळे बहुदा जागरणाचा परिणाम असावेत, तोंडाला चक्क सकाळी सकाळी दारूचा वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इस्त्री न केलेले कपडे. कर्नलला या अशा अवस्थेत सरताज पहिल्यांदाच बघत होता. मामला नक्कीच काहीतरी वेगळा होता हे नक्की.
‘सरताज.. पाच लाख, दहा लाख, पन्नास लाख कितीही खर्च झाला तरी होऊ देत पण मला ती हवीये!’
कर्नल नक्की कशाबद्दल बोलत होता तेच सरताजला कळत नव्हते; मात्र वाक्यात आलेले आकडे मात्र अचूक त्याच्या कानांनी टिपले होते.
‘कशाबद्दल बोलताय कर्नल साहेब? सरताजच्या आवाक्यात असेल, तर सरताज तुम्हाला अल्लादिनचा जादूचा दिवा देखील आणून देईल, हे तुम्हाला माहितीच आहे!’
‘त्यासाठीच मी तुझ्याकडे आलोय सरताज! मला ‘चित्रांगदा’ हवीये… यात जिवाचा धोका आहे, आयुष्य बरबाद होण्याचा धोका आहे हे मी सगळे जाणतो. पण मला ती हवीये.. मला ‘चित्रांगदा’ हवीये! कोणत्याही किमतीत हवीये!’
‘मला समजेल असे सांगाल का?’
कर्नलने एक दीर्घ श्वास घेतला आणि ते खुर्चीवर रेलले.
‘सरताज, तुला हिंदू धर्माची कितपत माहिती आहे मला कल्पना नाही. पण जशा तुमच्याकडे जन्नत, हूर संकल्पना असतात, तशा हिंदूमध्ये स्वर्ग, अप्सरा, गंधर्व अशा नानाविध कल्पना आहेत. महाभारत काळात दोन चित्रांगद होते. एक होता राजा शंतनूचा मुलगा आणि दुसरा गंधर्वांचा राजा. दैव देखील कसे खेळ खेळते बघ, हा शंतनूचा मुलगा असलेला राजा चित्रांगद एक अत्यंत तेजस्वी योद्धा होता, पण तो गंधर्वांशी लढताना चित्रांगद गंधर्वाच्या हातून मारला गेला. या चित्रांगद गंधर्वाला सर्वात पहिला गंधर्व मानले जाते. या चित्रांगदची बायको म्हणजे ‘चित्रांगदा’. युद्धातल्या विजयानंतर चित्रांगद गंधर्वाला अत्यंत उन्माद चढला. पण त्याच वेळी स्वर्गापेक्षा देखील त्याला पृथ्वीवर रहिवास अधिक भावला. साहजिकच चित्रांगदच्या जोडीने चित्रांगदा देखील पृथ्वीवर वारंवार विहार करू लागली. तिच्या अद्भुत सौंदर्याने अवघ्या सृष्टीला भुरळ घातली होती म्हणायला हरकत नाही. या भुरळ पडलेल्यांपैकीच एक म्हणजे चित्रकार प्रसेन. हा प्रसेन खरेतर ऋषी जाबालींचा शिष्य. पण एकदा आश्रमाचे पाणी आणायला म्हणून बाहेर पडलेल्या प्रसेनने चित्रांगदेला पाहिले आणि तो स्वत:ला विसरला. तहानभूक हरवलेल्या प्रसेनला चित्रांगदेशिवाय काही सुचेना. अखेर तिच्या हाता-पाया पडून, तास तास तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्यात घालवून अखेर त्याने तिच्याकडून तिचे चित्र काढायची परवानगी मिळवलीच. गर्विष्ठ चित्रांगदेने त्याला एक अट मात्र घातली; जे प्राण्याचे कातडे तो पांघरत असे, त्याच्यावरच त्याने तिचे चित्र रंगवायला हवे. भान हरपलेल्या प्रसेनने ही अट देखील मान्य केली!’
