संकासूर आणि गुहागर यांचं वेगळं नातं आहे… शिमगा म्हटलं की आमच्याकडे संकासूर येतोच. तळकोकणात दशावतारामध्ये असणारा संकासूर हे छोटं पात्र आहे, पण इथे गुहागरमध्ये संकासूर म्हणजे उत्सव. देवांना विद्याप्राप्ती, वेदांचा अभ्यास व विद्यप्राप्तीचा अधिकार होता. पण संकासुराने या सर्वांचा अभ्यास केला. वेद, शास्त्र, पुराण ग्रंथ पळवून समुद्रात शंखामध्ये लपून बसला, अशी आख्यायिका सांगितली जाते. विद्याप्राप्तीची बंडखोरी संकासुराने केली, म्हणून नंतर विष्णूने त्याचा वध केला. कोकणात बहुसंख्य बहुजन वर्ग अल्पशिक्षित-अत्यल्प भू-धारक यांनाही पूर्वी शिक्षणाचा अधिकार नव्हता. अधिकार फक्त सवर्ण ब्राम्हणांना, ही वस्तुस्थिती झाली. आमचा हाच बहुजन वर्ग संकासुराला श्रद्धास्थान मानतो, नाचतो गातो; सागोती खाऊन त्याचा उत्सव करतो, कारण त्याने ज्ञानप्राप्तीसाठी केलेली बंडखोरी प्रेरणादायी वाटते. पेरियायारांनी तमीळमध्ये द्राविडी संस्कृतीमधील अनेक गोष्टी विस्ताराने मांडल्या.
आता हे लिहिण्याचे कारण म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना संकासूर म्हटलं आहे. भास्कर जाधवांचा मी वैचारिक आणि राजकीय विरोधक आहे, त्यांच्या विरोधात सभा घेतल्या, प्रचार केला आहे. मुळात दोन्ही आमदार आमच्या कोकणातले आहेत आणि आपल्या प्रतीकांबद्दल त्यांनी जबाबदारीने व्यक्त व्हावं एवढंच वाटतं. बाकी एवढ्या भावना नाजूक नाहीत की त्या दुखावल्या जाव्या. एकमेकांच्या राजकीय कुरघोडीत आपण कोकणातल्याच प्रतीकांबद्दल चुकीचं तर व्यक्त होत नाही ना, हे भान असावं.