• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अवघे गर्जे पंढरपूर

कोरोनामुळे बहुतेक वारकरी घरातूनच विठुरायाची आळवणी करीत आहेत

ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर by ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर
July 14, 2021
in सोपी पायवाट
0
अवघे गर्जे पंढरपूर

या वर्षी वारी निघाली असती, तर काय झाले असते?… पंढरपुरात, चंद्रभागेच्या वाळवंटात काय चित्र दिसले असते?
टाळोटाळी लोपला नाद ।
अंगोअंगी मुरला छंद ।।
असा रोमारोमातून सावळ्या विठूच्या भक्तीरसाचा कल्लोळ उचंबळून आला असता. पताकांचे भार, मिळाले अपार, असे पंढरपूरचे दृश्य दिसले असते. शेकडो मैलांचा प्रवास संपवून पंढरपुरात दाखल होताच अवघाचि संसार सुखाचा झाल्याचा आनंद वारकर्‍यांना झाला असता. मात्र कोरोनामुळे बहुतेक वारकरी घरातूनच विठूरायाची आळवणी करीत आहेत, तर मोजके वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. असे काय आहे या पंढरपुरात? तर तिथे आहे समदृष्टी असणारा सावळा विठुराया!
—-

चला हो पंढरी जाऊ ।
जिवाच्या जिवलगा पाहू ।।
असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्‍यांना झाला असता. पण कोरोनामुळे अनेक वारकर्‍यांची ही वारी सलग दुसर्‍यांदा चुकली आहे. ‘चुकलिया माय । बाळ हुरहूरा पाहे ।’ अशी वारकर्‍यांची अवस्था झाली आहे. कारण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मला विसरू नका, अशी आळवणी याच खुद्द पाडुरंगानेच केली असल्याची नोंद नामदेव महाराजांनी करून ठेवलेली आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगतसे गूज पाडुरंग ।।
इतर दैवते आणि त्यांचे भक्त यांच्यात आणि विठुराया आणि त्यांच्या भक्तात एक महत्वाचा फरक आहे. इतर दैवतांच्या भेटीसाठी केवळ भक्त व्याकूळ होतात. इथे मात्र भक्त पाडुरंगाच्या भेटीसाठी जेवढे उत्सुक असतात आणि विरहाने जितके व्याकूळ होतात तीच अवस्था, तितकीच अस्वस्थता आणि उत्सुकता विठुरायाच्या मनातही दिसते. पंढरीत पोहचेपर्यंत
माहेरच्या मुळा लेकी आसावली ।
पाहतसे वाटुली माऊलीची ।।
अशी वारकर्‍यांची अवस्था असते. तर पंढरपुरातून परत निघाल्यानंतर
कन्या सासुरासी जाय ।
मागे परतोनी पाहे ।।
अशी व्याकुळता दिसते. ही वारकर्‍यांची अवस्था आहे. यापेक्षा वेगळी अवस्था पाडुरंगाची नसते. वारकरी परत निघतात तेव्हा पाडुरंग किती कासावीस होतात, याचे वर्णन नामदेव महाराजांनी करून ठेवले आहे. पाडुरंग म्हणतात, पतितपावन असा माझा डांगोरा आहे, पण हे सगळं मोठेपण तुमच्यामुळे आहे.
पतित पावन मी तो आहे खरा ।
तुमचेनी बरा दिसतसे ।।
आता आषाढी वारी संपवून तुम्ही गावाला निघालेले आहात. पण, माझ्या जिवाला मात्र हुरहूर लागलेली आहे.
तुम्ही जाता गावा हुरहूर माझ्या जीवा ।
भेटाल केधवा मज लागि ।।
अशी व्याकुळता व्यक्त केल्यानंतरही वारकरी जेव्हा गावाकडे निघतात तेव्हाची अवस्था नामदेव महाराज मांडतात-
धावोनिया देव गळा घाली मिठी ।
स्फुन्दुन गोष्टी बोलतसे ।।
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी ।
म्हणे चक्रपाणी नामयासी ।।
भगवंताची ही अवस्था आहे, तर वारकरी तितकेच पाडुरंगाच्या ओढीने व्याकूळ झालेले असतात. ऊन, वारा, पाऊस यांचा मारा झेलत, सगळ्या शारीरिक, मानसिक, संसारिक व्यथा-वेदना विसरून पंढरपुरात पोहोचताच
भाग गेला शीण गेला ।
अवघा झालासे आनंद ।
अशी अनुभूती त्यांना येते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात-
उदंड पाहिले उदंड ऐकिले ।
उदंड वर्णिले तीर्थ महिमे ।।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ।
ऐसा विठेवर देव कोठे ।।
तुकाराम महाराज म्हणतात, मी खूप तीर्थे पाहिली, खूप तीर्थांचे वर्णन ऐकले. पण अशी चंद्रभागा असा पाडुरंग आणि असे त्याचे भक्त कुठेच दिसले नाहीत. किंबहुना तुम्हाला कुणाला असे तीर्थक्षेत्र दिसले का? असे आव्हानच तुकाराम महाराज देतात. इतकेच नव्हे भाविकाला तुकाराम महाराज सल्ला देतात की बाबा तुला खरच सुखाची तळमळ असेल तर तू एकदा पंढरपूरला जा.