कर्नल बोलत असताना भान हरपलेल्या सरताजला, त्याने खुर्चीशेजारचे कपाट उघडून बाटली कधी बाहेर काढली आणि पेग भरायला सुरुवात केली हे देखील कळले नाही. एक एक राउंड झाला आणि कर्नल पुन्हा बोलायला लागले…
‘शिष्य गुरूला विसरला असला, तरी गुरूचे शिष्यावरचे ध्यान कसे हटेल? जाबाली ऋषींना अखेर कुणकूण लागली आणि पहिल्या प्रहराचे मंत्रोच्चारण टाळून हळूच वनाकडे पळालेल्या प्रसेनच्या पाठीमागे त्यांनी कूच केली. काही अंतरावरच मंत्रोच्चाराने आणि पवित्र जलाने शुद्ध केलेले स्वत:चे वस्त्र अर्थात कातडे भूमीवर टाकून त्यावर चित्रांगदेचे चित्र रेखाटणारा प्रसेन त्यांना दिसला आणि आधीच कोपिष्ट असलेल्या जाबालींचा तोल ढळला. त्यांनी प्रसेनला शाप दिला! ‘जे चित्र तू बनवत आहेस, ते शापित बनेल. हे चित्र जिथे जिथे जाईल तिथे तिथे अनर्थ कोसळेल, जो हे चित्र बाळगेल त्याचा सर्वनाश तर निश्चितच!’ चित्रांगदेला देखील, ‘पृथ्वीवर तिने पुन्हा पाय ठेवल्यास तिचा दगडाचा पुतळा बनेल’ अशा शाप मिळाला.’
‘हे चित्र शापित असले, तरी त्या चित्राची; खरे तर त्यातल्या चित्रांगदेच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडतच गेली. असे म्हणतात की, जगातले सर्वात थक्क करणारे सौंदर्य कुठे असेल, तर ते त्या चित्रात आहे! आणि ते सौंदर्य मला मरायच्या आधी बघायचे आहे सरताज!!’
‘ते चित्र अजून अस्तित्वात आहे?’ आवंढा गिळत सरताजने विचारले.
‘हो! ते चित्र नष्ट करण्याचा प्रसेनने खूप प्रयत्न केला. ना ते पाण्याने नष्ट झाले, ना आगीने जळाले, ना शस्त्राने त्याचे तुकडे झाले. त्या चित्राने शेवटी प्रसेनला देखील वेडे केले आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्यानंतरच्या कथांचा स्पष्टपणे कुठे उल्लेख नसला, तरी हे चित्र पुढे दुर्योधनाच्या हाताला लागले आणि त्याचा कुलसंहार झाला असे मानले जाते. पुढे हे चित्र द्वारकेत पोचले आणि यादव आपापसात लढून मेले. असे मानले जाते की, हे सर्व पाहून स्वत: ऋषी जाबालींनी त्या चित्राला ‘रक्षाबंधन’ घातले आणि त्या चित्राला गंधमादन पर्वताच्या पायथ्याखाली पुरले. त्यानंतर मात्र या चित्राचा उल्लेख एकदम राजा विक्रमादित्याच्या काळात मिळतो. विक्रमादित्याने जगातील सर्व आश्चर्ये गोळा केली होती म्हणतात, त्यात हे चित्र देखील होते. मात्र या चित्राचा प्रताप माहिती असल्याने, त्याने ते कायम ‘रक्षाबंधनात’च ठेवले आणि या चित्राची जबाबदारी अनंगपाल या विश्वासू अमात्यावर सोपवली.’
‘पिढ्यान पिढ्या अनंगपालाचे वंशज हे गुपित प्राणापलीकडे जपत आले, आणि त्याचे शाप देखील भोगत आले. मात्र त्यांचा शेवटचा वंशज कुकर्मी निघाला आणि व्यसनांच्या गर्तेत कोसळला. त्याने आपल्याकडील वंशपरंपरागत चालत आलेल्या अनेक वस्तू रद्दीच्या भावात विकल्या. काही वस्तू जाणकारांच्या हातात पडल्या, तर काही मूर्खांच्या! या विकलेल्या वस्तूंमध्ये ते चित्र देखील आहे सरताज!’ कर्नलने वाक्य पूर्ण केले आणि सरताज आ वासून कर्नलच्या तोंडाकडे पाहत राहिला!
