थोर साहित्यिक, विचारवंत अशी एक वेगळी जमात समाजात आहे, असं समजल्या जाते. का कोण जाणे… खरं म्हणजे चेहरा उभट करता येत नसला तरी समाजात प्रत्येक जण विचार करतच असतो. पाच मिनिटं मन निर्विचार व्हायला हजारो मिनिटं तपश्चर्या करावी लागते महाराज..!
आजचीच गोष्ट घ्या ना… आज चहामधे खारी बिस्कीट बुडवून खायचा मी विचार केला. लगेचच अमलातही आणला. एक बिस्कीट बुडवून खाल्लंही… मग अजून एक बिस्कीट बुडवायचा विचार केला… कारण चहा बरा झाला नव्हता… वायच जरा रापला होता. मग गंमत अशी झाली की दुसरं बिस्कीट बुडवल्यावर चहा जवळपास संपला…
आलं लक्षात?
सिच्युएशन लक्षात घ्या…!
मग माझ्या मनात असा विचार आला की जीवन हे असंच चहाच्या कपाप्रमाणे आहे. आपण टाइमपास म्हणून सटरफटर गोष्टी करत राहतो आणि त्यातच आयुष्य संपून जातं. निव्वळ खरंखुरं आयुष्य (फक्त चहा) जगायचंच राहून जातं! ते मनातलं आयुष्य जगायचं लांबणीवर पडत जातं. एकंदरीत आपण आयुष्याचा गांभीर्याने विचार करत नाही… हा विचार माझ्या मनात आला. साध्या एक कप चहाने मला हा धडा शिकवला. म्हणजे मी एक प्रकारची विचारवंतीणच झाले.
अशा कित्येक गोष्टींचा आपण विचार करत असतो. कळत नकळत करत असतो. नवीन साडी विकत घेताना दहा वेळा विचार करतो आणि जुनी झाल्यावर कुणाला देताना वीस वेळा विचार करतो. साधं दूध ऊतू गेलं तरी या महिन्यात ही गोष्ट कितीदा झाली हा विचार आपण करतो. ओट्यावर सांडलेलं दूध बोक्याला विचारपूर्वक चाटायला लावतो. ते सिंकमधे किती वाहून गेलं असेल याचा अंदाज बांधतो. एक लिटर दूध नासलं (खरं तर हा भयाण अभद्र विचारही मला नको वाटतो) तर साधारण आपला एक दिवस नासला जातो. अर्धा लिटर दूध असेल तर साधारण अर्धा दिवस वाया जातो, असा हिशेब आहे. तोही अगदी विचारपूर्वक तीन वेळ बेरजा वजाबाक्या करून मी ठेवला आहे.
मग त्या नासलेल्या दुधात गूळ आणि हळदीचं पान घालून आपण शिजवतो. सगळ्यांना वाटीतून खायला देताना छान अगदी कलाकंदासारखी टेस्ट आहे नाही, असं आपणच म्हणून माल खपवतो… ही गोष्ट साधी नाही. यामागे एक उदात्त असा विचार आणि धोरणच असतं.
आणि तसं बघायला गेलं तर मोठमोठी नेते मंडळी सतत राष्ट्राचाच विचार करतात, असं कुठे आहे? ते पण आमच्यासारखा बर्याच वेळा स्वत:चा विचार करतात. साधारणपणे एक तासातील सत्तेचाळीस मिनिटं ते स्वत:चा विचार करतात आणि उरलेली तेरा मिनिटं हा विचार राष्ट्राशी कसा जोडता येईल याचा विचार करतात. याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
ज्यावेळी मी स्वत:ला अत्यंत मामुली समजते किंवा मी अतिसामान्य आहे असं माझ्या लक्षात येतं तेव्हा मी असा विचार करते की आपण सामान्य आहोत म्हणूनच आपण साहित्याच्या, सिनेमाच्या, नाटकाच्या, कवितेच्या, राजकारणाच्या, बातम्यांच्या, वर्तमानपत्राच्या केंद्रस्थानी आहोत. आपणालाच गृहीत धरून लोकं एकगठ्ठा मतांचं राजकारण करतात. आपली मतं आपणाला कळायच्या आधी त्यांना कशी कळतात?
आमच्या जिवावरच घोटाळे महाघोटाळे होतात.
आमच्यासाठीच पावसाळ्यात कपड्यांचे महासेल लागतात.
आमच्या हमखास यशासाठीच मेरू अंगठी, लक्ष्मीयंत्र बनतं.
आमच्यासाठीच दोन मिनिटांत पोट कमी करणारे पट्टे बनतात.
दोन दिवसांत केस लांबसडक आणि काळेभोर करणारी तेलं बनतात… ती आमच्याचसाठी…
आमच्यासाठीच कित्येक बुवा महाराज बुद्धिमत्ता आणि तपश्चर्या पणाला लावतात.
आमच्यामुळेच तद्दन भिकार सिनेमाही कोटीची उलाढाल करतात.
आमच्यामुळेच टुकार सिरिअलींची वर्षानुवर्षे बाळंतपणं होतायत.
आणि अशा बातम्यांमुळेच लाखो पेपर खपतात आणि न्यूज चॅनेलं चौवीस तास सुरू राहतात.
पुलंनी म्हटलंय तसं ताटातल्या पाचही वाट्या खिरीने भरलेल्या असतील तर त्याला काय चव येणार! म्हणजेच आपलं सामान्यपण खूप मोलाचं आहे. आपण थोर थोर विचारवंत नसलो तरी साधे सालस विचारवंत नक्कीच आहोत. कसल्याही उचापती लांड्यालबाड्या न करता सामान्य राहाणं ही गोष्ट सामान्य नाहीये.
हा थोर विचार सकाळी सकाळी माझ्या मनात आला आणि कळशा लख्ख घासून चार वेळा पाणी भरून मी पोळ्यांसाठी मनसोक्त पीठ भिजवायला घेतले.
– सई लळित
(लेखिका खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत.)