तुम्ही बॅडमिंटन खेळलाय का कधी? छातीचा भाता फुटेल एवढा दम लागतो. खेळून झाल्यावरही आपण कुत्र्याचं कसं पोट हलत राहतं तसे हलत राहतो. लिटरवारी घाम सांडून टीशर्टचा चिखल होतो. पोटर्यांमध्ये गोळे येतात. हात भरून येऊन जड होतात. खाली-वर, डावीकडे-उजवीकडे, मागेपुढे करून काही अवयव कायमसाठी ट्विस्ट होतात की काय अशी भीती वाटते. घोडा खिंकाळून उडी मारतो तशी उंच उडी मारून स्मॅशचा फटका लगावताना पाठीत उसण भरेल किंवा प्रतिस्पर्ध्याने खेळवण्यासाठी लगावलेला फटका परतावताना पाय स्ट्रेच झाल्यामुळे पुन्हा उठून उभं राहता येईल का अशी भीती मनात असते. बुटांमधले सॉक्स गच्चगोळ होतात. डोक्यावरच्या केसात घाम साकळून त्वचेला चिकटतात. हे सगळं चित्र डोळ्यासमोर तरळताना नको रे बाबा असा विचार मनात येतो. पण या चित्रात पी.व्ही. सिंधूचा प्रवेश झाला की हेच सगळं सुखावह वाटू लागतं.
१३० कोटी जनतेतून ऑलिम्पिक या क्रीडाविश्वाच्या सर्वोच्च स्पर्धेत सलग दोन स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आपली लोकसंख्या लक्षात घेता, कोणत्याही स्पर्धेसाठी शे-पाचशे स्पर्धक सहज असतात. यातून वाट काढत शहरात, परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात अव्वल व्हायचं. मग राज्यात बेस्ट व्हायचं. मग राष्ट्रीय विजेतेपद नावावर करायचं. ही मजल गाठेपर्यंतच बहुतांशांचा प्रवास गुंडाळायला येतो. खरं आव्हान विदेशी खेळाडूंचं असतं. कारण अनेक देशांमध्ये वस्तूंचं यंत्रवत उत्पादन होतं तसे खेळाडू घडवले जातात. अगदी लहानपणापासून त्यांना विशिष्ट सिस्टममध्ये टाकलं जातं. त्यांचं खेळणं मॉनिटर केलं जातं. सिस्टमने ठरवलेलं खावंप्यावं लागतं. त्यांनी सांगितलेल्या वेळापत्रकानुसार जगावं लागतं. तगड्या प्रशिक्षकांची फौज असते. फिजिओ, ट्रेनर असतात. तुम्हाला सगळं दिलंय, आता तुम्ही पदक आणायचं असा जणू अलिखित करार असतो. त्यामुळे नीट बघितलंत तर बॅडमिंटनमधले असंख्य खेळाडू भावनारहित भासतात. जिंकल्यावर किंचाळत, ओरडत नाहीत. त्यांचं वागणं एकदम सपाट असतं. स्पर्धा भरवलेली, मला जिंकणं क्रमप्राप्त होतं, मी जिंकले असं त्यांच्याकडे बघून वाटतं. अशा खेळाडूंविरुद्ध सिंधू गेली दहा वर्ष खेळतेय. बॅडमिंटनमध्ये स्पर्धांची रचना चार श्रेणींची असते. नवीन असताना इंटरनॅशनल चॅलेंज, इंटरनॅशनल सीरिज किंवा फ्युचर सीरिज असतात. दुसरा टप्पा असतो- ग्रँड प्री गोल्ड किंवा ग्रँड प्री. तिसरा टप्पा-सुपर सीरिज. चौथा टप्पा-जागतिक अजिंक्यपद. जसजसं खेळाडू एकेक श्रेणी वर सरकतो तसं चुका करण्याची संधी कमी होत जाते. कारण या स्पर्धांसाठी पात्र होणारे त्यांच्या त्यांच्या देशातले सर्वोत्तम खेळाडूच असतात. याव्यतिरिक्त सांघिक स्वरूपाच्या दोन स्पर्धा होतात- थॉमस/उबर चषक आणि सुदिरमान चषक. यापल्याडची स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. वर्षभर या स्पर्धांचं एक ठोस वेळापत्रक असतं. युरोप सर्किट आणि एशिया सर्किट अशी या कॅलेंडरची भौगोलिक विभागणीही झालेली आहे.