‘मी गेली अनेक वर्षे या अनंगपालाच्या वंशजांचा माग काढत होतो! दुर्दैवाने तो मिळाला, तोवर घात झालेला होता. पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, अनंगपालाचा शेवटचा वंशज मुंबईत मेला.’
‘म्हणजे ते चित्र आपल्या या मुंबईतच असण्याची सर्वात जास्ती शक्यता आहे?’ उत्साहाने सरताज बोलला आणि कर्नल साहेबांच्या चेहर्यावर एक मंद स्मित उमटले.
—
‘सरताज तो कर्नल एक महामूर्ख आहे आणि तू शतमूर्ख!!’ फणकार्याने प्रांजल म्हणाली आणि सरताजने ग्लासात बुडवलेली नजर वैतागाने वर केली. ‘आज चार महिने झाले, तू नुसता त्या चित्रामागे वणवण फिरत आहेस. असे चित्र खरंच अस्तित्वात तरी आहे का नाही याची तरी खात्री केलीस का? ज्या चित्राने केवळ बरबादी येणार आहे, त्या चित्रामागे तो कर्नलसारखा माणूस कशाला लागेल? वयाच्या जोडीने तुझी बुद्धी काम कधी करायला लागणार आहे?
प्रांजलच्या प्रश्नाने सरताज थोडासा गोंधळला. ‘बक्कळ पैसा कमावण्याची संधी’ यापलीकडे आपण या सगळ्याचा विचार केलाच नाही हे त्याला आता उमगले होते. गेले चार महिने तो नुसता वणवण करत होता. एकतर त्या चित्राची चौकशी आडून आडून करावी लागत होती. संपूर्ण माहिती देता येईल असा एकही विश्वासातला माणूस या धंद्यात त्याच्या ओळखीत नव्हता. सगळे काही एकट्यालाच करावे लागत होते. पण आता मात्र प्रांजलचे प्रश्न त्याला डाचू लागले होते. तिच्या विचारांचा भुंगा आता त्याच्या डोक्यात शिरला होता. पण अमिन तर सांगत होता की ‘कोणी एक अरबी शेख पण कोणत्याश्या चित्राची चौकशी करत हिंडतो आहे’ म्हणून.. नक्की समजायचे तरी काय?
सरताजसारखा ‘अधर्मी’ माणूस चक्क देवळाबाहेर अर्धा तास उभा असलेला बघून अनेकांच्या भुवया वर चढल्या नसत्या, तरच आश्चर्य! सरताजला देखील त्या नजरांची बोच, उपहास जाणवत होता, पण त्याचा नाईलाज होता. काम तितकेच महत्त्वाचे होते. काही वेळातच देवळाच्या दारातून एक गोरटेला, घारा मनुष्य लगबगीने बाहेर पडला. शोधक नजरेने इकडे तिकडे बघत असताना, त्याची नजर सरताजवर खिळली आणि तो ओळखीचे हसला.
‘बसा.. मला प्रोफेसर खान कालच बोलले की तुम्ही याल म्हणून. बोला कोणत्या संदर्भात माझी मदत हवी आहे तुम्हाला?’
‘शास्त्रीजी, आपल्यातले बोलणे आपल्यातच राहिले, तर खूप उपकार होतील तुमचे.’ शास्त्रीजी आश्वासक हसले आणि सरताजने पुढे सुरुवात केली, ‘मी हिंदू पुराणातला एक संदर्भ शोधतो आहे. त्याबद्दल आपण काही सांगू शकलात तर खूप मदत होईल माझी. खानसाहेब सांगत होते की, यासंदर्भात ज्ञान बाळगून असलेल्या देशात ज्या काही मोजक्या व्यक्ती आहेत, त्यातील तुम्ही एक आहात. त्यामुळे मी अत्यंत विश्वासाने तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहे.’