सुखालागी करीशी तळमळ ।
तरी तू पंढरीशी जाय एक वेळ ।।
मग तुला केवळ सुख नाही मिळणार, तर तूच सुखरूप होऊन जाशील, असा विश्वास महाराज देतात. काहीजण पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात. पण तुकाराम महाराज ठामपणे सांगतात की केवळ काशीच नाही तर काशी, गया, द्वारका ही सर्व तीर्थे एकत्र केली तरी पंढरीची बरोबरी करू शकत नाहीत.
वारानसी, गया । पाहिली द्वारका ।
परी न ये तुका । पंढरीचा ।।
किंबहुना एकट्या चंद्रभागेला नुसतं डोळ्यांनी पाहिले, तरी सर्व तीर्थे घडतात, असा विश्वास देताना तुकाराम म्हणतात-
अवघीच तीर्थे घडली एक वेळा ।
चंद्रभागा डोळा देखलिया ।।
इतकंच नव्हे, तर सर्वच संतांनी पंढरपुराला ‘भूवैकुंठ’ असे म्हटलेले आहे. निळोबाराय म्हणतात-
चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ।।
आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर पाऊल ठेवणार्‍या माणसाची इच्छा असायची की वैकुंठाला गेले पाहिजे. पण निळोबाराय सांगतात, चंद्रभागेचे वाळवंटच वैकुंठ आहे. निवृत्तीनाथ महाराज तर त्याही पुढे जाऊन सांगतात- पंढरपूर हेच एकमेव वैकुंठ आहे. इतर नुसता बोभाटा आहे.
एक पंढरी वैकुंठ ।
येर अवघे बोभाट ।।
आता हे पंढरपूर वैकुंठाच्या बरोबरीचे कसे काय झाले याचे उत्तर देताना एकनाथ महाराज सांगतात-
वैकुंठीचे वैभव पंढरीशी आले ।
भक्ते साठविले पुंडलिके ।।
अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पंढरपुरालाच वैकुंठ म्हणून सिद्ध करण्याची किंबहुना वैकुंठापेक्षाही पंढरपुराचे महत्व अधिक पटवून देण्याची धडपड संतांनी का केली असेल? त्याचे कारण आहे, वैकुंठ आणि स्वर्ग या पारलौकिक सुखाची लालूच आणि नरकयातना आणि जन्ममृत्यूचा धाक दाखवून समाजाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. वारकरी संतांनी स्वर्ग आणि वैकुंठ या पारलौकिक सुखालाच तुच्छ ठरवून टाकले. त्यातूनही कुणाला वैकुंठाला जाण्याची इच्छा झालीच तर पंढरपूर हे वैकुंठच असल्याचे ठामपणे ठसविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वैकुंठाला पर्याय पंढरपूर दिले. एकाही वारकरी संताने भगवंताकडे स्वर्ग अथवा वैकुंठाला जाण्याची अपेक्षा केलेली नाही. नामदेव महाराजांनी तर स्पष्ट शब्दांत वैकुंठ नाकारला. नव्हे त्याला तुच्छ ठरविले. नामदेव महाराज म्हणतात-
वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी ।
वास दे पंढरी सर्वकाळ ।।
म्हणजे अनादी काळापासून जो वैकुंठाचा डोलारा उभा केलेला आहे त्याची थोरवी नामदेव महाराज एका झटक्यात उतरवून पंढरीत राहण्याचा हट्ट धरतात. नामदेव महाराजांना विचारले की वारकरी संत परंपरेपूर्वी तर आध्यात्मिक वाटचाल करणाराला स्वर्ग आणि वैकुंठालाच जाण्याची इच्छा होती. आता तुम्ही मात्र तिकडे पाठवू नका असं म्हणता! असं का?
मग नामदेव महाराज सांगतात की जे वैकुंठाला जाऊ इच्छितात, त्यांना तेथे काय आहे ते माहिती नसेल.. तिथल्या कल्पिलेल्या गोष्टींचा त्यांना मोह होत असेल. मग नामदेव महाराजांना विचारले, बरं जे वैकुंठाला जाऊ इच्छितात त्यांना तिथे काय आहे, हे माहीत नाही म्हणता, मग तुम्हाला तरी वैकुंठाबद्दल माहिती आहे का? यावर नामदेव महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात, हो मला माहिती आहे. वैकुंठ हे जुनाट झोपडी आहे.
वैकुंठ खोपट जुनाट झोपडी ।
तेथे आडाआडी घालू नको ।।
वैकुंठ ही जुनाट झोपडी असल्याने त्याच्याविषयी आम्हाला कोणतेही आकर्षण नाही, असे सांगून ज्या वैकुंठाची लालूच दाखवून भोळ्याभाबड्या लोकांचे शोषण केले जात होते, त्या वैकुंठाला तुच्छ लेखून त्याचे आकर्षण संपवून टाकण्यासाठी आम्हाला पंढरपुरातच ठेव असे सांगताना नामदेव महाराज म्हणतात,
वास दे पंढरी सर्व काळ ।

