सिनेमा – जून – मराठी
प्रदर्शित होणारं ओटीटी माध्यम – प्लॅनेट मराठी – मराठी
आणि जाहिरातीत फक्त दोनच शब्द मराठी- ‘जून’ आणि ‘मराठी’.
काय भारीच जाहिरात आहे ना?
बहुधा जाहिरातीचं मराठी डिझाईन करण्याएवढा बजेट निर्मात्याकडे नसावं!
काल नेटफ्लिक्सवर धनुषचा ‘सुरुली’ सिनेमा पाहिला. स्थलांतरित तामीळ लोकांवरचा सिनेमा. निम्म्याहून अधिक सिनेमा घडतो लंडनमध्ये. स्थलांतरित तामिळींसाठी लढणारा शिवदास हातात पेरियारांचं पुस्तक वाचताना एका प्रसंगात दिसतं. तर शिवदासचा अंतिम संस्कार लंडनमध्ये तामिळ पद्धतीने संगीताच्या तालावर नाचत करताना दुसऱ्या प्रसंगात दिसतं. लंडनमध्ये हे प्रसंग दाखवताना दिग्दर्शकाला ‘आपल्याला बाकीचे काय म्हणतील’ असं वाटत नाही. आपल्याकडे नुसती जाहिरात करतानाही भाषेचं ‘खूपच’ दडपण येतं, असं दिसतंय. काल ‘सिलिंडरमॅन’ची बातमी पाहिली. अंबरनाथमधील कुणी जाधव नावाची व्यक्ती. पिळदार शरीरयष्टीचा जाधव गॅस सिलिंडर उचलून नेतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाला म्हणे. तो जाधव सांगत होता की लोकं ‘गॅसवाला’ म्हणायचे तेव्हा बरं वाटायचं नाही. आता ‘सिलिंडरमॅन’ म्हणतात, तेव्हा खूप भारी वाटतं! ‘गॅसवाला’ आणि ‘सिलींडरमॅन’ अर्थ एकच ना?
मग एक ‘ठीकैय’ आणि दुसरं ‘भारी’?
हे म्हणजे सफाई कामगाराला स्वीपर म्हटल्यावर भारी वाटतं असं म्हणण्यासारखं झालं.
अर्थात जाधवसारख्या सर्वसामान्य लोकांचे चुकत नाही. समाजातली सुशिक्षित, सुसंस्कारी, प्रतिष्ठित, श्रीमंत वर्गातली आडनावाने मराठी माणसं जेव्हा स्वत:च्या भाषेबाबत ‘माती खातात’ तेव्हा सर्वसामान्यांवरही त्याचा तसाच परिणाम होणार ना?
बाकी तुम्ही ‘जून’ अवश्य पहा बरं का, खूप चांगला सिनेमा आहे असं ‘म्हणतात’!