‘अशा कामात कोणतीही मदत करण्यास मी कायमच तयार असतो. माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या भल्यासाठी होणार असेल तर मला आनंदच आहे.’
सरताजने बोलायला सुरुवात केली आणि शास्त्रीजी शांतपणे लोडाला टेकले. सरताज सलग अर्धा तास बोलत होता आणि शास्त्रीजी मध्ये मध्ये मान डोलवत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. सरताज थांबला आणि शास्त्रींनी पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरला.
‘सरताज, पुराणातल्या गोष्टी पुराणातच राहिलेल्या बर्या असतात. नाही का? कोणी चिरंजीवी हनुमानाची गोष्ट सांगतात, कोणी अश्वत्थाम्याची. कोणी परीस शोधायला बाहेर पडतो, तर कोणी सोन्याची लंका. बर्याच गोष्टी आपणापर्यंत पोचतात, तोवर त्याचे संदर्भ बदललेले असतात, काही नाहीसे झालेले असतात, तर काही नवीन जोडले गेलेले असतात. आपण अशा कथा ऐकाव्यात, त्यातून जमेल तो बोध घ्यावा आणि सोडून द्यावे.’
‘पण म्हणजे असे चित्र अस्तित्वातच नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?’ सरताज देखील आता हट्टाला पेटला होता. अखेर त्याच्या चिकाटीला यश आले आणि शास्त्रीजी बोलते झाले..
‘सरताज जी घटना तुमच्यापर्यंत जी कथा पोचली आहे, ती अर्धवट सत्य आहे. असे चित्र खरेच अस्तित्वात आहे, पण ते शापित नाही!! ज्या कोणाला हे चित्र प्राप्त होईल तो त्रिभुवनाचा राजा होईल. अगणित संपत्ती, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेईल आणि वार्धक्य त्याला कधीही हात लावू शकणार नाही. आजवर ज्यांचा ज्यांचा संपूर्ण नाश झाला, तो या चित्राच्या प्राप्तीमुळे नाही, तर चित्र प्राप्त करण्याच्या हव्यासामुळे झाला आहे. खुद्द जगातील सर्वात श्रीमंत असलेला अरब ‘अल-जहाबा’ या चित्रासाठी ५० कोटी मोजायला तयार आहे असे माझ्या कानावर आले आहे. त्याचा माणूस दोनच महिन्यांपूर्वी माझ्याकडे येऊन गेला.’
—
सरताज सुन्नपणे समोर बसलेल्या कर्नलकडे बघत होता. काल शास्त्रीजींकडून आल्यापासून तो सुन्न होताच आणि आता समोर अत्यंत विचित्र रंगाच्या कातडीवर असलेल्या चित्राला घेऊन बसलेल्या कर्नलने त्याच्या सुन्नतेत अजूनच भर घातली होती.
‘मी शेवटी तिला प्राप्त केलेच सरताज! आता हिच्या दर्शनानंतर बरबादी देखील मंजूर आहे मला!’ कर्नल अक्षरश: जग जिंकल्याच्या उत्साहात होते.
‘तुम्हाला खात्री आहे, हे तेच चित्र आहे कर्नल?’
कर्नलने अत्यंत रागाने सरताजकडे बघितले आणि क्षणभर तो देखील दचकला. कर्नल तर कोणी काळजावर घाव घालावा असे पिसाळले होते. त्यांनी त्वेषाने सरताजसमोरची दारूची बाटली ओढली आणि त्या चित्रावर ओतली. सरताजला नक्की काय चालले आहे, ते समजायच्या आतच त्यांनी लायटर काढला आणि ते चित्र पेटवून दिले. त्यानंतर काही वेळाने समोरची पाण्याची बाटली घेऊन, ती आग शांत देखील केली. सरताज अक्षरश: डोळे फाडून समोरच्या चित्राकडे पाहत होता. चित्राला साधी आगीची झळ देखील बसलेली नव्हती.