वैकुंठाप्रमाणेच दुसरे स्वर्गाचे आकर्षण दाखविले जाते. इथे जिवंतपणी सर्व सुखाचा त्याग केला, तर स्वर्गात उच्च भोग भोगायला मिळतात, असे वर्णन केले जायचे. त्याला तुकाराम महाराज मोठा धक्का देतात. तुकाराम महाराज सांगतात, स्वर्गात जे अमर होऊन राहिले आहेत, ते तिथे कंटाळले असून मृत्युलोकात येण्याची इच्छा आता ते व्यक्त करू लागले आहेत.
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा ।
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ।।
म्हणजे पारलौकिक सुखाचा जो डोलारा निर्माण केला होता, त्याला सहज धक्का देऊन त्याचे आकर्षण कमी करून सुधारणावादाची रुजवात संतानी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
मी अशी कीर्तनातून मांडणी करू लागतो, तेव्हा काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही हिंदू असून आपल्याच स्वर्ग-वैकुंठाबद्दल तुच्छतेची भावना समाजात निर्माण करता. असा एक तरी इतर धर्मातला माणूस आहे का, जो आपल्या धर्मातील पारलौकिक सुखाबद्दल तुच्छ भावना निर्माण करतो. तेव्हा असे विचारणाराला मी सांगतो की, एक तर वैकुंठ आणि स्वर्गाला मी नव्हे, तर तर आपल्या संतशिरोमणींनी तुच्छ लेखलेले आहे. आणि इतर धर्मातील पारलौकिक सुखाला त्या धर्मातील लोक कमी लेखतात का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, कोणत्याही धर्मातील विचारवंत आपल्या धर्माची चिकित्सा करतात. जवळपास सर्वच धर्मात पारलौकिक सुखाच्या संकल्पना रंगविल्या आहेत आणि त्या सुखाची लालूच दाखवून धर्माचे ठेकेदार सामान्य भाविकांची दिशाभूल करतात. आज मुसलमान धर्मात जे धर्मांध तरुण इस्लामच्या नावाखाली आत्मघातकी अतिरेकी कारवायामध्ये सहभागी व्हायला तयार होतात, त्यांच्याही मनावर बिंबविलेले असते की, इथे जर तुम्ही धर्मासाठी मेलात तर तुम्हाला जन्नतमध्ये जागा मिळेल. काय असतं जन्नत आणि स्वर्गामध्ये? जन्नतमध्ये असतात ‘हूर’. हूर म्हणजे अत्यंत देखण्या तरुणी. आणि स्वर्गात काय असतं? अप्सरा! म्हणजे काय तर देखण्या स्त्रियाच! म्हणजे इथे जीव द्यायचा आणि परलोकात भोग भोगायचे. पण सर्वच धर्मातील चिकित्सक लोक अशा पारलौकिक सुखाचा फोलपणा उघडा करतात. आमचे नामदेव महाराज जसे वैकुंठाला झोपडी म्हणतात, तसेच इस्लाममधील जन्नतबद्दल मुस्लिम धर्मातील प्रसिद्ध शायर गालिब म्हणतात-
हमको मालूम है जन्नत की हकिकत लेकिन
दिल को खूष रखने को
गालिब ये खयाल अच्छा है ।
गालिब म्हणतात, जन्नतमध्ये काय आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण मनाच्या समाधानासाठी ते सर्व ठीक आहे.
वैकुंठ आणि स्वर्गसुखाबरोबर भक्तजनांना मोक्ष आणि मुक्तीची लालूच दाखविली जात होती. तो मोक्ष मिळविण्यासाठीही अत्यंत कडक अशी कर्मकांडे सागितलेली होती. तपसाधना सांगितलेली होती. मात्र वारकरी संतांनी मोक्ष मिळविण्यासाठीसुद्धा इतर कर्मकांडांची गरज नाही असं सांगितलं. नुसतं पंढरपुरात येऊन सावळ्या विठुरायाच्या मंदिराचा नुसता कळस पाहिला तरी मोक्ष मिळेल, असा विश्वास तुकाराम महाराजांनी दिला आहे.
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस ।
तात्काळ हा नाश अहंकाराचा ।।

