कोणताही स्त्रीवादी दृष्टिकोन हा कायम स्त्रीवर होणार्या सगळ्या जबरदस्तीला पुरुषसत्ताक समाज किंवा पुरुषी व्यवस्थाच कशी जबाबदार असते असं गृहितक मांडत असतो. पण ही व्यवस्था अशीच अबाधितपणे चालत राहावी यासाठी ज्या स्त्रिया इतर स्त्रियांवरही स्त्रीसुलभ वागणं लादत असतात त्याही तितक्याच जवाबदार आहेत.
—-
ब्रा वर ब्र पेक्षा अधिक बोलायची वेळ आली आहे… काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिचा ब्लॉग वाचनात आला. त्यानंतर तिने अनेक सामाजिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीही वाचल्या आणि पाहिल्या. हेमांगीचा मोठा आक्षेप आणि रोख स्त्रीच्या ब्रा घालण्यावरून किंवा न घालण्यावरून समाज जो हल्लकल्लोळ माजवतो त्यावरच होता.
तिने पुढे थोडं विस्ताराने सांगितले की कसं एकदा चपात्या बनवण्याचा व्हिडिओ ती बनवत असताना तिच्या क्लिवेजवरून वेगवेगळे लोक कमेंट टाकू लागले. त्यात काही पुरुषही होते, पण त्यात काही बायकांनीही अत्यंत हिडीस पद्धतीने तिच्या ब्रा न घालण्यावरून कमेंट सुरू केल्या. हेमांगीचे बहुतांशी आक्षेप बरोबर आहेत.
हेमांगीच म्हणते, ‘कितीतरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसतानाही ‘लोग क्या कहेंगे’ यासाठी त्या घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात, ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांना दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!’
स्त्रीसुलभ वागणं, स्त्रीसुलभ लज्जा, स्त्रीसुलभ हसणं आणि स्त्रीसुलभ कपडे घालणं याला आपल्याकडे फार महत्त्व आहे. समाजाच्या अशा वागण्याला सामाजिक पदर आहे तसाच मनोवैज्ञानिक पदर ही आहे. कोणताही स्त्रीवादी दृष्टिकोन हा कायम स्त्रीवर होणार्या सगळ्या जबरदस्तीला पुरुषसत्ताक समाज किंवा पुरुषी व्यवस्थाच कशी जबाबदार असते असं गृहितक मांडत असतो. पण ही व्यवस्था अशीच अबाधितपणे चालत राहावी यासाठी ज्या स्त्रिया इतर स्त्रियांवरही स्त्रीसुलभ वागणं लादत असतात त्याही तितक्याच जवाबदार आहेत.
आणि म्हणून हा मुद्दा हा केवळ हेमांगीने मांडल्याप्रमाणे लैंगिक राहात नाही. पुरुषांना कसेही कपडे घालायची मुभा दिली जाते आणि सगळी बंधनं आणि जोखडं बाईच्या वाट्याला का येतात हा तिचा प्रश्न बरोबर आहे. आपला समाज अजूनही सरंजामशाही दृष्टिकोन जाणीवेत आणि नेणीवेत खोल रुजवून आहे, हे याचं कारण आहे. स्त्रीची मांडणी ही ‘जर, जोरु और जमीन’ अशी ‘मालमत्ते’त केली जाते. पाणी आणि जमिनीसोबत त्याच प्रकारची मालकी रूढीवादी आणि परंपरावादी समाज स्त्रीवरही गाजवत असतो. स्त्री ही मनुष्य म्हणून वेगवेगळ्या नात्यांत वावरत असली तरी जेव्हा तिला परंपरावादी जाणीव-नेणिवेत पाहिलं जातं तेव्हा ती फक्त आणि फक्त मालकीचीच ‘वस्तू’च बनून जाते. एकदा एखाद्या व्यक्तीकडे मालकीची वस्तू म्हणूनच पाहिलं तर मग तिच्यावरच्या हक्काचा भंग होऊ नये या दिशेने सगळं वागणं-बोलणं होऊ लागतं. तिचं वागणं, बोलणं, दिसणं, तिचे अवयव हे सगळे खासगीत भोगण्याच्या वस्तू बनतात आणि तिच्यावर तथाकथित सोज्वळता लादली जाते. ज्यामुळे (इतर) कोणाच्या इच्छा आणि वासना चाळवल्या जातील, असं काही करू नका, असा आग्रह पुढे येतो. स्त्रियांच्या मासिक पाळीबाबतची साधनशुचिताही यातूनच निर्माण होते.
