काल दहावीचा निकाल लागला. एक अनोखा निकाल विद्यार्थी आणि पालक दोघांनीही अनुभवला.
परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला. त्यामुळे या निकालाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. परंतु परीक्षा न घेता निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहीसे थट्टेचे स्वरूपदेखील प्राप्त झाले आहे.
या मुलांना कोविड रिझल्ट, लॉटरी बॅच, मार्कांची खैरात अशी टोमणेबाजी सुरू असलेली देखील दिसते आहे. सोशल मिडीयावर अशा अनेक मीम्स, विनोद यांचा भडीमार होत आहे.
या वर्षी काय काठावरचेही पास झालेत त्यामुळे पेढे, पार्टी असले कौतुक करण्यासारखे असे काही नाही अशी कुजकट बोलणी करणारेही काही महाभाग आहेत.
आपलं काहीतरी चुकतंय मित्रांनो,
परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जातील याची काहीच पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना, पालकांना अगदी शिक्षकांनासुद्धा नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने तयारी केलीच होती. परंतु ऐनवेळी आरोग्याशी निगडीत एवढी मोठी अडचण आली व शासनाला मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा व परीक्षांबाबत अनेक निर्णय घ्यावे लागले.
पण यात मुलांची काय चूक? त्यांनी त्यांच्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. एकीकडे शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या होत्या. सर्वच गोंधळाचे वातावरण होते. ऑनलाइन अभ्यासात अनंत अडचणी होत्या.
शेवटी प्रत्यक्ष वर्गात बसून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेला अभ्यास आणि घराच्या एका कोपर्यात बसून मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर यापूर्वी कधीही न अनुभवलेला असा अभ्यास यामध्ये खूपच फरक आहे. (काहींना तर स्क्रीन देखील नशिबात नव्हती) तरीही मुलांनी जीव तोडून अभ्यास केला. शाळांनी तर विविध अंतर्गत चाचण्या सुध्दा घेतल्या.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, परीक्षा घेतल्या जाणार नाहीत हा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या शेवटी घेतला गेला होता त्यामुळे मुलांनी आता मिळवलेले गुण हे फुकटचे आहेत असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.
मित्रांनो, गेल्या वर्षभरात अनेक मुलांनी तर नोकरी गमावलेले पालक, जीव गमावलेले जवळचे नातेवाईक असे अनेक आघातसुद्धा सहन केले. परंतु तरीही त्यांच्या ‘अभ्यास’ या कर्तव्यात फरक पडू दिला नाही.
कदाचित बोर्डाच्या या निर्णय प्रक्रियेत अगदी प्रत्येक विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन झाले नसेलही, काहींना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर काही प्रामाणिक कष्ट केलेल्या मुलांवर अन्यायसुद्धा झाला असेल, पण या जागतिक महामारीच्या वातावरणात या सर्व बाबी दुय्यम स्थानी ठेवणे गरजेचे आहे.
या कोवळ्या मनांना उभारी देण्याची व त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.