तुमचं शरीर खेळण्यासाठी, सरावासाठी आणि सततच्या प्रवासासाठी फिट हवं. जेवढं तुम्ही जास्त खेळता, तेवढं तुमच्या खेळातल्या उण्या गोष्टी प्रतिस्पर्ध्यांसमोर उघड होतात. त्यांचे प्रशिक्षक त्यानुसार गेमप्लॅन आखतात. तुम्ही तीच चूक केलीत तर पलीकडचे कोणीच कनवाळू नाहीत. बहुतांश स्पर्धा नॉकआऊट स्वरूपाच्या असतात. पाचपैकी तीन जिंकू असं निवांत नसतं. हरलं की घरी निघायचं. दुखापत झाली असेल किंवा दुखापतीतून सावरत असेल तर प्रतिस्पर्धी त्याबरहूकूम आक्रमण करतात. ते चिरडून टाकतात. घरी काही प्रॉब्लेम झालाय, नातेवाईक-मित्रमैत्रिणीत काही झालंय या गोष्टींना काहीच स्थान नाही. तुमचे इन्स्टावर किती फॉलोअर्स आहेत हेही विचारत नाहीत. बॅडमिंटनमध्ये रॅकेटच्या जोडीला शटल अर्थात फूल असतं. सुरुवातीला अमुक टू सर्व्ह म्हणतात. लव्ह ऑल-प्ले असं म्हणतात. फूल, लव्ह अशा सगळ्या रम्य कल्पना असल्या तरी हा खेळ शरीराची नस न् नस कामाला लावतो. २६व्या वर्षी सिंधूने दुसरं ऑलिम्पिक पदक जिंकलंय. रिओत पाच वर्षांपूर्वी पदक पटकावलं तेव्हा वय होतं जेमतेम २२. सिंधू आठव्या वर्षापासून खेळतेय. गेली दहा वर्ष म्हणजे १६व्या वर्षापासून वर उल्लेख केलेलं चक्र तिच्या धमन्यांमध्ये भिनलंय. त्याआधीही ती ज्युनियर सर्किटमध्ये खेळत होतीच. बाकी मुलंमुली मित्रमैत्रिणी, कॉलेज लाईफ पुरेपूर एन्जॉय करत असताना सिंधूने हा रस्ता पकडला. जे चविष्ट लागतं ते पौष्टिक नसतं यामुळे अनेक आवडीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पदक जिंकलं की महासागर लोटतो पण तिथपर्यंतचा रस्ता एकट्याने पार करावा लागतो. सिंधूच्या सुदैवाने तिचे आईबाबा व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. त्यामुळे या रस्त्याची त्यांना कल्पना होती. बिइंग अॅट अ राईट टाईम अॅट अ राईट प्लेस हे घडल्याने सिंधू योग्यवेळी गोपीचंद अकादमीत दाखल झाली. गोपीचंद यांच्या यंत्रणेतून तावून सुलाखून ती बाहेर पडली. गोपीचंद यांच्या कामाचा पसारा वाढल्यानंतर दक्षिण कोरियाचे पार्क तेइ सांग यांच्या मार्गदर्शनाखाली ती खेळतेय.
रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधू हा ब्रँड झाला. बेसलाईन व्हेंचर्स ही कंपनी सिंधूच्या व्यावहारिक कमिटमेंट पाहू लागली. एखादी कंपनी तुमच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चत असाल आणि कंपनीचा चेहरा तुम्ही असाल तर खेळताना जिंकण्याचं दडपण येणं साहजिक आहे. रिओत ते दडपण नव्हतं. टोकियोत ते होतं. मात्र तरीही सिंधूने पदक जिंकलं. उपांत्य फेरीची मॅच म्हणजे सुवर्ण-रौप्य पदकापासून तुम्ही एक पाऊल दूर असता. ती मॅच हरल्यावर कांस्यपदकासाठीची मॅच खेळायला लागणं नामुष्कीसारखं वाटू शकतं. अनेक मोठमोठे खेळाडू कांस्यपदकाच्या लढतीत गारद होतात. आधीच्या मॅचमधली हार ते पचवू शकत नाहीत. पण सिंधूने तो धक्का पचवला. तो दु:खाचा सल ताजा असतानाच ही मॅच खेळणं, त्यात तुफान आक्रमण करणं आणि पदक जिंकणं-म्हणून खास आहे. दहावी-बारावी, सीईटी, डॉक्टरकी, इंजिनिअरिंग, फारतर यूपीएससी याभोवती रेंगाळणार्या पालकांच्या चर्चांमध्ये ‘आमची ही बॅडमिंटन खेळते, त्यातच करिअर करायचं म्हणतेय’ ही परिस्थिती यायला बरीच वर्ष लागतील. परवाच नंदू नाटेकर गेले. त्यांनी रुजवात केली. प्रकाश पदुकोण आणि गोपीचंद यांनी ती मशाल तेवत ठेवली. सायना नेहवालने या मशालीने दीपस्तंभ प्रज्वलित केला आणि आता सिंधूने दमदार कळसाची वास्तूच रचली आहे. ‘गर्व से कहो सिंधू है’ हा मथळा आतापर्यंत छापायला गेला असेल. नाव विशेषनाम होण्याचा हा प्रवास अतीव परिश्रमाचा मात्र पराकोटीच्या समाधानाचा…