(स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केली आणि या विद्यार्थ्यांच्या एकंदर मानसिक स्थितीबाबत सगळ्या समाजाला खडबडून जाग आली.. समाजमाध्यमांवर त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया..)
उशीर रात्रीपर्यंत
टीव्ही बघून झोपलेलं असतं, म्हणून,
तांबडं फुटायला
गावाला जाग येत नाही हल्ली.
पण कोंबडे आरवतात मात्र, सवयीने,
आणि काही पाखरे किलबिलतात,
यंत्रासारखी.
तेव्हाच, काही पोरे
धसकून जागी होतात झोपेतून
आणि
धपापून पळायला सुरू करतात
डांबरी सडकेच्या कडेने.
काही जोरबैठका काढतात,
वावरात गोठ्यासमोर;
किंवा बेघर मातीमाखल्या धुळकट रस्त्याकडेला.
काही उजेड पेटवतात
साठ पावरच्या बल्बाचा
आणि तारवटल्या डोळ्यांनी
रेटत राहतात
‘हमखास यशा’च्या पुस्तकाची पानं.
फार महागामोलाची नसतातच
गावातल्या पोरांची स्वप्नं-
कुणाला पोलीस व्हायचं आहे,
कुणाला तलाठी,
कुणी जरासं जास्त छाती फुगवून
जास्ती पुस्तकं वाचून
ज्यास्तीचा पैसा खर्चून म्हणतं,
औंदा
फौजदार होऊनच दाखवतो, गड्या!
नायब तहसीलदार
म्हणजे डोक्यावरून पाणी असतं पोरांच्या.
पोरांना नसतं व्हायचं
कलेक्टर, एका झटक्यात.
त्यांना नसते वखवख
लाल दिव्याच्या ताकदवान सनदेची.
पोरांना,
हाती लागेल ती फांदी
पकडायची असते फक्त,
पायातळीची भुई सुटून जाण्याच्या,
किंवा माथ्यावरचं आभाळ उडून जाण्याच्या आधी.
पोरं धसकून उठतात
तांबडं फुटायच्या आधीच,
पळायला चालू करतात, रस्त्याकडेने, जोरकस,
‘जगण्यासोबतच्या स्पर्धा परीक्षे’त तगून जाण्यासाठी.
पळता पळता
पोरांच्या छात्या धपापून येतात,
मोगलाई माजते छातीत पोरांच्या,
नि,
चौफेर मातलेली दिसत असते निझामी,
तेव्हाच्या अस्मानी-सुलतानीत
पोरं धावत सुटतात ‘रेस’च्या घोड्यांप्रमाणे.
पोरांना माहीत असतं,
की नसतं,
कुणास ठाऊक,
रेसमध्ये एकच घोडा जिंकत असतो अंतिमतः!
न जिंकणा-या
घोड्यांचं पुढे काय होतं?
पोरांच्या छातीत
भय दाटून येत असेल,
न जिंकलेल्या घोड्यांच्या जागी स्वतःला बघताना..
कोवळी पोरं-
तांबडं फुटायलाच धसकून उठतात, नि,
उर फुटेस्तोवर धावायला लागतात.
पोरं, रेसचा घोडा झालीयत..