अन्य ठिकाणी तर भक्तीसुखाच्या आनंदासाठी आम्ही मोक्षपद तुच्छ करून टाकले आहे. किंबहुना पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा कोण्ाताही धाक आम्हाला नाही, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-
मोक्षपद तुच्छ केले या कारणे ।
आम्हा जन्म घेणे युगायुगी ।।
मोक्षाची लालूच दाखविली जात असतानाच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात खूप मोठे दु:ख आहे, असे सांगून त्यातून सुटका करून घेण्यासाठी वेगवेगळी कर्मकांडे सांगितलेली आहेत. पण वारकरी संतांनी जन्ममृत्यूचे भयही झुगारून दिले. आम्ही युगेयुगे जन्म घेऊ, असे सांगून तुकाराम महाराज त्या धाकातून लोकांची मुक्तता करतात. त्यासाठी कितीही वेळा आपल्याला सुखाने गर्भवासाला घालावे, आपण त्याला घाबरत नाही, असे महाराज म्हणतात-
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ।।
या गर्भवासाचे भय धरणार नाही, त्यातून मुक्त करावे, अशी याचना करणार नाही, असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-
न ये काकुळती गर्भवासासाठी ।
न धरी हे पोटी भय काही ।।
अशा तर्‍हेने मोक्षाचे आकर्षण आणि गर्भवासाच्या कथित दु:खाचे भय वारकरी संत झुगारून देतात. त्यानंतर लालूच असते ती मुक्तीची! पण पंढरीचे वारकरी कधी मुक्तीची अपेक्षा करीत नाहीत. त्यातून कुणाला मुक्तीची अपेक्षा असलीच आणि तो कितीही पापी असला, कोणत्याही जातीचा असला तरी त्याने केवळ विठ्ठलमूर्ती पाहिली तर तो मुक्त होतो, असे एकनाथ महाराज सांगतात-
हीन दीन पापी होतु का भलते याती ।
पाहता विठ्ठल मूर्ती मुक्त होती ।।
थोडक्यात काय तर वैकुंठ, स्वर्ग, मोक्ष, मुक्ती या सर्व गोष्टीसाठी पंढरपूर हाच सोपा पर्याय दिला.
पंढरपूर या भूवैकुंठाची वारी ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मानवी मूल्यांची पायवाट ठरत आहे. केवळ वारीत दिसणारा हा बंधुभाव, विवेकी विचार, चारित्र्यसंपन्नता खर्‍या अर्थाने समाजामध्ये रुजेल, तेव्हा संतांनी पाहिलेले आनंदी समाजाचे स्वप्न साकार झाले, असे म्हणता येईल. तो दिवस यावा यासाठी सतत संतविचारांचा जागर करू या!

– ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी परंपरेतील नामांकित कीर्तनकार आहेत)

Previous Post

बाप्पा : दीपक शिर्के

Next Post

उकड, मोकळ भाजणी, खिचू

Next Post

उकड, मोकळ भाजणी, खिचू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.