खूप लोक व्यवसाय उद्योग शोधताना, सुरू करताना एक घोळ घालतात. तो घोळ घालण्यापासून दूर राहिलं तर बिझनेस बुडणार नाही याची खात्री राहते. तो घोळ म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग/उत्पादन या प्रोसेसला बिझनेस समजणं. हजारो, लाखो रुपये खर्च करून मशिनरी घेतात, प्रोडक्शन सुरू करतात आणि मग प्रश्न पडतो की हे केलेले उत्पादन विकायचं कसं? हे काही माझ्या मनाचं वाढीव सांगत नाही. हे खरोखरच होतं…
उदाहरण म्हणून दोघांची केस सांगतो.
एकाने कच्च्या तेलाच्या मशिनरी आणून उद्योग सुरू केला. त्यानंतर त्याला प्रश्न पडला आणि त्याने मला फोन केला, सर, माझं प्रोडक्शन महिन्यात इतकं इतकं होत आहे. विक्रीसाठी काही आयडिया द्या, दुस-याने कांदा वाळवणी यंत्र आणले आणि त्यानंतर मला फोन, सर हे उत्पादन झालंय पण विकायचं कसं, कुठे आणि कोणाला?
हे का होते?
नव्याने उद्योजक होऊ पाहणा-या तरुणांच्या घरात कोणी बिझनेस केलेला नसतो. कोणी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे नसते; जे असतात ते फक्त खिल्ली उडवतात किंवा भीती घालतात. त्यामुळे हे तरूण कोणाला विचारत नाहीत.
मशिनरी विकणारे जबरदस्त भूल पाडणारे मार्केटिंग करतात. ‘अमुक इतकं प्रोडक्शन महिन्यात निघतं, त्याला मार्केटमध्ये इतका भाव मिळतो, सर्व खर्च जाऊन तुम्हाला इतके हजार/लाख निव्वळ नफा मिळतो’ असं छान छान गोड गोड चित्र मशीन विक्रेते रंगवून सांगतात.
आपले तरूण ह्यातल्या ‘नफा’ शब्दावर पूर्ण लक्ष देतात, पण ‘मार्केट’ शब्दावर अजिबात देत नाहीत. खरा धंदा, बिझनेस हा विक्रीचाच असतो हे सगळी गुंतवणूक केल्यानंतर लक्षात येते, तोवर उशीर झालेला असतो. आपल्याला मार्केटिंग, सेल्स, जाहिरात, बिझनेस-नेटवर्किंग ह्यातलं काहीच येत नसेल, माहिती नसेल तर धंदा हमखास बुडणार यात नवल नाही.
कोणत्याही उत्पादकाची सर्वात मोठी चिंता ही नसते की ‘प्रोडक्शन कसं होईल’, त्याची चिंता असते की ‘ऑर्डर कशी येईल!’ त्यामुळे नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी मार्केटिंग आणि सेल्स ह्यात प्राविण्य मिळवणं सर्वात जास्त आवश्यक आहे हे कायम लक्षात ठेवावं.
आपल्या मराठी पोरांना इतर व्यापारी समाजासारखी पोषक इकोसिस्टिम उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी भावनेच्या भरात स्वतःचं कोणत्याही प्रकारे नुकसान करून घेऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जोवर तुमच्याकडे खात्रीपूर्वक नियमित ऑर्डर्स येत राहतील अशी परिस्थिती तयार होत नाही तोवर प्रोडक्शन मशिन्स विकत घेऊन उद्योग सुरू करण्याच्या फंदात पडू नये… भले ती कितीही स्वस्त, उधारीवर, कर्जावर, हप्त्यांवर मिळत असू देत. मशीन विक्रेत्यांच्या जाळ्यात अडकू नका.
ज्यात उद्योग करायचा आहे त्यांचे उत्पादक शोधून त्यांचे प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न सुरू करा. हळूहळू मार्केट लक्षात येते. आपली ओळख निर्माण होते. नंतर मशिनरी वगैरेचा विचार करावा.
(एकदम नवीन आणि स्वतः संशोधन केलेलं प्रॉडक्ट असल्यास वरील गोष्टी लागू होत नाहीत, तिथं मशिन्स आणि मार्केटिंग दोन्ही एकत्र लागतं.)