अखंड स्त्री ही भोगाची वस्तू म्हणून पाहिली जाते तेव्हा स्त्रीचे स्तन जे ती आई झाल्यावर बाळाच्या संगोपनासाठी असतं आणि एरवी तिच्या शरीरसौंदर्याचा एक आविष्कार असतात ते पुरुषीसत्तेच्या अधीन होतात, तेही अनेक स्त्रियांच्या संमतीने. जागतिक इतिहासात डोकावलं तर ब्रा हे कधी स्वातंत्र्याचं प्रतीक राहिलेलं आहे तर कधी गुलामीचं. मुळात पाश्चिमात्य जगातल्या बायका पंधराव्या आणि सोळाव्या शतकात कोर्सेट घालत असत. वक्षभाग उठावदार और डौलदार दाखवणारा हा वेष. पण सर्व बाजूंनी स्त्रीच्या सांगाड्याला दाबून टाकणार्या कोर्सेटमध्ये सतत राहिल्यामुळे अनेक बायका आजारी पडायला लागल्या. त्यानंतर ब्रा आली. ती वेशभूषा म्हणून रुजली ती पहिल्या महायुद्धात. त्या काळात युरोपात आणि अमेरिकेत अनेक बायका फॅक्टर्यांमध्ये काम करू लागल्या होत्या. तिथे युनिफॉर्ममध्ये काम करणं हे गरजेचं बनलं होतं. पुन्हा कॉर्सेट या पारंपारिक वेशभूषेतून मुक्तीचा मार्ग म्हणूनही नवीन गणवेषांकडे पाहिलं जात होतं. आणि म्हणूनच १९१८च्या आसपास ज्या ब्राच्या जाहिराती आधी फॅशन मॅगझिनच्याही पाठच्या पानांमध्ये लपवल्या जायच्या, ती ब्रा अनेक डिपार्टमेंट स्टोरमध्ये खुलेआम विकली जाऊ लागली. स्तनांना आधार देऊन ते सुडौल दाखवणं हे जाहिरातजगताचं पण एक निरागस आद्यकर्तव्य बनलं आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय, ब्राला जगात मान्यता मिळाली. ब्रा हा विक्टोरियन संस्कृतीचा पण भाग मानला जातो. पण या पारंपारिक ब्रिटिश समाजात स्त्रियांच्या सौंदर्याचा आविष्कार म्हणून याकडे पाहिलं जात नसे, तर स्त्रियांनी चारचौघांत कसं वागावं बोलावं या दिशानिर्देशाचाच तो भाग होता. किंबहुना म्हणूनच भारतातसुद्धा याच सोज्वळतेचा भाग म्हणून ब्रा घालणं हे रुजलं आणि फोफावलं.
ब्रा घालणं आणि स्तन झाकणं याला आपल्या देशात वर्गीय पदरसुद्धा आहे. त्रावणकोर राज्यात मागासवर्गीय महिलांना एकेकाळी स्तनांव्ारचा कर द्यावा लागत असे. त्या महिलांना स्तनांच्या आकाराप्रमाणे ती झाकण्याकरता कर द्यावा लागे. मुली वयात आल्या की कर गोळा करायला कर अधिकारी मागासवर्गीय मुलींच्या घरी जात असत आणि त्यांच्या स्तनांच्या आकाराप्रमाणे कर गोळा होत असे. या धोरणामुळे वर्गीय संघर्षसुद्धा या भागात फोफावला होता. खूप संघर्षानंतर हा कर केरळमधून मागे घेतला गेला. अमेरिकेत सत्तरच्या दशकात ब्रा न घालण्याचं एक आंदोलनही छेडलं गेलं होतं. इतिहास आपल्याला हेच सांगतो की कधी ब्रा हे स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं तर कधी स्त्रियांना सांस्कृतिक बंधनात अडकवण्याचं. पण ब्रा घालायची की नाही हे ठरवणं जाहिरात जगत, समाज, पुरुष, इतिहास या सगळ्यांपेक्षा स्त्रीनेच ठरवावं म्हणजे हा वादच कायमचा संपेल. हेमांगीने हे सवंग प्रसिद्धीसाठी केलेलं नाही तर अनेक मुली आणि स्त्रियांच्या जे मनात होतं तेच तिने मांडलं आहे.
जाता जाता केवळ एक आक्षेपवजा निरीक्षण नोंदवू इच्छितो. पुरुष मजा घेतात आणि निघून जातात, असंही हेमांगीने ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. वर दिलेल्या उदाहरणांमधून हे समजून येईल की वस्त्रशुचितेत स्त्रीला बांधण्यासाठी जितके पुरुष जबाबदार आहेत, तितक्याच त्यांच्या बोळ्याने दूध पिणार्या अनेक स्त्रियासुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे पुरुषांवर एकांगी टीका असू नये. बाईला स्वत:चं शरीर दाखवण्याचा आणि झाकण्याचा अधिकार आहे, ते कसं दिसावं आणि कसं दाखवावं यावरही स्त्रियांचाच अधिकार असावा. या विषयाच्या संदर्भातील भीड आणि लज्जेच्या जागी ‘माझं शरीर माझे निर्णय’ हा विचार अधिक रुढ होईल, तेव्हाच हे शक्य होईल. सध्या ब्रा बद्दल ब्र जरी उच्चारला तरी उल्लेख होतो तो सवंग लैंगिकतेचा, चावट विनोदांचा आणि वखवखलेल्या पुरषी नजरांचा. हा विषय निघताच हा काय चर्चेचा विषय आहे का, हे सवंग प्रसिद्धीसाठी सुरू आहे, तो व्हिडिओ तसा बनवायचाच कशाला, नवा सिनेमा येत असणार निश्चित, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजात उमटल्या होत्या. महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष उडवून सनसनाटी निर्माण करण्यासाठीच हा विषय उकरून काढण्यात आला आहे, असा शोधही लावला गेला होता. अतिशय संवेदनशील अशा विषयावर असल्या उथळ आणि भंपक चर्चेची जागा अत्यंत निकोप अशा वैज्ञानिक, सामाजिक आणि निर्मळ स्त्रीवादी दृष्टिकोनाने जरूर घ्यावी. हेमांगीने यासंदर्भात चर्चेला तोंड फोडलं, याबद्दल तिचे आभारच मानले पाहिजेत.
– केतन वैद्य
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि केविकॉमचे संस्थापक आहेत.)