‘आर यू मॅड सरताज? अरे आयुष्यातली बारा वर्षे या सुंदरीसाठी वेचली आहेत मी! हिमालयापासून श्रीलंकेपर्यंत अविरत प्रवास केलाय. ते काय हे चित्र मिळाल्यावर त्याचा सौदा करायला? मी तुझ्याकडे आलो हेच चुकले माझे!’
‘कर्नल साहेब मला तुमच्या प्रयत्नांचा आदरच आहे. पण तुम्हीच तर म्हणाला होतात, की तुम्हाला फक्त एकदा तिचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. मग ती तर आता पूर्ण झालीच आहे. आता या चित्राचा तुम्हाला उपयोग तरी काय? खुशीखुशीने आता हे चित्र मला विकून टाका, तुम्ही म्हणाल ती किंमत मला मंजूर आहे! अन्यथा हे चित्र मालकासाठी फक्त विनाश घेऊन येते हे तुम्ही जाणताच!’ वाक्य पूर्ण करता करता सरताजने खालच्या कप्प्यातील बंदूक काढून टेबलावर ठेवली.
—
कधीही बंद नसलेल्या शास्त्रींच्या घराला पहिल्यांदाच कुलूप पाहून सरताज थोडा चमकला. तसेही ते चित्र घरी आणून आज सात दिवस झाले होते. पण ना धन आले, ना कीर्ती ना कुठली चांगली बातमी. ना परत त्या अरबाच्या माणसाने संपर्क साधला होता. नाही म्हणायला, ती पनवती प्रांजल गेले काही दिवस कुठे नाहीशी झाली होती काय माहिती; पण निदान आता तिचा महिन्याचा खर्च तरी वाचला हेच समाधान होते. चित्र आणल्या दिवशीच, तो ते चित्र घेऊन शास्त्रींकडे धावला होता, मात्र शास्त्रींनी ते चित्र पाहायलाच काय, साधे घरात घ्यायला देखील त्याला नकार दिला होता आणि त्याच्या तोंडावर दार बंद करून घेतले होते. शास्त्रींचे बंद दार बघताना पुन्हा एकदा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. मनाशी काहीतरी विचार करून, त्याने घराच्या दिशेने मोर्चा वळवला. घाईघाईने त्याने चित्रांगदाचे चित्र गुंडाळले आणि कर्नलच्या बंगल्याकडे कूच केली.
‘मला कर्नल साहेबांना भेटायचे आहे.’ दारात उभ्या असलेल्या अनोळखी म्हातारीवर सरताज गुरकावला.
‘ते तर दोन दिवसांपूर्वीच हा बंगला, त्यांची गाडी सगळे काही आम्हाला विकून उत्तराखंडाला गेले. तिथे कोणा स्वामींच्या आश्रमात राहणार आहेत म्हणे आता,’ समोरची स्त्री म्हणाली, आणि सरताज मटकन दारातच बसला.
—
‘चिअर्स… चिअर्स फॉर द न्यू लाईफ!’
‘चिअर्स फॉर द न्यू लाईफ.. न्यू तीन कोटीचा बँक बॅलेन्स आणि माझ्यासारखी न्यू मैत्रीण!!’ खळखळत हसत प्रांजल ब्ाोलली आणि कर्नल देखील तिच्या हास्यात सामील झाले. हास्याची बरसात ओसरली आणि कर्नल गर्रकन मागे वळले, ‘पैसे दुधाबरोबर घेणार का, दुधानंतर शास्त्रीजी?’’ त्यांनी डोळे मिचकावत विचारले.
शास्त्रीजी नेहमीसारखेच मंद हसले, ‘पण काही म्हणा कर्नल, कथा खोटी असेल, चित्र खोटे असेल पण ते चित्र मालकासाठी बरबादी घेऊन येते हे मात्र खरे!!’ शास्त्रीजी बोलले आणि पुन्हा एकदा कर्नलच्या नवीन बंगल्याचा हॉल हास्याच्या दणदणाटात बुडाला…
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)