पायघोळ धोती, झब्बा नि शाल घेतलेले आनंदबाबू टांग्यातून उतरले ते कुठे? कलकत्त्यातील मॉडर्न रंभा-उर्वशी-मेनकांच्या गल्लीत. बरेच तर्रर्र झालेले होते, पण त्यांना वातावरण जरा निराळे वाटले. टांगेवाल्याला ते म्हणाले देखील ‘अरे कौनसी जगह तुम लेके आये मुझको?’ टांगेवाल्याने सीधासाधा जवाब दिला! ‘साहब, आपने ही कहा, कहीं भी लेके चलो!’ आनंदबाबू आपल्या पायघोळ धोतीत लडखडणारे पाय आपल्या नेहमीच्या तंद्रीत कसेबसे टांग्यात ठेवणार इतक्यात ते एक मीठी आवाज सुनतात- ‘रैना बीती जाये… श्याम न आये…’ त्यांच्या टांगा टांग्यात न चढता त्या आवाजाच्या रोखाने जातात. आनंदबाबू पुष्पाच्या त्या गीताने इतके बेहोष होतात की त्यांचं जाणं येणं नियमित चालू राहतं.
आनंदबाबू – एक कलकत्त्यातले श्रीमंत. बायको क्लब- डिनर पार्ट्या इत्यादी कार्यक्रमात मश्गुल असल्यामुळे त्यांना साधी धोतीच काय, पण सिगरेट शिलगवायला काड्याच्या पेटीत काडी मिळत नाही. सहाजिकच मनाच्या समाधानासाठी शराब नि हा एक नवा आवाज-पुष्पा.
पुष्पा – खेडेगावातली तरुणी. पण मूल होत नाही म्हणून नवर्याने दुसरी शादी करून घराबाहेर काढलेली. आई गावातल्या हलकट लोकांचं ऐकून हाकलून देते नि एक बदमाष इसम तिला ‘या’ व्यवसायात ढकलून देतो. आनंदबाबूसारखा सज्जन माणूस तिला भेटतो नि छोट्या नंदूची गाठ पडते.
नंदू – पुष्पाच्याच गावच्या एका इसमाच्या पहिल्या बायकोचा मुलगा. नंदूची सावत्र आई त्याला इतकी छळते की त्याला पुष्पाचा आधार मिळतो. आईचं प्रेम मिळतं, पण नंदूच्या वडलांची बदली होते नि त्यांची ताटातूट होते.
आनंदबाबू, पुष्पा नि नंदू असे हे तिघेजण. तसे यांचे एकमेकांशी संबंध नाही. पण प्रत्येकाच्या काही व्यथा नि प्रेम न मिळाल्यामुळे ते एकत्र आले. मध्यंतरीच्या काळात ते एकमेकांपासून दुरावले, पण शेवटी पुनः एकत्र आले. एका निर्व्याज प्रेमाचा एक शानदार नमुना.
गल्लाभरू चित्रपट तयार करणारे शक्ती सामंता यांनी बंगाली कथेवरून हे चित्र बनवलंय. चित्राची प्रकृती संथ आहे. कुठेही ‘तडजोड’ केलेली नाही. काही ठिकाणी त्यांना पहाणार्या लोकांना पटण्यासाठी थोड्या उड्या माराव्या लागल्या, पण त्या माराव्या लागतातच. कारण राजेश खन्ना नि शर्मिला टागोर हे कलाकार म्हटले म्हणजे ‘आराधना’ची अपेक्षा बाळगणारे तो चष्मा लावून जाणारच. त्यांची ती इच्छा पुरी कशी होणार? म्हणून काय सामंतानी निराळ्या प्रकारची चित्रं बनवूच नाही? चित्रं त्यांची कैक गाजलीत की ते आता ‘प्लस’मध्ये आहेत. हे चित्र ‘मायनस’मध्ये गेलं तरी त्यांचं काहीच बिघडणार नाही. कारण नेहमी चित्रपट पहाणारा ‘मॉब’ या चित्राला मिळणं कठीण आहे हे त्यांना माहीत आहे. याला ‘मास’ मिळणार नाही ‘क्लास’ मात्र जरूर मिळेल. पण याने शेवटी एकच गोष्ट होईल. शक्ती सामंता आपली शक्ती यापुढे गल्लाभरू चित्रपटासाठी वापरतील. त्यांच्या मनात कितीही असलं तरी या मार्गाने जाणार नाही. पण होणार काय? ‘आम्हाला दर्जेदार चित्रं हवीत’ अशी बोंब मारणार्यांची मात्र ‘बोंब’ रहाणारच!
सामंतांनी हे चित्र बनवताना तडजोड केली नसली तरी मोडतोड केलीय. स्टोरीच्या बाबतीत. पुष्पाला नवर्याने घराबाहेर हाकलून दिलं एवढं पुरं होतं. पण त्याने जळक्या पाठीवर मारलेले डाग मात्र त्यांनी दुसर्याच ‘शॉट’ला साफ पुसून टाकले. थोडक्यात बारीक बारीक गोष्टीतही त्यानी ‘कंटिन्युइटी’ नावाची चीज साफ दुर्लक्ष केलेली आहे. अशा अनेक घटना दाखवता येतील. पण स्टोरीतील नवीनता पहाता त्याचा उल्लेख न करणे बरे.
आर. डी. बर्मन यांचे संगीत चांगले. फोटोग्राफीने स्टुडिओत ‘हावडा ब्रीज’चे शूटिंग करून एडिटिंगमध्ये जे खरे शॉट्स ‘मॅचिंग’ केलेत ते झकास! कामाच्या बाबतीत राजेश खन्नाने आपली स्टाईल ठेवलीय पण तो असित सेनच्या स्टाईलीत बर्याच वेळा का बोललाय ते समजत नाही. कलकत्त्यात याच स्टाइलीत प्रत्येकजण बोलतो का? शर्मिलाने पुष्पाला न्याय दिलाय. विनोद मेहराने आपल्या कामापेक्षा आपल्या केसांकडे जास्त लक्ष दिलंय. इतर कलाकार उत्तम. अरे हो, ओमप्रकाशची छोटीशी भूमिका ‘पाणीपुरी-व्हिस्की’ गंमत आणते.
थोडक्यात हे ‘क्लास’ पिक्चर क्लाससाठी आहे ‘मास’साठी नाही.